Quick Reads

फलसफी: तत्त्वज्ञानाच्या वर्गातलं द्वंद्व

आलान बाद्यु यांच्या व्याख्यानांवर आधारित लेखमालिका: भाग ३

Credit : MR Online

आलान बाद्यु यांच्या पहिल्या व्याख्यानावर आधारित याआधीच्या दोन लेखांमध्ये आपण पाहिले की बाद्यु दोन प्रश्नांची चर्चा करतात: 

१. तत्वज्ञानाची व्याख्या काय? 

२. तत्त्वज्ञानाचं उद्दिष्ट काय?

दुसऱ्या व्याख्यानात बाद्यु नव्या दोन प्रश्नांची चर्चा करतात: 

१. एक वृध्द तत्त्ववेत्ता तरुणांशी का संवाद साधत आहे? 

२. तत्वज्ञानाचा इतिहास त्याचा वर्तमान आणि भविष्य यांचा काय संबंध आहे?

पहिल्या प्रश्नाची सोडवणूक बाद्यु, तत्वज्ञान म्हणजे  जीवनचरित्र या विचारानं करतात. अर्थात बाद्यु इथं 'जिवनचरित्र' फक्त व्यक्तिगत जीवनाच्या अर्थानं वापरत नाहीत, तर 'ऐतिहासिक आणि तत्वज्ञानात्मक जिवनचरित्र', या अर्थाने वापरतात. बाद्युच्या जीवनातील ऐतिहासिक संदर्भात दुसरं महायुद्ध, चीनची क्रांती, अल्जेरिया आणि व्हिएतनाममधील साम्राज्यवादविरोधी युद्ध, फ्रांसमधील मे '६८ इत्यादी घटनांचा समावेश होतो तर याच सोबत रुझवेल्ट, चर्चिल, दु गॉल, स्टॅलिन, केनेडी, कॅस्ट्रो आणि चे इत्यादी व्यक्तींचा ही समावेश होतो. साहजिकच ही फक्त नाव नाहीत किंवा घटनांचा लेखाजोखा नाही, या नावांमधून या घटनांमधून मानवी इतिहासातील महान शतक बनलेलं आहे, जन्माला आलेलं आहे. 

बाद्युचा हा अनुभव आणि आपला अनुभव नक्कीच वेगळा आहे या बद्दल शंका नसावी. बाद्यु जसा ऐतिहासिक अनुभव मांडतो तसाच तो त्याचा तत्वज्ञानाचा अनुभवदेखील आपल्या समोर कथन करतो. बाद्युचं तत्वज्ञानात्मक जीवनचरित्र हे २०व्या शतकातील तत्वज्ञानाच्या इतिहासाबद्दल आहे, बाद्यु या इतिहासाला चार क्रमांमध्ये आपल्यासमोर मांडतो ते असं: 

बाद्युची तत्वज्ञानाशी ओळख साधारणपणे १९५० च्या सुमारास होते, या काळातील तत्वज्ञानातील प्रस्थापित तत्वज्ञान Phenomenology हे आहे आणि या विचारातील महत्त्वाचे तत्त्ववेत्ते म्हणजे Husserl, Heidegger, Sartre, Merleau-ponty इत्यादी लोक आहेत. या काळातील मुख्य संकल्पना जाणीव (consciousness), व्यक्तिनिष्ठता (subjectivity) या आहेत आणि या परंपरेतील मुख्य प्रश्न, 'स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय?' हा आहे. तत्वज्ञानाचं हे द्वंद्व, Phenomenology आणि positivism or Philosophy of science या दोन परंपरामधलं होतं.  

यानंतरचा जो क्रम किंवा टप्पा आहे, तो साधारणतः १९६०-७० च्या दरम्यान फ्रांस मध्ये उदयाला येतो. या परंपरेला फ्रांस मध्ये संरचनावाद (structuralism) असं म्हणतात, तर या विचाराचे प्रचलित नाव 'फ्रेंच थिअरी' हे आहे. संरचनावाद म्हणजे संरचनेचे तत्वज्ञान अथवा वस्तुनिष्ठ संरचनेचे तत्वज्ञान व त्याच सोबत भाषेचं तत्वज्ञान होय. साधारणपणे हा विचार Phenomenology या तत्वज्ञानाची टीका होती आणि म्हणून संरचनावाद प्रामुख्याने स्व (subject), जाणीव (consciousness) या दोन प्रमुख संकल्पनांची टीका आहे. याचा परिपाक म्हणून आपणाला फुको ची मानवतेची (humanity) टीका किंवा अल्थ्युझर यांची subjectivity या संकल्पनेची टीका इत्यादी विचार पहावयास मिळतात. बाद्युसाठी तत्वज्ञानाच्या परंपरेतील हे विशिष्ट द्वंद्व थोडं क्लिष्ट आहे कारण त्याचे दोन्ही मास्टर या काळात एकमेकांविरोधात ऊभे ठाकले होते - सात्र व अल्थ्युझर! 

यामुळंच बाद्युना संरचना आणि भाषा, या दोन गोष्टी 'स्व-निहित' करतात, हा 'जाणिवे'च्या विरोधातील जहाल विचार पचवणं थोडं अवघड गेलं आहे. यानंतरचा जो क्रम आहे, तो प्रामुख्यानं विखंडन (deconstrction) व उत्तर-आधुनिकता (Post modernity) या नावानं ओळखला जातो. हा विचार प्रामुख्यानं 'तत्वज्ञानाचा अंत' या अनुषंगानं प्रख्यात आहे, पण इथं अंत, पुर्वी सांगितल्याप्रमाणं विश्लेषणात्मक तत्वज्ञानाच्या परिसमाप्ती किंवा निष्कर्षासारखा नाही. या तत्वज्ञानाचा मुळ विचार असा होता की तत्वज्ञान मुळातच परिसमाप्त आहे, अभिजात तत्वज्ञानाची सुरवातच परिसमाप्ती मधून झालेली आहे. आणि या परिसमाप्तीचं नाव आधिभौतिकशास्त्र (Metaphysics) हे आहे. (आधिभौतिकशास्त्र ही तत्वज्ञानाची मुख्य शाखा आहे, याचा एक भाग सत्ताशास्त्र - ontology म्हणून ओळखला जातो. या मध्ये प्रामुख्यानं theory of being, causation, theory of self, theory of arch principle इत्यादी प्रश्नांची सोडवणूक केली जाते. साधारणपणे विखंडन व उत्तर आधुनिकता हे विचार anti-foundational विचार म्हणून ओळखले जातात. या परंपरेतील महत्त्वाचे तत्त्ववेत्ते म्हणून आपण देरिदा, ल्योतार इत्यादी लोकांची नावं घेऊ शकतो. 

विखंडन आणि उत्तर-आधुनिकता हे दोन्ही विचार संरचनावादाची टीका आहेत. मुळात या विचारांची मुळ टीका रचनावादाबद्दल आहे, कारण रचनावाद ही एक पद्धतीची परिसमाप्ती आहे, ठराविक स्वरूप आहे, म्हणजेच संरचनावाद असं प्रतिपादित करतो की कोणतीही गोष्ट आपण संरचनेमधून समजू शकतो किंवा संरचना गोष्टीचा अर्थ निहित करतात. यात महत्त्वाचं म्हणजे विखंडनाचंच तत्वज्ञान विखंडांचंदेखील विखंडन करतं. थोडक्यात हा विचार असिमीततेचं समर्थन करतो, म्हणजेच हा विचार कोणत्याही नजीकच्या शक्यतेतील अंताचं समर्थन करत नाही.

यानंतरचा जो क्रम आहे, तो साधारणपणे आज ही चालू आहे, या क्रमाचं प्रचलित नाव आहे - post-post-modernity. आपण याला मराठीत उत्तर-उत्तर-आधुनिकतावाद असे ही म्हणू शकतो किंवा उत्तर-आधुनिकोत्तरवाद हा शब्दही वापरू शकतो. यानंतरचा क्रम उत्तर -उत्तर - उत्तर आधुनिकतावाद असेल का ? हा प्रश्न आहे पण त्या पुर्वी, उत्तर-उत्तर-आधुनिकतावाद म्हणजे काय, ते पाहूया. पहिलं तर बाद्यु  स्वतःला या क्रमाचा घटक मानतो आणि त्याअनुषंगानं या तत्वज्ञानाची एक ढोबळ व्याख्या देतो: उत्तर-उत्तर-आधुनिकता म्हणजे शैक्षणिक प्रतिक्रियावादी न होता अभिजात तत्वज्ञानामधील काही संकल्पनांकडं परत जाणं. 

बाद्यु स्वतःला देरिदाप्रमाणे विखंडनवादी किंवा ल्योतार प्रमाणे उत्तर-आधुनिकतावादी म्हणवून घेत नाही, कारण बाद्यु हे मान्य करतो, की being, स्व(subject), सत्य (truth) इत्यादी सारख्या आधिभौतिकशास्त्रीय संकल्पना आज ही वैध आहेत आणि म्हणून तो स्वतःला उत्तर-उत्तर आधुनिकतावादी या क्रमाचा घटक मानतो. (बाद्युच्या नंतरच्या लिखाणात ही संकल्पना फारशी आढळुन येत नाही, पण साधारणपणे बाद्युचं तत्वज्ञान post-foundational philosophy म्हणून गणलं जातं. पण या संकल्पनेतील जो विचार आहे, तो मात्र बाद्युच्या तत्वज्ञानाचं मुळ सार आहे. या अर्थानं बाद्युला 'नव-प्लेटोवादीही म्हटलं जातं). याचसोबत बाद्यु स्वतःला व त्याच्या तत्वज्ञानाला आधिभौतिकशास्त्रिय तत्वज्ञान म्हणवून घेण्यात काही वावगं मानत नाही. कारण त्याच्या मते, तो देल्युज, देरिदा यांच्याप्रमाणे आधिभौतिकशास्त्राचं विखंडन करत नाही. थोडक्यात अभिजात तत्वज्ञानाकडं परत जात, त्या संकल्पनांचा आजच्या संदर्भात अर्थ लावणं, या अर्थानं बाद्यु उत्तर-उत्तर-आधुनिकतावाद या विचारांची व्याख्या करतो. 

उत्तर-उत्तर-आधुनिकता ही उत्तर-आधुनिक नाही, ती विखंडन ही नाही, ती भाषिक खेळातील स्वातंत्र्यही नाही (ल्योतार) किंवा ती आधिभौतिकशास्त्राचा नकार ही नाही किंवा स्व, सत्य, या सारख्या संकल्पनांचा नकारही नाही. पण हा विचार अभिजात तत्वज्ञानाकडं परत जाणं, असादेखील नाही.  तर हे चार क्रम गेल्या ५०-६० वर्षातील तत्वज्ञानाचा लेखाजोखा आहेत.

या सर्व क्रमांमध्ये आणि विशेषतः पहिल्या दोन क्रमांमधील समान आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही क्रमांना दोन मुलभूत संदर्भ आहेत आणि ते म्हणजे - मार्क्सवाद आणि मनोविश्लेषण अर्थात मार्क्स आणि फ्रॉइड! थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की मार्क्स आणि फ्रॉइड, सात्र पासून  अल्थ्युझर  पर्यंत सतत पहायला मिळतात आणि इतकंच नव्हे, तर तिसऱ्या टप्प्यातसुध्दा मार्क्स आणि फ्रॉइड आपल्याला, विशेषतः देरिदामध्ये दिसतात (Specters of Marx) आणि ल्योतार मध्येही दिसतात (Libidinal Economy, Political Writings). बाद्यु हेदेखील स्पष्ट करतो की जरी मार्क्स आणि फ्रॉइड या तिन्ही परंपरांमध्ये दिसत असले, तरीही मार्क्सवाद किंवा मनोविश्लेषण हे विचार या पैकी कोणत्याही परंपरेमध्ये घटित केले जाऊ शकत नाहीत आणि म्हणून या क्रमांव्यतिरिक्त त्यांचं स्वतःचं वेगळं अस्तित्व आहे. 

या तीन क्रमांच्या शेवटी या दोन संदर्भाच्या विरोधात आपल्याला जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळते, विशेषतः फ्रांस मध्ये नव-तत्ववेत्त्यांनी (new philosophers) मार्क्स आणि फ्रॉइडचा प्रखर विरोध केला आहे. आणि आजच्या काळात पुन्हा फ्रॉइडबद्दल प्रखर वाद आपणाला दिसून येतो. आज उत्तर-उत्तर-आधुनिक क्रमात देल्युज, स्वतः बाद्यु काही प्रमाणात झिझेक आणि क्वांता मेईलासो (Quentin Meillassoux) इत्यादी तत्त्ववेत्तेही पुन्हा मार्क्स आणि फ्रॉइडकडं वळले आहेत आणि हे तत्त्ववेत्ते असं गृहीत धरतात की ते मार्क्स आणि फ्रॉइडसोबतच संवाद साधत आहेत आणि या पद्धतीनं आज पुन्हा भविष्याच्या अनुषंगानं मार्क्स आणि फ्रॉइडचा पुनर्विचार होताना दिसून येत आहे.

बाद्यु स्वतःच्या जीवनचरित्राच्या साह्यानं, गेल्या शतकातील तत्वज्ञानाचे जे क्रम, टप्पे मांडतो, ते क्रम एकमेकांपासून वेगळे सुध्दा आहेत आणि वेळोवेळी एकमेकांच्या विरोधात सुद्धा आहेत आणि म्हणूनच या अर्थानं तत्वज्ञान हे विचारांची युद्धभूमीच असतं. या युध्दभुमीमध्ये विजयही आहेत आणि ज्या संकल्पना एखाद्या काळात हरलेल्या आहेत त्यांचं परत येणं ही आहे. यावरून बाद्यु म्हणतो, की तत्वज्ञानात हरलेले विचार, नष्ट झालेले विचार, संकल्पना, अदृष्य झालेल्या संकल्पना आणि विचार यासुद्धा पुन्हा परत येतात त्या पुन्हा उगवतात.

स्वतःच्या जीवनचरित्र्याच्या आधारे बाद्यु एका वृध्द तत्ववेत्त्यानं तरुण मुलांशी संवाद का साधावा या प्रश्नाला विरोधाभासात रूपांतरित करतो. हा विरोधाभास म्हणजे बाद्युनं 'त्याच्या अनुभवाआधारे निर्माण केलेला दृष्टीकोण' विरुध्द 'जे आहे ते' जग. 

बाद्यु म्हणतात की त्यांनी अनुभवलेलं जग हे आजच्या जगापेक्षा पुर्ण वेगळं आहे, ते जग क्रांत्यांचं होतं, बदलाचं होतं. त्या जगाचा 'जग' बनण्याचा मूलभूत नियमच आजच्या जगापासून वेगळा होता. बाद्यु म्हणतात, जसा दोन जगांमध्ये विरोधाभास आहे, तसाच विरोधाभास या तत्त्वज्ञानाच्या वर्गातही आहे, कारण त्यांचा स्वतःचा अनुभव हा क्लासमधील विध्यार्थी किंवा आपणापासून नक्कीच वेगळा आहे म्हणून ही परिस्थिती सुध्दा द्वंदात्मक आहे. जर तत्वज्ञानाच्या वर्गातील परिस्थिती ही विरोधाभासी असेल तर ही परिस्थिती दोन वेगवेगळ्या शक्यता निर्माण करते. यामधील पहिल्या शक्यतेनुसार तत्त्ववेत्ता त्याचा तत्वज्ञानाचा अनुभव विध्यार्थ्यांना देऊ शकतो, आणि दुसरी शक्यता ही तत्वज्ञान आणि काळ यांच्या बद्दल आहे.

पहिल्या शक्यतेमधून तत्ववेत्ता त्याचा अनुभव परावर्तित करेलही, पण त्यामधून काही नवीन क्रम निर्माण होणार नाही. थोडक्यात सामूहिक इच्छा निर्माण करण्याची इच्छा इथं शुन्य राहील. म्हणून ही शक्यता तत्वज्ञानात्मक नसून, ती ऐतिहासिक आहे, कारण ही शक्यता तत्त्ववेत्ता आणि विध्यार्थी या दोघांसाठी काही नवीन इच्छा निर्माण करत नाही.

दुसरी शक्यता ही वेगळी आहे कारण तत्वज्ञान आणि काळ यांच्यातील विरोधाभास, हा तत्त्ववेत्ता आणि विध्यार्थी यांच्यातील विरोधाभासा सारखा नाही किंवा हा विरोधाभास तत्त्ववेत्त्याचा अनुभव व विद्यार्थ्याचा अनुभव, असा विभाजित करता येत नाही. पण जर तत्वज्ञान हे वर्तमानात घटित न करता काळाशी समयोचित असेल तर हा विरोधाभास उपयोगाचा आहे.

म्हणून बाद्यु म्हणतात की तत्वज्ञानाचा प्रश्न हा वर्तमानात उभं राहून राहून भविष्याच्या शक्यतेबाबतचा प्रश्न असतो आणि या भविष्याच्या शक्यतेची निर्मिती ही भुतकाळाच्या नव्या समजातुन निहित असतं. याअर्थानं वर्तमानातलं तत्वज्ञान हे त्याच्या भूतकाळातील संपूर्णता (Totality) असतं. पण इतिहासाची पुनरावृत्ती म्हणून नव्हे तर त्याच्या भूतकाळाच्या नव्या अर्थानं ते अस्तित्वात असतं. तत्वज्ञानाच्या या व्याख्येनुसार इतिहासातील प्रत्येक तत्त्ववेत्ता आज आपल्या सोबत असतो/आहे कारण या तत्ववेत्त्यांना आपण आपल्या भविष्याच्या निर्मितीसाठी वापरू शकतो, साहजिकच नव्या भविष्याची निर्मिती ही इतिहासाच्या नव्या अर्थातून जन्माला येते.

इथं पुन्हा आपल्यासमोर एक विरोधाभास निर्माण निर्माण होतो. कारण तत्वज्ञानात अजून एक भूमिका आहे, जी असं जाहीर करते, की तत्वज्ञान हे फक्त तत्वज्ञानाचा इतिहास मात्र आहे. ही धारणा प्लेटो, कांट यांचा अभ्यास करते पण एखाद्या जुन्या धार्मिक धारणेकडं जसं परत जाता येतं, त्याप्रमाणं तत्वज्ञानाच्या इतिहासात परत जातं. थोडक्यात हे इतिहासाचं विभूतीकरण (Fetishization) आहे. परंतु ही भूमिका विश्लेषणात्मक तत्वज्ञानापेक्षा थोडी वेगळी आहे, विश्लेषणात्मक तत्वज्ञान जाहीर करतं, की तत्वज्ञानाचा इतिहास संपुष्टात आला आहे किंवा जुनं तत्वज्ञान काही उपयोगाचं नाही. आणि इथं आपणाला या नवीन विरोधाभासाला तोंड द्यावे लागतं, जो आज प्रस्थापित विचार देखील आहे. म्हणून आपल्याला इतिहासाची पुनरावृत्ती सुध्दा करायची नाही किंवा इतिहासात परत ही जायचं नाही आणि आपणाला इतिहास पुर्ण नाकारायचा देखील नाही. आपण एकच गोष्ट करू शकतो आणि केली पाहिजे, ती म्हणजे या इतिहासाचा भविष्याच्या अनुषंगानं अर्थ लावला पाहिजे.

इथं आपणाला हे दाखवुन देणं गरजेचं आहे, की तत्वज्ञानाचा वर्तमान हेसुद्धा इतिहासाचा भविष्यासाठी अर्थ लावणं आहे. बाद्यु आपणाला त्याचा पुर्णतः वेगळा ऐतिहासिक अनुभव, जो आजच्या जगापासून वेगळा आहे, तो अनुभव, नव्या अर्थानं प्रसारित करतो, आणि हे आपणाला सामाईक आहे, आणि म्हणून आपण समान भविष्य संयोजित करू शकतो. आपण इथं एक समूह तयार करत आहोत, कारण आपण हे मान्य करतोय की भविष्याची शक्यता वर्तमानात असू शकते. 

हा जहाल आणि ठोस विचार आहे कारण मानवतेची एकात्मता त्याच्या भविष्याच्या धारणेत समाविष्ट आहे. ही नव्या भविष्याची शक्यता ही गरज आहे कारण जर आपणाला आपल्या सर्व मतभेदांपलीकडील (लिंग,राष्ट्रीयता, संस्कृती इत्यादी) मानवतेचं स्वप्न आहे, व्यापक मानवतेचं स्वप्न आहे, तर आपणाला अशी व्यापक मानवता पाहिजे जी आपल्या सर्व भिन्नतांचा आदर ही करेल आणि त्याच वेळेस या भिन्नतां या मानवतेमध्येच असतील. हा जो समुह आपण निर्माण करत आहोत तो आपल्या भविष्याच्या दृष्टीकोणासाठी आहे, कारण लोकांमध्ये कितीही भिन्नता असल्या, तरी त्यांना समान भविष्य असू शकतं. हे भविष्य त्यांना त्यांच्या भिन्नतांसोबत एकत्रित आणू शकतं आणि म्हणून आपणाला आज तत्वज्ञानाची गरज आहे!