India

‘गलीबॉय’- धारावीतून साउथ बॉम्बेवर उडालेला चिखल

प्रेडीक्टेबल कथेचा, पण सुंदर सिनेमा

Credit : Excel Entertainment & Tiger Baby Productions

धारावीसारख्या झोपडपट्टीतून आलेला एक मुलगा आपली संगीताची आवड जोपासत गरिबी, समाज, परिस्थितीवर मात करत एक कमालीचा यशस्वी म्युझिशियन बनतो ही बॉलिवूडची चावून चोथा झालेली कथा म्हणजे गलीबॉय.

पण यावेळी ही अत्यंत प्रेडिक्टेबल गोष्ट, बॉलिवूडमध्ये असूनही त्याचा बटबटीतपणा अंगाला लागू न दिलेल्या रिमा कागती आणि झोया अख्तर या दोन माणसांनी सांगितलीय.

'गॉड इज वुमन' असं एका फिलॉसॉफरनं लिहून ठेवलंय. त्यांनं ते कोणत्या संदर्भात लिहिलंय हे त्यालाच माहित पण आज जर तो असता तर बॉलिवूडमध्ये राहूनही झोया अख्तर जे सिनेमे बनवतेय ते बघून तो पुन्हा एकदा हेच म्हटला असता. झोया अख्तर सांगत असलेली प्रत्येक कथा अगोदरच दहा जणांनी सांगून ठेवलेली असते तरी ती कथा अशीही सांगता येते हे ती मागच्या दहा बॉलिवूड कथाकर्त्यांना ठासून सांगते.

धारावीतल्या एका SUV कारएवढ्या घरात राहणाऱ्या मुरादला (रणवीर सिंग) संगीताची, रॅपची आवड आहे. श्रीमंतांच्या घरी त्यांची SUV चालवणारा ड्रायव्हर शकीर (विजय राझ) हा त्याचा बाप आहे. ज्याला आपल्या मुलानं अभ्यासात लक्ष देऊन औकातीत एखादी बरी नोकरी मिळवावी असं वाटतं. मुलाची आई रझिया (अमृता सुभाष) त्याच SUV त नवऱ्यानं आणखी एक बायको करून आणल्यानं दुःखी आहे. अशा परिस्थितीवर हळूवार फुंकर म्हणून मुरादचं आणि सुखवस्तू पण कट्टर धार्मिक घरातल्या सफिनाचं (आलिया भट) लहानपणापासूनच प्रेम आहे. बाकी धारावीला साजेशा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या मित्रांची मुरादला संगत आहे पण लहान मुलांना आपल्या याच मित्रानं अमली पदार्थांच्या कामाला लावलंय म्हणून चिडण्याइतका मुराद हळवा आणि समंजस दाखवलाय. तुलनेने नावाजलेला रॅपर एम. सी. शेर (सिद्धांत चतुर्वेदी) आणि US रिटर्न म्युझिक प्रोड्यूसर स्काय (कल्की कोएचलीन) जी नंतर मुरादच्या प्रेमातही पडते. तर यांच्या मदतीनं मुराद आपलं स्वप्न पूर्ण करतो, असं साधारण प्रेडिक्टेबल कथानक आहे.

चित्रपटाचं यश म्हणजे ही फक्त मुरादच्या यशस्वी होण्याची गोष्ट नसून धारावी, तिथली स्वप्नं, स्वप्नांना जन्म देणाऱ्या प्रेरणा आणि ती पूर्ण करायला निघताना अंगावर येणारे अंतर्विरोध याची ही गोष्ट आहे. गलीबॉय हा प्रसिद्ध रॅपर नॅझीच्या आयुष्यावर बेतलेला आहे. समाजातील विषमता आणि अंतर्विरोध, गरिबी, सडून एका कोपऱ्यात निपचित पडलेली मूल्यव्यवस्था यावर बोट ठेवणाऱ्या रॅपमधल्या कवितेप्रमाणंच चित्रपटातले सीन्स भेदक आहेत.

चित्रपटातील एका प्रसंगात सफिनाशी भांडण करून मुराद स्कायच्या घरी जातो. तिच्या घरचं बाथरूम आपल्या घरापेक्षा मोठं आहे, हे रणवीर सिंग त्याच्या डोळ्यातून प्रेक्षकांना सांगतो. हा चित्रपटातला टॉप नॉच सीन आहे. त्यानंतर नम्रपणे स्कायचं प्रेम नाकारत तो तिला म्हणतो की, ‘सफिना के बिना मेरी जिंदगी ऐसी हो जायेगी जैसे बिना बचपन के बडा हो गया’. चित्रपटात अशी काही मोजकी दृश्यं आहेत जी संयतपणे सुमडीत विद्रोही राजकीय स्टेटमेंट करून जातात. पण ती तेवढ्यापुरतीच कारण शेवटी बॉलिवूड आहे.

चित्रपटातलं आझादी नावाचं रॅप सॉंग डायल्यूट करणं असो अथवा मुरादचा मेंटॉर असलेल्या एम. सी. शेरनं त्याच्या विदेशी गर्लफ्रेंडविषयी सांगताना इनके यहा जात वात नही देखते, हा डायलॉग असो. असा डायलॉग वापरूनही त्याचा संदर्भ सबंध चित्रपटभर कुठेही न जाणवणं हे नक्कीच खटकणांर आहे. अर्थात जिंगोस्तान जिंदाबाद या ट्रॅकमधले लिरिक्स व्यवस्थेला आणि सरकारला प्रत्यक्ष जाब विचारणारे आहेत. पण ते वेगवान कथानकाच्या नादात येवढे बॅकग्राऊंडला जातात की जातिव्यवस्थेसारख्या सडक्या प्रवृत्तीवर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय, असं प्रेक्षकाला जाणवतही नाही.

बापाच्या जागी ड्रायव्हरकीचं काम करायला लागल्यावर माणसं आणि धारावीत कोंबलेली जनावरं यांच्यातला फरक मुरादला प्रकर्षानं जाणवतो.याच हिडीस जाणिवेतून ‘दूरी’ आणि ‘अपना टाईम आयेगा’ या त्यानं लिहिलेल्या कविता यांसारखे प्रसंग गलीबॉयच्या स्टिरिओटिपिकल बॉलीवूडकरणावरही क्षणभर का होईना मात करून जातात. आलिया भटच्या स्त्रीसुलभ टाळीखाऊ आक्रळास्तेपणानंतरही मुराद आणि सफिनाचा जागेअभावी गटारीच्या पुलावर, बंद ट्रेनच्या डब्यात फुलणारा रोमान्स, प्रेम ही खरंच वर्गजाणिवेपल्याडची वैश्विक गोष्ट आहे यावर विश्वास ठेवायला भाग पाडतो. चित्रपटातील स्काय (कल्की कोएचलीन) सोबत थोडावेळ चाललेलं प्रेम प्रकरण म्हणजे दुसरं तिसरं काही नसून विषमलिंगी संबंधात पुरुषच ड्रायव्हिंग सीटवर असायला हवा हा बॉलीवूडचा लिंगभेदी हॅंगओव्हर काही केल्या उतरणार नाही, याचा पुरावा आहे. दुर्दैव म्हणजे हे तत्त्व बिंबवण्यासाठी त्यांनी कल्की कोएचलीनसारख्या अभिनेत्रीचा वापर केला याला पॅरडी शिवाय दुसरं काही म्हणता येणार नाही. शेवटी ‘ये बॉलीवूड है, यहा सबका कटता है’.

मुरादला सख्ख्या भावासारखं पाठबळ देणाऱ्या एम. सी. शेरचा ‘दुनिया मे अगर सब कम्फर्टेबल होते तो रॅप कौन बनाता’, मुरादची मामी त्याची समजूत काढत असताना ‘अगर गानाही गाना था तो गझल गा लेता’ यांसारखे काही अतिशय वाढीव डायलॉग चित्रपटाची जान आहेत. चित्रपटाचे डायलॉग मुरादच्या मामाचं पात्र रंगवणाऱ्या विजय मौर्य यांनी लिहिलेले आहेत, जो वेळ आल्यावर मुरादला म्हणतो की ‘नोकर का बेटा नोकर ही बनेगा ये फितरत है!

बाकी सर्व अभिनेत्यांनी भारी काम केलंय. आलिया-रणवीरचा हा पहिला चित्रपट आहे असं वाटत नाही इतकं त्या दोघांमधलं प्रेम सहज वाटतं. दोघांचा चित्रपटातील पहिलाच एकत्र बेस्ट बसमधला सीन कहर अफलातून असून पुढच्या त्यांच्या प्रेमाच्या नरेटिव्हला साजेसा आहे. लहानपणापासून सोबत असल्याकारणानं नात्यात आलेली सहजता दोघांनी फारच कन्व्हिसिंगली दाखवलीय. सर्व अभिनेत्यांमध्ये एम.सी. शेरची भूमिका केलेला सिद्धांत चतुर्वेदी आणि कार चोरणारा मुरादचा मित्र विजय वर्मा हे वेळप्रसंगी अभिनयात रणवीरलाही वरचढ ठरले आहेत.

चित्रपटातल्या प्रत्येक पात्राची पूर्ण स्टोरी सांगण्याच्या नादात चित्रपट लांबला आहे. मुलांच्या स्वप्नाची अडवणूक करणारा हेकेखोर बाप, नवऱ्याचा मार खाऊनही मुलाला पाठिंबा देणारी पवित्र आई, आईला मारहाण करणाऱ्या बापाच्या विरोधात उभा टाकणारा मुलगा, दुसऱ्या मुलीने आपल्या बॉयफ्रेंडवर नजर टाकल्यावर आगपाखड करणारी हतबल प्रेयसी असले फिक्स भावनिक करणारे टाळ्याखाऊ स्टरियोटिपीकल फॉर्म्युले चित्रपटात सर्रास वापरले गेलेत हा दोष आहेच पण ठीक आहे बॉलीवूड आहे म्हणल्यावर तेवढं तर होणारच.

बॉलिवूडचा मोदी म्हणवल्या जाणाऱ्या करण जोहरच्या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीतील माइलस्टोन सिनेमाच्या एकाही पात्राची जात प्रेक्षकांनी विचारली नाही की त्या जातीची समस्या खुद्द त्या चित्रपटातील पात्राला कधी जाणवली नाही. स्वतः समलिंगी असून आपल्या चित्रपटात सेक्सिस्ट आणि गे समूहावरच्या जोक्सचा भडिमार करणाऱ्या बॉलीवूडकडून जातिव्यवस्थेचा भेदक संघर्ष, खालच्या स्तरातील स्ञीची अस्तित्वाची लढाई अशा वगैरे गोष्टींच्या चित्रणाची अपेक्षा करणं हे जरा जास्तच होईल. बॉलीवूडमधून वास्तववादी चित्रण हाच एक विरोधाभास आहे. त्यामुळेच इथे जातिव्यवस्थेचे चटके सोसत, कवितेतून विद्रोह करणारा धारावीतील रॅपरचा रोल साऊथ बॉम्बेत आयुष्य घालवत प्रचंड संघर्ष करून स्टार बनलेल्या सिंधी रणवीर सिंगला मिळणं सहाजिक आहे.

त्यातही बॉलीवूड सिनेमे बघतच लहानाचा मोठा झाल्याने रणवीर सिंगच्या कन्व्हिंसिंग अभिनयाचं मन भरून कौतुक करणं, मला भागच आहे. देशातील धारावीसारख्या गटारातून आलेला, नाही रे वर्गातला तरुण, रॅपसारखं रॉ माध्यम वापरून आपल्या अंगाला चिकटलेली घाण घेऊन ‘आहे रे वर्गात येतो’ आणि ही गटार तुम्हीच तुंबून ठेवलीय, हे तो कवितेतून ठासून सांगतोय. गलीबॉयसारख्या मेनस्ट्रीम बॉलीवूडपटाच्या निमित्ताने किमान या गटारातील घाण कवितेतून समोर आणणाऱ्या रॅपर्सला थोडंफार अधिष्ठान मिळेल हेही नसे थोडके. बाकी आलिया भटनं पुढच्या चित्रपटात पुन्हा तिला साजेशा गोंडस भूमिका करत स्त्री संघर्षाचं बेगडी चित्रण केल्यावर तिच्या दमदार अभिनयाचं कौतुक करण्यासाठी आम्ही प्रेक्षक म्हणून सज्ज आहोतच.

इम्तियाज अलीचा तमाशा पाहून भेंडी, मी काय करतोय? हा जॉब सोडून माझी आवड जोपासायला पाहिजे असा किडा तुमच्या वळवळला असेल तर गलीबॉय पाहून मी आजच बॉसच्या तोंडावर राजीनामा फेकून स्वतःचा मार्ग शोधायला निघतो अशी भावना दाटून येण्याची दाट शक्यता आहे. परिस्थितीची बंधनं झुगारून स्वतःची आवड जोपासल्यावर फक्त यशस्वीच होऊ शकतो, हा दुर्दैवाने बॉलीवूडपटांचा मोटो, ‘सिनेमा लोकप्रिय करण्याचा फॉर्म्युला आहे’. चित्रपटातील प्रोटॅगॉनिस्टपासून प्रेरणा घेत आपणही यशस्वीच होऊ असं वाटून पुढे भ्रमनिरास होण्याचा मोठा धोका आहे. प्रोटॅगॉनिस्टला लार्जर दॅन लाइफ यशस्वी झालेला दाखवणे ही चित्रपटाच्या तिकीट बारीवर यशस्वी होण्याची अट आहे, तुमच्या आयुष्यातील निर्णयक्षमतेची नव्हे.

तुमची आवड जोपासण्याची किंमत तुम्ही यशस्वी होऊनच चुकवू शकता हा सिद्धांत झोया अख्तरनंच तिच्या ‘लक बाय चान्स’ या पहिल्या सिनेमानं मोडीत काढला होता. लक बाय चान्समधली प्रोटॅगॉनिस्ट कोंकणा सेन अभिनेत्री होण्यासाठी मुंबईला येते. शेवटपर्यंत ती लीड अ‍ॅक्टर बनण्यात यशस्वी ठरत नाही मात्र, साईड हिरॉईनची दुय्यम भूमिका साकारत साधारण आयुष्य जगतही ती प्रेक्षकांना प्रेरणा देण्यात कमालीची यशस्वी ठरते. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी यश मिळवण्यापेक्षा स्वतःच्या आवडीसाठी स्वतः उभं राहणं हे जास्त महत्त्वाचं असं हा सिनेमा अधिक तरलपणे सांगतो. नायकाला यशस्वीच दाखवण्याचा तद्दन व्यावसायिक विचार गली बॉय मध्ये दाखवण्यात आलेला असला तरी ती चित्रपटाची नसून बॉलिवूडची मर्यादा आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मेनस्ट्रीम सिनेमाच्या मर्यादा लक्षात घेता गलीबॉय एक नितांत सुंदर अनुभव असून यावर्षीचा आत्तापर्यंतचा सर्वोत्तम सिनेमा आहे, यात वाद नाही.