Africa
हवामानभेद
हवामानबदलाचे परिणाम आफ्रिकेला अन्यायकारक ठरतात
जागतिक हवामान बदल ही जरी जागतिक घटना असली तरी तिचे परिणाम मात्र एकसारखे असे नाहीत. जगाला एका कुटुंबाचं प्रारूप मानलं तर घरात सर्व कष्ट उपसून तरीही उपाशी राहणाऱ्या मुलासारखं आफ्रिकेचं आजवर झालं आहे. जगातल्या सर्व विकसित आणि विकसनशील देशांसाठी आफ्रिका हा गृहीत धरलेला प्रदेश आहे. माध्यमांच्या एकांगी चित्रांद्वारे आपल्याला विकसित देशांनी आफ्रिकेला मानवी दृष्टिकोनातून केलेली मदत दिसते. वर्ल्ड बॅंक, संयुक्त राष्ट्रसंघ यांसारख्या जागतिक संस्थांचा उदार दृष्टिकोन दिसतो. नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असलेल्या एवढ्या मोठ्या आफ्रिका खंडाला सतत मिळणारी मदत असूनही आफ्रिका एवढा भिकेला का लागला हा प्रश्न आपल्याला पडत नाही. एवढ्या साध्या विरोधाभासाकडे सोईस्कर दुर्लक्ष करणे हे आपल्यासाठी पर्यायाने जगासाठी जेवढे सोपं आहे तेवढंच आवश्यकही.
अठराव्या शतकातील औद्योगिक क्रांतीनंतर मागच्या दीडशे वर्षात वातावरणात सोडल्या गेलेल्या हरितगृहवायू मध्ये एकट्या दानशूर अमेरिका देशाचा वाटा २५ टक्क्याहून अधिक आहे तर अख्ख्या आफ्रिका खंडाचा वाटा आहे इन मीन ७ टक्के. आता ह्याच हरितवायूंच्या उत्सर्जनातून मानवनिर्मित जागतिक तापमान वाढीची सर्वात जास्त झळ सोसतोय तो आफ्रिका तर सर्वात कमी झळ बसते ती अमेरिकेला. हवामान बदलाशी अनुरूप असे इन्फ्रास्ट्रक्चर, तंत्रज्ञान हे विकसित देशांना ज्या प्रमाणात उपलब्ध आहे तेवढं आफ्रिकेला नाही. अफ्रिका हे जगासाठीच डम्पिंग ग्राउंड असून विकसित देश फुकटही घेणार नाहीत असलं रद्दड तंत्रज्ञान मदत म्हणून आफ्रिकन देशांना विकलं जातं.
अनेक पर्यावरणतज्ज्ञ, शास्त्रज्ञांना साक्षात्कार घडवून आणणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांची तर गोष्टच वेगळीय. ग्लोबल वॉर्मिंग वगैरे असलं काही नसून हा चीनचा प्रपोगंडा आहे, गरीब देशांनी आमचा पैसा लुबाडण्यासाठी रचलेले षडयंत्र आहे, असा दावा त्यांनी केलाय. या दाव्यावर कायम राहून त्यांनी पॅरिस हवामान करारातून माघार घेतली. तसंही या जागतिक हवामान करारातून विकसित राष्ट्र हवामान बदलाबाबत किती जागरूक आणि जबाबदार आहेत तेवढंच भासमान चित्र निर्माण व्हायचं. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी किमान हा बुरखा तरी फाडलाय याबद्दल त्यांचं कौतुक करायला हवं.
तसंही असल्या परिषदांच्या मोघम चर्चांमधून तुटपुंज्या मदतीशिवाय दुसरं काहीच हाती लागलेलं नाही. उत्तराधुनिक काळात जगातल्या सर्वात प्रभावशाली देशाचा राष्ट्राध्यक्ष जेव्हा असं बोलतो तेव्हा ते फक्त त्याच्यापुरतं किंवा अमेरिकेपुरतं मर्यादित राहत नाही. ते पहिल्या जगाचा तिसऱ्या जगाविषयी असलेला अहंभाव, तेढ आणि तुसडेपणाचं प्रतीक असतं. कट्टर उजव्या राष्ट्रवादी राजकीय विचारसरणीचा विकसित राष्ट्रांमध्ये वाढलेल्या लोकप्रियतेमध्ये अंगावर आलेल्या हवामान बदलाची व त्यासाठी भविष्यात चुकवाव्या लागणाऱ्या किमतीची मूळं आहेत.
कितीतरी वर्ष वारेमाप प्रदूषणावर ब्र न काढता उत्पादन क्षेत्राच्या जोरावर विकास करून घेतल्यानंतर पर्यावरणाचा उथळ पुळका आणत शाश्वत विकासाची राळ उठवणे यावरून पहिल्या जगातील देशांचा दुटप्पीपणा दिसून येतो.आता तिसऱ्या जगातील देशांच्या विकासाची गोष्ट आल्यावर हवामान बदलाच्या नावाने का रोख लावायची. आत्तापर्यंत झालेल्या प्रदूषणाची जबाबदारी विकसित देशांनी उचलायला हवी अशी आफ्रिकन देशांची मागणी आहे.ती अगदीच रास्तही आहे.
आफ्रिकेतील हवामान बदलाच्या समस्येबाबत आपण किती अनभिज्ञ आहोत याचा नमुना आपल्याला २०१५ च्या पॅरिस करण्याच्या उद्देशातून दिसून येतो. या करारात जगातील तापमान वाढ येत्या काळात २ डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त वाढू न देण्याचा उद्देश ठरवण्यात आलं. आफ्रिका खंडाने ही २ डिग्री ची वाढ तेव्हाच साध्य केलेली होती!
आफ्रिका खंडातील बहुतांश देशांची अर्थव्यवस्था नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून आहे. ८० टक्के लोकसंख्या शेती व त्यासंबंधी उद्योगांवर अवलंबून आहे. मात्र हवामान बदलामुळे दुष्काळ, शेतीयोग्य जमिनीचे वाढत जाणारे वाळवंटीकरण, तीव्र तापमान, अटत जाणारे पाण्याचे स्त्रोत, यामुळे शेतीतील उत्पादन कमालीचे घटले आहे. याउलट विकसित देशांच्या अर्थव्यवस्था प्रामुख्याने उद्योग व सेवा क्षेत्रांवर अवलंबून असल्याने हवामान बदलाचा प्रत्यक्ष परिणाम त्यांच्या अर्थव्यवस्थेवर दिसून येत नाही. नैसर्गिक आपत्तीचा राष्ट्रीय उत्पन्नावर परिणाम हा अविकसित आणि विकसनशील देशांवर पंधरा टक्के आहे तर हेच प्रमाण विकसित देशांमध्ये दोन टक्क्यांपर्यंत आहे.
हवामान बदलाचे इतर मुख्य दुष्परिणाम आफ्रिकेला भेडसावत आहेत. येत्या काळात या समस्या अजून उग्र रूप धारण करतील. Climate refugee म्हणजेच प्रतिकूल पर्यावरणीय परिस्थिती मुळे झालेले स्थलांतर ही हवामान बदलाने दिलेली ‘देणगी’ असून आफ्रिका खंडातील प्रतिकूल पर्यावरणामुळे मोठ्या संख्येने लोक युरोपात स्थलांतर करण्याचा प्रयत्न करतायेत. युरोपात लोकप्रिय असलेल्या उजव्या राष्ट्रवादी राजकीय विचारसरणीला आफ्रिकन स्थलांतराची किनार आहे.
आफ्रिका खंडातील जन्मदर जगात सर्वात जास्त असून येणाऱ्या काळात प्रचंड वाढणारी लोकसंख्या, घटलेले शेतीचे उत्पन्न व त्यामुळे कमी झालेले रोजगार, प्रतिकूल हवामान, यामुळे आफ्रिकेतून युरोपात स्थलांतराचे प्रमाण वाढतच जाणार आहे. हवामान बदलामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कुपोषण व इतर साथीचे आजार यांचे प्रमाण तापमान वाढीमुळे प्रचंड प्रमाणात वाढले असून याचा सामना करणे हे तेथील सरकारपुढे आव्हान आहे.
हवामान बदल व हिंसेचा जवळचा संबंध आहे. नायजेरियात उगम पावलेल्या बोको हराम या दहशतवादी संघटनेसाठी अनुकूल असं सामाजिक राजकीय अवकाश सलग पडलेल्या दुष्काळाने तयार केलं होतं. प्रख्यात पर्यावरण तज्ञ वंदना शिवा यांच्या म्हणण्यानुसार सीरियातील दुष्काळ आणि विपरीत पर्यावरणीय परिस्थिती इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया अर्थात इसिसच्या जन्मासाठी मोठ्या प्रमाणात जबाबदार होती. मर्यादित नैसर्गिक संसाधनंमुळे होणारी नागरी हिंसा हे तेथील सरकारने पुढे येत्या काळात मोठे आव्हान असणार आहे.
Years of Living dangerously ही अमेरिकन डॉक्यूमेंट्री टेलिव्हिजन सिरीज २०१४ मध्ये आलेली. यात हवामानबदलामुळे जगातील देशांवर, विशेषतः अविकसित व विकसनशील होणारे परिणाम दाखवले गेले. थॉमस फ्रीडमन या तीन वेळा पुलित्झर विजेत्या पत्रकाराने यासाठी आफ्रिकेतील रिपोर्टिंग केलं असून तिथली स्थिती अंगावर काटा आणणारी आहे. ग्लोबल वॉर्मिंग व हवामान बदल ही जागतिक घटना सर्वव्यापी असली तरी आपण तिला वर्णभेदी बनवण्यात यशस्वी ठरलो असून तापमान वाढीची जी किंमत आफ्रिकन लोकांना चुकवावी लागतेयेे व भविष्यात त्याचे असमान परिणाम बघता #Blacklivesmatters ही चळवळ हवामान बदलाबाबतही तेवढीच लागू होईल.
हवामान बदलाचे आफ्रिका खंडावर झालेले परिणाम विविधांगी आहेत. बलाढ्य अर्थव्यवस्थांच्या विकासाची किंमत अफ्रीका चुकवत असून शेतीपासून ते स्थलांतर, पर्यटन ,अर्थव्यवस्था ,जैवविविधता, सामाजिक-राजकीय परिस्थिती,आरोग्य यावर हवामान बदलामुळे झालेला परिणाम व भविष्यातील स्थिती याचा आपण या लेखांच्या सिरीजमध्ये आढावा घेऊ.