Quick Reads
माझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं: रिचर्ड फायनमन
११ मे १९१८ ला जन्म झाला रिचर्ड फायनमनचा
मागच्याच महिन्यात माझ्या कारभाऱ्यानं मला एक लिंक पाठवली आणि ती लिंक जेव्हा हाताळली तेव्हा माझं एक नविनच एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर सुरु झालं आणि अर्थात हे कारभाऱ्यानेही झटक्यात मान्य केलं. कारण एका अफाट बुद्धिमत्तेच्या प्रेमात पडण्यास मजबूर करणारा माझाच नवरा होता...ती लिंक होती तरी कसली?
अगदी परवा परवा बड्डै असणाऱ्या म्हणजे ११ मे १९१८ ला जन्मलेल्या रिचर्ड फायनमन या अत्यंत अफाट माणसाच्या लेक्चर्सची. रिचर्ड हा एक slow and steady wins the match फॉलो करणारा माणुस होता. म्हणजे लहानपणी जवळपास तीन वर्षाचा होईपर्यंत पठ्ठ्या फक्त इशारो इशारो में बाते करत होता. म्हणजे बोलु शकत नव्हता. पण एका पुरोगामी आईबापांचा पुरोगामी पुत्तर होता. आता एका सेपियोसेक्शुअल मुलीला प्रेमात पाडायला आणखी कशाची गरज असते? त्यातच हा फिजिक्सवाला. घरात प्रयोगशाळा असणारा,प्रयोगशाळेत लहानपणापासूनच नसते पण कामाचे उद्योग करणारा,आणि मेन म्हणजे नास्तिक आईबापांचा नास्तिक पोट्टा. हायस्कुलमध्येच यानं गणितात पटापट बाजी जिंकायला सुरूवात केली. नंतर तर high IQ वाला म्हणून ओळखला जाऊ लागला. बहिण जोन पण त्याच्यासारखीच उच्च बुद्धिमत्तेची निघाली.प्रिस्टनमध्ये ग्रैज्युएशनला गणित आणि फिजिक्समध्ये सगळ्यात जास्ती मार्क्स मिळालेले.
हा रिचर्ड ना जेवढं वाचत जाऊ तेवढं जास्ती प्रेमात पाडतो आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेनं भुरळ घालतच राहतो. आता बघा ना,जेव्हा मी १५ वर्षाची होते तेव्हा आहे तीच गणितं सुटता सुटत नव्हती. आणि हा पठ्ठ्या स्वतःच भुमिती,बीजगणित, कॅलक्यूलस शिकत होता. आणि हाईट म्हणजे कॉलेजला जाण्याइआधीच त्याला डेरीव्हेटीव वगैरे येत होतं. मला तर अजुन डोक्याला शॉट देतं हे. नंतर त्यानं कोलंबिया विद्यापीठात अर्ज केला पण साला धर्म आडवा आला. ज्यु कोटामुळं एडमिशन मिळालं नाही. म्हणून त्यानं मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये गेला. तिथं त्यानं गणितासोबतच फिजिक्सचा ध्यास घेतला. आणि दोन पेपर पब्लिश केले. हायझनबर्गच्या अभ्यासावर आधारीत एक पेपर होता जो त्यानं सिनियरसोबत केलेला आणि दुसऱ्या पेपरमधला Hellmann-Feynman प्रमेय आजही अभ्यासलं जातं. १९३९ मध्ये फायनमनला पुट्टनम फेलो ही पदवी दिली गेली.
रिचर्डने त्याचा पहिला वहिला सेमिनार दिला होता आणि त्या सेमिनारमध्ये अल्बर्ट, वुल्फगँग पॉली आणि जॉन वॉन न्यूमॅन यांच्या सिद्धांताचाही समावेश होता. रिचर्डच्या अभ्यासावर पॉलीला थोडी शंका होती पण अल्बुनं पुरता विश्वास ठेवला. याच विश्वासाला काही काळाने आपल्या भारतीय शास्त्रज्ञ नारळीकरांनी आणि हॉईलने तडीस नेलं. तोच तो होयल-नारळीकर गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत.
यानंतर रिचर्डने पीएच.डी. प्रिन्सटनमध्ये केली. जॉन आर्किबाल्ड व्हीलर हे त्यांचे थीसिस सल्लागार होते. त्याचा डॉक्टरेट थेसिस "क्वांटम मेकॅनिक्समधील मूलभूत कृतीचे सिद्धांत" असा होता. रिचर्डला प्रिस्टनची स्कॉलरशीप मिळणार होती परंतु त्यांची स्पष्टपणे अट होती की रिचर्डने लग्न करायचं नाही. हे मात्र त्याच्यानं जमणारी गोष्ट नव्हतीच मुळी. कारण त्याची एक हायस्कुलपासुनची मैत्रिण होती अर्लाइन ग्रीनबम. तिला डेट करत होता रिचर्ड तेव्हा. अर्लाइनचा हा सर्वात कठीण काळ होता आणि तेव्हाच जर रिचर्डनं तिला सोडलं असतं तर तो स्वतःला माणुस म्हणवुन घेऊ शकला नसता.तिला क्षयरोग झालेला आणि ती फक्त दोनच वर्षांची पाहुणी या पृथ्वीतलावर. त्याचं पहिलं प्रेम अल्पकाळासाठीच उरलं होतं. तेवढ्याचसाठी त्यानं एका बोटीवर २९ जून, १९४२ रोजी लग्न केलं. तो फक्त वेडींग किस घेऊ शकला अर्लाइनचा आणि लगेचंच हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन जावं लागलं.
इकडं रिचर्डच्या वैयक्तिक आयुष्यात हे जीवनमरणाचं युद्ध सुरु होतं आणि तिकडं दुसरं महायुद्ध पीकला होतं. १९४१ पर्यंत अमेरिका या युद्धात उतरली नव्हती पण जेव्हा उतरली तेव्हा रिचर्डलाही सैन्यात भाग घ्यावा लागला. फायनमनचं काम होतं रॉबर्ट आर. विल्सन सोबत परमाणु बॉम्बमध्ये वापरण्यासाठी समृद्ध युरेनियम तयार करणं. मॅनहॅटन प्रोजेक्टवर काम करणं. हा तोच मॅनहॅटन प्रोजेक्ट आहे जो मेक्सिकोतील मेसा येथील गुप्त प्रयोगशाळेत १९४३ ला माझ्याच लाडक्या ओपेनहायमरनं सुरु केला होता. तिथं हा आला पण एकटा नाही. अर्लाइनला व्हीलचेअरवरती घेऊन आला. पण त्यावेळी त्याला मिळणारे पैसे एवढे कमी होते की अर्लाईनच्या औषधालाही पुरत नसत. परिस्थिती पुर्णपणे हाताबाहेर गेली होती. बाँब तयार होत होता आणि जपानच्या विनाशासोबतच अर्लाईनचं आयुष्यही संपत आलं होतं. १६ जून १९४५ ला अर्लाइन गेली आणि आता फक्त उरलं एकच ध्येय रिचर्डचं. ट्रिनीटीची चाचणी. बायकोच्या जाण्याचं दुःख तो त्या स्फोटासोबतच उडवु पाहत होता जणु. किती अवघड असतं ना हे,पण रिचर्डने हे कसं सहन केलं असेल त्यालाच माहित.
या सगळ्यातुन बाहेर पडण्यासाठी त्याने मॅनहॅटनमधुन सुट्टी घेऊन भौतिकशास्त्राचा सहाय्यक प्राध्यापक म्हणून विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठात जाण्याचं ठरवलं. कारण त्याला माहित होतं की फक्त इथंच त्याच्या जीवाला शांती मिळेल. ओप्पुने त्याला कॅलिफोर्निया विद्यापीठात जाण्याबद्दल सुचवलं. तिथं त्याच्या मानसिक अवस्थेची तपासणी झाली, त्यातच वडिलही वारले. बिचारा पुरता हादारला होता. याचदराम्यान त्यानं अर्लाइनला पत्र लिहलं आणि पत्रात लिहलं की,
"हे तुला न पाठवल्याबद्दल माफ कर पण मला तुझा नविन पत्ता माहित नव्हता."
किती गहिरं प्रेम होतं त्याचं. अर्लाईन खरोखर नशीबवान होती. इतकं खोलवर रुजलेलं प्रेम खचितच कुणी करु शकतो.
या सगळ्या मानसिक धक्क्यांनंतरही रिचर्ड काम करतच राहिला. स्वतःला सांभाळत फिजिक्सचा कणा ताठ करतच राहिला. दरम्यान भयंकर अस्वस्थही होता. कुठल्याही होस्टेलवर वगैरे राहणं त्याच्याने होत नव्हतं. अंडरग्रैज्युएट मुलांसोबत राहणंही होतं नव्हतं. त्यानं मोठ्या मुश्कीलीनं त्याचं काम सुरु ठेवल. फंडामेंटल फीजीक्सवरती एवढं काम केलं की त्यासाठी त्याला नोबेल मिळालं. पण काही काळासाठी जेव्हा तो रियो दि जेनेरोला गेला होता तेव्हा त्याला गुप्तचर समजून अटक करण्यात आली होती. त्याने त्याची निष्ठा स्पष्ट केल्यावर त्याला सोडण्यात आलं. नंतर त्याला संगिताचा नाद लागला तो काही वाद्येही वाजवायला शिकला. तिथुन परत आल्यानंतर त्याला एक मुलगी भेटली. मेरी बेल. त्यानं लग्नही केलं तिच्याशी परंतु ते काही जास्त काळ टिकु शकलं नाही. त्याच्या तापट स्वभावानं त्याला तिच्यापासुन दुर नेलं. तशा अवस्थेतही हा मात्र कैल्क्युलसचा अभ्यास झोपता उठाता खाता पिता करत होता. दरम्यान रिचर्डला अध्यक्षांच्या विज्ञान सल्लागार समितीच्या बैठकींसाठी बोलवण्यात आले आणि एफबीआयने फायनमनच्या जवळ असलेल्या महिलेची मुलाखत घेतली, आणि ८ ऑगस्ट १९५८ रोजी जे. एडगर हूव्हर यांना लेखी निवेदन पाठवलं. यात रिचर्ड एकतर कम्युनिस्ट आहे किंवा कम्युनिस्ट समर्थक आहे असा आरोप लावण्यात आला.
तरीही सरकारनं १९५८ च्या शांती परिषदेसाठी रिचर्डला जिनेव्हा येथे पाठवलं. जिनेवा तलावाच्या किनारी तो ग्वेनथ हावर्थला भेटला, घटस्फोटानंतर रिचर्ड जरा हादरालेलाच होता आणि त्यातच त्याची आधीची गर्लफ्रेंड त्याच्या अल्बर्ट आइंस्टीन अवॉर्ड पदवीसह गेली होती. यावेळी मात्र रिचर्डने हॉवर्थबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. तिचे कार्ल नावाचा मुलगा आणि मिशेल ही मुलगी त्याचे झाले.
१९६० च्या दशकाच्या सुरुवातीसच रिचर्डने आपलं सगळं लक्ष शिकवाण्याकडे वळवलं,त्यादरम्यानं त्यानं जेवढी लेक्चर्सा दिली त्याचंच एक पुस्तक तयार झालं. त्याचीच लिंक माझ्या पतीने मला पाठवली आणि मला रिचर्डचा एवढा अभ्यास करण्यास भाग पाडलं. खरंतर रिचर्डला यानंतर आत्मकथन लिहायचं होतं. यासाठी तो अनेक मुलाखतीही देत होता. त्याची अनेक पुस्तकं आली. त्याचं गॅलिलियो आणि विविध शास्त्रज्ञांवरती अभ्यासाचे लेखही आले. अनेक पुरस्कार मिळाले. जागतिक स्तरांवरती ओळखला जाऊ लागला आणि एक महान शास्त्रज्ञ म्हणून नावारुपासही आला. पण म्हणतात ना की यशासोबत आणखीही बरंच काही येतं. १९७८ मध्ये, रिचर्डला लिपोसोर्कोचं निदान झालं. एक किडनी आणि ट्युमर काढुन टाकला. नंतरही दोन शस्त्रक्रिया झाल्या आणि किडन्या फेल झाल्या, डायलिसिसला त्यानं नकार दिला आणि त्याचमुळं तो १५ फेब्रुवारी १९८८ला आपल्या बहिण जोनच्या उपस्थितीच जीव सोडला. त्याला हे आजारी जीवन आवडत नसल्याचं त्यानं बरेचदा बोलुन दाखावलं होतं परंतु आपला फायटर फारच लवकर गेला!
तुझ्या आता लेक्चर्सचा पुरेपुर अभ्यास करायला हवाय रिचर्ड..!!!!