Quick Reads
माझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं : न्यूटन
आयझॅक न्यूटननं भौतिकशास्त्राचा पाया मजबूत केला
भविष्यात कुणीही कितीही कुणावरही बेइंतेहा वगैरे प्रेम केलं तर शालेय जीवनात एखादा खडा असतोच असतो प्रत्येकाचा. एखाद्याच्या हुशारीनं, बोलण्यानं मन आपोआपच कान खुट्ट करुन त्याच्याविषयी ऐकायला लागतं.त्यानं वर्गात दिलेलं उत्तर ऐकण्यासाठी मैत्रिणींची तोंडं जबरदस्ती बंद करायला लागतं. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये,
"लैच सर मैडमच्या पुढं हवा करतंय."
म्हणून एक सुप्त राग ठेवला तरी वयाची पौगंडावस्था शांत बसत नाही. Opposite attracts प्रमाणं जानी दुश्मन कधी जिगर का टुकडा होऊन जातो कळतंही नाही.
तो शाळेत भेटलेला. खरंतरी तिसरीतच ग्रह ताऱ्यांची ओळख होती. पण हीच ओळख मला त्याच्याशी भविष्यात कनेक्ट व्हायला मदत करेल अजिबातच वाटलं नव्हतं. कारण तेव्हा याच्या अस्तित्वाबद्दल काडीमात्रही कल्पना नव्हती. सातवीपासुन मात्र याचं नाव सतत सगळ्यांच्या तोंडी यायला लागलं. कधी फोर्स शिकताना विज्ञानाचे खांडेकर सर याच्या ताकदीबद्दल सर भरभरुन बोलायचे तर कधी भुगोल शिकताना कलुबर्मे सर त्याच्या नावाचा चांगल्या अर्थानं उद्धार करायचे. मला तर साला हा कोण नमुनाय बघायचाच होता. हैला,शिक्षकांकडुन लाड करुन घेण्याचा तोवर ठेका माझा होता ना? मग हा कोण टिकोजीराव आला माझी जागा घ्यायला? म्हणजे मी अभ्यासु होते अशातला भाग नव्हता पण खोड्या आणि थोडंफार वाचन यामुळं जरा लाडकी होते. भयंकर insecurity आली ना राव. तरी दोन वर्षे काढली कसेतरी पण नववीत मात्र याचं अतीच झालं. खांडेकर सरांबरोबर पवार सर,धोकटे सर ,गणितचे माळी सर याच्या नावाचा अक्षरशः जपच करायला लागले. आता मात्र, 'कधी भेटला तर डोक्यात दगडच घालीन याच्या' अशी तीव्र भावना रोज व्हायची. पण जेव्हा खांडेकर सरांना रागारागात एके दिवशी हे बोलले तर सर हसायलाच लागले.
"शांत व्हा डॉन,शांत व्हा. तु डोक्यात दगड घालण्याची वेळचा येणार नाही. हा आधीच डोक्यावर आपटलाय. म्हणजे खरंतर याच्या डोक्यावर आघात झालाय."
"कसला सर?"
"सफरचंद पडलं डोक्यावर याच्या अन् तेव्हापासुनच असा भैसाटलाय."
"काय कळीना सर,नीट सांगा की."
"याचा रागराग न करता फक्त वर्गात ऐकत चल.तुला कळेल."
कळलं ना राव नंतर. डोक्यावर आपटलेला हा येडा कोण ते? तुम्हाला कळलं का? नाही?
असं कसं? अहो फिजिक्स शिकताना ज्याच्याबद्दल प्रचंड राग येऊन वाटतं की सफरचंदाऐवजी सफरचंदाचं झाड पडलं तर बरं झालं असतं . असा हाआयझॅक न्यूटन. महान शास्त्रज्ञ. ज्याचं नाव गली गली का बच्चा जानता है.माझा दोस्त झालेला. का होणार नाही?? खांडेकर सरांनी ओळख करुन दिली ना? मग तर बेस्ट फ्रेंडच होणार. शिवाय आम्हाला एकमेकांच्या प्रेमात पाडायला लायब्ररीचे गरड सर होतेच कि. गरड सर रोजच त्याची माहिती द्यायचे कि मला.
२५ डिसेंबर १६४२ रोजी वूलस्टोरपेमध्ये जन्मला हा. जन्मायच्या तीन महिने आधीच वडिल गेलेले. हा त्या धक्क्यामुळं वेळेआधीच आविकसित जन्मलेला. उपचार तर झाले. जगला ही.म्हणजे हा तेव्हाही त्याच्या काळाच्या आधीच होता.पण आयुष्यात प्रत्येकालाचा स्वतःचा असा comfort zone मिळत नाही ना. अवघा तीन वर्षाचा असताना आईने दुसरं लग्न केलं आणि याला आजीजवळ सोडुन दुसऱ्या नवऱ्याबरोबर गेली . आता त्या वेळी जे काही झालं याचा परिणाम न्युटुवर होणं स्वाभाविकच होतं ना. वडिल आवडत नव्हते आणि आई गेली म्हणून आईही आवडली नाही. हे फार नैसर्गिक असतं नाही का? त्या त्या परिस्थितीत कुणीही चुक बरोबर असत नाही. प्रत्येकजण जगण्याचा मार्ग शोधत असतो. स्वतःच्या सोयीचा. आणि निसर्गनियमानुसार हे अगदीच योग्य असतं. हं तर न्युटु फिलॉसॉफर होता म्हणून आपण नकोय काही तत्वज्ञान झोडायला.
हळुहळु आजीसोबत हिरो मस्त जगत होता.खोडकर तसा नव्हता म्हणायचं की परिस्थितीनं खोडकर बनवलं नाही म्हणायचं हाच काय तो प्रश्न आहे.आणि म्हणूनच तो हुशार,अभ्यासु झाला असावा. ग्रंथामच्या किंग स्कुलमध्ये लॅटिन आणि ग्रीक भाषा आवडीनं शिकला आणि तिथंच त्याला गणिताचीही गोडी लागली. तिथुन मात्र तो परत गावी आलाच. कदाचित सावत्र वडिलांच्या जाण्यानं आईसाठी यावं लागलं असावं. कितीही राग राग केला तरी आईसाठी यावं वाटणं नैसर्गिक नसतं का? आईने मात्र त्याला शेतकरी बनवण्याचा प्रयत्न केला. त्यालाही शेतीबद्दल आवड होतीच. पण किंग स्कुलचे शिक्षक मात्र आपला हुशार विद्यार्थी गमवु इच्छित नव्हते.त्यांनी त्याच्या आईला परत शाळेत पाठवण्याबाबत विनंती केली.
परतला तो शाळेत पण यावेळी मात्र जिद्द होती.चांगले मार्क्स घेणं जणु काही त्याची गरजच झाली होती. कारण जिथं काका शिकले तिथंच त्यालाही कॉलेज पुर्ण करायचं होतं. जून 1661 मध्ये त्याला काका रिव्हियम विलियम आइसकॉ च्या शिफारसीवरून कॅंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये एडमिशन मिळालं. उच्च शिक्षणासाठी त्याला स्कॉलरशीपची नितांत गरज होती.ती मिळेपर्यंत छोटंमोठं काम केलं.आणि नंतर स्कॉलरशीपही मिळालि. अरिस्टोटलच्या सिद्धांतावर आधारित असणारं बेसिक शिक्षण घेता घेता गॅलीलियोच्या खगोलशास्त्राचा नाद लागला. आणि हा भयंकर नाद होता हे मात्र खरं हं. नशा आहे ही साला. आता गॕलिलिओचा नाद लागला म्हणलं की केप्लरची एन्ट्री होणं काळ्या दगडावरची रेषच.
केप्लरचे ग्रहांच्या कक्षाचे तिन्ही नियम गणितीय पद्धतीने सिद्ध केले. स्वतःही गतीचे तीन नियम मांडले. फक्त फिजिक्स किंवा खगोलशास्त्रच उजाळत नव्हता तो. ते सगळे नियम घेऊन रोजच मला विज्ञानाच्या तासाला भेटत होता. नववी दहावीपासुनच आमची भेट ही अशी फिक्स होत गेली. नजरों से नजरे मिली आणि माझ्या डोक्यात फिजिक्सचे दिवे जलने लगे वगैरे. फुल्ल अॉन प्रेमाचा माहौल. लायब्रीतल्या भेटी, विज्ञान तासाच्या भेटीसुद्धा आम्हाला कमी पडायला लागल्या ना. म्हणजे आमचे हे राजे गणिताच्या तासालाही भेटू लागले, एवढ्यासाठी कॅलक्युलससारखी शाखाच तयार केली ना साहेबांनी. गणितात ऑगस्ट १६५५ मध्ये बी.ए. ची डिग्री घेतली. बारावी पर्यंत आमचं हे असं best friends with lots of scientific benefits वाली दोस्ती से थोडी ज्यादा और प्यार से थोडा कम वाली फ्रेंडशिप सुरुच होती. B. Sc लाही हे थोडं थोडं भेटता यावं म्हणून ऑप्टिक्स आणि गुरुत्वाकर्षणाचे नियम ही सिद्ध केले. आणि आता मात्र आमच्या भेटी वाढायलाच लागल्या. याच्या फिजिक्सनं पुरतं घायाळ केलं होतं मला. आता सफरचंद त्याच्या डोक्याऐवजी माझ्या हृदयात धडकत होतं. हाहा.
न्युटु यानंतर केंब्रिजला परतला आणि ट्रिनिटीचा सहकारी झाला.त्याचा प्रचंड अभ्यास बघुन लिबझीज प्रभवीत झाला.आणि लवकरच न्युटु ट्रिनीटीचा मालकही झाला. यानंतर झाला तो जगप्रसिद्ध कॅल्टन लीबनिझ-न्यूटन कॅल्कनस विवाद. बहुतेक आधुनिक इतिहासकारांचा असा विश्वास आहे की न्यूटन आणि लेबनिझ यांनी स्वतंत्ररित्या गणिताची रचना केली परंतु न्यूटनने १६९३ पर्यंत त्याबद्दल जवळजवळ काहीच प्रकाशित केले नव्हते तर लिबनिझने १६८४ मध्ये आपल्या पद्धतींचा पूर्ण अहवाल प्रकाशित करण्यास सुरूवात केली होती. नंतर न्यूटनच्या प्रिन्सिपिया या पुस्कताचा आधार घेत १७११ मध्ये रॉयल सोसायटीने एका अभ्यासात असे म्हटले की न्यूटन हे खरे शोधक आहे आणि लिबनिझ यांनी फसवणूक केली आहे.
न्यूटनची प्रिन्सिपियाची स्वतःची प्रत, दुसऱ्या आवृत्तीत हस्तलिखित दुरुस्तीसह, कॅंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजमधील वॅरेन लायब्ररीमध्ये आहे .
१६७९ मध्ये न्यूटु ग्रहणांविषयी केप्लरच्या नियमांचा आधार घेत संदर्भात गुरुत्वाकर्षण आणि ग्रहांच्या कक्षांवर त्याचा प्रभाव लक्षात घेऊन खगोलीय यंत्रणेवर कार्य करत होता.१६७९-८० मध्ये हुकबरोबर पत्रांची देळिण घेवाण केली. त्यामध्ये धुमकेतुंबद्दलचा बराचसा अभ्यासाचा भाग होता. प्रिन्सिपियाही छापली गेली आणि न्युटुचे गतीविषयकचे तिन्ही नियम जगभर गाजले.त्यानंतरही Newton's cooling law, gravitational law वगैरे अनेक फिजिक्स रिलेटेड गोष्टी बाहेर आल्या. गुरुत्वाकर्षणाचा अभ्यास करत असताना तो पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील आकर्षण बलाचा अभ्यास करत होता. त्यातुनच पृथ्वीच्या पोटात दडलेल्या गुरुत्वकर्षाचा सिद्धांत मांडला गेला.
एकेकाही हुकचा चाहता असणाऱ्या न्युटुचा हैलेच्या धुमकेतुवरुन बराचसा वाद झाला. तो अगदीच जगजाहीर होता. या काळात न्युटु पुर्णतः एकटा झाला. त्या वादाचा परिणाम त्याच्यावर होतच होता. यातच २० मार्च १७२७ रोजी न्यूटु पृथ्वीवर त्याचं गुरुत्वीय बल असणारं शरिर सोडुन गेला.न्यूटु जन्मभर माझ्याशी आणि फिजिक्स प्रामाणिक राहिला.त्याने कधीही लग्न केले नाही.
पण आजही वर्गात gravitation शिकवताना न्युटु संपुर्ण क्लासभर आपल्या प्रेमाची नशा पसरवत असतो. माझ्यासारख्या अनेकांना फिजिक्स प्रेमात अक्षरशः गुरुत्वीय बलासह centripetal force लावुन फिरवत असतो.... !!!
न्युटु इझ बे!
हे झालं माझ्या शालेय क्रशसोबतच प्रेमप्रकरण. पुढच्या आठवड्यात भेटु माझ्या पुरातन प्रेमासोबत....!!!!