Quick Reads

माझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं : अल्बर्ट

विज्ञानाच्या विद्यार्थिनीची वैज्ञानिक लफडी

Credit : WallpaperUP

बारावीला मला फिजिक्सला फारच कमी मार्क्स होते. बी.एस्ससी साठी वालचंदला ऐडमिशन घेतलं. कमी मार्क्समूळं फिजिक्स माझा दुष्मनच झालेला आणि तशातच प्रैक्टीकलच्या पहिल्याच दिवशी लैबमध्ये स्वागत केलं ते एक अतिशय खडुस वगैरे दिसणाऱ्या हिरोनं. ती आमची पहिली भेट. फिजिक्सचा सगळा राग मी याच्यावर काढायचे. रोज लॅबला आले की शिव्या घालायचे. मग तो सवयीचाच भाग होऊन गेला. रोज यायचं आणि याच्याशी भांडायचं. मैत्रिणी कधी हसायच्या, कधी ओरडायचा का त्याच्या मागे लागले म्हणून. प्रॅक्टिकलचं रिडींग चुकलं, कॅल्क्युलेशन  बिघडलं, उशीर झाला या सगळ्याला हाच जबाबदार रहायला लागला. हा माझी पंचिग बैग झालेला. तो ही काही कमी नव्हता. मी भांडले की अस्सा डेँजर लुक द्यायचा बस्स.

हळुहळु भांडणं कमी झालं आणि मुली मला याच्या नावानं चिडवायला लागल्या. कॉलेजच्या बाहेरही कुठंही हा दिसला किंवा याचं नाव दिसलं की मला हाक मारून माझ्या कोपरखळ्या काढु लागल्या. खरंतर नावाशिवाय त्याच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. मैत्रिणींच्या चिडवाण्यामुळं याच्याबद्दल आकर्षण वाटायला लागलेलं. वयच होतं ते पटकन कुणाच्याही प्रेमात पडण्याचं. त्यात हा दिसायलाही जरासा खडुस असला तरी हॅन्डसम होता. याची ओढ लागली म्हणून जाणुन घेऊ लागले याला. फॉलो करू लागले. रोज येऊन भांडण्याऐवजी एक हलकासा प्रेम आणि  लज्जा यांनी भरलेला कटाक्ष फेकु लागले. त्यानंही त्याचा तो रागीट लुक बंद केला आणि खट्याळ नजरेनं बघु लागला.

जसंजसं जाणुन घेत होते तसंतसं अधिकच जवळ गेले. दोन वर्षांच्या या नजर नजर के इशारोंवाल्या खेळानंतर पुर्णपणे याच्या प्रेमात पडले. म्हणतात ना प्रेम लपुन राहत नाही ते? अख्ख्या वर्गाला आणि शिक्षकांनाही याची कुणकुण लागली. त्याचा फिजिक्स म्हणून मीही फिजिक्स घेण्यासाठी कॉलेज चेंज केल्यावर तर नात्यावर शिक्कामोतर्बच झालं. त्यात एका मैत्रिणीने हातावर त्याच्या एका जगप्रसिद्ध निशाणीचा पेननं काढलेला टॅटू  बघितलाच. तर E=mc2 च्या टैटुनं माझी आणि माझ्या अल्बुची प्रेमाकहानी उघड केलीच.

अल्बुबद्दल आकर्षण वाढण्याचं आणखी एक ठोस कारण म्हणजे लहानपणी घरी रद्दीत एक दिवाळी अंक सापडलेला, अमृत नावाचा. त्यातला एक लेखक की लेखिका, जर्मनी प्रवास वर्णनात अल्बुच्या उल्म या जन्मगावाचं वर्णन करते. मला आवडलेलं. त्याचं गाव,बालपण, त्यात त्याचं आधी अगदीच मंद असणं, हे अल्बुचं फक्त  नाव माहीत असणाऱ्यालाही माहित असेल, पण मला मात्र त्याला पुर्णपणे जाणुन घ्यायचं होतं. त्याच्याबद्दल मिळेल तिथुन वाचु लागले आणि जास्तच प्रेमात पडु लागले.

वर्गात,लैबमध्ये आणि डोक्यात हृदयात तोच तो. फोटोईलेक्ट्रीकचं प्रैक्टीकल करताना हा त्याचा शोध आहे म्हणून जरा जास्तच ऍक्युरेट रिडींग्ज यायली लागली. क्वांटमच्या तासाला वर्गात जास्तीच लक्ष देऊ लागले. स्टॅटिस्टिकल फिजिक्स आवडत नव्हतं पण त्यालाही स्पेशल अल्बुटच आहे म्हणून त्यातही मन रमवु लागले. जनरल थिअरी ऑफ  रिलेटीव्हिटी, स्पेशला थिअरी ऑफ रिलेटीव्हीटी, Inertial and Non-inertial frames of references चा त्यानं केलेला वापर, फोटॉनिक फिजिक्स, आणखीही बरंच काही. सगळं कसं अल्बुमय झालं होतं.

आणखी एक राहिलंच. न्युक्लिअर फिजिक्समधल्या त्याच्या कामानं अणुबाँबचा पाया घातला हे कळल्यावर त्याच्यावर चिडले सुद्धा. पण जास्त काळ नाहीच रुसता येत त्याच्यावर. त्याचवेळी Higgs Boson चा शोध लागलेला ना! आणि photonic physics,gravitons मध्येही त्याचा अभ्यास होताच म्हणून न्युक्लिअरच्या वेळी आलेला राग गॉड पार्टिकलने झटक्यात पळवला. तसा रुसवा काढण्यात पटाईत आहे माझा राजा. अगदी पुर्वीपासुनच हां. याआधीही एकदा जरा चिडले होते मी. त्याचं पहिलं अफेयर कळाल्यावर.

मिलेव्हा मॅरीख अल्बुचा पहिला खडा. त्या काळातली एक हुश्शार पोट्टी. झुरीच विद्यापीठातली पहिली महिला विद्यार्थी. अतिशय हुशार आणि कर्तृत्ववान. अल्बुनं पटवलं. त्याच्यापेक्षा वयानं मोठ्ठी आणि त्याच्यापेक्षा काकणभर जास्तीच हुशार. एवढी हुशार असुनही ती ग्रॅज्युएशनला तात्कालिक कारणांनी फेल झाली. परत परिक्षा दिली. परत फेल. मग ती घरी गेली. अल्बु पण तोवर धडपडतच होता. ती घरी गेली तेव्हा प्रेग्नंट होती. तिने अल्बुला खुप पत्रं पाठवली पण या बाबाचा रिप्लायचं नाही. आता तुम्ही तुमच्या आयटमला मेसेज केल्यावर, ब्ल्यु टिक येऊन पण रिप्लाय नाही दिल्यावर कसं वाटेल? शेवटी एकदाचा रिप्लाय आलाच, "मी फिजिक्समधल्या एका problem मध्ये अडकलोय. लवकरच भेटु."

१९०३ मध्ये ते एकत्र आले आणि नंतर मग दोघांनी लग्नं केलं, पण ती प्रेग्नेंट असताना यानं लवकर रिप्लाय नाय दिला म्हणून राग आलेला. साला सब मर्द एक जैसे होते है असंचा वाटलेलं, पण नंतर कळलं की तो जे problems सोडवत होता त्यांनी जग बदलवलं! ती होती स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. माझा रुसवा तर निघालाच आणि त्यात तो gravitational waves च्या शक्यतांबद्दल बोललेला ते खरं ठरलं. आज १०१ वर्षानंतरही त्याची जादु कायम आहे. या जगावर आणि माझ्यावरही. आणि ही जादू अनेक शतकं अशीच राहणार आहे.

Special theory of relativity, General theory of relativity, Photoelectric effect, Quantum theory, Brownian motion, Adiabatic invariance, Einstein's refrigerator, Quanta and photons यासारख्या अनेक विषयांवरचं त्याचं काम आणि  नील्स बोर, हायझेनबर्ग, अप्पेनहायमर सारख्या अनेक लोकांसोबत एकसे बढकै एक केलेलं काम मला त्याच्यात न गुंतवेल तरच नवल. ३०० च्या वर वैज्ञानिक पेपर्स आणि १५० विज्ञानाबाहेरचे पेपर लिहिलेत त्याने. हे ऐकुन तर बस्स मी त्याच्या काळात नसल्याबद्दलच खंत करु लागले.

सायंटिस्ट म्हणून महान तर तो होताच आणि असणारही आहे पण माणुस म्हणूनही महानच होता. मिलेव्हा ताईंनी अल्बुच्या सुरुवातीच्या काळातील अनेक पेपर्स लिहायला मदत केलेली. लग्नानंतर त्यांनी स्वतःचं सायंटिफिक अस्तित्व थांबवलं असलं तरी त्याच्या कामात आणि सुरुवातीच्या काळात त्याला खुप मदत केली. म्हणून तर नोबेल मिळाल्यावर मिळालेली अर्धी रक्कम घटस्फोटातल्या अटीनुसार त्यांना देताना आढेवेढे घेतले नाहीत.

त्याच्यावर एक आरोप नेहमी केला जातो की त्याने त्याच्या बायकोला पुरेसं प्रोत्साहन दिलं नाही. हे खरं ही आहे. थोडासा जेलस होता तो. बाईमाणसाला कमी लेखण्याचाच काळ होता तो, मग देश कोणता का असेना. त्यात आमचं येडं अल्बु, ना खायचचं भान ना कपड्याचं. एकदा वही मध्ये घुसला की घुसलाच. सायंटिस्टांचं हृदय अन् डोकं दोन्हींचा गोपाळकाला होतो त्यांच्या आवडत्या कामात घुसल्यावर. तसंच झालं असंल काय तर. पण चुक झाली खरी.

मला त्याच्यातला माणसाच्या प्रेमात पाडणारी आणखी एक गोष्ट आठवली. एकदा अल्बुला एका पत्रकारानं विचारलं,

"कसं वाटतं महान वैज्ञानिक असणं?"

तर माझा हा लाडका राजा, आल्बुलं डल्बुलं म्हणाला,

"म्हाइत नाय ब्वा. निकोला टेस्लाला विचारलं पायजे."

त्याच्या ना या अशा डाऊन टु अर्थ असण्यानंच मला तो अधिक आवडतो आणि त्याचे शोध मला परत परत त्याच्या प्रेमात पाडतात. खरंतर मला आकंठ प्रेमात पाडलेले दोनच पुरुष. एक म्हणजे रणदीप हुड्डा आणि दुसरा हा १३८ वर्षाचा बुढ्ढा! 

आज  माझ्या पहिल्या वहिल्या प्रेमाचा, लाडक्या राजाचा, अल्बुचा १४० वा वाढदिवस. त्याच्या पासूनच या 'माझी वैज्ञानिक प्रेमप्रकरणं’ या सिरीजला सुरुवात करतेय. दुसरा खडा ओप्पु डार्लिंग!