India

भारतीय पुरुषाची (अव) लक्षणे

भारतीय पुरुष सार्वजनिक अवकाशात असे का वागतात?

Credit : Deccan Chronicle

दिल्लीमध्ये मंगळवारी एक घटना घडली. रात्री सुमारे ९ वाजल्याच्या सुमारास एक महिला पत्रकार काम आटोपून हरियाणातून दक्षिण दिल्लीत सार्वजनिक बसमधून चालली असता एक ३५ वर्ष वयाचा इसम तिच्याजवळ येऊन थांबला. मद्यपान केलेल्या अवस्थेत त्याने पँटची झीप काढली आणि तिच्याकडे पाहतच हस्तमैथुन करू लागला. विशेष म्हणजे या बसमध्ये ती दोघंच अथवा चार - पाच लोकंच होती, अशातला भाग नव्हता. या दोघांना वगळून त्या बसमधून ५० इतर लोक प्रवास करत होते. तिने घाबरून बसमधल्या लोकांना मदत मागितली. मात्र, या या प्रवाशांनीच काय तर बसच्या ड्रायव्हर, कंडक्टरनेही ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि बस सुरुच ठेवली. तिने त्याला हा प्रकार थांबवायला सांगितलं, तर तो हस्तमैथुन सुरूच ठेवून तिलाच आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करू लागला. शेवटी वैतागून तिनं चप्पल काढली आणि त्याला बडवायला सुरुवात केली. सरतेशेवटी बसमधील एक तरुण मुलगा तिच्या मदतीला आला. तिने पोलिसांना बोलावून या हातकरुला पोलिसांच्या ताब्यात दिले. किस्सा संपला.

तर झालेली घटना विचित्रय, वाईट आहे याबाबत दुमत नाही. अशा घटना का होतात, यामागची कारणमीमांसा आपण नंतर पाहू. पण या अशा घटनांवर रिअॅक्ट कसं व्हावं हा मोठा प्रश्न आहे. स्त्रियांवरील बलात्कार, मारहाण अशा गंभीर गुन्ह्यांवर काय प्रतिक्रिया द्यावी, याबाबत सगळ्यांमध्ये बऱ्यापैकी एकसंधता आहे. मग, वरील प्रत्यक्षरित्या शारिरिक इजा न करणाऱ्या घटनांवर रिअॅक्ट होण्यात आपल्यालाच काय पीडित महिलांमध्येही एकवाक्यता दिसत नाही.

सार्वजनिक ठिकाणी विनासंमती लैंगिकरित्या व्यक्त होण्याचं हे काय पहिलंच उदाहरण नाही. विशेषत: दिल्ली, मुंबईसारख्या मोठ्या शहरात अशा घटनांचं पेवंच फुटलंय.

काही दिवसांपूर्वीच दिल्लीत अशीच एक घटना घडली. ओला कॅब चालकाने महिला पॅसेंजर बसलेली असताना आरश्यातून बघत गाडी चालवतच हस्तमैथुन सुरू केलं. त्या महिलेनं हटकल्यानंतर कुठं काय करतोय? बळजबरी थोडी ना केलीय? अशा अर्विभावात त्यानं उत्तर दिलं. ती महिला शेवटी वैतागून कॅबमधून उतरुन गेली. मध्यंतरी मुंबईतही एका मराठी कलाकाराच्या बायकोला अशा प्रकाराला सामोरं जावं लागलं. दिल्ली विद्यापीठातील एका विद्यार्थिनीला एका कार्यक्रमात गेल्यावर गर्दीत मागून कोणीतरी धक्का देतोय वाटलं. तिनं दुर्लक्ष केलं व नंतर घरी जाऊन पाहिलं तेव्हा तिला तिच्या शर्टावर वीर्याचे डाग पडलेले दिसले. अशा घटना सातत्याने समोर येत असून दर पंधरा दिवसाला अशी एखादीतरी बातमी वाचायला मिळतेच.

भारतात फिरायला आलेल्या महिला परदेशी प्रवाशांसाठी सार्वजनिक ठिकाणी आपल्याकडे बघून हस्तमैथुन करणारे पुरुष हा तर नेहमीचाच विशेष भारतीय अनुभव आहे. भारतीय स्त्रियांच्या तुलनेत परदेशी बायकांसाठी हा अनुभव तुलनेनं नवीन असल्याकारणाने त्या सोशल मीडियावर का होईना, अशा घटनांवर व्यक्त होतात. त्यांचं बघून भारतातील स्त्रियाही असले विचित्र अनुभव सोशल मीडियावर सांगायला लागल्या आहेत. अशा शेकडो घटनांपैकी एखादी घटना आपल्यासमोर येत असेल, तरीही दर आठ - पंधरा दिवसाला आपण ह्या बातम्या वाचत असू, तर सार्वजनिक ठिकाणी हस्तमैथुन करण्यात भारतीय पुरुष किती शिरजोर झालाय, याची आपल्या सगळयांनाच चिंता वाटायला हवी. रोजचाच अनुभव आहे आणि त्याचा विशेष शारिरीक काही त्रास नाही, असं म्हणत त्या बसमधील प्रवाशांसारखं बसून राहणं आपल्याला खरंच परवडण्यासारखं आहे काय, याचा पुन्हा एकदा विचार व्हायला हवा.

काही महिन्यांपूर्वी दिल्लीतच बसमध्ये एका महिलेसोबत असाच प्रसंग घडला होता. तस्लिमा नसरीन या बांगलादेशी स्त्रीवादी लेखिकेनं त्यावर व्यक्त केलेलं मत हे वादग्रस्त ठरलं होतं. लैंगिकदृष्ट्या खचलेल्या समाजात वारंवार घडणाऱ्या बलात्कारासारख्या घटना बघता महिलांकडे बघून त्यांच्यासमोर केलं जाणारं हस्तमैथुन ही काय चिंतेची बाब असता कामा नये. उलटपक्षी असं करुन त्यांच्या लैंगिक भावनांचा निचरा होत असेल तर ठीकच आहे, असं म्हणत त्यांनी याचं काहीअंशी समर्थनच केलं होतं. पुरुषांना उघडपणे समोरच्या स्त्रीला फँटसाईज करुन हस्तमैथुन करू दिलं तर बलात्कारासारख्या घटना आपण टाळू शकतो, असं यामागंच सुप्त लॉजिक होतं. अशा घटना गुन्हेगारीत मोडत असल्या तरी त्यात पीडित कोणीचं ठरत नाही, असा त्यांचा दावा होता. थोडक्यात अशा घटनांची गणती victimless crime मध्ये करुन त्या मोकळ्या झाल्या.

थोडासा विचार करता तस्लिमा नसरीन यांच्या दाव्यात थोडंफार तथ्य जरी वाटत असलं तरी अशा घटनांना सरसकट Victimless crime म्हणणं म्हणजे जरा अतिच आहे, अशा प्रतिक्रिया नेटीझन्सनी त्यावेळी व्यक्त केल्या. यामुळे एका नवीनच चर्चेला पेव फुटले.

अशावेळी तस्लिमा नसरीन यांच्या दाव्यामधील संदर्भ व तर्क समजून घेणं आवश्यक आहे. लैंगिकदृष्ट्या थोडंफार पुढारलेल्या समाजात वाढल्यामुळे परदेशी महिलेला ही घटना नवीन वाटली अन् तिनं आरडाओरड केली. त्याचजागी भारतीय स्त्रीनं कशीबशी या अवघड प्रसंगातून सुटका करुन घेतली आणि ती निघून गेली. हे म्हणजे दरोडा घालायला आलेले चोर फक्त सोनं आणि पैसा घेऊन गेले पण जीव घेतला नाही म्हणत सुस्कारा टाकण्यासारखं आहे.

विनासंमती लैंगिक भावनांचं होणारं हे प्रदर्शन शारिरीक इजा पोहचवणारं नसलं तरी तरी मानसिक नुकसान करणारं नक्कीच आहे. अशा घटनांना सामोरं जाव्या लागणाऱ्या स्त्रियांना स्वत:विषय़ी, पुरुषांविषयी किंवा एकूणच लैंगिक कृत्यांविषयी घृणा निर्माण झाल्याची कित्येक उदाहरणं आहेत. आज हस्तमैथुन करणाऱ्या या तरुणांचा लैंगिक निचरा झाल्यामुळे तो उद्या बलात्कार करणार नाही, या युक्तिवादातच मुळात विरोधाभास आहे. हा विरोधाभास समजून घेण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी हस्तमैथुन करण्याच्या प्रेरणेच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे.

सार्वजनिकरित्या स्त्रियांसमोर निर्लज्जपणे हस्तमैथुन करणाऱ्यांच्या लैंगिक भावनांचे अनेक पदर असू शकतात. ज्या ज्या गोष्टी कोणाला प्रथमदर्शनी विकृत व अशक्यप्राय वाटतील त्या त्या गोष्टी अशा लोकांना लैंगिकदृष्ट्या उत्तेजित करण्यास कारणीभूत ठरतात. याला मानसशास्त्रात पॅराफिलिया अशा नावाची संज्ञा आहे. जसे की  सार्वजनिकरित्या अनोळखी स्त्रिच्या संमतीविना तिलाच फँटसाईज करण्याने उत्तेजन भेटणे. हे फँटसाईज करताना पकडलो जाण्याच्या भितीच्या थ्रिलने पुन्हा उत्तेजन. तिच्यासमोरच हस्तमैथुन करताना तिला बसलेला धक्का, तिच्या चेहऱ्यावरील घृणास्पद व लज्जास्पद भाव याने मिळणारे उत्तेजन.

अशाप्रकारे सामान्यत: ज्या गोष्टी हस्तमैथुन करण्यासाठी प्रतिकुल ठरू शकतील, त्याचगोष्टी काही लोकांच्या बाबतीत विशिष्ट परिस्थितीत अनुकुल ठरतात. पण या पॅराफिलिक लोकांना या सर्व गोष्टी करण्याचे स्वातंत्र्य घेण्यासाठी जी हिम्मत एकवटावी लागते, त्यासाठी काही सामाजिक घटक कारणीभूत ठरतात, ज्यात तुमचा आणि माझाही समावेश होतो.

हस्तमैथुन करणाऱ्या त्या पुरुषाला माहिती असतं की, पकडलो गेलो तर आजुबाजूचे लोकंच काय पीडित महिलासुध्दा लाजेने मूग गिळून गप्प बसेल. चुकून एखादा कोणी बोललाच अथवा बोललीच तरी अनोळखी लोकांच्या समुहात असल्याने उद्या बदनामीचा प्रश्नही उद्भवत नाही. काहीही झालं तरी लोक आणि कायदासुध्दा याची बलात्कारासारखा गंभीर गुन्हा म्हणून नोंद घेणार नाही. भारतीय दंड संहितेत (आयपीसी) सार्वजनिक ठिकाणी हस्तमैथुन करणे अशा शब्दबध्द केलेल्या गुन्ह्याची नोंद नाही. मात्र, तरीही सदर व्यक्तीवर सार्वजनिक ठिकाणी अश्लील वागणूक करणे, महिलांचा अनादर करणे अशा कलमांतर्गत कारवाई होऊ शकते. पण हे गुन्हे तुलनेने गंभीर नसल्याने त्यांची लगेच सुटकाही होते. भारतीय पुरुषांनी सार्वजनिक ठिकाणी हस्तमैथुन कलेत मिळवलेले प्राविण्य लक्षात घेता, आयपीसीमध्ये याचे एक वेगळे कलम समाविष्ट करणे संयुक्तिक ठरेल.

या विकृतीला फक्त विकृती म्हणून तुच्छतेने हेटाळून दुर्लक्ष करणं परवडण्यासारखं नाही. अशा घटनांवर लोकांची किंबहुना कायद्याचीही प्रतिक्रिया सौम्य असल्याकारणानेच ही विकृती प्रत्यक्ष कृतीत परावर्तित होऊ शकली. त्यामुळे अशा घटनांचं जनरालयझेशन होणं आणि आपल्याला त्यात काहीच विशेष न वाटणं ही अतिशय घातक गोष्ट आहे. उद्या बलात्कारासारख्या घटनेवरील आपली प्रतिक्रिया सौम्य झाली तर त्याचंही जनरलायझेशन होऊन आज जेवढ्या सहजतेनं हे पुरुष धीटपणे हस्तमैथुन करतायत, तेवढ्याच सहजतेनं उद्या ते बलात्कार करतील याची शक्यता नाकारता येत नाही. एखादी गोष्ट विकृत आहे म्हणून सोडून देणं हे म्हणजे स्वत:पासून दूर पळण्यासारखं आहे.

विकृती ही काय आभाळातून पडत नाही, तर तुमच्या आमच्याच सगळ्यांमध्ये असते. तिला आपण कसं जपतो, वाढवतो तिचा सामना कसा करतो यावर तिची तीव्रता आणि आयुर्मान अवलंबून आहे. उघड्यावर भीम पराक्रम करणारे हे सगळेजण एकाच सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक स्तरातील लोक नव्हते. यातील काही जण तर सधन उच्चस्तरीय कुटुंबातील असल्याची उदाहरणं आपल्यासमोर आहेत.

सार्वजनिक जीवनातील लैंगिक आक्रमणाच्या याहून सौम्य घटना, तर भारतीय महिला व मुलींच्या दैनंदिनीच्या भाग होऊन बसल्या आहेत. बस, ट्रेन, मंदिर अशा गर्दीच्या ठिकाणी कोणी कुठे हात लावून विकृत आनंद मिळवणं हे रोजचं होऊन बसलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देऊन स्वत:चा वेळ का खर्ची घालावा इतपत कोडगेपणा आपल्यात आलेला आहे. माझी एक मैत्रीण एकदा मस्करीत बोलता बोलता म्हणाली की, यावर्षी वारीत गेले असं वाटतच नाही. कारण कोणी काही केलंच नाही. यातला विनोदाचा भाग सोडला, तर तिच्या विनोदातील sarcasm आपण समाज म्हणून लैंगिकदृ्ष्ट्या किती पंगू आहोत याची साक्ष देतो. लैंगिक शिक्षणाची मारामार असलेल्या देशात एक स्त्री एका पुरुषाने केलेल्या लैंगिक आक्रमणाविषयी दुसऱ्या पुरुषाजवळ तुच्छतावादी विनोदबुध्दीने बोलते, हे एकाचवेळी हास्यास्पद आणि गंभीर आहे.

पितृसत्ताक समाजात स्त्रियांचं objectification होत असल्याचं म्हणत गळे काढणाऱ्या नवस्त्रीवाद्यांचा दावा भपंक असून चरमोत्कर्षाच्या विशिष्टक्षणी पुरुषांकडून स्त्रियांचं आणि स्त्रियांकडून पुरुषांचं objectification होणं हे निसर्गाला धरून अत्यंत साहजिकच आहे. फक्त स्वत:च्या लैंगिक आक्रमकतेचं दमन करताना ती आक्रमकता समोरच्याच्या संमतीच्या (consent) कसोटीवर खरी उतरायला हवी. लैगिक कृतीवरील संमतीवर इथं चर्चा करणं संयुक्तिक ठरणार नाही. तुमचा पार्टनर, वर्गातील मुलगी, मित्राची बायको, आवडती सेलिब्रिटी या सर्वांचा तुमच्या समागमाच्या रम्य कल्पनाविश्वात अलगद शिरकाव होणं हे साहजिक आहे आणि त्याबद्दल वाईट वाटण्याचं काही कारण नाही. विशिष्ट समाजरचनेत नैतिक चालीरीतीच्या अलिखित करारानुसार संमतीची व्याख्या ठरत असते. ती व्याख्या समजून घेऊन त्या रेषेतच तुमच्या लैंगिक भावनेचा निचरा करणं व ती रेषा कोणी ओलांडण्याचा प्रयत्न करत असल्यास त्यावर योग्य प्रतिक्रिया देणं ही तुम्हा आम्हा सर्वाचीच सामाजिक जबाबदारी आहे.