Quick Reads

फलसफी: जागतिक तत्वज्ञान दिवस

सोक्रेटीसच्या मृत्युदिनी जागतिक तत्वज्ञान दिन साजरा होते

Credit : jacques louis-david

फायरबाख वरील शेवटच्या सिद्धांतात मार्क्स चा शेवटचा सिद्धांत खूप प्रसिद्ध आहे, कार्ल मार्क्स म्हणतो, 'आज पर्यंत तत्ववेत्यांनी जगाचा वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ लावला आहे, मुद्दा आहे जग बदलण्याचा!!'.  असंच काहीसं वाक्य बाबासाहेब आंबेडकर, 'बुद्ध आणि त्याच्या धम्म' मध्ये लिहितात. धर्माचं उद्धिष्ट जगाचा उदय व अंत स्पष्ट करणं आहे, धम्माचं उद्धिष्ट जग बदलणे हे आहे. बुद्ध स्वतःबद्दल बोलताना असंच काही म्हणतो, 'मी मार्गदाता आहे मोक्षदाता नाही',किंवा 'जसे नदी पार करण्यासाठी आपण तराफ्याचा उपयोग करतोय, तसा माझ्या विचारांचा उपयोग जीवनातील दुःख पार करण्यासाठी करा'.
 
हे तिन्ही सिद्धांत जवळून पाहिले असता आपणाला असे लक्षात येते की बुद्ध- मार्क्स - बाबासाहेब तत्वज्ञानाला किंवा तत्त्ववेत्याला उपयोग्यतेच्या अनुशंगाने पाहतात म्हणजेच या तिन्ही तत्ववेत्यासाठी तत्वज्ञान हे उद्धिष्ट नाही किंवा निरंतर अस्तित्वात असणारी किंवा चालणारी गोष्ट नाही तर ती विशिष्ट परिस्थितीत माणसाला प्रबोधन करणारी गोष्ट आहे व त्याच सोबत त्या परिस्थितीतुन बाहेर काढण्यासाठी उद्युक्त करणारी गोष्ट आहे.

आज जागतिक तत्वज्ञान दिवस म्हणजेच सॉक्रेटिसचा मृत्यदिवस. अथेनियन लोकशाहीच्या विरोधात तरुणांना भडकवण्याच्या आरोपाखाली सॉक्रेटिसला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आणि त्याने अथेन्सच्या प्रेमाखातर ती स्विकारली सुध्दा. फ्रेंच तत्त्ववेत्ता बाद्यू या घटनेला तत्वज्ञानाची सुरवात म्हणतो. तत्वज्ञानाची सुरुवातच एका आरोपाने होते - तत्वज्ञान लोकांना भ्रष्ट करतं! हो तत्वज्ञान लोकांना भ्रष्ट करतं म्हणून सॉक्रेटिस हे सत्य मान्य करत स्वतःचा मृत्यू मान्य करतो. 

पण भ्रष्ट करणं म्हणजे लोकांच्या मजबुरीचा, दयनीय अवस्थेचा फायदा घेण नाही (जे धर्म आणि राज्यसंस्था नेहमीच करत आली आहे) तर लोकांना त्यांच्या या अवस्थे बद्दल सजग करणं, त्या अवस्थेची जाणीव करुण देणं म्हणजे लोकांना भ्रष्ट करणं होय. तत्वज्ञानाचं काम फक्त जाणीव करून देण्या इतपत नाही तर त्यांना त्या परिस्थिती विरोधात ऊभे राहण्यासाठी प्रवृत्त करणं ही आहे. या प्रवृत्त करण्याच्या तऱ्हा वेगवेगळ्या असू ही शकतात. उदाहरण सॉक्रेटिस बौद्धिक पातळीवर तरुणांना त्यांच्या पूर्वीच्या 'ज्ञाना' विरोधात प्रवृत्त करतो, तर मार्क्स लोकांना बौद्धिक-सामाजिक-भौतिक-राजकीय पातळी वर प्रवृत्त करत राजकीय कृतीला साद घालतो.

तर यामध्ये मूळ मुद्दा हा आहे, की लोक अज्ञानात जगत असतात, सॉक्रेटिस - प्लेटो याला 'डोक्सा' म्हणेल, बाद्यू सुध्दा याच परंपरेतील, तर बुद्ध याला अविध्या म्हणतो, मार्क्स याला खोटी जाणीव किंवा 'false consciousness' असं म्हणतो. माणूस अज्ञानी असतो आणि तत्वज्ञान त्याला या अज्ञानातुन बाहेर काढतं हे मूळ तत्व मान्य केल्यास, एक नवीन प्रश्न निर्माण होतो आणि तो म्हणजे माणसाला अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी तत्वज्ञान चिरंतन काळ अस्तित्वात असणं गरजेचं आहे का? या प्रश्नांच पहिलं उत्तर प्लेटोच्या 'रिपब्लिक' मध्ये देतो, प्लेटोच्या मते लोकांना लोकशाही मार्गाने समाज चालवता येत नाही आणि म्हणून लोकांना समाज चालवण्यासाठी 'तत्त्ववेत्ता राजा'ची गरज असते जो ज्ञानी असतो आणि जो समाजाला एकसंध बांधून समाजाची जडणघडण करतो. बाद्यू आजच्या काळातील तरुणांना उद्देशून लिहिताना हीच भूमिका घेतो की शहाणा मनुष्य नवउदारवादी जगण्यात भरकटलेल्या तरुणांना नवी वाट दाखवत चांगले जगणे म्हणजे काय हे शिकवू शकतो.
 
माझा प्रश्न या शिकवण्याबद्दल आहे. तत्वज्ञान आणि तत्ववेत्याला काही मर्यादा असाव्यात का? की ते चिरंतन असावे? मार्क्स १८४६ मध्ये तत्वज्ञानाला आयडिओलॉजी म्हणतो, तर हाच मार्क्स १८४४ मध्ये तत्वज्ञानाची जहालता जाहीर करतो. तत्वज्ञान किंवा आयडिओलॉजी म्हणजे काय? हे कुणाला उद्देशुंन म्हंटल आहे?  तर मार्क्स त्याच्या अगोदरच्या जर्मन परंपरेला विशेषतः हेगेल आणि तरुण हेगेलपंथीयाना व त्यांच्या तत्वज्ञानाला आयडिओलॉजी म्हणतो. कारण ही तत्वज्ञान मानवी जगण्याचा प्रश्न जाणिवेच्या/ विचारांच्या पातळीवर शोधू पाहतात, ही तत्वज्ञान माणसाला कृतिशील संवेदनशील जाणीव असलेला माणूस म्हणून पाहत नाहीत (फायरबाख चा पहिला सिद्धांत पाहावा) आणि म्हणून चिद्वादी आणि भौतिकवादी तत्वज्ञान या दोन्ही परंपरा आयडियॉलॉजी आहेत.
 
तत्वज्ञान म्हणजे आयडिओलॉजि या विरोधात मार्क्स स्वतःच मत १८४४ मध्ये मांडतो. मार्क्सच्या मते तत्वज्ञान माणसाच्या जगण्यातील मूळ प्रश्नांची पकड घेते तेंव्हा ते जहाल बनत असते जेंव्हा ते माणसाच्या भौतिक प्रश्नाबाबत बोलते तेंव्हा ते कामगारवर्गाच्या हातातील दुहेरी तलवार असते. परंतु तत्वज्ञान ही सोडवणून फक्त विचारांच्या पातळीवर करत नाही तर ती सोडवणूक प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये राजकीय भौतिक बदल घडवून करत असते,  अर्थाने तत्वज्ञान कृतिशील असते. म्हणजेच तत्वज्ञान त्या विशिष्ट परिस्थिचा भौतिक अर्थ लावण्यासाठी लोकांना मदत देखील करते परंतु त्याच सोबत ती परिस्थिती बदलण्यासाठी तत्त्वज्ञान लोकांच्या सोबत कार्यरतही असते. थोडक्यात मार्क्सवादी तत्त्ववेत्ता हा फक्त विद्यापीठीय प्राध्यापक नसतो तर तो प्रत्यक्ष वर्गसंघर्षात लोकांसोबत कार्यरत असतो. प्रश्न कार्यरत असण्यापुरता मर्यादित राहत नाही तर मार्क्स या पूढे जाऊन तत्वज्ञानाच्या अंताची भाषा करतो.
  
तत्त्वज्ञानाचा अंत म्हणजे काय? तर मार्क्सच्या मते प्रत्येक तत्वज्ञान हे त्या काळाचे अपत्य असते (इथे मार्क्स थोडा हेगेलीयन होतो, विशेषतः हेगेलच्या Owl of Minerva च्या संदर्भात). जेंव्हा तत्वज्ञान ती भौतिक परिस्थिती भौतिक - राजकीय मार्गाने संपुष्टात आणते त्यानंतर त्या समाजाला तत्वज्ञानाची गरज भासत नाही. याही पूढे जाऊन मार्क्स म्हणतो की समाजवादात माणसाचे सगळेच भौतिक प्रश्न सुटल्यावर तत्वज्ञानाने कोणत्याही प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रश्नच उरणार नाहीत आणि म्हणून तत्वज्ञान ही विशिष्ट व महान (परात्म सुध्दा!) शाखाच  संपुष्टात येईल. या अवस्थेत एक विशिष्ट व्यक्तीच तत्त्ववेत्ता नसेल (जो भांडवली व्यवस्थेत नेहमीच वरच्या वर्गातील असतो!) तर प्रत्येक व्यक्ती तत्त्ववेत्ता असेल कारण या अवस्थेत माणूस  त्याच्या भौतिक गरजांच्या प्रांतातून खऱ्या अर्थाने मुक्त झाला असेल, त्याचे अस्तिताचे प्रश्न खऱ्या अर्थाने सुटले असतील आणि म्हणून तो तत्त्वज्ञानाच्या गप्पा करण्यासाठी मुक्त असेल. त्याच्या जगण्याचा प्रश्न काय आहे आणि तो कसा सोडवावा हे सांगण्यासाठी त्याला विशिष्ट व्यक्तीची गरज भासणार नाही.
 
आज जगाचा प्रश्न विशिष्ट घटकांच्या शोषणापुरता मर्यादित नाही तर आज जग स्वतःच्या अस्तित्वासाठीच झगडत आहे (अणुस्फोटाचं अरिष्ट, पर्यावरणाचं अरिष्ट, ऑटोमेशनचं, निर्वासितांच्या प्रश्नाचं, भांडवली, फॅसिस्ट, अस्मितेच्या राजकारणाचं अरिष्ट ईत्यादी) या सर्व अरिष्टातुन जगाला अस्तित्वात असलेली राजकीय किंवा भांडवली व्यवस्था वाचवू शकत नाही. आज जगासमोर पूर्वीसारखा समाजवाद किंवा अराजकता (Anarchism)  हा पर्याय उपलब्ध ही नाही तर जगासमोर फक्त बार्बारिझम, बर्बरतेचा, हिंस्त्रतेचा पर्याय उपलब्ध आहे. 

अशा काळात, मार्क्स म्हणतो तसं, जगाला कृतिशील राजकीय तत्त्वज्ञानाची गरज आहे. तत्वज्ञान जे माणसाला या परिस्थितीची जाणीव ही करून देईल आणि या परिस्थितीतुन बाहेर काढत नवीन समाज निर्माण करण्यासाठी उद्युक्त ही करेल. सॉक्रेटिसचा मृत्यू हा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे आणि असेल आणि गरज पडली तर जगाने अजून सॉक्रेटिस जन्माला ही घालावेत परंतु यावेळी त्यांच्या मृत्यूनंतर असा समाज जन्माला यावा जिथे सगळं जगच सॉक्रेटिस असेल जिथे जगातील प्रत्येक व्यक्तीच ज्ञानाचा प्रियकर असेल!