Quick Reads
त्या रिक्षातल्या प्रेमाचं पॉर्न कोणी केलं?
या अशा घटनांच्या निमित्ताने आपल्याला आपल्यामध्ये डोकावण्याची संधी मिळते
प्रत्येक व्यक्तीला कसला ना कसला तरी कॉम्प्लेक्स असतो. न्यूनगंड असणं हा कोणाच्याही व्यक्तिमत्त्वाचा नैसर्गिक भाग आहे. कोणाला कशाचा कॉम्प्लेक्स असावा, याचा काही नेम नाही. पण तरी एखादी व्यक्ती कोणत्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक क्षेत्रातून आलीये यावरून आपण तिच्या न्यूनगंडा विषयी एक साधारण अंदाज लावू शकतो. अर्थात याला अपवाद असतातच. उदाहरणादाखल खेड्यातून अथवा निमशहरी भागातून शहरात स्थलांतर केलेल्या माणसाला इंग्रजीचा कॉम्प्लेक्स येणं सहाजिक आहे. व्यक्तीचे जसे वैयक्तिक न्यूनगंड असतात त्याचप्रमाणे एकसमान संस्कृतीचं, नैतिकतेचं ओझं वाहणाऱ्या समाजालाही न्यूनगंड असणं सहाजिकच म्हणावं लागेल.
भारतीय परिप्रेक्षात आपल्या समाजाच्या अंगभूत न्यूनगंडांमध्ये सेक्सबद्दलच्या न्यूनगंडाचा सामावेश अग्रक्रमानं करावा लागेल. या न्यूनगंडावर पुन्हा एकदा बोट ठेवण्याचं नैमित्तिक कारण म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियातून चवीने फिरवला जात असलेला एक व्हिडिओ. या व्हिडिओत रस्त्यावरून चालत्या रिक्षात एक तरुण जोडपं प्रणयक्रीडेत दंग असलेलं पाहायला मिळतंय. ज्या वेगानं आणि चवीनं हा व्हिडीओ व्हाट्सअप वरून फिरवला जातोय त्यावरून एक उघड सत्य पुन्हा एकदा अधोरेखित होतं की आपण एक लैंगिक दृष्ट्या कमालीच्या वैफल्यग्रस्त समाजाचा भाग आहोत. यावर पडणाऱ्या प्रतिक्रियांचा पाऊस म्हणजे आपण सगळेच हार्डकोर भारतीय पर्यायाने सेक्शुअली फ्रस्ट्रेटेड असल्याचा दाखला आहे.
नेहमीप्रमाणे आता यावरही दोन्ही बाजूंनी चर्चा झडत आहेत. एका पक्ष घेणारे तर दुसरे समर्थन करणारे. दोन व्यक्ती एकमेकांवर प्रेम करतात आणि ते चूक की बरोबर अशी चर्चा होते हे जर लैंगिक दृष्ट्या वैफल्य न आलेल्या समाजातील कोण्या तिसर्या माणसाला कळालं तर त्याच्यात पुन्हा एक नवीन न्यूनगंड तयार होण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. आता ज्या लोकांनी रिक्षातल्या दोघांवर आक्षेप घेतलाय ही तीच लोक आहेत ज्यांचा नोटबंदीमुळे काळ्या पैशांवर आळा बसला यावर विश्वास आहे. त्यामुळे त्यांना गंभीरपणे घेण्याची गरज नाही. राहता राहिला प्रश्न दुसऱ्या बाजूला या चर्चेत त्या दोघांचे हिरीरीने समर्थन करणाऱ्यांचा. तर कोणीतरी यांना सांगायची गरज आहे की दोन व्यक्तींना एकमेकांवर प्रेम करण्यासाठी तुमच्या समर्थनाची गरज नाही.
मानवी इतिहासाच्या त्या त्या टप्प्यावर विकास करत माणसानं काही नवीन मूल्य तयार करून ती स्वीकारली. उदाहरणादाखल काही वर्षांपूर्वी काही लोकांनी स्त्रीच्या शिक्षणासाठी लढा उभारला आणि सगळ्यांनाच शिक्षणाचा अधिकार असल्याचे मूल्य रुजवलं. त्या त्या काळातील संघर्षातून वाट काढत आपण स्त्री शिक्षणाचे मूल्य स्वीकारून एक काळ लोटला. आता आपण त्यावर चर्चा करत बसत नाही की, स्त्रीला शिक्षण द्यावं की नको? कारण ती ग्राह्य गोष्ट आहे. त्याचप्रमाणे दोन व्यक्ती परस्परसंमतीने एकमेकांशी लगट करत आहेत तर त्यांचं समर्थन वगैरे करत आपला मागासलेपणा सिद्ध करायची काही एक गरज नाही. कारण प्रेमाची ही लढाई लढून झालीये. तर पुढे सरका. त्यांचं जाऊ द्या. तुम्ही व्हिडिओ एवढ्या चवीनं का बघताय हा प्रश्न स्वतःला विचारा. एवढं करूनही पण त्या दोघांनी उघड्यावर असं करायला नको होतं असं म्हणत बारीक पिन टोचणाऱ्यांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की आपण उघड्यावर हागायला बसू शकतो तर उघड्यावर प्रेम तर करूच शकतो.
या अशा घटनांच्या निमित्ताने आपल्याला आपल्यामध्ये डोकावण्याची संधी मिळते. ती आपण सोडता कामा नये. रिक्षात चाललेला खेळ चूक की बरोबर या फंदात पडण्यापेक्षा त्याहून महत्त्वाचे प्रश्न या निमित्ताने आपल्या समोर आ वासून उभे राहतात. जसं की भररस्त्यात आपलं काम सोडून व्हिडिओ काढणाऱ्या त्या इसमाच्या कष्टामागची तसेच त्याच्या कष्टाला आपण देत असलेल्या उदंड प्रतिसादाची प्रेरणा काय असू शकते? माणसासाठी आता सेक्स (संभोग) ही फक्त गरज वाटली तेव्हा करायची गोष्ट राहिलेली नाही. याचं एक कारण म्हणजे इतिहासाच्या एका टप्प्यावर माणसानं स्वतःच्या सोयीसाठी निसर्गाच्या विरुद्ध जात स्वतःवर लग्नसंस्था, मोनोगामी अशा व्यवस्था लादल्या. यातून लैंगिक भावनांचं दमन करणं जेवढं सोयीस्कर झालं तेवढच एकसुरीसुद्धा! याच एकसुरीपणातून सेक्सभोवतीच्या राजकारणात आमुलाग्र बदल झाला. आता यातून सेक्स भोवतीच राजकारण म्हणजे काय असा प्रश्न पडणं म्हणजेच आपण पक्के राजकारणी आहोत याचे द्योतक आहे. संभोगाची अमर्याद भूक आणि ती भूक भागवणे सहजशक्य राहिलेलं नाही, असं कळाल्यावर माणसानं ती भागवण्यासाठी षड्यंत्र आणि कल्पना रचायला सुरुवात केली. लग्नसंस्था आणि तिला लाभलेल्या पावित्र्याचं वलय हा देखील त्याच राजकारणाचा भाग आहे. खरंतर लग्नसंस्था मोडकळीस आली तर अनागोंदी माजेल आणि कोणीही कोणासोबत संभोग करेल, या भीतीवरच लग्नसंस्था नावाचं फिक्शन आणि त्या भोवतीच राजकारण आजतागायत टिकून आहे.
याचा अर्थ त्या अगोदर सेक्ससाठी राजकारण होत नव्हतं असा नव्हे. एकाला एक असं गणित मांडण्याच्या अगोदरपासून सेक्ससाठी राजकारण करणं ही माणसाची गरज बनून गेली होती. उदाहरणादाखल मानववंशशास्त्रज्ञांनी मान्य केलेली एक थेअरी थोडक्यात समजून घेऊ. लग्नसंस्था जन्माला येण्याअगोदर हजारो वर्षांपूर्वी जेव्हा माणसाला कळलं की प्रजननाची क्षमता फक्त स्त्री मध्येच आहे आणि त्यासाठी तिला लागणारी पुरुषाची गरज नाममात्र आहे तेव्हा सहाजिकच सेक्स या नैसर्गिक प्रेरणेचा ड्रायव्हिंग फोर्स स्त्री ठरू लागली होती. इंग्रजीमध्ये एक शब्दप्रयोग आहे पॉवर रिलेशन्स. तर हे पावर रिलेशन्स त्यामुळे स्त्रीकेंद्री होत गेले.
संभोगासाठी कोणता पुरुष हवाय हे निवडण्याइतपत शक्ती या प्रजनन क्षमतेनं स्त्रीला प्रदान केली. होणारं मूल सुदृढ असावं, या हेतूने त्या स्त्रीने मग फक्त तंदुरुस्त आणि हुशार पुरुषांशीच संभोग सुरू केला. समजा त्यावेळी शंभर पुरुष आणि शंभर स्त्रिया एका समूहात असतील तर त्या सगळ्या शंभर स्त्रिया त्यातील फक्त तुलनेनं आकर्षक अशा ३० पुरुषांशीच संभोग करायच्या. यामुळे मग बहुतांश पुरुष सेक्स सारख्या नैसर्गिक गरजेपासून वंचित राहायला लागले. या वंचित बहुजनांनी मग आपली आघाडी उघडून सेक्ससारखी नैसर्गिक प्रेरणा भागवण्यासाठी राजकारण सुरू केलं. अर्थात कल्पना करून फिक्शन रचणं हे फक्त माणसालाच शक्य असल्यामुळे याची सुरुवात झाली.
स्त्रियांना आकर्षित करण्यासाठी आपल्याकडे आकर्षक शरीर नाही तर मग मिथक तयार करून स्त्रीला खूश करण्याचे प्रयत्न होऊ लागले. खाजगी मालमत्ता, सत्ता, शिकारी सारखे साहस प्रकार हा या राजकारणाचाच भाग होता. याच लैंगिक दृष्ट्या वैफल्यग्रस्त सत्तर जणांनी रचलेलं लग्नसंस्था आणि मोनोगॅमीचं मिथक हा त्या राजकारणाचा परमोच्च बिंदू म्हणावा लागेल. आता या सर्वांचा आणि रिक्षा प्रकरणाचा काय संबंध असा प्रश्न कोणी विचारू शकेल. पण त्या रिक्षातील जोडप्याचा कोणी एकाने व्हिडिओ काढणं. त्यावर रूढीवादी गटाने आक्षेप घेणं तर लिबरल म्हणवल्या जाणाऱ्यांनी समर्थन करणं हे त्या प्रत्येकानं स्वतःच्या लैंगिक भावनांचं दमन करण्यासाठी केलेले राजकारण आहे हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. अन्यथा कोण कुठल्या दोन भिन्नलिंगी व्यक्ती लैंगिक सुखाचा उपभोग घेतायेत, त्यावर हजारो-लाखो लोक संबंध नसताना प्रतिक्रिया देतात याला आपण दुसरे काय म्हणू शकतो?
एवढी मिथकं पेरून, राजकारण करूनही त्या ७० जणांचं लैंगिक वैफल्य काही गेलंलं नाही. सेक्स भोवतीच्या फिक्शनच्या गराड्यायामुळे भविष्यातही ते जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे अशी एखादी घटना घडताच या लोकांचं वैफल्य या ना त्या मार्गानं उत्स्फूर्तरित्या बाहेर पडतं. या लोकांच्या निव्वळ प्रतिक्रिया न बघता या प्रतिक्रिया मागील त्यांच्या प्रेरणांचा अभ्यास केला तर दुसऱ्याचं वाकून पाहण्यामागील माणसाचा कार्यकारणभाव आपल्या लक्षात येईल.
भारतीय परिप्रेक्षातील माणूस तर विशेष करून सेक्स भोवतीच्या फिक्शन्स आणि राजकारणाने एवढा लिंगबंबाळ झालाय की त्याला सेक्सबद्दल कॉम्प्लेक्स आला नाही तर ती आश्चर्याची गोष्ट ठरेल. या कॉम्प्लेक्स मधूनच मग सेक्स ही फक्त अनुभवण्याची नाही तर बोलण्याची, कुजबुजण्याची, पाहण्याची गोष्ट बनून जाते. याच कॉम्प्लेक्स मधून दोन माणसांना संभोग करायला लावून, त्याचं चित्रीकरण करून ते पाहत हस्तमैथुन करणं, असा भलताच विचित्र प्रकार करायला माणसाने सुरुवात केली. खरंतर पॉर्न या प्रकारालाच माणसानं सेक्सभोवती रचलेल्या राजकारणाचं बाय प्रोडक्ट म्हणता येईल.
यात पुन्हा पॉर्नचे विविध प्रकार म्हणजे या राजकारणातील डिस्कोर्सेसचं डिजिटल प्रारूपच म्हणावं लागेल. याचं भारतीय व्हर्जन तर भलतंच विचित्र आहे. इंडियन पॉर्न या कॅटेगिरीत कलाकारांना अभिनय करायला लावून पद्धतशीरपणे प्रणय क्रीडा दाखवण्यापेक्षा दोन व्यक्ती त्यांच्या खाजगी स्पेसमध्ये लैंगिक सुखाचा आनंद घेत आहेत आणि तुम्ही अनावधानाने चोरून पहात आहात असा अनुभव बघणाऱ्याला दिला जातो. सेक्स त्या भोवतीची फिक्शन्स आणि राजकारण यांनी ग्रासलेल्या सेक्शुअली फस्ट्रेटेड समाजाच्या लिबिडोचा (कामेच्छा) हा अस्सल भारतीय अविष्कार म्हणता येईल. रिक्षाचा तो व्हिडिओ, त्याचे व्हाट्सअप फॉरवर्ड्स आणि त्यावर लोकांच्या प्रतिक्रियांचा पाऊस हा भारतीयांच्या बदलत चाललेली लिबीडोचा आणखी एक अविष्कार आहे.
जसे जसे सेक्सभोवतीची मिथकं आणि राजकारण बदलत जाईल तसतसे माणसांची लिबिडो (कामेच्छा) ही आकार घेत जातील. विश्वास बसत नसेल तर पॉर्नहबवर जाऊन भारतीय लोकं सर्च करत असलेली कीवर्ड्स आणि कमेंट्स बघा. सार्वजनिक अवकाशात अशा रोज घडणार्या घटनांचं होणारं सेक्सुअलायझेशन समजून घेण्यासाठी पॉर्नहबसारखी दुसरी जागा नाही. काही महिन्यांपूर्वी कठुआत एका लहान मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. त्यानंतर पॉर्नहबवर आठ दिवस कठुआ गॅंगरेप हा कीवर्ड सर्च करण्यात भारतीय लोक आघाडीवर होते. भाऊ-बहीण, आई-मुलगा यांच्यातल्या पवित्र नात्याचं ओझं खांद्यावर बाळगणाऱ्या भारतीयांकडून पॉर्नहबवर स्टेप-मॉम, स्टेप-सिस्टर असे की-वर्ड्स सर्च केले जातात. हे जेवढं विनोदी आहे तेवढंच महत्त्वाचंही.
आज रिक्षातल्या त्या दोन अनोळखी लोकांचा व्हिडिओ तुमचा-आमचा लिबिडो जागृत करण्यास कारणीभूत ठरला. उद्या तुमच्या आमच्या आई -बहिणीचाही व्हिडिओ या कामी आल्यास लाज वाटू न देता त्याला ही विनोद म्हणून घ्या आणि फॉरवर्ड करत राहा. प्रत्येक गोष्टीचं सेक्शुअलाझेशन आणि पोर्निफिकेशन ही फक्त मानवालाच साध्य झालेली गोष्ट असून त्याचा अखंड जागर करत राहणं एवढंच फक्त आपल्या हातात आहे. यासाठी पॉर्नहबच उघडायची गरज आहे अशातला काही भाग नाही. टीव्हीवर आपण सहकुटुंब पाहत असलेल्या रियालिटी शोमध्ये जेव्हा पाच-सहा वर्षांची मुलगी तिला कळत नसलेले मादक इशारे करत नाचत असते तेव्हा तिच्या डान्सला आपण दिलेली दाद, पॉर्न म्हणजे फक्त रात्री एकट्यात बघायची नव्हे तर सहकुटुंब उपभोगण्याची गोष्ट आहे, यावर शिक्कामोर्तब करते.
या रिक्षा प्रकरणाच्या निमित्तानं अॅडम आणि ईव्हपासून ते आजपर्यंत सेक्सचं आपण जे काहीही करून ठेवलंय त्याकडे थोडसं थांबून कौतुकानं पाहण्यास हरकत नसावी.