Quick Reads

ग्वावा आयलंड

दुहेरी शोषण आणि क्रांतीच्या शक्यतांची कथा

Credit : Amazon Originals

‘ग्वावा आयलंड’ ही फिल्म १३ एप्रिलला अ‍ॅमेझॉन प्राईम वर प्रदर्शित झाली आहे. हिरो मुराई या दिग्दर्शकानं दिग्दर्शित केलेली ही फिल्म, प्रामुख्याने माणसाच्या दोन महत्त्वाच्या शोषणांबद्दल बोलते. एक माणसानं निसर्गाचं केलेलं शोषण आणि दुसरं, माणसाने माणसाचं केलेलं शोषण.

बहुदा दक्षिण अमेरिकेतल्या एका बेटावर घडणारी ही कथा आहे. हे बेट निळ्या रेशमासाठी विख्यात आहे. साहजिकच या निळ्या रेशमाचं ‘भांडवल’ करून जागतिक बाजारपेठेत स्वतःचं वर्चस्व स्थापन करण्यासाठी ‘रेड कार्गो’ नावाची एक भांडवली कंपनी हे संपूर्ण बेट स्वतःच्या ताब्यात घेते. जर तुम्ही एडवर्डो गॅलियानो वाचला असेल, तर ही साधनसंपत्ती कशा प्रकारे बळकावली जाते, याचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं राहील. गॅलियानोच्या ‘ओपन वेन्स ऑफ लॅटिन अमेरिका’ या पुस्तकात साधनसंपत्तीनं विपुल असलेल्या लॅटिन अमेरिकेतील बेटांना लुटण्यासाठी भांडवली कंपन्यांनी जे मानवी आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचं शोषण केलं, त्याचा लेखाजोखाच गॅलियानो मांडतो. या फिल्ममधलं हे बेट बळकावण्याची तऱ्हा ही अगदी स्पॅनिश, पोर्तुगीज, ब्रिटिश, फ्रेंच आणि इतर यूरोपीय राष्ट्रांसारखीच आहे. या सगळ्यांनीही संपूर्ण ‘ग्लोबल साऊथ’ असाच तर बळकावला आहे.

नैसर्गिक साधनसंपत्तीपासून उपयुक्त वस्तू बनवण्यासाठी मानवी श्रम आवश्यक असतात आणि सामान्यत: हे श्रम अतिशय मोठ्या प्रमाणात करवून घेतले जातात यामध्ये मोठ्या प्रमाणातल्या श्रमासोबतच श्रमाची कौशल्यावर आधारित विभागणी आलीच आणि या श्रमाला नियंत्रित करणारी जुलूमकारी यंत्रणा सुध्दा आली.

या सामान्य सामूहिक श्रमाची विभागणी ‘ग्वावा आयलंड’चा दिग्दर्शक रंगाच्या मदतीने सुंदररित्या मांडतो. सॉफ्ट लेबर म्हणजे रेशमापासून तयार झालेलं कापड शिवणाऱ्या स्त्रिया या त्याच निळ्या रंगाच्या ड्रेसकोड मध्ये काम करतात तर हार्ड लेबर म्हणजे पुरुष हे लाल रंगाच्या ड्रेसकोड मध्ये काम करणारे!

कथा आली की त्यात परिस्थितीचं विरोधाभासी चित्रण येणारच! तर परिस्थितीचं हे विरोधाभासी चित्रण समजायला सहज आणि सोपं आहे. कथेचा नायक ’ला’ गायक आहे आणि एक स्त्री फॅक्टरी वर्कर कथेची नायिका जी त्याची प्रेयसी असून फॅक्टरीमध्ये शिवणकाम करते. या बेटावरच्या सर्वच लोकांवर (कामगारांवर) नायकाच्या संगीताची जादू आहे. नुसती जादू नाही तर हे संगीत लोकांची ‘अफू’ आहे. काम करत असताना विरंगुळा म्हणून किंवा कामानं येणारा शीण जावा म्हणून स्त्रिया या नायकाचं गाणं ऐकतात आणि या गाण्याची लहान मुलांनामध्येही तेवढीच क्रेझ आहे. नायकाच्या गाण्याची एक कॉन्सर्ट एका शनिवारी होणार असते, जो खरं तर आठवड्यातून एकदा येणारा सुटीचा दिवस आहे, पण ‘रेड कार्गो’च्या मॅनेजरला ही कॉन्सर्ट नको आहे, कारण शनिवारी लोकांनी या कॉन्सर्टचा आंनद घेतला तर ते रविवारी कामाला येणार नाहीत आणि लोक कामाला आले नाहीत तर काम ठप्प पडेल, जे कोणत्याही भांडवली संस्थेला नको असतं. इथं प्रश्न फक्त लेबर टाईमचा नाही तर जाणीवपूर्वक कामगारांमध्ये परात्मता निर्माण करण्याचा देखील आहे. श्रम करत असताना श्रमिकांचं लक्ष फक्त प्रक्रियेकडे असावं म्हणून फॅक्टरीमध्ये रेडिओ कमी आवाजात लावला जातो आणि या आवाजावर नियंत्रण ठेवणारा एक ‘चौकीदार’ही इथं आहे, आणि म्हणूनच हा मॅनेजर ही कॉन्सर्ट करू नये म्हणून नायकाला पैसे देतो.

गाणारा नायक फॅक्टरी मॅनेजरनं कॉन्सर्ट रद्द करण्यासाठी देऊ केलेले पैसे घेतो पण त्या रात्री प्रत्यक्षात कॉन्सर्ट घडते, साहजिकच याच कार्यक्रमात नायकाला गोळ्या झाडून मारलं जातं. रविवारी सकाळी ‘रेड कार्गो’चा मॅनेजर फॅक्टरीमध्ये पोहचतो तेव्हा दोन्ही फॅक्टरीमध्ये लोक आलेले नाहीत. प्रश्न हा आहे की नायकाला मारल्या नंतर कॉन्सर्ट कशी झाली? आणि लोक कुठे आहेत?

खरं तर नायक मारला गेलाय, कॉन्सर्ट झालेली सुद्धा नाही पण त्या सकाळी लोक संपूर्ण उत्साहात नायकाच्या अंत्यविधीसाठी एकत्र जमलेले आहेत. हा नायकाचा अंत्यविधी, ही एक दुःखद घटना न राहता एक कॉन्सर्ट बनलेली आहे. लोक नायकाची गाणी गात त्यांच्या ‘हिरो’ला अलविदा करत आहेत. इथे आपल्याला ‘चे’ आठवतो, तुम्ही एक ‘चे’ माराल पण त्याच्या मृत्यूनंतर हजारो चे जन्माला येतील.

कथेचा -  फिल्मचा आशय हाच की, बदल आणि विरोधाची शक्यता प्रत्यक्षात कधी मावळत नाही, ती लोकांमध्ये संकल्पनेच्या स्वरूपात असते आणि एखाद्या घटनेनंतर लोक ती संकल्पना प्रत्यक्ष वास्तवात आणतात देखील.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नव्या शतकात अभिजात डावं राजकारण म्हणजेच वर्ग राजकारण मागे पडलं असताना आणि फॅशिझमसारखी गोष्ट महाविक्राळ स्वरूप धारण करून मानवजातीसमोर ऊभी असताना राजकारण नेमकं काय असावं ही धारणादेखील ही फिल्म नमूद करते.

‘विरोधाचा/क्रांतीचा वाहक’ कोण असेल हे भांडवलच निश्चित करतं, हे मार्क्सनं अगोदरच सांगून ठेवलं आहे त्यात आणखी काही समाविष्ट करण्याची गरज देखील नाही. फक्त इतकंच की वाहक (Subject/agency) हा त्या सामान्य सामूहिक परिस्थितीमधून जन्माला येतो हे नक्की. फॅशिझममध्ये हा वाहक धार्मिक किंवा जातीय अथवा वंशीय अल्पसंख्याकही असू शकतो. हा अल्पसंख्याक घटक त्या विशिष्ट सामान्य परिस्थितीचं अपत्य असतं हे अगदीच मान्य परंतू श्रम संघर्षाच्या सर्वसामान्य आणि सार्वत्रिक परिस्थितीमधून जन्माला येणारा वाहक हा जास्त प्रगल्भ असतो. त्याची जाणीव ही अधिक सजग असते, त्याचं राजकारण फक्त राजकीय वर्चस्व उध्वस्त करण्यापुरतं मर्यादित नसतं तर त्याचं राजकारण हे ज्या सर्वसामान्य परिस्थितीमधून जन्माला आलेलं आहे ती सर्वसामान्यता पूर्ण नष्ट करून नवीन हेट्रोजिनिअस परिस्थिती निर्माण करणारं असतं. ज्या परिस्थितीमध्ये तो संपूर्णपणे ‘माणूस’ म्हणून जगू शकेल.

तत्काळ आणि दिर्घकालीन राजकारण काय असावं या द्वंदाची सोडवणूक करत आपल्याला पुढं जावं लागेल आणि या नव्या शतकातसुध्दा अभिजात क्रांतीच्या शक्यता अजूनही जिवंत आहेत, ही भावना ही फिल्म ठसवून जाते.