Quick Reads

उष्णतेच्या लाटांचं वर्ष

यावेळी उष्णतेच्या लाटांचा आशिया, आफ्रिका आणि अमेरिकेसह थंड हवामानाचा प्रदेश मानला जाणाऱ्या युरोपात हाहाकार.

Credit : इंडी जर्नल

 

यावर्षी जगभरात ठिकठिकाणी आलेल्या उष्णतेच्या लाटांनी अनेक ठिकाणी तापमानाचे उच्चांक मोडले आणि हजारो नागरिकांचा जीव घेतला. काही महिन्यांपूर्वीच अनेक पर्यावरणीय संस्थांनी २०२३ ला जगातील सर्वात उष्ण वर्ष म्हणून जाहीर केलं असताना यावर्षीच्या तापमानानं गेल्या वर्षीचे उच्चांकदेखील मोडले आहेत. शिवाय उष्णतेच्या लाटांचं प्रमाण पाहता हे वर्ष उष्णतेच्या लाटांचं वर्ष म्हणवलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावेळी उष्णतेच्या लाटांनी आशिया, आफ्रिका आणि अमेरिकेसह थंड हवामानाचा प्रदेश मानला जाणाऱ्या युरोपात हाहाकार माजवला.

भारतात ३१ मे रोजी नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी केरळमध्ये प्रवेश केला. मात्र तरीही अजून उत्तर भारतात अजून अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटा कायम आहेत. देशाची राजधानी दिल्लीत आतापर्यंत अनेक वेळा पाऱ्यानं ४५ अंश सेल्सियसचा टप्पा पार केला. तापयंत्रानुसार नोंद झालेलं तापमान जरी ४५ अंश सेल्सियस असलं, तरी त्याची प्रत्यक्ष दाहकता ५० अंश सेल्सियस तापमानाप्रमाणे जाणवते.

दिल्लीस्थित एका अशासकीय सेवाभावी संस्थेनं केलेल्या दाव्यानुसार दिल्लीत या उन्हाळ्यानं सुमारे १९२ बेघर लोकांचा जीव घेतला आहे. दिल्ली पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसात त्यांना वंचित समूहांमधील लोकांचे ५० मृतदेह सापडले आहेत. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार दवाखान्यात बुधवारी झालेल्या मृत्यूंपैकी १३ जणांचा मृत्यू उष्माघाताशी निगडीत आहे. तर त्यादिवशी ३३ लोकांना उष्मघाताची लक्षणं दिसल्यामुळे दाखल करण्यात आलं. मंगळवारी दिल्लीतील तीन मोठ्या दवाखान्यांमध्ये २० रुग्णांचा मृत्यू उष्माघातामुळे झाला होता.

देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात बिहारमध्ये मतदान केंद्रावर काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांचा उष्माघातानं मृत्यू झाला होता. संपुर्ण देशभरात अनेक ठिकाणी उष्माघातामुळे बऱ्याच नागरिकांना आणि पाळीव प्राण्यांना त्यांचा जीव गमावावा लागला होता. उष्णतेची लाट ही तशी तर नैसर्गिक घटना आहे. जेव्हा गरम वातावरणाचा प्रभाव खुप काळासाठी कामय राहतो, तेव्हा त्याला उष्णतेची लाट म्हणतात. मात्र जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलामुळे पृथ्वीचं तापमान वाढत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून उष्णतेच्या लाटांचं प्रमाण वाढलं आहे शिवाय त्या जास्त काळापर्यंत टिकत आहेत.

उत्तर भारतातील उत्तराखंड, जम्मू-काश्मिर आणि हिमाचल प्रदेशसारख्या हिमालयाच्या कुशीतील राज्यांनादेखील उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागला. या राज्यांतही तापमानानं नवा उच्चांक गाठला आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत ५ ते ७ अंश सेल्सियसनं जास्त तापमान नोंदवण्यात आलं. जम्मूमध्ये पहिल्यांदाच कमाल तापमानानं ४४.३ अंश सेल्सियसचा पारा गाठला. नैऋत्य मोसमी वारे उत्तर भारतात पोहचण्यासाठी वेळ लागत असल्यानं या राज्यांना जून महिन्याच्या शेवटापर्यंत तरी या प्रकारच्या तापमानाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

 

 

देशात गेल्या १५ वर्षांपासून उष्णतेच्या लाटांची माहिती नोंदवली जात आहे आणि यावर्षी देशात आलेल्या उष्णतेच्या लाटांची संख्या सर्वात जास्त आहे. देशात सर्वात जास्त म्हणजे एकूण २७ उष्णतेच्या लाटा ओडीशात नोंदवल्या गेल्या. त्यानंतर राजस्थानचा क्रमांक येतो. हिमाचल प्रदेश आणि केरळमध्ये यावर्षी पहिल्यांदाच उष्णतेच्या लाटांची नोंद करण्यात आली. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार उष्णतेच्या लाटांना सुरुवात देखील लवकर झाली, त्या दीर्घकाळ टिकल्या, त्यांची व्याप्ती आणि तिव्रतादेखील जास्त होती.

 

आशियात उष्णतेच्या लाटांची वाढ

या घटना भारतापुरत्या मर्यादित नव्हत्या, तर संपुर्ण दक्षिण आणि आग्नेय आशियात यावर्षी उष्णतेच्या लाटांचा प्रकोप पाहायला मिळाला. त्यामागे जागतिक हवामान वाढीसोबत एल निन्यो प्रभाव कारणीभूत असल्याचं तज्ञांचं मत आहे. उष्णकटिबंधीय प्रदेशात येणाऱ्या दक्षिण आणि आग्नेय आशिया देशांना तीव्र उष्णतेची सवय असतानाही यावर्षीच्या उष्णतेच्या लाटांनी बहुतेक नागरिकांना हैराण करून सोडलं आहे. यावर्षीच्या उष्णतेचा भारत, बांगलादेश, म्यानमार, व्हिएतनाम, थायलंड, लाओस, फिलिपीन्स आणि या प्रदेशातील इतर देशांवर अत्यंत वाईट परिणाम झाला.

थायलंड सरकारच्या आकडेवारीनुसार यावर्षी थायलंडमध्ये उष्माघातानं किमान ३० नागरिकांचा जीव घेतला. तर इंडोनेशियात वाढलेल्या तापमानामुळे मच्छरांच्या प्रजनन काळात वाढ झाली आणि परिणामी डेंग्यूच्या लागणीमध्ये वाढ झाली. इंडोनेशिया सरकारनं दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी देशात साधारणपणे १५,००० नागरिकांना डेंग्यूची लागण होत असे, यावर्षी मात्र संख्या वाढून ३५,००० वर गेली आहे. मलेशियात उष्माघाताशी निगडीत आजारामुळे ४५ नागरिकांना दवाखान्यात भरती करावं लागलं तर दोन नागरिकांनी त्यांचा जीव गमावला.

फिलिपीन्स आणि बांगलादेश सरकारला मे महिन्याच्या उत्तरार्धात वाढलेल्या उष्णतेमुळे शाळा महाविद्यालयांना एक आठवड्याची सुट्टी जाहिर करावी लागली होती. भारत, बांगलादेश आणि आग्नेय देशातील किनारपट्टीच्या भागात उष्णता निर्देशांकानं मानवी सहनशीलतेची मर्यादा गाठली. फिलिपीन्समध्ये दिवसाचा पारा ४५ अंश सेल्सियसवर पोहचला, तर फिलिपीन्समध्ये पहिल्यांदाच ३० अंश सेल्सियसचं किमान उच्च तापमान नोंदवलं.

उष्णतेच्या लाटांचा परिणाम गरिब आणि वंचित घटकांच्या लोकांवर जास्त होतो. त्याचसोबत या उष्णतेच्या लाटांचा प्रतिगामी परिणाम शेतीवर होतो. लाटांमुळे शेतीचं उत्पादन घटतं, पिकांचं नुकसान होतं आणि शेतीसाठी पाण्याची मागणी वाढते. या लाटांमुळे मुलांच्या शिक्षणावर देखील वाईट परिणाम होत आहे.

या उष्णतेचा परिणाम प्रशांत महासागराच्या आशियासंलग्न किनाऱ्यावरही पहायला मिळाला. थायलंडमध्येही तापमान बऱ्याच काळासाठी ४० ते ४५ अंश सेल्सियसवर गेलं आणि तशीच काहीशी स्थिती व्हिएतनाममध्ये होती. मलेशियात तापमान ३५ ते ४० अंश सेल्सियसच्या टप्प्यात राहिलं, तर सिंगापूर सरकारनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार हे वर्ष १९२९ पासूनचं चौथं सर्वात उष्ण वर्ष ठरलं. चीनच्या युनान आणि हैनान प्रांतातही उष्णतेनं उच्चांक गाठला. उष्णतेच्या लाटांचा परिणाम जपानमधील काही प्रांतांनाही भोगावा लागला.

 

 

भारतीय उपखंड आणि आग्नेय आशियात मान्सुनपूर्व काळात वाढणारी उष्णता या तापमान वाढीमुळे जास्त तीव्र झाली आहे. यामुळे २०२२ मध्ये पाकिस्तानमध्ये उष्णतेची तीव्र लाट आली होती. तर बंगालच्या उपसागराला जोडून असलेल्या देशांमध्ये २०२३ मध्ये आर्द्रता असलेली उष्णतेची लाट पाहायला मिळाली होती. संशोधनानुसार या प्रदेशात येणाऱ्या या प्रकारच्या लाटींची वारंवारता जागतिक तापमान वाढीमुळे ३० पट्टीनं वाढली आहे.

वाळवंटी प्रदेश असलेल्या आखाती देशांमध्येही यावेळी उष्णतेनं अनेकांचा जीव घेतला. यात हज यात्रेला मक्क्यात आलेल्या १,००० हून अधिक भाविकांना उष्माघातामुळे जीव गमवावा लागला. गेल्या वर्षाच्या आकडेवारीशी तुलना केली असता यात दुप्पटीनं वाढ झाली. यावर्षी मक्काच्या मुख्य मशिदीजवळ तापमानानं ५१.८ अंश सेल्सियसचा पारा गाठला. तर सौदी अरेबियाच्या संशोधनानुसार मक्केत दर दशकाला ०.४ अंश सेल्सियसनं तापमान वाढत आहे. पर्यावरणीय संस्थांच्या संशोधनानुसार यावेळी पश्चिम आशियात दरवर्षीपेक्षा ८ अंश सेल्सियस जास्त तापमान नोंदवलं जाऊ शकतं.

या आखाती देशांपैकी काही देशांमध्ये आणि उत्तर आफ्रिकेत काही ठिकाणी सुरु असलेल्या युद्धांमुळे किंवा अशांततेमुळे लाखो नागरिक विस्थापित झाले आहेत. या विस्थापितांसमोरील आव्हानं या उष्णतेच्या लाटांनी वाढवली आहेत. आधीच पाण्याची वणवण असलेल्या या भागात युद्ध आणि त्यावर उष्णतेच्या लाटा यामुळे जीवीतहानी वाढू शकते, अशी भीती अभ्यासकांना वाटते. इसरायलनं गाझा पट्टीवर पुकारलेल्या युद्धामुळे तिथल्या लाखो नागरिकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत, त्यामुळे त्यांना तंबूत राहावं लागत असून या तंबूत उष्णतेच्या विरोधात लढण्यासाठी कोणत्याही उपाययोजना नाहीत.

जागतिक तापमान वाढीमुळे पश्चिम आशियाचा भागातील सरासरी तापमान १.७ अंश सेस्लियसनं वाढलं असून त्यात अजून १ अंश सेल्सियस वाढ होण्याची शक्यता असल्याचं संशोधन सांगतं.

 

युरोप आणि अमेरिकेतही उष्णतेचे उच्चांक पार

मात्र या वर्ष अतिउष्ण वातावरणाचा सामना फक्त भारत किंवा आशियातील देशांना नाही तर अमेरिका आणि युरोपमधील देशांनाही करावा लागला. युरोप आणि अमेरिकेत अनेक ठिकाणी तापमानानं जुने उच्चांक मोडले. युरोपात अजूनही उष्णतेच्या लाटांचा मारा ओसरलेला नाही आणि तिथली सरकारं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत.

उष्णतेच्या लाटांचा सर्वात वाईट परिणाम भूमध्य समुद्राच्या किनाऱ्याला संलग्न पूर्व आणि आग्नेय युरोपातील देशांना भोगावा लागत असून ग्रीस आणि सायप्रसमध्ये अनेक नागरिकांना उष्णतेच्या लाटांमुळे जीव गमावावा लागला आहे. तर तुर्कीये आणि पोर्तूगालमध्ये अनेक ठिकाणी वणवे पेटले आहेत. इटलीची राजधानी सिसली आणि इतर अनेक शहरांनी तर ४० अंश सेल्सियसचा टप्पा अनेकदा पार केला. पश्चिम युरोपातही यावेळी तापमानानं उच्चांक गाठला असून फ्रांसकडून पॅरिस ऑलिंपिकवर त्याचा होणारा परिणाम विचारात घेतला जात आहे. शेजारच्या स्पेननं देशातील नागरिकांना बाहेर न फिरण्याचा सल्ला दिला आहे.

जागतिक तापमान वाढीचा सर्वात वाईट परिणाम युरोप खंडावर झाला आहे. जिथं तापमान वाढीमुळे जगाच्या सरासरी तापमानात १.३ अंश सेल्सियसची वाढ झाली आहे, तिथं युरोपचं तापमान गेल्या शतकाच्या सरासरी तापमानापेक्षा २.३ अंश सेल्सियसनं वाढलं आहे. युरोपातील काही ठिकाणचं तापमान सरासरीपेक्षा १० अंश सेल्सियसनं जास्त नोंदवण्यात आलं आहे. पुढील दोन महिने अशीच स्थिती युरोपात राहणार असल्याचं जाणकारांनी सांगितलं.

 

 

युरोपातील यावेळीच्या उष्णतेच्या लाटांमागे एल निन्योच्या प्रभावासोबत उत्तर आफ्रिकेतून आलेले उष्ण वारे कारणीभूत असल्याचं हवामान तज्ञ सांगतात. औद्योगिक क्रांतीमुळे युरोप आणि अमेरिकाचा ऐतिहासिक आणि प्रतिव्यक्ती कार्बन उत्सर्ग जास्त आहे. त्यामुळे या खंडातील देशांनी जागतिक तापमान वाढीसाठी अधिक कठोर पावलं उचलली पाहिजेत, अशी मागणी शास्त्रज्ञ आणि विकसनशील देशांकडून होते.

याबद्दल युरोपातील देश सकारात्मक असले तरी अमेरिकेतील प्रतिगामी विचाराचे लोक जागतिक तापमान वाढीवर विश्वास ठेवत नाहीत. जागतिक तापमान वाढीचा सिद्धांत खोटा असल्याचं तिथल्या काही नागरिकांचं मानणं आहे. त्यात सध्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले डोनाल्ड ट्रम्प यांचाही समावेश होतो. तर काही अमेरिकन नेते जागतिक तापमान वाढीसाठी चीन आणि भारतासारख्या विकसनशील देशांना कारणीभूत मानतात.

यावेळी उष्णतेच्या लाटांनी अमेरिकेतही मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला. अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये सध्या तापमानानं ३५ अंश सेल्सियसचा टप्पा पार केला आहे. यावर्षी अमेरिकेतील सरासरी तापमान इतर वर्षांपेक्षा ८ ते ११ अंश सेल्सियसनं जास्त आहे. अनेक शहरांतील स्थानिक सरकारांनी शहरांंमध्ये थंड होण्यासाठी निवाऱ्यांची व्यवस्था केली आहे. तर अमेरिकेचं केंद्र सरकार सध्याच्या उष्णतेच्या लाटांना घातक हवामान घटना म्हणून जाहिर करण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचं मुख्य शहर मानल्या जाणाऱ्या न्यू यॉर्कमध्ये अनेक शाळांना लवकर बंद करण्याची वेळ सरकारवर आली. अमेरिकेचा शेजारी देश मेक्सिकोमध्ये १२५ नागरिकांना उष्माघातानं जीव गमवावा लागला. अमेरिकेच्या सरासरी तापमानात १.४ अंश सेल्सियसनं वाढ झाली आहे. तर रात्रीच्या सरासरी तापमानात १.६ अंश सेल्सियसनं वाढ झाली आहे. १ जून ते १५ जूनच्या काळात अमेरिकेत उच्च तापमानाचा विक्रम १२०० वेळा मोडला.

दक्षिण अमेरिकेच्या ब्राझीलमध्ये असलेला पृथ्वीवरील उष्णकटीबद्धीय प्रदेशात सर्वात मोठा दलदलीची भाग पँटनालमध्ये यावर्षी वणव्याचं प्रमाण वाढलं आहे. एकंदरीत पाहता संपुर्ण जागाला यावेळी अतिरिक्त उष्णता आणि उष्णतेच्या लाटांनी भेडसावलं असल्याचं दिसतं. आता यानंतर विविध देशातील सरकारं जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाबद्दल किती गंभीर होऊन तत्परतेनं पावलं उचलतात, याकडे तज्ञ आणि अभ्यासकांचं लक्ष आहे.

२०१५ साली जगानं एकत्र येत जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल रोखण्यासाठी पॅरिस करार केला. यात १९५ देशांनी जगाचं सरासरी तापमान २ अंश सेल्सियसच्या खाली ठेवण्याचं आणि १.५ अंश सेल्सियसपेक्षा जास्त वाढून न देण्याचं ध्येय ठेवलं. २०२३ मधील संयुक्त राष्ट्र संघटनेची हवामान बदल परिषद आतापर्यंतची सर्वात मोठी होती. त्यात या ध्येयाला प्राप्त करण्यासाठी उचलाव्या लागणाऱ्या पावलांची पुन्हा चर्चा झाली. आता यात कितपत यश मिळत, हा मुद्दा हवामान किती सुसाहाय्य होईल हे ठरवेल.