India

उत्तर प्रदेश: मुस्लिम तरुणांना अडकवण्यासाठी पुजाऱ्यानं स्वतःच तोडली गणेश मूर्ती

पोलीसांनी वेळीच केलेल्या तपासातून सत्य समोर.

Credit : इंडी जर्नल

 

उत्तर प्रदेशात घडलेल्या एका धक्कादायक प्रकारात एक मंदिराच्या पुजाऱ्यानं स्वतः मंदिरातील मुर्ती तोडून, दोन मुस्लिम तरुणांवर त्याचा आरोप  लावण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांनी वेळीच केलेल्या तपासातून सत्य समोर आलं. पोलीसांनी या पुजाऱ्याविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र उत्तर प्रदेशच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या वातावरणात या घटनेप्रमाणे इतर घटनांमधून तणाव वाढवत नेला जातो का, असा प्रश्न विचारण्यास वाव आहे.

समोर येत असलेल्या माहितीनुसार १६ जुलै रोजी क्रिच राम नावाच्या पुजाऱ्यानं उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थनगर जिल्ह्यातील काथेला समयमाता पोलीस स्थानकात एक खळबळजनक तक्रार दाखल केली. या तक्रारीत त्यानं दोन मुस्लिम युवकांनी तौलीहावा नावाच्या गावातील गणपती मंदिरातील गणेशाची मुर्ती तोडली असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर या दोन्ही युवकांनी त्याला धमकी दिल्याचा तसंच त्याला मंदिरात पुजा किंवा कीर्तन करुन देणार नसल्याचा आरोप पुजाऱ्यानं या तक्रारीत केला.

मन्नन आणि सोनू अशी या दोन मुस्लिम तरुणांची नावं आहेत. पुजाऱ्यानं त्याच्या तक्रारीत असंही म्हटलं होतं की जेव्हा तो या दोघांना थांबवायला गेला तेव्हा या दोन तरुणांनी त्याला हाणामारी केली आणि जमीनीवर पाडलं. उत्तर प्रदेश पोलीसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करत एफआयआर नोंदवली, ज्यात या तरुणांवर 'जाणून बुजून जखमी करणं, एका विशिष्ट धर्मातील लोकांच्या भावना दुखावणं आणि एका विशिष्ठ धर्माचा अपमान करण्यासाठी त्यांच्या पुजास्थळाचं पावित्र्य भंग करण्याचा' आरोप केला होता.

 

 

मात्र जेव्हा पोलीस झालेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी घटनास्थळी गेले तेव्हा त्यांना मिळालेली माहिती पुर्णपणे वेगळी होती. स्थानिक वृत्तांनुसार  तिथल्या लहान मुलांनी पोलिसांना सांगितलं की गणपतीची मुर्ती तथाकथित आरोपींनी नाही तर फिर्यादीनं म्हणजे पुजाऱ्यानं स्वतः तोडली होती. शिवाय पोलीसांनी मंदिराच्या सीसीटीव्हीची रेकॉर्डींग तपासली असता मंदिरात त्या पुजाऱ्याशिवाय इतर कोणीही गेलं नसल्याचं दिसलं. यानंतर जेव्हा पोलीसांनी पुजाऱ्याची कसून तपासणी केली, तेव्हा त्यानं त्याचा गुन्हा मान्य केला.

पुजाऱ्यानं गुन्हा मान्य करताना दिलेल्या जबाबानुसार या दोन तरुणांसोबत त्याचे काही जुने वाद होते. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्याच्या प्रयत्नात त्यानं मंदिरातील मुर्ती तोडली आणि त्यांच्यावर आरोप ढकलण्याचा प्रयत्न केला. सध्या गावात शांतता असल्याचं पोलीसांनी सांगितलं आहे.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आल्यापासून मुस्लिमांवर होणाऱ्या द्वेषपुर्ण हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. यात अनेकदा सरकारी यंत्रणाच सहभागी असल्याचा आरोप राज्य सरकारवर केला जातो. अनेकदा कोणत्याही बाबतीत जेव्हा एखाद्या मुस्लिम नागरिकावर कोणता आरोप केला जातो तेव्हा मुख्यमंत्री योगीनाथ यांचं सरकार त्या नागरिकाच्या घरावर कारवाई करण्यासाठी प्रचंड तत्परता दाखवतात. त्यामुळे त्यांची स्वतःची ख्याती बुलडोझर बाबा अशी झाली आहे.

त्यात सिद्धार्थनगरमध्ये झालेली घटना उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या अशा कारवायांचा फायदा उचलण्याचा एक प्रयत्न म्हणून पाहिलं जाऊ शकत. मात्र जर पोलीसांनी वेळीच कारवाई करत सत्य बाहेर आणलं नसत तर उत्तरप्रदेशमधील वातावरण सांप्रदायिक होण्यास वेळ लागला नसता आणि राज्यात तणाव निर्माण होऊ शकला असता.