India

अवकाळी पावसानं महाराष्ट्राच्या अनेक भागात शेतकऱ्याचं नुकसान

तीळ, ज्वारी, हरभरा, कापूस, पपई, संत्रा, गहू, हळद, सोयाबीन, भाजीपाला, कांदा आणि इतर अनेक पिकांचं नुकसान.

Credit : इंडी जर्नल

 

गेल्या ३-४ दिवसांपासून महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांनी जोरदार हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानाला तोंड द्यावं लागत आहे. या अवकाळी पावसानं अनेक ठिकाणी हाताला आलेली पीकं, घरं आणि जनावरांचं नुकसान केलं आहे. आधीच खरीप हंगामात दुष्काळ आणि पूर अशा दुहेरी संकटात सापडलेल्या विदर्भातील शेतकऱ्याला महिन्याभराच्या अंतरात दोन वेळा अवकाळी पावसाला सामोरं जावं लागल्यामुळे त्याच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. त्यात सरकारकडून दाखवण्यात आलेली उदासीनता आणि विमा कंपन्यांकडून सातत्यानं नुकसान भरपाई देताना केली जाणारी टाळाटाळ यानं शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत.

हिंगोलीच्या माळधामणी गावाचे रहिवासी असलेले शंकर पारटकर यांच्या गावात दोन दिवसांपुर्वी रात्री अचानक वादळी वाऱ्यासह गारपीटांचा पाऊस पडला. या पावसामुळे त्यांच्या गावातील अनेकांच्या घरांचं नुकसान झालं आहे. शिवाय गावाला वीज पुरवठा करणाऱ्या वीजवाहिनी तारा तुटल्यानं गाव गेल्या दोन दिवसांपासून अंधारात आहे.

"बुधवारी संध्याकाळी संध्याकाळी एकदम सोसाट्याचा वारा सुटला, त्यानंतर गारा पडायला लागल्या. हा वारा आणि गारांचा पाऊस फक्त १० ते १५ मिनिट राहिला असेल पण त्यात त्यात लोकांच्या घरांचे पत्रे आणि शेतातली झाडं एकदम मोडून पडली. घरांच्या पत्र्यांवर ठेवलेले दगड पडून पत्रे उडून गेल्या गावातले काही वयस्कर जखमी झाले. गावातल्या एकाही पत्र्याच्या घरावर पत्रे राहिले नाही," पारटकर सांगतात.

भारतात गेल्या आठवड्यापासून ठिकठिकणी अवकाळी पावसानं जोर धरला आहे. तर महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागातही पावसानं जोरदार हजेरी लावली. बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट देखील पाहायला मिळाली. भारताच्या हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार १५ एप्रिल पर्यंत देशात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण अचानक आलेल्या पावसानं बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं. काही ठिकाणी काढणीला आलेली पिकं जमीनीवर पडली आहेत, तर काही ठिकाणी काढलेली माल पावमामुळे भिजला आहे. याचा परिणाम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे तीळ, ज्वारी, हरभरा, कापूस, पपई, संत्रा, गहू, हळद, सोयाबीन, भाजीपाला, कांदा आणि इतर अनेक पिकांचं नुकसान झालं आहे.

 

 

या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं पारटकर सांगतात, "पंजाबराव डख यांच्या सांगण्यामुळे इथं काही शेतकऱ्यांनी त्यांची पिकं झाकून ठेवली होती. पाऊस आला तरी जास्त नाही येणार असा लोकांचा विचार होता, त्यामुळे फार तयारी त्यांनी केली नव्हती. मात्र वाऱ्याच्या जोर इतका भयानक होता की ते कापडदेखील उडून गेलं. आमच्या इथं काहींनी हळद केली होती. ती काही प्रमाणात भिजली आहे. हळद जरी भिजली तरी ती पुन्हा सुकवून विकता येते पण तिचा दर्जा थोडा घसरतो. करडी, ज्वारी, काही ठिकाणी गहू, तीळ आणि भाजीपाला या पिकांचं पुर्ण नुकसान झालं आहे. तो पुर्ण जमीनीवर झोपून गेला आहे."

पंजाबराव डख महाराष्ट्रातील काही स्वघोषित हवामान तज्ञांपैकी एक आहेत. या हंगामात त्यांनी वर्तवलेल्या अंदाजामुळे अनेक शेतकऱ्यांनी पाऊस येईल या आशेवर बियाणे आणि खतांची खरेदी केली होती. मात्र त्यांचा अंदाज खोटा ठरल्यानं अनेक शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं. तरीही अनेक शेतकऱ्यांचा त्यांनी लावलेल्या अंदाजांवर विश्वास आहे.

याकाळात विदर्भात तीळ, हळद, सोयाबीन, ज्वारी आणि कापुस इत्यादी पिकांची लागवड केली जाते. वर्ध्याच्या गौल गावातील समीर सर्जे यांनी त्यांच्या पाच एकर क्षेत्रात तीळाची लागवड केली होती. त्यांच्या गावात मोठ्याप्रमाणात गारपीट झाली.

"गारपिटीमुळे तिळाची फुलं झडली, गारपिटीसोबत वारा आणि पाऊसदेखील होता. त्यामुळे पीक पूर्णपणे झोपलं. आम्ही पंचनाम्याची मागणी केली होती, पण अजून कोणता कृषी अधिकारी किंवा ग्रामसेवक पंचनाम्यासाठी आला नाही," सर्जे सांगतात.

देशात अनेक शेतकरी त्यांच्या पिकाचा विमा काढत असतात. मात्र कोणती नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर शेतकऱ्यांना या विमा कंपन्या कोणतं ना कोणतं कारण देत नुकसान भरपाई देण्याच टाळत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या विमा कंपन्यांबद्दल चीड दिसून येते.

पारटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी त्यांच्या गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नसल्यानं त्यांना आता सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. "या काळात आम्ही ज्वारी, करडी, तीळ यासारखी पीकं घेत असतो. खरीपाच्या वेळी शेतकरी थोडंफार लक्ष देऊन पीकविमा सारख्या गोष्टी करतो. पण यावेळी काही जणांनी पिक विमा काढला आहे तर काहींनी विमा काढलेला नाही. मी माझ्या काही पीकांचा विमा केला होता. आता त्या पीकविम्यासाठी दावा करावा लागेल."

 

 

मात्र विम्यासाठी दावा करुनही अनेक वेळा शेतकऱ्यांच्या हाती उपेक्षाच लागते. त्यामुळे शेतकरी विम्यापासून दुर जाताना दिसतं आहेत. सर्जे यांनी यावेळी त्यांच्या तिळाच्या पिकाचा विमा काढला नव्हता.

"या खरीपात मी २५ एकरात सोयाबीन आणि थोडाफार कापुस केला होता. यावेळी आमच्याकडे बऱ्याच ठिकाणी पूर आला आणि माझी जमीन नाल्याच्या बाजूला असल्यामुळे माझी जमीन पाण्याखाली गेली. त्यानंतर आम्ही विमा कंपनीकडे नुकसान भरपाईचा दावा केला होता. पण आम्हाला सोयाबीनच्या पिक विम्याचे पैसे नाही मिळाले, कपाशीच्या विम्याचे पण पैसे नाही मिळाले," यावेळी विमा न काढण्याचं कारण सर्जे सांगतात. "त्यानंतर आम्ही चण्याच्या पिकासाठी शासनाचा एक रुपयाचा विमा काढला होता. त्यासाठी तर दोनवेळा दावे केले, पण त्याच तर कोण पहायला पण नाही आलं. जर कोण पहायला आलं तर त्यांनी फोटो काढून २० टक्केच्या खालच आमचं नुकसान टाकलं आणि त्याचे पण पैसे अजून मिळाले नाही. ही रक्कम अतिशय छोटी आहे फक्त हेक्टरी १२५० रुपये, २० टक्क्यांमध्ये काय मिळतं," त्यांचा विमा न मिळण्याचा अनुभव खाजगी कंपनीपर्यंत मर्यादित नसून सरकारी विम्याचा अनुभवही काही वेगळा नव्हता असं ते सांगतात.

या हंगामात विदर्भाला अतिशय टोकाच्या वातावरणीय बदलाला सामोरं जावं लागलं. यावेळी विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पुर आला होता. तर काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना दुष्काळ सदृष्य स्थितीला सामोरं जावं लागलं. त्यानंतर आता अवकाळी पावसासोबत गारपीटीचा सामना करणाऱ्या विदर्भात यावर्षी अवकाळी पाऊस येण्याची ही पहिली वेळ नाही.

फेब्रुवारी महिन्यातही विदर्भात काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली होती. त्यावेळी डॉ. आशिष दिघीकर यांनी १२ एकर क्षेत्रात हरभरा आणि अर्धा एकरात ज्वारीची लागवड केली होती. पण अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीच्या उत्पादनात मोठा फरक पडल्याचं ते सांगतात.

"त्यावेळी आमच्या काही हरभऱ्याला फूलं लागत होती, तर काही हरभरा भरणीला आला होता. पण अवकाळी पावसामुळे उत्पादन घटलं. गेल्यावर्षी मला एकरी १२ क्विंटल हरभरा झाला होता, यावेळी तो एकरी चार ते सहा क्विंटलपर्यंत कमी आला आहे."

 

 

"पिक विमा मिळवण्यासाठी बराच त्रास घ्यावा लागला होता. सुरुवातीला विमा कंपनीचे अधिकारी आमचा फोन देखील उचलत नव्हते, त्यानंतर आंदोलन झाल्यानंतर कंपनीनं ऑफलाईन अर्ज घेतले. मी ऑफलाईन अर्ज केला पण त्यांनी माझा अर्ज नाकारला. अर्ज नाकारण्यामागचं कारण कंपनीनं अद्याप स्पष्ट केलेलं नाही. त्यावेळी कृषी सहायकांनी येऊन पंचनामा केला होता, मात्र त्याच्यानंतर काहीही कारवाई करण्यात आलेली नाही," विमा आणि पंचनाम्याबद्दल आलेला अनुभव दिघीकर सांगतात.

असाच काहीसा अनुभव सर्जे यांनी ही आला होता. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे त्यांनी शेतात केलेला गहू पुर्णपणे लोळला. त्यामुळे तो गहू काढण्यासाठी त्यांना हार्वेस्टर वापरताना प्रचंड अडचण आली. शिवाय पाऊस गहू उभारणीला येत असताना पडल्यामुळे गव्हाची वाढ झाली नाही.

"यावेळी घरी खायला गहू नाही, शेतातला गहू जिऱ्यासारखा लहान आहे. त्याचं पीठ पडत नाही. त्यामुळे तो गहू आम्ही जनावरांना चारा म्हणून वापरत आहोत. घरी खालचा गहू विकत आणावा लागत आहे," सर्जे सांगतात.

आता विदर्भातील शेतकरी पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आला असताना निवडणुकीच्या प्रचारात गुंग असलेल्या सरकारला शेतकऱ्यांचे होणारे हाल दिसतील की नाही असा प्रश्न जाणकार विचारत आहेत.