India

२१० कोटी खर्चून, शहरी पर्यावरणाला इजा करून पुणे मनपा टेकडीतून रस्ता काढण्यावर ठाम!

या रस्त्यामुळं वाचणारं अंतर आहे ४०० मीटर!

Credit : Indie Journal

पुणे महानगरपालिका पुणेकरांचा वेळ आणि प्रवासाचं अंतर वाचवण्यासाठी इतकी दक्ष आहे की त्यासाठी पुण्यात काही मोजक्याच पाहिलेल्या हिरव्यागार टेकड्यांपैकी एक फोडायलाही महापालिका तयार आहे. आणि पुणेकरांची १० मिनिटं आणि ४०० मीटरचं अंतर वाचवण्यासाठी महानगरपालिका तब्बल २१० कोटी रुपये खर्च करून रस्ता बनवायला निघाली आहे.

सेनापती बापट रोडला पौड रस्त्याला जोडणारा बालभारती-पौड फाटा रस्ता बनवण्याचा विचार पहिल्यांदा १९८६ साली तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यात करण्यात आला होता. मात्र पुणेकरांकडून या प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोध होत आला आहे. पुणे महानगरपालिकेची विरोधाला न जुमानता रस्ता होणारच या भूमिकेमुळं शनिवार १५ एप्रिल रोजी वेताळ टेकडी बचाव कृती समितीतर्फे मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे.

सध्या सर्वांना सेनापती बापट रोडवरून कर्वे रस्त्याला लॉ कॉलेज रोडवरून नळस्टॉपमार्गे पौड फाट्याला जाता येतं. बालभारती आणि पौड फाटा या दोन ठिकाणांमधील अंतर साधारणपणे २.५ किमी आहे. वेताळ टेकडीवरून प्रस्तावित नवीन रस्ता झाल्यानंतर हे अंतर चक्क २.१ किमी एवढं कमी होईल असं पुणे महानगरपालिकेचं म्हणणं आहे. म्हणजे या रस्त्यामुळं वाचणारं अंतर आहे ४०० मीटर! 

या रस्त्याला होणाऱ्या विरोधाच्या उत्तरादाखल वेताळ टेकडीवरून जाणारा रस्ता उड्डाणपुलाच्या स्वरूपात बांधला जाणार असून यातून टेकडीचं कमीत कमी नुकसान होईल, शिवाय रस्त्यासाठी वापरली जाणारी जागा वनविभागाची नसून खाजगी संस्थांची असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेच्या निखिल मिजार यांनी दिली आहे.

"टेकडीवरील काही झाडं स्थानिक प्रजातीची नाहीत. सध्या कारनं गर्दीच्या वेळी बालभारतीपासून पौड फाट्यापर्यंत जाण्यासाठी १५ मिनिटं लागतात. हा लिंक रोड बनल्यानंतर हा वेळ कमी होऊन ५ मिनिटं होईल," असंही ते म्हणाले.

मात्र या प्रकल्पाला अनेक वर्षांपासून विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मनपाच्या या अभ्यास आणि आकडेवारीमध्ये अनेक विसंगती असल्याचं म्हटलं आहे.

 

 

इंडी जर्नलनं केलेल्या प्रवासात पौड फाटा ते बालभारतीच्या वर्तुळापर्यंत जाण्यासाठी दुचाकीला सरासरी ७ ते ८ मिनिटांचा वेळ लागला तर, बालभारतीच्या वर्तुळापासून पौड फाट्यापर्यंत ८ ते ९ मिनिटांचा वेळ लागला. इंडी जर्नलकडे चारचाकी उपलब्ध नसली तरी गुगल मॅप्सच्या आधारे दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी तपासलं असता या अंतरासाठी ६ ते १२ मिनिटांदरम्यान वेळ लागेल असा अंदाज दाखवला गेला.

आंदोलनात सक्रियरित्या सहभागी असलेल्या पर्यावरण कार्यकर्त्या सुषमा दाते यांनी मिजार यांच्या दाव्यांचं खंडन केलं. "रस्ता कोणत्या जागेवर आहे यानं काही फरक पडत नाही. मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानुसार वेताळ टेकडी एक मानवनिर्मित वन आहे. त्यामुळं त्याला संरक्षण आहे. तसंच मिजार यांनी केलेल्या अहवालानुसार तोडल्या जाणाऱ्या एकूण झाडांपैकी फक्त ४० टक्के स्थानिक प्रजातीच्या नाहीत. बाकीची ६० टक्के झाडं स्थानिक प्रजातीचीच आहेत," दाते म्हणाल्या. 

काही दिवसांपूर्वी प्रकाशित झालेल्या टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सच्या २०२२ च्या अहवालानुसार पुणे जगातील सहावं सर्वात मंद गतीनं चालणारं शहर आहे. या अहवालानुसार पुण्यात १० किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी २७ मिनिटं आणि २० सेकंद लागतात. यात २०२१ वर्षीच्या तुलनेत १ मिनिट आणि १० सेकंदांनी वाढ झाल्याचं अहवाल म्हणतो. भारतात पुण्याचा क्रमांक दुसरा असून मुंबई किंवा दिल्लीपेक्षा जास्त वेळ पुण्यात प्रवासासाठी लागतो असं या अहवालात म्हटलं आहे. 

या अहवालानुसार गर्दीच्या वेळी पुण्यात ट्रॅफिक ताशी १९ किमी वेगानं चालतं. त्यामुळं वर्षाला एका नागरिकाचे २४९ तास वाया जाऊन एका चारचाकी गाडीमागं १,००१ किलो कार्बन डायऑक्साइड वातावरणात जातो, ज्याला शोषणासाठी १०० झाडांना एक वर्ष लागेल, असा हा अहवाल म्हणतो. पुण्यात वाहतूक कोंडी वाढत असल्याचं या अहवालातून लक्ष्यात येत.

 

 

सध्याच्या महानगरपालिकेच्या सर्वेक्षणानुसार लॉ कॉलेज रोडवरून दररोज २,००० ते २,५०० गाड्या जातात. सेनापती बापट रोडची रुंदी ३० मीटर आहे कर्वे रस्त्याची रुंदी सुद्धा ३० मीटर आहे मात्र लॉ कॉलेज रोडची रुंदी केवळ १८ मीटर आहे. त्यामुळं या रस्त्याला पर्यायी रस्त्याची आवश्यकता आहे, असं मिजार म्हणतात.

मात्र याचवेळी सेनापती बापट रोड ते लॉ कॉलेज रोडवर जास्त बसेस नसल्याची माहितीही आंदोलनात सहभागी असलेल्या कार्यकर्त्या पिनाकीन कर्वे यांनी दिली. शिवाय पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे पुरेशा बसेस नाहीत आणि पुण्यात मेट्रो येण्यासाठी प्रचंड उशीर झाला. त्यामुळं पुण्यातील सार्वजनिक प्रवासी सेवा कमकुवत आहे. त्यामुळं सार्वजनिक प्रवासी सेवा मजबूत करण्यासाठी खर्च केला तर पुण्याचा ट्रॅफिक प्रश्न सुटू शकतो असं त्यांना वाटत.

मिजार मात्र या मताशी सहमत नाहीत. पुण्यात मेट्रो सुरु झाली किंवा बसेस वाढवल्या तरी पुण्याचे वाहतूक कोंडीचे प्रश्न सुटतील असं त्यांना वाटत नाही. "पुण्यात सध्या नियोजित लिंक रोडपैकी ३९० लिंक रोड अपूर्ण आहेत. त्यातही पूर्ण असूनही काही कारणांस्तव अडवल्या गेलेल्या रस्त्यांची संख्या वेगळीचं आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता आपल्याला भविष्याचा विचार करता पुण्याला अजून जास्त रस्ते लागतील," ते म्हणाले.

वेताळ टेकडीवरून जाणाऱ्या बालभारती ते पौड फाटा रोडला विरोध पाहता पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वेताळ टेकडीवर नागरिकांशी चर्चा केली होती. चर्चेत विशेष काही निष्पन्न झालं नाही. 

मात्र या भाजप नेत्यांचा बालभारती पौड फाटा रोडला असलेला पाठिंबा आणि जनसामान्यांचा सदर प्रकल्पाला असलेला विरोध पाहता दोन्ही गटांकडून झालेली चर्चा स्वागतार्ह असल्याचं तिथे जमलेल्या पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी सांगितलं. 

त्यानंतर आता पुन्हा या प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी १५ एप्रिल पद यात्रा काढण्यात येणार आहे. 

शनिवार, १५ एप्रिल रोजी वेताळ टेकडी बचाव कृती समितीतर्फे मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे.

 

 

पुण्यातील वेताळ टेकडीवर बनवण्यात येणाऱ्या बालभारती ते पौड फाटा रोडच्या विरोधात शनिवार, १५ एप्रिल रोजी वेताळ टेकडी बचाव कृती समितीतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे.

पुणे महानगरपालिकेनं २१० कोटी रुपये खर्च करून बालभारती ते पौड फाट्यादरम्यान वेताळ टेकडीवरून नवीन रस्ता तयार करण्याचा घाट घातला आहे. या रस्त्यामुळं सेनापती बापट रस्त्यावरील बालभारती ते पौड फाट्यापर्यंतच अंतर तब्बल ४०० मीटर आणि १० मिनिटांनी कमी होणार असल्याचं महानगरपालिकेचं म्हणणं आहे. मात्र असं असलं, तरी फक्त इतकं कमी अंतर आणि फक्त १० मिनिटं वाचवण्यासाठी पुण्यासारख्या वेगानं विकसित होणाऱ्या शहरात काही मोजक्याच उरलेल्या नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास करणं योग्य आहे का, हा प्रश्न विचारला जात आहे.