India
३० वर्षांपूर्वी तिनं महाराष्ट्राची पहिली धुरकरी बनून शंकरपट गाजवला!
चंद्रप्रभा महाले ऊर्फ सीमा पाटील यांच्या जिद्दीची कहाणी.
शंकरपट अर्थात बैलगाडा शर्यत. महाराष्ट्रासह देशभरात विविध नावांनी हा खेळ ओळखला जातो. आता या खेळावर बंदी असली तरी, एकेकाळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या खेळाचे शौकीन पहायला मिळत. आजही प्रशासनाची नजर चुकवून काही ठीकाणी पटावरच्या शर्यतींचं आयोजन केलं जातं. मर्दानी खेळ म्हणून शंकरपटाची ओळख आहे. पण, जवळपास २५ – ३० वर्षांपूर्वी एका महिलेनं या खेळाला आपलं सर्वस्व मानलं होतं. इतकंच काय तर महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला धुरकरी बनण्याचा मानही मिळवला होता. त्या रांगड्या महिलेचं नाव आहे चंद्रप्रभा महाले ऊर्फ सीमा पाटील.
सीमा यांच्या या रांगडेपणामागची गोष्ट मात्र मायेनं भरलेली आहे. बुलढाणा या जिल्ह्याच्या ठीकाणापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या ज्ञानगंगापूर या गावात सीमा यांचा जन्म झाला. वडील पोलीस पाटील होते. परिस्थिती हालाकीची असली तरी मुलीला लहानाचं मोठं करताना त्यांनी मुलगा-मुलगी असा भेद केलाच नव्हता. सीमा लहान असताना त्यांच्या घरच्या गाईला दोन जुळी वासरं झाली. त्यांचं नाव ठेवलं गेल ‘जीवन-पवन’ या वासरांवर त्यांनी लेकरासारखं प्रेम केलं. वासरं पाच-सहा महिन्यांची होईपर्यंत अगदी त्यांच्या अंथरूणावर येऊन झोपायची. सु-शी या गोष्टी परिसरातील एका ठराविक ठीकाणी जाऊन करण्यापर्यंत त्यांनी या दोन्ही वासरांना ट्रेन केलं होतं. ही वासरं आता ३ वर्षांची होऊन प्रौढ झाली होती. देशी गाईची ही जुळी लेकरं दिसायला हुबेहुब एकमेकांसारखी होती. शिवाय भलतीच चपळ होती.
सीमा यांच्या वडिलांच्या मित्रानं या जोडीला शंकरपटावर पळवण्याचा सल्ला दिला. वडिलांना हा सल्ला आवडला. पण, स्वत: पटावर जाण्यात त्यांना रस नव्हता. सीमा यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्याच्या हातच्या घासालाही तोंड न लावणाऱ्या या जोडीसाठी सगळ्यात योग्य धुरकरी २० वर्षीय सीमाच होत्या होत्या. प्रशिक्षण शुन्य असलेली ‘जीवन-पवन’ची जोडी शंकरपटावर धावण्यात तरबेज असलेल्या इतर बैलांमध्ये अगदी नवखी होती. त्यांना पटावर नेलं गेलं. मात्र, अनोळखी चेहऱ्यांमध्ये हे दोघे चालायलाही तयार नव्हते. मात्र, सीमा यांना आपल्या लाडक्या बैलांवर पूर्ण विश्वास होता. फक्त पुरूषांच्या असलेल्या त्या गर्दीत शर्यत संपणाऱ्या टोकाला उभं राहून त्यांनी आपल्या लाडक्या ‘जीवन-पवन’ला साद घातली. ते दोघे वाऱ्याच्या वेगानं धावत आले. या शर्यतीनं सगळ्यांना अवाक् केलं. कारण, या जोडीनं आपल्या पहिल्याच शर्यतीत भल्याभल्यांना चक्रावूट टाकत पहिला क्रमांक पटकावला होता. हा क्षण सीमा पाटील, प्रस्थापीत खेळाडू आणि बघ्यांसाठी अविस्मरणीय होता.
या घटनेनं सीमा यांच्या आयुष्याला एक वेगळी दिशा दिली. पुरूषांची मक्तेदारी असणाऱ्या या क्षेत्रात एका स्त्रीला उभं राहायला जागा मिळाली होती. आता तिला तिचं कर्तुत्व दाखवायचं होतं. त्यांनी पटावरच्या बैल शर्यतींमध्ये स्वयंस्फुर्तीनं भाग घ्यायचं ठरवलं. जिथं स्त्रीनं डोक्यावरचा पदर खाली पडू देणं म्हणजे अभद्रपणा होता, तिथं एका महिलेनं पुरूषांच्या बरोबरीला उभं राहून रांगडेपणाचं प्रतिक असलेला खेळ खेळणं सामाजिक दृष्ट्या अमान्यच असणार यात शंका नव्हती. त्यांच्या वाटाल्या आव्हानं आणि अडचणांचा डोंगर येणं सहाजिक होतं. शिवाय, एका स्त्रीकडून हारण्यात पुरूषी अहंकार आडवा आला नसता तर खरं! या विजयानंतर सीमा यांच्या पटावर धावण्याला कडाडून विरोध झाला. पण, त्यांनी मात्र त्या विरोधाला काडीचीही किंमत दिली नाही. या सगळ्यता वडिलांचा त्यांनी छुपा पाठिंबा होताच. त्यांनी पटावरच्या बैल शर्यतीत वारंवार भाग घेतला. विजयही मिळवला. तोही एक-दोनदा नाही तर, तब्बल ३२ वेळा.
त्यांच्या कर्तुत्वाचे किस्से सर्वदूर ऐकवले जाऊ लागले. नागपूरला होणाऱ्या एका बैलगाडा शर्यतीच खुद्द आर.आर. पाटील यांनी सीमा यांनी सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं होतं. शंकरपटात आपली जोडी जिंकावी यासाठी बैलांच्या देखभालीवर लाखो रूपयांचा खर्च करणाऱ्या धुरकऱ्यांना शर्यतीत एका सामान्य जोडीसोबत धावणं अमान्य होतं. ‘जीन-पवन’ या जोडीत त्यांच्या लाखो रूपयांच्या बैलजोडीला हरवण्याचं सामर्थ्य आहे, या विचारानंच त्यांची भंबेरी उडाली असावी! ही शर्यत अनेकांसाठी प्रतिष्ठेची बनली होती. यावेळी सीमा यांना रोखण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र, आर. आर. आबांनी सहा महिला पोलीस कॉन्स्टेबल्सची सुरक्षा पुरवून सीमा यांना शर्यतीच्या मैदानात उतरवल्याची आठवण त्या मोठ्या कौतुकानं सांगातात. त्यांच्यावर दाखवलेला हा विश्वास सीमा यांनी खरा ठरवला. दहा लाख प्रेक्षकांच्या गराड्यात एका महिलेनं आपला सहस्पर्धकांना हरवत पहिलं पारितोषिक पटकवलं होतं.
दबावोखाली येऊन सीमा यांनी लग्न तर केलं मात्र, चूल आणि मुल या समाजिक चौकटीत बसणाऱ्या त्या नव्हत्या. याची जाणीव त्यांना लग्नानंतर वर्षभरातच झाली. पतीला घटस्पोट देत त्यांनी पुन्हा आपल्या ‘जिवन-पवन’ या जोडीच्या मदतीनं अनेक मैदानं गाजवली. जिवन-पवननं तब्बल २०-२२ वर्षं सीमा यांना साथ दिली. आता सीमा यांचं वय ४६ वर्षं आहे. ‘जीवन-पवन’च्या जाण्यानं त्यांच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांचा शंकरपटातील सहभाग संपुष्टात आला असला तरी, जनावरांप्रति त्यांचं प्रेम मात्र, कायम आहे. घटस्फोटानंतर माहेरी परतल्यापासूनन त्या स्वत: मेहनत घेऊन ज्ञानगंगापूर येथे असलेली आपली वडिलोपार्जित शेती सांभळतात. सामाजिक कार्यातही त्या अग्रेसर असतात. जिजाऊ पुरस्कार, विदर्भकन्या पुरस्कार, अहिल्याबाई होळकर लोकसेवा राष्ट्रीय पुरस्कार, अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलंय. शंकरपट हा खेळ आता काळाच्या पडद्याआड जातोय. तरी, शंकरपटात मानाचं स्थान मिळवून महिला केणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, हे अधोरेखीत करणाऱ्या सीमा पाटील यांना मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे. महाराष्ट्रातील पहिल्या आणि एकमेव धुरकरी म्हणून शंकरपटाच्या इतिहासात सीमा पाटील याचं नाव सुवर्ण अक्षरात लिहल्या जाईल यांत शंका नाही.