Asia

आशियाई क्रीडा स्पर्धा

भारताची सुधारती कामगिरी

Credit : Asian Games

इंडोनेशियातील जकार्ता शहरात १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत रंगलेल्या १८व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा नुकताच समारोप झाला. जवळपास ४५ देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत चीन, जपान आणि दक्षिण कोरियाच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवले. भारताचे ५७२ खेळाडू एकूण ३६ खेळांमध्ये सहभागी झाले होते. अनेक ऐतिहासिक विक्रम मोडीत काढून भारतीय खेळाडूंनी यावर्षी उत्तम कामगिरी केली. त्यांनी  १५ सुवर्ण, २४ रौप्य आणि ३० कांस्य अशा एकूण ६९ पदकांची कमाई करत देशाची मान उंचावली. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात नीरज चोप्रा(भाला फेक) तर समारोप समारंभात रानी रामपाल(हॉकी) या खेळाडूंनी ध्वजवाहक म्हणून भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं.

दर चार वर्षांनी आशियाई देशांदरम्यान होणारी आशियाई स्पर्धा किंवा एशियाड ही एक बहु-क्रीडा स्पर्धा आहे. ह्या स्पर्धेचे आयोजन आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचाच एक भाग असणारी आशिया ऑलिंपिक समिती ही संस्था करते. ऑलिंपिक खेळांनंतर एशियाड ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे. आशियातील प्रत्येक देशाची ऑलिंपिक संघटना आपल्या देशातील खेळाडूंची निवड करून या स्पर्धेसाठी पाठविते. सर्वात पहिली आशियाई स्पर्धा ही भारताची राजधानी नवी दिल्ली येथे १९५१ साली झाली. भारत हा या स्पर्धेचा पहिला यजमान देश आहे. आजवर नऊ देशांनी ह्या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. सध्या आशियामधील सर्व ४५ देश ह्या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात. पूर्वी ही संख्या ४६ होती पण काही राजकीय कारणांमुळे १९७४ मधील स्पर्धेनंतर इस्रायलच्या सहभागावर बंदी घालण्यात आली होती.

अनेक सकारात्मत आणि नकारात्मक गोष्टींमुळे यावेळी आशियाई क्रीडा स्पर्धा चर्चेचा विषय ठरली. या स्पर्धेची सुरुवात होण्याआधीच इंडियन ऑलम्पिक असोसिएशन(IOA) वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. असोसिएशनने आपल्याशी संलग्नित नसलेल्या फेडरेशनच्या प्रशिक्षक आणि खेळाडूंनी उद्घाटन समारंभासाठी गणवेश, प्रशिक्षण आणि स्पर्धेचं किट आदींचा खर्च स्वत:च उचलायचा आहे, असं फर्मान काढलं होतं. आयओएच्या या निर्णयाचा फटका साम्बो, पेन्काक सिलाट, कुरॅश, ब्रीज, स्पोर्ट क्लायम्बिंग, रोलर स्केटिंग, सॉफ्ट टेनिस आणि सिपॅक टकरॉ या खेळांना बसणार होता. या ८ क्रीडा प्रकारांसाठी भारतातून ८३ अॅथलेट्स आणि ३१ अधिकारी जकार्ता येथे स्पर्धेत सहभागी होणार होते. हा खर्च परवडण्यासारखा नसून याची कल्पना असोसिएशनने अगोदर दिली नव्हती असा आरोप फेडरेशन तर्फे करण्यात आला तर आयओएसोबत संलग्नित नसलेल्या फेडरेशनच्या खेळाडूंना आशियाई स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी दिली जात आहे हीच खूप मोठी गोष्ट आहे अशी सफाई असोसिएशनने दिली. शेवटी या सर्व पैशांची भरपाई करून दिली जाईल अशी आशा इंडियन ऑलम्पिक असोसिएशनकडून दाखविण्यात आली आणि हा चमू इंडोनेशियाला रवाना झाला. मात्र या खेळाडूंना जागतिक स्तरावर देशाचं प्रतिनिधित्व करणं आर्थिक दृष्ट्या बरंच महाग पडल्याचं एकंदरीत चित्र होतं. असं असलं तरीही या खेळाडूंनी १ सुवर्ण,१ रौप्य आणि ४ कांस्य पदकांवर नाव कोरत आपली पात्रता दर्शविली. 

आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान खेळाडूंना ५० डॉलर (३ हजार ५०० रुपये) इतका दैनंदिन भत्ता पुरविला जाणार होता. भारतीय क्रीडापटू पदकांची लयलुट करत असतानाच त्यांच्या हक्काचे हे पैसे देखील त्यांना वेळेत मिळाले नसल्याचंही समोर आलं. स्पर्धा संपत आली असताना अनेक खेळाडू त्यांच्या पुढच्या स्पर्धांसाठी रवाना झाले होते. सर्वांना फोरेक्स कार्ड वितरित करण्यात आले, पण त्यावर वेळेत पैसे जमा झाले नाहीत अशी तक्रार अनेक खेळाडूंनी स्पर्धेदरम्यान केली होती. दैनंदिन भत्ता क्रीडा मंत्रालयाकडून मंजूर केला जातो, पण क्रीडापटूंना तो वेळेत देण्याची जबाबदारी आयओएची असते. आयओएने मात्र तांत्रिक अडचणींचा हवाला देत लवकरच पैसे जमा केले जातील असे आणखी एक आश्वासन खेळाडूंना दिले. 

यावर्षीच्या आशियाई खेळांमध्ये अनेक ऐतिहासिक विक्रम आणि महिलांचे वर्चस्व यादेखील महत्वाच्या बाबी ठरल्या. यावर्षी बजरंग पुनिया या कुस्तीपटूने पहिले सुवर्ण पदक जिंकून भारताने आशियाई खेळांमध्ये दमदार कामगिरीला सुरुवात केली. आशियाई खेळांमध्ये भरताच्या इतिहासातील पहिल्या वहिल्या सुवर्ण पदकांवर नाव लिहणाऱ्यांमध्ये महिलांनी बाजी मारली. भारताचं महिला कुस्तीतलं पाहिलं सुवर्ण पदक पटकावलं फोगाट भगिनींपैकीच एक असणाऱ्या विनेश फोगाट हिने. त्यापाठोपाठ पायांना जन्मतःच बारा बोटं घेऊन आलेली स्वप्ना बर्मन हिने आपल्या या असाम्यत्वावर मात करत Heptathlon या खेळात इतिहासातलं पाहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. स्वप्नाकडे तिच्या पायांसाठी लागणारे खास बूट नसल्याने तिला अनेकवेळा अनवाणी सराव करावा लागला. दातांची दुखापत आणि पायांना होणारा त्रास याचा विचार न करता तिनं ही विशेष कामगिरी केली. क्रीडासाहित्य बनविणाऱ्या 'नायकी' कंपनीने यापुढे तिला लागणाऱ्या बुटांची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. राही सरनौबत हिने देखील आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला शूटर बनवण्याचा बहुमान मिळवला तर अरपिंदर सिंह या खेळाडूने तब्बल ४८ वर्षांनंतर 'ट्रिपल जम्प'मध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. 

 

स्वप्नास्वप्ना बर्मन.   छायाचित्र सौजन्य - झी न्यूज

 

आशियाई स्पर्धांच्या इतिहासात यावेळी भारतानं सर्वोत्तम प्रदर्शन केलं आहे. खेळाडूंनी आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी कष्ट घेतलेत हे पदकतालिकेवर नजर टाकताच जाणवतं. परंतु या यशाचं श्रेय क्रीडामंत्री हर्षवर्धन राठोड यांना सुदधा दिलं जातंय. एक खेळाडू क्रीडामंत्री असेल तर त्याचा फायदा कशाप्रकारे होतो याचं राठोड हे उत्तम उदाहरण असल्याची चर्चा होत आहे. हर्षवर्धन राठोड हे शूटर आहेत. ते २००४ साली झालेल्या अथेन्स ऑलम्पिक मध्ये रौप्यपदक विजेते आहेत. भारताच्या या यशाविषयी बोलताना राठोड म्हणतात की, 'हे यश सहजासहजी मिळालेलं नसून त्यासाठी सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांनी खूप कष्ट घेतले आहेत. आशियाई स्पर्धा भारताच्या स्पोर्ट पॉवर बनण्याचा प्रवासातील टर्निंग पॉईंट आहे.' आशियाई खेळानंतर २०२० मध्ये टोकियो इथे होणाऱ्या  ऑलम्पिक स्पर्धांसाठी भारतीय खेळाडूंकडून अपेक्षा वाढल्या आहेत.