India

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त एसएफआयची 'लेखणी ज्योत' यात्रा

शिक्षणावरील खर्च वाढवण्याची आणि शाळा वाचवण्याची मागणी.

Credit : इंडी जर्नल

 

सरकारकडून शिक्षण क्षेत्राबाबत घेण्यात आलेल्या विविध निर्णयांचा विरोध करण्यासाठी आणि देशातील मुलींच्या पहिली शाळा असलेल्या भिडे वाडाच्या जागी होणाऱ्या राष्ट्रीय स्मारकाच्या स्वागत करण्यासाठी सावित्रीबाई फुले जयंतीचं औचित्य साधत 'स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया'नं (एसएफआय) भिडे वाडा ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापर्यंत 'लेखणी ज्योत' यात्रा काढली. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंना देण्यात आलेल्या निवेदनात सरकारनं शिक्षणावरील खर्च वाढवावा, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि नवीन शैक्षणिक धोरण रद्द करावं, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

"मुंबई उच्च न्यायालयानं नुकत्याच दिलेल्या निर्णयानंतर भिडे वाड्याच्या जागी राष्ट्रीय स्मारक बनवण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर पुणे महानगरपालिकेनं भिडे वाड्याची जागा ताब्यात घेतली आहे. त्यानंतर त्या जागी असलेली जुनी इमारत पाडण्यात आली. या निर्णयाचं सर्वत्र स्वागत होत आहे. मात्र त्याचवेळी महाराष्ट्र सरकारनं घेतलेल्या अनेक निर्णयांमूळे सर्वसामान्य विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे," एसएफआयचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ म्हणाले.

"यात कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांचं समूह शाळेत रूपांतर करणं आणि शाळा सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिसपाँसीबीलीटी) तत्त्वाखाली दत्तक देणं या सारख्या निर्णयामुळं सरकार त्यांची स्वतःची जबाबदारी झटकत असल्याचं दिसून येत आहे. शिवाय सरकार उच्च शिक्षणातील शिष्यवृत्त्या कमी करत आहे, हा सर्व शिक्षणाचं बाजारीकरण करण्याच्या दिशेनं सरकारनं टाकलेलं पाऊल आहे. त्यामुळे सरकारनं हे निर्णय त्वरित मागे द्यावेत," निर्मळ त्यांच्या मागण्या मांडताना सांगतात.

 

 

लेखणी ज्योत भिडे वाड्यापासून सुरु होऊन जेधे महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय आणि फर्ग्युसनमहाविद्यालयामार्गे सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळ असलेल्या सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याला अभिवादन करून थांबली. त्यानंतर एसएफआयनं त्यांच्या मागण्यांचं निवेदन विद्यापीठाच्या कूलगुरूंना दिलं.

"राज्य सरकारनं घेतलेला शाळा दत्तक योजनेचा निर्णय रद्द करून शिक्षणावरचा खर्च वाढवा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शून्य शुल्क प्रवेश योजनेची अंमलबजावणी करावी, राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना यांची काटेकोर अंमलबजावणी करावी आणि सारथी, बार्टी आणि टीआआरटीच्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्यात यावी. शिवाय शिक्षणाचं बाजारीकरण करणारं नवीन शैक्षणिक धोरण रद्द करावं," अशा मागण्या एसएफआयकडून करण्यात आल्या आहेत.