India

वसतीगृहासाठी एसएफआयचं विद्यापीठात साखळी उपोषण

दुसऱ्यांदा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठानं वसतीगृह नाकारल्यानं आंदोलन.

Credit : इंडी जर्नल

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दुसऱ्यांदा पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतीगृह नाकारणारा अध्यादेश मागे घेऊन सर्व गरजू विद्यार्थ्यांना वसतीगृह उपलब्ध करुन देण्यात यावं, या मागण्यांसाठी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया किंवा एसएफआय या विद्यार्थी संघटनेनं मंगळवारपासून विद्यापीठात साखळी आंदोलन पुकारलं आहे. दुसऱ्यांदा पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेणारे बहुतांश विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातून येतात. त्यामुळं या विद्यार्थ्यांना, विशेषतः दुरून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींना वसतीगृह उपलब्ध न झाल्यास त्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होईल, असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. विद्यापीठ प्रशासनानं मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

वैष्णवी शेळके स्वतः पहिल्या दिवशी साखळी उपोषणात सहभागी होती. मुळची नाशिकची असलेल्या वैष्णवीनं यावर्षी पदव्युत्तर शिक्षणासाठी ग्रंथालय आणि माहिती विज्ञानाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे आणि तिचा प्रवेशदेखील निश्चित झाला आहे. मात्र या अभ्यासक्रमाचं शिक्षण सोडून घरी परतावं लागेल, अशी चिंता सध्या तिला सतावत आहे. त्यामागचं कारण म्हणजे विद्यापीठ प्रशासनानं दोन महिन्यापूर्वी काढलेलं परिपत्रक.

मी याआधीची एमएची पदवी शिक्षणशास्त्रात घेतली. पुण्यात आल्यानंतर मला समजलं की  'ग्रंथालय आणि माहिती विज्ञान' असाही विषय असतो. मला या विषयात रस होता आणि मला माझ्या घरच्यांनी प्रवेशासाठी परवानगीदेखील दिली होती. मात्र जेव्हा मी पुणे विद्यापीठात वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी आले तेव्हा मला एकाच क्षेत्रात लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला प्राध्यापकांनी दिला," वैष्णवी सांगते. दुसऱ्या पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेतला असल्यानं वैष्णवीला वसतीगृह मिळणार नाही, त्यामुळं प्राध्यपकांनी थेट प्रवेशच न घेण्याचा सल्ला दिल्याचं ती सांगते.

 

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं काढलेल्या या परिपत्रकानुसार जर एखादा विद्यार्थ्याला विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण पुर्ण करताना वसतीगृहाची सोय उपलब्ध झाली असेल आणि तोच विद्यार्थी दुसऱ्यांदा पदव्युत्तर शिक्षणासाठी पुन्हा विद्यापीठात प्रवेश घेत असेल, तर त्याला वसतीगृह मिळणार नाही. विद्यापीठानं अशाप्रकारचा निर्णय पहिल्यांदा घेतला नसुन याआधी २०१८ मध्येही असाच निर्णय घेतला होता. त्यावेळीही त्यांना विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं.

"एसएफआयनं याआधीही या आणि इतर काही मागण्यांसाठी विद्यापीठात हल्लाबोल मोर्चा काढला होता. त्यावेळीही प्रशासनानं आश्वासनं दिली होती, मात्र त्या आश्वासनांवर कोणतीही कारवाई न झाल्यानं यावेळी उपोषणाचा मार्ग पत्कारावा लागला," एसएफआयचे आकाश लोणकर सांगतात. विद्यापीठ प्रशासनानं याबाबत ३० तारखेला होणाऱ्या सेनेट बैठकीत याबाबत प्रस्ताव मांडणार असल्याचं आश्वासन प्रशासनानं एसएफआयला दिलं आहे. मात्र ते आश्वासन फक्त तोंडी असून लेखी आश्वासन देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचं लोणकर सांगतात.

 

 

या आंदोलनासंदर्भात आणि परिपत्रकासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी इंडी जर्नलनं पुणे विद्यापीठाच्या वसतीगृह प्रमुख वर्षा वानखेडे यांना अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दोनदा कार्यालयात त्या उपलब्ध नव्हत्या आणि त्यांनी इंडी जर्नलनं केलेल्या फोन आणि मॅसेजेसवेळ त्यांचं उत्तर आलं नाही. 

प्रतिक्षा कोकणेनंही पुणे विद्यापीठात शिक्षणशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण नुकतंच पुर्ण केलं आहे आणि यावेळी तिला एमएससी मानववंशशास्त्रासाठी प्रवेश मिळाला आहे. शिक्षणशास्र्तार पद्युत्तर शिक्षण असणाऱ्यांसाठी सध्या पुरेशा नोकऱ्या नाहीत, मात्र मानववंशास्त्रात पुढं अनेक संधी तिला दिसत असल्यामुळं तिनं यावेळी या विभागात प्रवेश घेतल्याचं ती सांगते. मात्र जर तिला पुण्यात राहून हा अभ्यासक्रम पूर्ण करायचा असेल, तर तिला वसतीगृहाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं ती म्हणाली.

 

"जर मला विद्यापीठातील वसतीगृह मिळाला नाही तर मला घरी जावं लागेल आणि मग घरचे माझं लग्न लावून देतील."

 

"मी शेतकरी कुटुंबातून येते. माझे वडील शेती करतात. त्यामुळं मला पुण्यात भाड्यानं खोली करुन राहणं शक्य नाही. जर मला वसतीगृह मिळालं नाही मी इथं राहू शकणार नाही. याआधीही मला पुणे विद्यापीठात वसतीगृह मिळालं म्हणून मी पुण्यात आले होते," प्रतिक्षा म्हणाली.

"बाबासाहेबांनी इतक्या पदव्या मिळवल्या आणि इथं आम्हाला फक्त दुसऱ्याच पदवीसाठी वसतीगृह नाकारालं जात आहे. जर मला विद्यापीठातील वसतीगृह मिळाला नाही तर मला घरी जावं लागेल आणि घरी गेल्यानंतर घरचे माझं लग्न लावून देतील, याची चिंता मला सतावत आहे. ग्रंथालय विज्ञान क्षेत्रात नोकरीच्या भरपूर संधी आहेत, असं मला वाटतं," वैष्णवी पुढं सांगते.

दुसऱ्यावेळी पुणे विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या किमान २० मुली एसएफआयच्या संपर्कात असल्याची माहिती लोणकर देतात. त्यांंच्यासाठी विद्यापीठ प्रशासनानं काढलेला तोडगा म्हणजे या विद्यार्थ्यांना अतिथी व्यवस्थेत राहण्याची परवानगी प्रशासन देत आहे. मात्र आधीच वसतीगृहाच्या एका खोलीत पाच विद्यार्थी असल्यानं अजून एक विद्यार्थी त्यात भरती करण्यास आधी राहणारे विद्यार्थी बऱ्याचदा तयार नसतात, असंही लोणकर सांगतात.

या सर्व प्रकारानंतर पुणे विद्यापीठात नक्की किती विद्यार्थ्यांना देण्यासाठी वसतीगृह उपलब्ध आहेत, त्यातील किती जागा भरल्या जात आहेत आणि दुसऱ्यांदा वसतीगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे नव्या अशा किती विद्यार्थ्यांना जागा उपलब्ध होतील, असे काही प्रश्न उपस्थित होत आहेत.