India

संगमनेरच्या प्रस्थापितांना आव्हान देणारा ‘अपक्ष’ कार्यकर्ता - दत्ता ढगे

अहमदनगर जिल्ह्यात विखे पाटील आणि थोरात अशा दोन कुटुंबाचं वर्चस्व आहे.

Credit : इंडी जर्नल

 

"तुम्ही मला दिलेलं प्रत्येक मत या प्रस्थापित राजकारण्यांना ओरडून सांगेल की इथली लोकं शेती, रोजगार आणि महागाई सारख्या विषयांवर देखील मतं देतात," नऊ वेळा आमदार आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री राहिलेल्या बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात संगमनेर मतदारसंघात उभे असलेले दत्तात्रय ढगे प्रचारादरम्यान भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सांगतात.

छात्रभारतीचे माजी अध्यक्ष असलेले ढगे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या समोर उभ असलेलं आव्हान खूप मोठं असलं. तरी त्यांनी मांडलेल्या प्रचार करताना मांडलेल्या मुद्द्यांसाठी त्यांना चांगला पाठिंबा मिळत आहे आणि ही फक्त सुरुवात असल्याचं ते सांगतात.

बुधवार, २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान होणार आहे आणि २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाईल. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फूटीमुळं यावेळी महाराष्ट्रातील पक्षांची संख्या वाढली आहे. शिवाय इतर अनेक पक्ष आणि आघाड्यांची त्यांचे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं स्थापन केलेली आघाडी, वंचित बहुजन आघाडी, इत्यादी अनेकांना समावेश होतो. यात अनेक अपक्ष उमेदवारदेखील या रणधुमाळीत उतरले आहेत.

त्यामुळं महाराष्ट्रात यावेळी प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांची भाऊगर्दी झाली असून अशा वेळी प्रस्थापित उमेदवार पुन्हा बाजी मारण्याची शक्यता असल्याचं जाणकार सांगतात. अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्याचे गेली ४० वर्षं ८ वेळा आमदार असलेले बाळासाहेब थोरात देखील याच प्रस्थापितांपैकी एक आहेत.

 

 

यावेळी हा मतदारसंघ महायुतीतील शिवसेनेकडं गेला असल्यानं थोरातांविरोधात शिवसेनेनं अमोल खटाळ यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात एकूण १३ उमेदवार उभे आहेत आणि दत्तात्रय ढगे त्यातील एक उमेदवार आहेत. वयाच्या ३२व्या वर्षी पहिल्यांदाच एखाद्या निवडणुकीत उतरलेले ढगे याआधी छात्रभारतीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष होते. मात्र सध्या ते संगमनेरमध्ये एक व्यावसायिक आहेत. त्यांच्या व्यवसायाचं कार्यालय सध्या त्यांच्या निवडणूक प्रचाराचं केंद्र आहे.

या कार्यालयात इंडी जर्नलशी बोलताना ढगे सांगतात, "ही निवडणूक लढताना मला लक्षात आलं की निवडणूक लढवणं ही गरीबाची गोष्ट राहिलेली नाही." प्रचारासाठी लागणाऱ्या वस्तूंपैकी एक ग्रीनस्क्रीन, प्रकाशासाठीचा दिवा (लाईट), मोबाईल स्टँड आणि बसण्यासाठी एक खूर्ची एवढ्याच काही वस्तू त्यांच्या कार्यालयात आहेत. त्यांनी प्रचारासाठी जास्त खर्च केलेला नाही. प्रचाराच्या प्रवासासाठी लागणारी एक चारचाकी, प्रचाराचे फ्लेक्स आणि भोग्यांसाठी मालवाहतूक करणारा एक छोटा ट्रक आणि पत्रिका वाटण्यासाठी सोबतीला दोन ते चार मित्र एवढाच त्यांच्या प्रचाराचा पसारा असल्याचं ते सांगतात.

मात्र तरीही संगमनेरच्या मतदारांच्या मनात जागा निर्माण करू शकत असल्याचा त्यांचा दावा आहे. "काल (शुक्रवार) मी एका ठिकाणी प्रचारासाठी गेलो होतो. तिथं काही महिला कांदा लागवडीच काम करत होत्या. तर एक पुरुष लांब उभा राहून शेतात पाणी देत होता. मी त्या महिलांना पत्रक देऊन पुढं जात असताना, लांब उभ्या असलेल्या त्या माणसानं आम्हाला आवाज दिला. 'माझं मत यावेळी तुम्हालाच' असं त्या माणसानं म्हटलं. 'माफ करा मी तुम्हाला ओळखलं नाही' मला अशाप्रकारच्या गोष्टी ऐकायची सवय नसल्यानं मी त्यांना विचारलं," त्यांना आलेल्या एका अनुभवाची गोष्ट ढगे सांगतात.

"त्यावर तो माणूस म्हणाला, 'तुम्ही मला ओळखलं नसलं तरी मी तुम्हाला ओळखतो. दुध आंदोलनाच्या वेळी मी तुमचं भाषण ऐकलं होतं. तुम्ही मांडलेले मुद्दे मला पटले, त्यामुळं यावेळी माझं मत तुम्हाला,' मला असं ऐकुन आश्चर्याचा धक्का बसला," ढगे पुढं सांगतात.

 

 

निवडणुकीत उभं राहण्यापूर्वी गेल्या दीड दोन वर्षात ढगेंनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर आंदोलनं केली आहेत. त्यात दुधाच्या भावासाठी पुकारलेलं आंदोलन, महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना फी माफी मिळावी म्हणून आंदोलन, शेतमालाला भाव मिळवण्यासाठी आंदोलन आणि इतर अनेक आंदोलनांचा समावेश आहे.

मात्र आंदोलन आणि निवडणूक यात फरक असतो आणि ढगे ते जाणतात. त्यामुळंच निवडणूक लढवणं गरीबाची गोष्ट राहिली नसल्याचं ते म्हणाले. त्यांचा संपुर्ण प्रचार सध्या त्यांना त्यांच्या मित्रांनी केलेल्या आर्थिक मदतीवर चालला असल्याचं ते सांगतात. यात ते वापरत असलेली चारचाकी गाडी आणि ट्रक त्यांच्या भावानं त्यांना दिला आहे, त्या गाड्यांसाठी कोणतंही भाडं ते मोजत नाहीत, निवडणुकीत उभं राहण्यासाठी भरायची अनामत रक्कमेसाठी त्यांना त्यांच्या मित्रांनी मदत केली, तर इतर खर्चांसाठी त्यांना लोकांकडून मिळालेल्या निधीचा वापर ते करतात.

"काही दिवसांपूर्वी माझ्या एका जुन्या मित्राच्या भावानं माझी भेट घेतली. मला माझ्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा दिल्या आणि माझ्या प्रचारासाठी ५०० रुपयांची मदत त्यानं केली," त्यांना समाजातून मिळत असलेल्या मदतीची माहिती देताना ढगे सांगतात.

"जशी शिवपूर्व काळात महाराष्ट्रात स्थिती होती, तशी काहीशी स्थिती सध्या महाराष्ट्रात आहे, असं मला वाटत. त्यावेळी महाराष्ट्रात सरंजामशाह तयार झाले होते, आणि जो कोणी दिल्लीत सत्तेत येईल त्याच्याशी वाटाघाटी करून ही लोकं स्वतःची स्थानिक सत्ता अबाधित ठेवायचे. ते कधी आदिलशहा, कधी मुगल, तर कधी निजामशाहकडं ते काम करत होते. तशीच काहीशी स्थिती सध्या आहे, असं मला वाटतं," या निवडणुकीत उतरण्याचं कारण विचारलं असता, सध्याच्या राजकारणाबद्दल ढगे बोलतात.

"विखे आणि थोरातदेखील त्यांचंच प्रतिनिधीत्व करतात. महाराष्ट्रात जवळ जवळ १५० असे मतदारसंघ आहेत, जिथं कोणत्या ना कोणत्या सरंजामदारांचं प्रभुत्व आहे, असं मानलं जातं. आता ती लोकं तिथले संस्थानिक झाले आहेत, आणि त्यांची मुलं एकमेकांविरोधात बोलतानासुद्धा त्याचंप्रमाणे बोलतात. विखेंचा मुलगा सुजय थोरातांच्या मुलगी जयश्री विरोधात बोलत असेल, तर त्यांना संगमनेरची राजकुमारी म्हणून उद्दशतो, किंवा मग जयश्री सुजय विरोधात बोलताना त्यांना लोणीचा राजकुमार म्हणते," ढगे पुढं सांगतात.

 

अहमदनगर जिल्ह्यात विखे पाटील आणि थोरात अशा दोन कुटुंबाचं वर्चस्व आहे.

 

"मग एखाद्या भाषणात बोलताना सुजय म्हणतो की 'माझ्या बापाबद्दल बोलाल तर खड्ड्यात गाडील'. मग कधी थोरातांची मुलगी विखेंना बोलताना म्हणतात की 'माझ्या बापाला काही बोलाल तर याद राखा.' माझ्या लक्षात आलं की या दोन्ही बापांच्या भांडणात माझ्या शेतकरी बापाबद्दल कोणी बोलत नाही, त्यांच्या अडचणी, प्रश्नांबद्दल कोणी काही चर्चा करत नाहीत," दोन्ही कुटुंबात होणाऱ्या भांडणाबद्दल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होत नसल्याबद्दल दुःख व्यक्त करत ढगे सांगतात.

"आज दुधाला भाव मिळत नाही, शेतमालाला भाव मिळत नाही, कर्जाचा डोंगर वाढत आहे, गायी घेण्यासाठी घेतलेल्या कर्जाची फेड करण्यासाठी गायी विकाव्या लागत आहेत. या शेतकऱ्याबद्दल कोणीही बोलायला तयार नाही. मग मी म्हटल की आपल्या बापासाठी बोलण्यासाठी म्हणून आपण उभं राहिलं पाहिजे," राजकारणात उतरण्याचं कारण स्पष्ट करताना ढगे म्हणाले.

अहमदनगर जिल्ह्यात विखे पाटील आणि थोरात अशा दोन कुटुंबाचं वर्चस्व आहे. यात राधाकृष्ण विखे पाटील नगरच्या शिर्डी मतदारसंघातून सात वेळा म्हणजे ३५ वर्षांसाठी आमदार राहिले आहेत. त्यांचे वडील बाळासाहेब विखे पाटीलदेखील मोठ्या काळासाठी राजकारणात होते. राधाकृष्ण विखे पाटलांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात शिवसेनेत झाली. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ पर्यंत ते काँग्रेसमध्ये होते आणि २०१९मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर त्यांचा मुलगा सुजय विखे पाटील २०१९ मध्ये नगर जिल्ह्याचे खासदार होते. मात्र त्यांना गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव स्विकारावा लागला.

त्यानंतर थोरात घराण्याचा इतिहासदेखील तितकाच मोठा आहे. बाळासाहेब थोरातांचे वडील भाऊसाहेब थोरात देखील नगर जिल्ह्यातील सरकार चळवळीत महत्त्वाचं नाव आहे. भाऊसाहेब एकवेळचे आमदार आणि सहकार चळवळीतील महत्त्वाचे नेते होते. त्यानंतर बाळासाहेब थोरात ४० वर्षांसाठी संगमनेरचे आमदार राहिले आहेत. काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी अनेक महत्त्वाची मंत्रीपद सांभाळली. बाळासाहेबांची कन्या जयश्री थोरात देखील गेल्या काही काळापासून राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी जयश्रींवर भाजप नेत्यानं केलेल्या एका विधानामुळं नगरमध्ये राजकारण पेटलं होतं.

या जिल्ह्याचं राजकारण गेल्या अनेक वर्षांपासून या दोन कुटुंबांभोवती फिरतं. ढगेंकडं मात्र असा कोणताही राजकीय वारसा नाही. त्यांचा जन्म एका विडीकामगार आणि अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात झाला. १२वीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी नगरच्या एका विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांचा संबंध छात्रभारती आणि इतर समविचारी संघटनांशी आला. तेव्हापासून त्यांनी या संघटनांचा कार्यकर्ता म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

त्यावेळी त्यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतला. संघटनेत महत्त्वाची भूमिका पार पाडली. २०१७ ते २०१८ च्या काळात छात्रभारतीच्या राज्य अध्यक्षपदावर ते होते. मात्र २०१९ मध्ये त्यांनी या सर्व कामातून सुट्टी घेत, घरी लक्ष केंद्रीत केलं. गेल्या दीड दोन वर्षांपुर्वी त्यांनी त्यांच्या सामाजिक आयुष्यात पुनर्रप्रवेश केला. त्यांनी या काळात केलेल्या काही आंदोलनांमुळं त्यांची सामान्य नागरिक आणि राजकारण्यांमधील ओळख वाढली आहे.

 

 

यावेळची निवडणूक ही जिंकण्यासाठी लढवत नसून राजकारण्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत करण्यासाठी लढवत असल्याचं ढगे भेटणाऱ्या मतदारांना सांगतात. ढगेंची मतदारांना भेटण्याची पद्धत अतिशय साधी आहे. त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा मोठा घोळका नाही, त्यांनी घातलेल्या पांढऱ्या शर्टाला कडक इस्त्री नाही, हातात त्यांच्या प्रचारासाठी छापलेल्या पत्रिका, आणि त्यांच्या चिन्हा आणि कामाबद्दल माहिती देण्यासाठी भोंगा लावलेली गाडी त्यांच्या सोबत असते.

त्यांच्या प्रचारासाठी मुख्यतः समाज माध्यमांचा वापर ते करतात. यात दिवसभर एखाद्या गावात फिरायचं, तिथं लोकांना भेटायचं, जिथं गर्दी दिसेल, अशा ठिकाणी गाडी उभी करून भाषण द्यायचं आणि त्याच भाषणाला समाजमाध्यमांवर थेट प्रक्षेपित करायचं, असा त्यांच्या प्रचाराची दिनचर्या. तर रात्री जेवणासाठी एका खानावळीतून तीन ते चार डब्बे घेऊन मातीनं लेपलेल्या त्यांच्या घरी ते जातात.

ढगेंच्या प्रचारसभांमध्ये भेटणारे बहुतांश नागरिक थोरात आणि विखे कुटुंबाची जिल्ह्यात असलेल्या दहशतीबद्दल बोलतात, ढगेंनी आतापर्यंत केलेल्या कामाबद्दल आणि त्यांनी दाखवलेल्या 'हिंमतीबद्दल' त्यांचं कौतुक करतात, आणि आता परिवर्तनाची आवश्यकता असून त्याची वेळ जवळ आली असल्याची ग्वाही देतात.

"काहीही निर्णय लागला तरी मी माझ्या घरी आणि आजूबाजूला सांगितलं आहे की यावेळी आपलं मत दत्ताला. या दोघांनी इतकी वर्ष जिल्ह्यावर राज्य केलं. पण जिल्ह्यासाठी काही केलं नाही," ढगेंना भेटलेला एक गावकरी सांगतो.

तरीही हा लढा विजयासाठी लढत नसल्याचं ढगे सातत्यानं सांगतात. बहुजन समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि दलितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या कांशीराम यांचा एक मंत्र ते इथं सांगतात. "पहिली निवडणूक लढण्यासाठी असते, दुसरी निवडणूक पाडण्यासाठी असते आणि तिसरी निवडणूक जिंकण्यासाठी असते," असं कांशीराम म्हणाले होते.

एका अर्थानं ही ढगेंची पहिली निवडणूक असली तरी पराभव स्विकारण्यास ते तयार असून हा लढा मोठ्या काळासाठी सुरू राहणार असल्याचं ते सांगतात.