India

पुणे: अनेक वर्ष मतदान केलेल्या मतदारसंघात नाव गहाळ झाल्यानं मतदार त्रस्त

अनेक वर्ष पुण्यात मतदान करत असलेल्या पुणेकरांना सोमवारी त्यांचा मतदानाचा हक्क बजावता येणार नाही.

Credit : Indie Journal

 

पुणे । सोमवार १३ मे रोजी पुणे लोकसभेसाठी होणाऱ्या मतदानाच्या मतदार यादीत नाव नसल्यानं गेली अनेक वर्ष पुण्यात मतदान करत असलेल्या पुणेकरांना सोमवारी त्यांचा मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. हा राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेत्यांनी केला आहे. तर मतदार यादीत होणाऱ्या सुधारणांमुळे चुकून काहीवेळा नागरिकांचं नाव मतदार यादीतून वगळलं जातं, असं स्पष्टीकरण प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलं आहे. मात्र अनेक वर्ष एकाच ठिकाणी मतदान करणाऱ्या लोकांची नावं अचानक यादीतुन का वगळली जातात आणि असं होऊ नये यासाठी सरकार काही उपाययोजना करत का नाही, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. 

उमेश शेंडगे गेली अनेक वर्ष पुण्यात मतदान करत असून त्यांनी २०१९साली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींसाठीही त्यांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामुळे यावेळी मतदार यादीत नाव असण्याबाबत ते निश्चिंत होते. मात्र जेव्हा दोन दिवसांपुर्वी त्यांनी त्यांचं नाव मतदार यादीत तपासलं असता त्यांना त्यांचं नाव सापडलं नाही.

त्यांना वाटलं की त्यांच्याकडून कोणती चुक होतं आहे, म्हणून त्यांनी इतरांना मतदारयादीत त्यांचं नाव तपासण्यास सांगितलं. मात्र जेव्हा इतर बऱ्याच मतदारांना त्यांचं नाव मतदार यादीत सापडलं नाही, तेव्हा त्यांना धक्का बसला, "मी गेल्या वेळी पुणे महानगरपालिकेच्या १९नंबर शाळेत मतदान केलं होतं, यावेळीही मी मतदानाची तयारी करत होतो, काही दिवसांपूर्वी मी माझ्या मोबाईलवर मतदार यादीत माझं नाव तपासलं तरी मला ते सापडलं नाही. मी गेली अनेक वर्ष पुण्यात मतदान करत आहे. मी पुणे सोडून कुठे गेलो नाही, त्यामुळे माझं नाव इतर कोणत्याही यादीत असण्याचा प्रश्न नाही. तरीही माझं नाव पुण्याच्या यादीतून काढण्यात आलं." 

मतदान यादीत नाव नसल्यानं शेंडगे आणि इतर काही नागरिकांनी शुक्रवारी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची जाऊन भेट घेतली. दिवसे यांनी त्यांना त्यांची नाव पुणे छावणी बोर्डाच्या मतदार यादीत नाव तपासण्यास सांगितलं, त्यानंतर काही नागरिकांना त्यांचं नाव छावणी परिसरातील मतदार यादीत त्यांची नावं सापडली पण या यादीतही शेंडगेंचं नाव नव्हतं. 

 

हे देखील पहा

 

 

दिवसेंना मतदार यादीत काही पुणेकरांची नाव नसल्याबद्दल विचारलं असता मतदार यादीत वेळोवेळी सुधारणा होतं असतात आणि त्याबद्दल वेळोवेळी माहिती दिली जाते, असं उत्तर त्यांनी दिलं, "मतदार यादीत वेळोवेळी सुधारणा करून निवडणूक आयोगाकडून ती यादी प्रकाशित केली जाते, जर त्या यादीत एखाद्या नागरिकाला त्यांचं नाव सापडलं नाही किंवा त्याच्या मतदार यादीतील माहितीत काही तृटी आढळल्या तर ते त्याबद्दल तक्रार करू शकतात. जानेवारी महिन्यात पुणे लोकसभा मतदार संघासाठी यादी जाहिर झाली. त्यावेळी यादीतून एक लाख नावं कमी करण्यात आली होती. त्यानंतर १५ एप्रिलपर्यंत या यादीत सुधारणा करणं शक्य होतं."

जानेवारी महिन्यात पुणे लोकसभेसाठी पहिल्यांदा मतदार यादी जाहीर झाल्यानंतर माजी आमदार मोहन जोशी यांनी यादीतून एक लाख मतदारांची नावं काढण्यात आल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. "सरकार आणि निवडणूक आयोग यांनी घरोघरी जाऊन मतदार यादी तयार केली असं सांगितलं त्यासाठी अनेक सरकारी कर्मचारी आणि शिक्षक या सर्वांचा समावेश करून घेतला. मग एवढी मेहनत करून सुद्धा याद्या सदोष कशा आहेत? आम्ही त्यावेळी सुद्धा हरकत नोंदवली की ज्या भागात आमचं मतदान होतं त्या भागांतून काही मतदारांना हेतूपुर:सर वगळलं आहे." 

हा एक राजकीय षडयंत्राचा भाग आहे आणि सत्ताधारी पक्षाला फायदा पोहचावा म्हणून काँग्रेस पक्षाला मतदान करणाऱ्या भागातील मतदारांची नावं वगळण्यात आली असल्याचा आरोप जोशी करतात.

"निवडणूक आयोगानं २०१९पासून १२ वेळा मतदार यादी प्रकाशित करून राष्ट्रीय पक्षांना दिली आहे. २०२२पासून चार वेळा या याद्या प्रकाशित असून त्यानंतर प्रशासनाकडून शाळा, महाविद्यालयं, सहकारी गृहनिर्माण संस्था आणि इतर अनेक ठिकाणी बैठका घेऊन नागरिकांना या बदलांबाबत माहिती देण्यात आली होती," या बदलांबाबत राजकीय पक्ष आणि नागरिकांना जागृत करण्याचा प्रयत्न प्रशासनानं केला होता, असं दिवसे सांगतात.

"१५ एप्रिलपर्यंत पुण्याच्या मतदार यादीत बदल आणि नवी नोंदणी केली जात होती. काही नागरिकांनी त्यांची नावं नसल्याची तक्रार केली, त्यातील काही नागरिकांची नावं छावणी बोर्डातील मतदान केंद्रात हलविण्यात आली असल्याचं निदर्शनास आणून देण्यात आलं. तरीही काही नागरिकांची नावं नाहीत, असं दिसतं. तरी आम्ही १५ एप्रिल पर्यंत ७० टक्के नागरिकांचे प्रश्न सोडवले आहेत. पण मानवी चुकांमुळे असे काही प्रश्न समोर येत असतात," असंही दिवसे पुढं सांगतात. 

 

काही नागरिकांची नावं छावणी बोर्डाच्या मतदारकेंद्रात हलविण्यात आल्यानंही अनेकांना त्रास सहन करावा लागला होता.

 

काही नागरिकांची नावं छावणी बोर्डाच्या मतदारकेंद्रात हलविण्यात आल्यानंही अनेकांना त्रास सहन करावा लागला होता. तर अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची संख्या १४००च्या पूढं गेल्यानं मतदाऱ्यांच्या संख्येचं पुनर्गठन करण्यासाठी छावणी बोर्डातील मतदानकेंद्रात काही मतदारांची नावं हलविण्यात आली असल्याचं दिवसे सांगतात. 

काही नागरिकांना त्यांची नावं त्यांच्या मतदार केंद्राच्या यादीत न सापडल्यानंतर त्यांनी छावणी बोर्डातील मतदान केंद्रांवर त्यांची नावं तपासली होती, मात्र तरीही त्यांना त्यांची नावं त्या यादीतही सापडली नाहीत. केतन माने यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांची नावं कोणत्याही यादीत नसल्याचं ते सांगतात, "माझ्यासह माझ्या आई आणि वडीलांचं नाव यावेळीच्या मतदार यादीत नाहीत. गेल्यावेळी म्हणजे २०१९च्या मतदार यादीत आमच्या तिघांचीही नावं होती आणि आम्ही पर्वतीच्या धुमे शाळेत आम्ही मतदानाला गेलो होतो. गेल्या चार पाच दिवसांपासून मी निवडणूक आयोगाच्या अॅपवर माझं आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांचं नाव शोधण्याचा प्रयत्न करतोय पण मला आमचं कोणाचंही नाव सापडलं नाही."

सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी याप्रकारे नागरिकांची नावं अचानक मतदार यादीतून वगळल्या जाण्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं, "यातला मुळचा प्रश्न असा आहे की असलेलं नाव उडतं कसं? का नागरिकांनी दरवेळी त्यांचं नाव मतदार यादीत तपासायचं? जे नागरिक वर्षानुवर्ष एकाच जागी मतदान करत आले आहेत, त्यांचं नाव तिथून का गेलं याचा शोध प्रशासन घेणार आहे की नाही?"

"मतदार यादीत नाव नसल्याची जबाबदारी प्रत्येक वेळी नागरिकांवर ढकलून हे मोकळे होणार? गेल्या यादीत जर एखाद्या मतदाराचं नाव असेल तर ते यादीत ते का उडालं याचं त्यांनी संशोधन केलं पाहिजे आणि ज्यांनी कोणी हे उद्योग केलेत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. तुम्ही नागरिकांचा मुलभूत अधिकार हेरावून घेत आहात. कोणीतरी कधीतरी याचा लेखाजोखा केला पाहिजे, हे दरवेळेसचं नाटक आहे. दर सहा महिन्यांनी नागरिकांनी हेच पाहत बसायचं का?" असंही वेलणकर विचारतात.