India

पुणे: रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाचे भराव, बांधकाम पुराच्या पाण्यात वाया

पुण्यात २५ जूलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि खडकवासला धरण साखळीतून झालेल्या विसर्गामुळे पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.

Credit : राकेश नेवसे/इंडी जर्नल

 

पुण्यातील नदी सुधार प्रकल्पातंर्गत सुरू असलेल्या बांधकामाचा काही भाग मागील आठवड्यात मुसळधार पावसामुळं आलेल्या पुरामुळे फुटला, तसंच बांधकाम पुर्ण झालेल्या बागेतील मातीदेखील वाहून गेली. आता अशीच परिस्थिती दरवर्षी उद्भवत राहील, असा इशारा शहरातील पर्यावरणवाद्यांनी दिला आहे. मात्र महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी सुरु असून, दरवेळी हा प्रश्न उद्भवणार नाही, असं आश्वासन दिलं आहे.

पुण्यात गेल्या आठवड्यात गुरुवारी (२५ जूलै) झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि खडकवासला धरण साखळीतून झालेल्या विसर्गामुळे पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पुण्यातील काही सखल भागांमध्ये पाणी भरलं होतं. कामगार वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी त्यांना वेळेवर चेतावणी न देण्यात आल्याचा आरोपही केला. त्यानंतर अनेक तज्ञ आणि विविध विरोधी पक्षांनी पुण्यात निर्माण झालेल्या पुरस्थितीसाठी पुण्याच्या नदी सुधार प्रकल्पाला जबाबदार धरलं. त्याचवेळी या वाढलेल्या पाण्यामुळे नदी सुधार प्रकल्पालाही काही ठिकाणी हानी पोहोचली.

या संदर्भात इंडी जर्नलनं नदी सुधार प्रकल्पाचं बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी भेट दिली. जिथं ओढे नदीत मिळतात, अशा दोन ठिकाणावर टाकलेला मुरुम पाण्याच्या दबावामुळे वाहून गेला होता. तर बांधकाम पुर्ण झालेल्या प्रायोगिक टप्प्यात काही ठिकाणच्या बागेतील माती वाहून गेली असल्याचं दिसलं. शहरी पूर तज्ञ सारंग यादवाडकर यांनी याची पुष्टी दिली, शिवाय या प्रकारच्या प्रकल्पांमुळे शक्य धोक्याबद्दलही सांगितलं.

 

बंड गार्डन पुलाजवळ नदी सुधार प्रकल्पाची वाहून आलेली माती. सर्व फोटो: राकेश नेवसे

 

"या प्रकल्पामुळे नदीची गाळ वाहण्याची क्षमता कमी होईल. शिवाय या प्रकल्पासाठी वापरण्यात आलेल्या मातीमुळे नदीत पडणाऱ्या गाळाच्या प्रमाणात वाढ होईल. पर्यायानं नदी अधिक उथळ होईल. मुळा-मुठा पुढं भीमा नदीला जाऊन मिळत असल्यानं पुढं काही वर्षांनी उजनी धरणातही गाळ वाढल्यानं त्या धरणाची क्षमतादेखील कमी होईल," यादवाडकर सांगतात. पुणे बचाव मोहीम या संस्थेनं नदी सुधार प्रकल्पाचं काम तात्पुरतं स्थगित करण्यात यावं, अशी मागणी केली आहे.

पुणे महानगरपालिकेत उपअभियंता असलेले सुरेंद्र करपे यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार [नदी सुधार प्रकल्पाचं] झालेलं नुकसान मोठं नाही. "बांधकाम पूर्ण झालेल्या बाजूला कोणतीही हानी झाली नाही. तिथं काही ठिकाणी फक्त बागेतील माती वाहून गेली आहे. ती माती वाहून जाऊ नये म्हणून बागेत गवत आणि झाडं लावली आहेत. जिथं गवत लावलं नव्हतं, किंवा लावून जास्त काळ झाला नव्हता, तिथंच काही प्रमाणात माती वाहून गेली. अन्यथा मातीदेखील वाहून गेली नसती," करपे सांगतात.

या संदर्भात संबंधित बांधकाम कंपनीला अहवाल सादर करायला लावला असून तो अहवाल एका आठवड्यात तयार होईल, असंही ते सांगतात. त्यानंतरच नुकसानाचं पुर्ण स्वरूप स्पष्ट होईल.

 

कोरेगाव पार्कची मागची बाजू.

 

"आता दरवर्षी नदीत पाणी सोडल्यानंतर नदी सुधार प्रकल्पावरील माती वाहून जाईल आणि दरवर्षी ती माती पुन्हा टाकण्यासाठी पुन्हा पुणेकरांचे पैसे जातील," अशी शक्यता यादवाडकर व्यक्त करतात. हा पुणेकरांच्या गळ्यात पडलेला आणखी एक खर्च आहे, असंही ते म्हणाले. करपेंनी मात्र ही शक्यता नाकारली.

"प्रकल्पासाठी जास्त करुन मुरुमाचा आणि दगडाचा वापर केला आहे. त्यांना पावसाच्या पाण्यानं जास्त काही फरक पडणार नाही, ज्या ठिकाणी माती वाहून गेली आहे, बांधकाम सुरु असल्यामुळे तिथं गवत वेळेत लावता आलं नाही, नाहीतर ती मातीही वाहून नसती गेली," करपे नोंदवतात.

२५ जूलैला पुण्यातील खडकवासला धरण साखळीतून ५५,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. पाण्याचा प्रवाह यापेक्षा जास्त असल्यास त्याचा नदी सुधार प्रकल्पावर काही परिणाम होईल का असा प्रश्न केला असता करपेंनी ती शक्यतादेखील नाकारली. नदी सुधार प्रकल्पात २ लाख क्युसेक पाणी वाहून नेण्याची क्षमता आहे, असं ते नोंदवतात.

 

सलीम अली पक्षी अभयारण्याजवळ.

 

नदी सुधार प्रकल्पामुळे पुण्यात अनेक ठिकाणी मुळा-मुठा नदीचं पात्र अरुंद झालं आहे. काही ठिकाणी नदीपात्राची रुंदी ३० टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. उदाहरणार्थ पुण्यातील बंडगार्डन भागात नदीच्या पात्राची २०१९ सालची रुंदी २१० मीटर होती. आता २०२४ मध्ये ती फक्त १४७ मीटर राहिली आहे. काही जाणकारांच्या मते यापूर्वी नदीपात्रात १ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला तरी शहरात पुरस्थिती उत्पन्न होत नव्हती. मात्र यावेळी निम्म्या क्षमतेच्या उत्सर्गानं पुण्यात पुर आणला, असं जाणकार नोंदवतात.

पुण्यातील नद्यांमध्ये आधीच वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी अनेक बांधकामं झाली आहेत. त्या प्रकल्पांमुळे नदीच्या पाण्याची पातळी दोन ते अडीच फुटांनी वाढली आहे. त्यात नदीपात्रात झालेली अतिक्रमणं, रस्ते आणि मेट्रोच्या खाबांचाही समावेश होतो. नदी सुधार प्रकल्पाच्या अहवालानुसार या प्रकल्प पुर्ण झाल्यानंतर नदीच्या पाण्याच्या पातळीत किमान पाच फुटांची वाढ होईल. यामुळं सुरुवातीपासूनच तज्ञांनी आणि पर्यावरणवाद्यांनी दिलेल्या चेतावणीनुसार भविष्यात पुण्यातील पूरस्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुळा आणि मुठा या दोन नद्यांच्या काठांवर वसलेले आहेत. पुढं पुण्यातील संगमेश्वर मध्ये या दोन्ही नद्यांचा संगम होतो आणि मुळामुठा नदी जन्म घेते. या तिन्ही नद्यांच्या महानगरपालिका हद्दीत काठांवर म्हणजेच साधारणपणे ४४ किलोमीटर अंतरावर सिंमेटीकरण करुन तिथं पर्यटनासाठी आणि उद्योगांसाठी घाट तयार करण्याचा विचार या नदी सुधार प्रकल्पांतर्गत दोन्ही महानगर पालिकांचा आहे. याबद्दलची संकल्पना पहिल्यांदा २०१५-१६ मध्ये मांडली गेली होती. मात्र पर्यावरणवादी आणि तज्ञांनी या प्रकल्पाला आधीपासून विरोध केला आहे.