India
पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म ६ ची न थांबणारी घुसमट
प्रशासन मुंबईच्या एल्फिन्स्टनला झालेल्या चेंगराचेंगरीची पुनरावृत्ती होण्याची वाट पाहतंय का?
दररोज एक लाख प्रवासी आणि २८० हुन अधिक रेल्वे गाड्यांची ये जा असणाऱ्या पुण्याच्या रेल्वे स्थानकावर सहा प्लॅटफॉर्म आणि त्यांना जोडण्यासाठी असलेल्या फक्त दोन पादचारी पूलांमुळं स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सहाला जाणाऱ्या जिन्यावर आणि पादचारी पुलावर अनेकदा प्रचंड गर्दी होत आहे. त्यात हा पादचारी पूल तसंच प्लॅटफॉर्म अरुंद असल्यानं घाईच्या वेळी चेंगराचेंगरी होण्याची भीती नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी व्यक्त केली आहे. मात्र रेल्वे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे रेल्वेला या परिस्थितीबद्दल माहिती आहे आणि त्यावर उपाययोजना केली जाईल.
पुणे स्थानकावर एकूण तीन पादचारी पूल आहेत. त्यातील जुना पूल २०१७ साली बंद करण्यात आला आणि त्याच्या शेजारी एक १२ मीटर रुंदीचा नवा पूल बांधण्यात आला. मात्र जुन्या पूलाला दोन्ही बाजूला खाली उतरण्याची सोय असल्यामुळं आणि मुंबईच्या दिशेला अजून एक पूल असल्यामुळं घाईच्या वेळी होणारी गर्दी तशी भीतीदायक नव्हती.
मात्र नव्यानं बांधण्यात आलेल्या पूलावरून फक्त एकाच बाजुनं उतरण्याची सोय असून या पूलावरून प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर उतरण्यासाठी जिना नाही. त्यामुळं प्रवाश्यांना या मुख्य पूलावरून खाली उतरण्यासाठी मुंबईच्या टोकाला असलेल्या पूलाला किंवा सोलापूर टोकाला असलेल्या जुन्या बंद पूलाला जोडणाऱ्या छोट्या पूलांचा वापर करावा लागतो. यामुळं प्रवाश्यांना एका प्लाॅटफाॅर्मवरून दुसऱ्या प्लाॅटफाॅर्मवर जाताना गर्दीला सामोरं जावं लागतं.
याबद्दल बोलताना पुणे विभागाच्या विभागीय प्रबंधक इंदु राणी दुबे यांनी मात्र प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर अशी कोणत्याही प्रकारची अडचण होत नसल्याचं म्हटलं आहे. "प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर चढण्या-उतरण्यासाठी इतर प्लॅटफॉर्म प्रमाणे २ मार्ग आहेत. यावर लागणाऱ्या गाड्यांचा प्रवास एकतर सुरू होत असतो किंवा संपत असतो. स्थानाकातून बाहेर जाण्यासाठी या प्लॅटफाॅर्मवरून दोन्हीकडे मार्ग आहेत. त्यामूळं गर्दी होण्याचा प्रश्न निर्माण होतं नाही," असं त्या म्हणाल्या.
मनोज दररोज उरुळी कांचन ते पुणे असा प्रवास करतो. उरुळीच्या रेल्वे स्थानाकावरून ८ वाजताच्या शटलनं तो पुणे स्थानकावर नऊ-पावणे नऊच्या दरम्यान पुणे स्थानकावर पोहचतो. तिथून त्याला आंबेडकर पुतळ्यापासून ऑफिसकडं जाणारी बस पकडायची असते. त्यामूळं तो बऱ्याच घाईत असतो. मात्र गाडी जर प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर लागली तर उशीर होणार हे नक्की असतं, असं तो सांगतो.
"माझ्याबरोबर गाडीनं प्रवास करणारी बहुतेक लोकंही दौंड ते लोणी काळभोरच्या भागातून कामासाठी दररोज रेल्वेनं प्रवास करणारे सर्वसामान्य आहेत. यात काही विद्यार्थीसुद्धा असतात. सर्वांनाच कुठं नं कुठं पोहचण्याची घाई असते. त्यामूळं रेल्वे प्लॅटफॉर्मवर लागायच्या आधीच लोकांची उतरण्याची घाई असते. त्यामूळं गाडी कोणत्याही प्लॅटफॉर्मवर लागली तरी गर्दी होतेच. मात्र जर गाडी सहा नंबरवर लागली तर गर्दी जरा जास्त होते," मनोज सांगतो.
सहा क्रमांकाचा पूल अरुंद असल्याचं दुबे यांनी मान्य केलं. मात्र सहा क्रमांकाचा प्लॅटफॉर्म मुळात अरुंद असल्यानं त्याच्या जिन्यांची रुंदी वाढवली जाऊ शकत नसल्याचं ही त्या म्हणाल्या. तसंच जुन्या पूलाची दुरुस्ती करून लवकरच तो प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू केला जाणार असल्याचंही आश्वासनही त्यांनी दिलं आहे.
"मी कधी कधी गाडी असेल तसं प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर फळांचा स्टॉल लावते. गाडी लागली की इथं जिन्यासमोर बऱ्याच वेळा चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या लोकांची गर्दी होते. नव्या लोकांना जुन्या पुलाबद्दल माहीत नाही. काही लोकं पूल बंद आहे पाहून पुन्हा खाली उतराय लागतात, त्यामूळं गर्दी वाढते. मात्र सुदैवानं इथं अजून कोणता अपघात घडला नाही," पुणे स्थानकावर फळांची विक्री करणाऱ्या रोहिणी ताई सांगतात.
पुणे रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शाह या परिस्थितीला पुणे रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार जवाबदार असल्याचं म्हणतात. "बऱ्याच वेळा एखाद्या प्लाॅटफाॅर्मवर एक ट्रेन आली असताना दुसरी ट्रेन लागणार असल्याची आणि तिसरी ट्रेन सुटणार असल्याची घोषणा केली जाते. त्यामूळं त्या प्लाॅटफाॅर्मवर एकाच वेळी दोन-तीन गाड्यांसाठीची गर्दी जमा होते. यातून एकाच वेळी खाली उतरणाऱ्या आणि वर चढणाऱ्या प्रवाश्यांची घाई पादचारी पुलाच्या जिन्यावर होते," शाह म्हणतात.
"त्यातही सहा क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर मुंबई टोकाकडचा जिना अरुंद आहे. त्यावर एकावेळी सहापेक्षा जास्त प्रवासी एकावेळी जाऊ शकत नाहीत. त्यामूळं जिन्यासमोर गर्दी होऊन प्रवासी घाईमुळं धक्काबुक्की करायला सुरुवात करतात," शाह पुढं सांगतात.
याबद्दल अनेक वेळा रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्लॅटफॉर्म क्रमांक सहाची रुंदी वाढवण्याची मागणी केल्याचं रेल्वे प्रवाशी ग्रुपच्या हर्षा शाह यांनी सांगितलं. मात्र प्लॅटफॉर्म क्रमांक सहाच्या भिंतीबरोबर रेल्वे स्थानाकाची हद्द संपत असल्यानं त्याचा विस्तार होऊ शकत नसल्याचं दुबे म्हणाल्या.
पुणे रेल्वे स्थानाकाची सध्याची इमारत १९२५ साली बांधून पूर्ण झाली. त्यावेळी या स्थानकावर सहा प्लॅटफॉर्म बांधण्यात आले होते, तर पहिल्या प्लॅटफॉर्मच्या सोलापूरच्या टोकाला सातवा प्लॅटफॉर्म म्हणलं जातं. या एक ते सहा प्लॅटफॉर्मला जोडण्यासाठी त्याकाळी ब्रिटिशांनी एक पादचारी पूल बनवला.
या पूलाला दोन्ही बाजूंनी चढण्या-उतरण्याची सोय होती. एका बाजुनं जिना होता तर दुसऱ्या बाजुनं वयोवृद्ध आणि अपंग व्यक्तींना येण्या जाण्यासाठी रॅम्प तयार करण्यात आला होता. त्यानंतर वाढती गर्दी लक्षात घेत मुंबईच्या टोकाला अजून एक नवीन पूल बांधण्यात आला.
त्यानंतर जुन्या पुलामध्ये संरचनात्मक दोष निर्माण झाल्यामुळं पुणे रेल्वे प्रशासनाकडून जुना पुलाच्या बाजूला एक नवीन पूल बांधण्याचं ठरवलं. हा नवा पूल १२ मीटर रुंदीचा असून त्याचं उद्घाटन झाल्यानंतर जुना ब्रिटिशकालीन पूल बंद करण्यात आला. नव्या पूलावरून प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर उतरण्याची सोय नाही. त्यामूळं प्रशासनानं नव्या पूलाला मुंबईच्या टोकाला असणाऱ्या पुलाला आणि सोलापूरच्या बाजूला असणाऱ्या बंद पुलाला जोडलं आहे.
मात्र जुना पूल इतर सर्व ठिकाणी बंद असल्यामुळं अनेकदा प्रवाशांकडून या पूलाचा वापर होतं नाही. त्यामूळं सर्व गर्दी मुंबईच्या टोकाला असणाऱ्या पुलावर जमा होते. तिथून प्रवासी स्थानकातून बाहेर पडण्यासाठी नव्या पूलाकडं किंवा दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर उतरण्यासाठी घाई करताना दिसतात. शिवाय या पूलाचा जिना अरुंद आहे. त्यामूळं तिथं प्रचंड गर्दी होते. बऱ्याच वेळा प्रवाशी एकमेकांना धक्काबुक्की करताना ही दिसतात.
प्लॅटफॉर्म सहावर स्टॉलवर काम करणारा राजेंद्र चार दिवसांपूर्वीच पुण्यात आला आहे. प्लॅटफॉर्म अरुंद असल्यामुळं होणारी गर्दी त्यानं एवढ्या चार दिवसात पाहिली. "हा प्लॅटफॉर्म तसा इतका अरुंद नाही पण इथं असलेल्या खांबांमुळं लोकांना चालण्यासाठी जास्त जागा राहत नाही. ते बऱ्याच वेळा एकमेकांना धक्का देत चालतात. जर येणारी जाणारी लोकं एकत्र आली तर जरा जास्त गर्दी होते," राजेंद्र सांगतो.
तिन्ही पूलांचे खांब आणि प्रवाशांना उभं सावलीसाठी केलेल्या आडोशाचे खांब प्लॅटफॉर्म क्रमांक सहाची निम्माहून जास्त जागा व्यापतात. त्यामूळं जास्त गर्दी असणाऱ्या जागीच येण्या जाण्यासाठी पुरेशी जागा शिल्लक राहत नाही.
वाडिया कॉलेजमध्ये शिकणारा स्वप्नील गायकवाड यानं गर्दी टाळण्यासाठी वेगळा मार्ग अवलंबला आहे. तो सकाळच्या डेमु गाडीत बसताना मुद्दाम शेवटच्या डब्यात बसतो. जेणे करून त्याला मागच्या माग उतरून जुन्या पूलाचा वापर करता येईल.
"मी लोणीमध्ये सकाळच्या डेमु गाडीनं कॉलेजला येतो. पहिल्यांदा मी जागा मिळावी म्हणून पुढच्या किंवा मधल्या डब्यात बसायचो. पण गाडी सहा नंबरला लागली की मला भरपूर गर्दीत मला माघारी यावं लागायचं. घाई करणाऱ्या लोकांचा धक्का मला लागायचा. त्यामूळं मग मी आता शेवटच्या डब्यात बसतो आणि तिकडून मागच्या माग कॉलेजला जातो," स्वप्नील सांगतो.
रेल्वे अधिकाऱ्यांनी असा कोणता प्रश्न उद्भवतच नसल्याचं सांगितलं असलं तरी रेल्वेच्या दुसऱ्या एका अधिकाऱ्यांनी मात्र नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर याबद्दल वेगळीच माहिती दिली. कोणतीही गाडी उपलब्ध असलेल्या प्लाॅटफाॅर्मवर उभी केली जाते. कोणत्याही ठिकाणी काही अपप्रकार घडू नये म्हणून रेल्वे पोलिस आणि इतरांना जागोजागी तैनात केलं जातं असं एक रेल्वे अधिकारी म्हणले.
त्यांनी दिलेल्या माहितीला प्लाॅटफाॅर्म क्रमांक सहावर तैनात असलेल्या रेल्वे पोलिस हवालदार यांनी दुजोरा दिला. नाव न लिहिण्याच्या अटीवर बोलताना ते म्हणाले, "प्लाॅटफाॅर्म क्रमांक सहावर सर्व प्रकारच्या गाड्या लागतात. यात लोकल, डेमु, इंटरसिटी आणि एक्सप्रेस अशा सर्व प्रकारच्या गाड्या असतात. जास्त करून गर्दी इंद्रायणी सारख्या इंटरसिटी आणि लोकल गाड्यांच्या वेळी होते. काही वेळेस धक्काबुककीही झाली आहे. मात्र, रेल्वे पोलिस इथं कायम तैनात असते."
मुंबईत २९ सप्टेंबर, २०१७ रोजी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास एल्फिन्स्टन-परेलला जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी झाली होती. पूल पडत असल्याची आणि शॉर्ट सर्किट झाल्याची अफवा पसरल्यानंतर पादचारी पुलावरील चेंगराचेंगरीमध्ये किमान २३ जण ठार, तर ३९ जण जखमी झाले होते. याप्रकरची घटना होण्यामागे गर्दी आणि अरुंद पूल अशा दोन्ही बाबी जवाबदार होत्या. अशा प्रकारची घटना पुणे रेल्वे स्थानकावर घडू नये म्हणून प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेण्याची गरज असल्याच रेल्वे प्रवाशांचं म्हणण आहे.