India

कल्याणीनगर प्रकरणावर नागरिक आणि विरोधी पक्षांचा आक्रोश

भरधाव वेगानं गाडी चालवून दोघांचा बळी घेणाऱ्या आरोपीला अटक झाल्याच्या फक्त १५ तासांच्या आत जामीन मिळाला.

Credit : इंडी जर्नल

 

रविवारी पहाटे पुण्याच्या कल्याणीनगर भागात भरधाव वेगानं गाडी चालवून दोघांचा बळी घेणाऱ्या आरोपीला अटक झाल्याच्या फक्त १५ तासांच्या आत जामीन मिळाला. याविरोधात कसबा पेठ आमदार रवींद्र धंगेकर आणि पुण्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी येरवडा पोलीस स्थानकात आज आंदोलन केलं. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा १७-वर्षीय मुलगा यांचा मुलगा वेदांत अग्रवाल याच्यावर दारू पिऊन विनापरवाना भरधाव वेगानं गाडी चालवण्याचा आरोप आहे. रविवारी पहाटे त्यानं २ दुचाकीस्वारांना ठोकल्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र त्याला लगोलग मिळालेला जामीन पाहता पुण्यातील लोकांनी आणि काँग्रेस नेत्यांनी पोलीसांवर आरोपीला विशेष वागणूक मिळाल्याचा आणि कमी तीव्रतेची कलमं लावून त्याचा बचाव करण्याचा आरोप केला आहे.

रविवारी पहाटे अडीच ते साडेतीनच्या सुमारास पुण्याच्या कल्याणीनगर भागात एक मोठा अपघात झाला. या अपघातात प्रचंड वेगानं आलेल्या एका महागड्या गाडीनं रस्त्यावर चालत असलेल्या दुचाकी गाडीला मागून धडक दिली. त्या धडकेमुळे एका दुचाकीवर स्वार असलेल्या अनीष अवधिया आणि अश्विनी कोष्ठा यांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अभियंते म्हणून काम करत होते.

अपघातानंतर काही वेळातच येरवडा पोलीसांनी तिथं येऊन आरोपीला अटक केली. मात्र आरोपी एका श्रीमंत आणि महत्त्वाच्या माणसाचा मुलगा असल्यानं त्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप येरवडा पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे. शिवाय त्याला पोलीस स्थानकात विशेष वागणूक दिल्याचंही म्हटलं जात आहे.

 

 

"या अपघाताचा आळ त्या मुलावर येऊ नये म्हणून पोलीस स्थानकात रात्री कोटींचा व्यवहार झाला आहे. या गुन्ह्यात ज्या प्रकारची कलमं लावली गेली पाहिजे होती, त्या प्रकारची कलमं लावली गेली नाहीत. खरंतर त्याच्यावर गंभीर स्वरुपाची कलमं लावून त्याला बालसुधारगृहात टाकायला पाहिजे होतं. पण साधी कलमं लावल्यामुळे आरोपीला लगेच जामीन मिळाला, या सगळ्यासाठी रात्री काही राजकारण्यांनी, पोलीसांनी आणि वकीलांनी येऊन मांडवली केली आहे. अशाप्रकारे कायदा व्यवस्थेची चेष्टा करणाऱ्या पोलीसांवर त्वरीत कारवाई पाहिजे," धंगेकर म्हणाले.

वेदांत पोलीस स्थानकात असताना त्याला पिझ्झा आणि बर्गर खाऊ घालण्यात आला, असा आरोपही त्यांनी पोलीसांवर केला.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सदर आरोपांची चौकशी करून गरज पडल्यास संपुर्ण पोलीस स्थानकावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. 

दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार वेदांतवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३४ ए, ३३७, २७९, ३३७, ३३८ आणि महाराष्ट्र मोटार वाहन नियमाच्या काही कलमांनुसार खटला दाखल करण्यात आला. त्यानंतर वेदांतला पुण्याच्या सत्र न्यायालयात सुट्टीच्या विशेष न्यायालयात सादर करण्यात आलं. त्यानंतर त्याला तत्काळ जामीन मंजूर झाला.

जामीन मंजूर करताना न्यायालयानं त्याच्यावर काही 'जाचक' अटी लादल्या असून त्यानुसार त्याला अपघातांवर निबंध लिहिण्यास सांगितलं आहे, शिवाय येरवडा पोलीसांसोबत १५ दिवस वाहतुक व्यवस्थापनाचं काम करण्याचा आणि दारूचं व्यसन सोडवण्यासाठी मानसशास्त्रीय समुपदेशन घेण्याचा सल्ला दिला आहे.

 

 

पोलीसांनी वेदांतचे वडील आणि त्याला दारू देणाऱ्या पबवरही गुन्हा दाखल केला आहे. शहरातील विविध सामाजिक आणि राजकीय व्यक्तीमत्त्वांनी त्यानंतर पोलीस प्रशासनाची भेट घेतली असून पबवर निर्बंध लादण्याची मागणी केली आहे. कल्याणीनगरच्या रहिवाशांनी सातत्यानं पब आणि त्यामुळे होणारा गोंधळ आणि त्रास याबद्दल महानगरपालिका प्रशासनाकडे तक्रार केली आहे. मात्र प्रशासनाकडून फक्त नाममात्र कारवाई करण्यात येते.

ही पब संस्कृती पुण्याच्या संस्कृतीच्या विरोधात आहे आणि हे पब पुर्णपणे बंद केले पाहिजेत अशी मागणी आंदोलनात सहभागी असलेले माजी आमदार मोहन जोशी यांनी केली, तर हे प्रकरण दाबण्यासाठी राजकीय दबाव आणला जात असल्याचंही ते म्हणाले. यामुळे पुण्यातील कायदाव्यवस्था बिघडली असल्याचा आरोप त्यांनी केला.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मात्र हे प्रकरण दाबण्यासाठी त्यांच्यावर किंवा त्यांच्या पोलीस दलावर कोणत्याही प्रकारचा दबाव नसल्याचं म्हटलं. त्यांच्या पोलीस दलाकडून आरोपीचा ताबा मिळवण्यासाठी पुर्ण प्रयत्न केले होते आणि आता या जामीनाविरोधात ते उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. येरवडा पोलीस स्थानकात आरोपीला विशेष वागणूक दिली गेल्याच्या आरोपांची चौकशी करणार असून गरज पडल्यास ते संपुर्ण पोलीस स्थानकावर कारवाई केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं.