India

पुण्यातील कुष्ठरोगग्रस्तांची समाजानंतर व्यवस्थेकडूनदेखील उपेक्षाच

पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापनाची अनुपलब्धता, असे अनेक प्रश्न अंतुलेनगरच्या रहिवाशांसमोर आहेत.

Credit : इंडी जर्नल

 

कुष्ठरोगातून बरं झाल्यानंतरही पूर्वग्रहांमुळे समाजात अवहेलना सहन करावी लागणाऱ्या पुण्याच्या कुष्ठरोग वसाहतीतील नागरिकांच्या हाती महानगरपालिकेच्या व्यवस्थापनाकडूनही उपेक्षाच लागत आहे. कुष्ठरोगाबद्दल असलेल्या गैरसमजामुळे गावाच्या बाहेर आलेल्या या रोग्यांना मूलभूत नागरी सुविधादेखील उपलब्ध होत नसून महानगरपालिकेनं वेळेत कारवाई न केल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा कुष्ठरोग्यांची वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंतुलेनगरच्या नागरिकांनी दिला आहे.

जवळपास ३५० कुटुंब असलेल्या या वसाहतीत सतत विनवणी केल्यानंतरही पुरेसा पाणी पुरवठा होत नाही, शिवाय वसाहतीमध्ये कचरा गोळा करणारी घंटा गाडी येत नसल्यानं पाण्याचा एकमेव स्रोत असलेल्या विहिरीजवळ कचऱ्याचा ढीग जमा झाला आहे. वस्तीतील खराब रस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्रांचा अभाव आणि इतर अनेक प्रश्न रहिवाशांना सतावत आहेत. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र याबद्दल माहिती नसल्याचं म्हटलं आहे.

पुणे शहराच्या दक्षिणेला असलेल्या कोंढव्यात डॉ बंदोरावाला शासकीय कुष्ठरोग रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या मागच्या बाजूला याच रुग्णालयात उपचार घेऊन बऱ्या झालेल्या कुष्ठरोगग्रस्तांची वसाहत आहे. सुमारे ५० वर्षांपूर्वी उपचार पूर्ण होऊनही घरी न परतू शकणाऱ्या रुग्णांनी इथं राहायला सुरुवात केली होती. आता हा भाग पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आला आहे. त्याआधी तो पिसोळी गावाच्या ग्रामपंचायतीत होता. या ग्रामपंचायतीचे सदस्य राहिलेले पन्नालाल निकम स्वतः कुष्ठरोगातुन बरे झाले आहेत.

"एखाद्या व्यक्तीला कुष्ठरोग झाला हे कळलं की त्याच्याकडे विचित्र नजरेनं पाहिलं जायचं, तो उपचारासाठी कुठे बाहेर जायचा. बरा व्हायचा पण त्याला घरात पुन्हा स्थान नव्हतं. त्या व्यक्तीमुळे घरातील इतर कोणाला हा आजार होईल अशी भीती तर होतीच. पण आपल्या घरात कुष्ठरोगी आहे हे कळल्यावर आपल्या घरात बहिणी, मुलांची लग्न होणार नाही ही चिंता कुटुंबासह त्या रोग्यालाही असायची. त्यामुळे बऱ्याच वेळा उपचार घेऊन बरी झालेली व्यक्ती पुन्हा घरी जात नव्हती. साधारणपणे ५० वर्षांपूर्वी या रुग्णालयातून बाहेर पडलेल्या लोकांनी परत घरी जाण्याऐवजी इथंच राहण्याचा निर्णय घेतला. तेव्हा ही वस्ती तयार झाली," निकम सांगतात.

 

पुणे महानगरपालिकेचा भाग झाल्यानंतर अंतुलेनगरची होणारी अवहेलना कमी होईल अशी अपेक्षा असताना घडलं मात्र त्याच्या उलट.

 

"पुढं इथं राहणाऱ्या रोगग्रस्तांना कायमची जागा मिळावी म्हणून महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री ए आर अंतुले यांना आमच्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यावेळी त्यांनी आम्ही राहत असलेल्या रुग्णालयामागच्या वनविभागाच्या जागेवर राहण्याची परवानगी दिली. त्यामुळे या वस्तीला अंतुलेनगर नाव देण्यात आलं," निकम पुढं सांगतात.

पुढं पिसोळी ग्रामपंचायत इतर २३ गावांबरोबर पुणे महानगरपालिकेचा भाग झाली. पुणे महानगरपालिकेचा भाग झाल्यानंतर अंतुलेनगरची होणारी अवहेलना कमी होईल अशी अपेक्षा असताना घडलं मात्र त्याच्या अगदी उलट. 

वस्तीत पाणी प्रश्न पूर्वीपासूनच होता. ग्रामपंचायत असताना निदान कचरा तरी वेळेवर उचलला जात होता. मात्र महानगरपालिकेचा भाग झाल्यानंतर वस्तीत कचरा नेणारी गाडी येत नसल्याचं वस्तीत रास्त धान्याचं दुकान चालवणारे अरुण नितनवरे सांगतात.

ते सांगतात, "वस्तीत पाणी प्रश्न पहिल्या पासून आहे. महानगरपालिकेचा भाग होण्यापूर्वी आम्ही सायकलवर दोन पाण्याचे कॅन्स बांधून ३ किलोमीटर वरून पाणी घेऊन यायचो. गाव महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर वस्तीत पाण्याचे नळ आले, पण कचरा उचलून नेणारी घंटागाडी मात्र बंद झाली. आधी ग्रामपंचायत कचरा उचलून नेत होती."

वस्तीला अर्ध्या इंचाची पाईप लाईन देण्यात आली असून त्यातून पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याचं नितनवरे म्हणाले. महानगरपालिकेनं दिलेल्या नळाला पुरेशा दबावानं पाणी येत नाही. शिवाय दोन दिवसात एकदा येणार पाणी एका तासात बंद केलं जात, त्यामुळे एका कुटुंबाला दोन दिवसाआड ८० लिटर पाणीदेखील मिळत नाही. सरकारी आकडेवारीनुसार एका व्यक्तीला दिवसाला १३५ लिटर पाणी लागतं. त्यामुळे महानगरपालिकेकडून मिळणाऱ्या पाण्यात एका व्यक्तीची दिवसाची गरजही भागत नाही. याविषयी चौकशी केली असता पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर आजारी असल्यामुळे या विषयावर बोलू शकले नाही.

 

 

अंतुलेनगरच्या रहिवासी जनाबाई कुंभार यांच्या कुटुंबात ५ सदस्य आहेत. मात्र महानगरपालिकेच्या नळातून त्यांना फक्त तीन ते चार कॅन्स पाणी मिळतं. बाकीचं पाणी त्यांना वाहून आणावं लागतं. महानगरपालिकेच्या नळांना जास्त दाबानं आणि जास्त वेळासाठी पाणी सोडण्यात यावं अशी मागणी त्या करतात.

वस्तीच्या जवळ एक मोठी विहीर आहे. मात्र त्या विहिरीचं पाणी पिण्यालायक नसून ती विहीर उन्हाळ्यापर्यंत पूर्णपणे आटते, नितनवरे सांगतात. शिवाय कचरा नेणारी घंटागाडी येत नसल्यानं लोकांना त्यांचा कचरा विहिरीच्या बाजूला टाकत आहे. त्यातून विहिरीचं पाणी प्रदूषित होण्याची भीती आहे. मुख्य वाहिनीपासून वस्तीला पाणी पुरवठा करणारी झडप पुरेशी खोलली जात नसल्यानं वस्तीत पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.

झडप उघड बंद करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अनेकदा पाणी वाटपात भ्रष्टाचार करण्याचे आरोप झाले आहेत. त्यामुळे महानगरपालिका जुन्या झडपा काढून नव्या स्वयंमचलित झडपा बसवत आहे. मात्र वस्तीत कमी पाणी पुरवठा होण्यामागे भ्रष्टाचारासोबत कुष्ठरोगाबद्दलचा पुर्वग्रहदेखील जबाबदार आहे, असा आरोप वस्तीतील नागरिक करतात.

वस्तीतील लोकांना पाण्यासह कचऱ्याच्या समस्येनं भेडसावलं आहे. वस्ती ग्रामपंचायतीचा भाग असताना किमान कचरा वेळेवर उचलला जात होता. मात्र महानगरपालिकेच्या घंटागाड्या आता वस्तीत फिरकत नाहीत. २ ऑक्टोबर रोजी भारत सरकारकडून चालवण्यात आलेल्या स्वच्छ भारत मिशनपुरती घंटागाडी वस्तीत आली होती, मात्र त्यानंतर सातत्यानं पाठपुरवठा करुनही घंटागाडी वस्तीत फिरकली नसल्याचं नितनवरे सांगतात.

 

 

याबद्दल इंडी जर्नलनं पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांच्याकडे विचारणा केली असता याबद्दल त्यांना माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलं तसंच याबद्दल चौकशी करण्याचं आश्वासन दिलं.

याशिवाय वस्तीत सुमारे ४०० ते ४५० कुष्ठरोगाचा उपचार घेतलेले रुग्ण सध्या राहत आहेत. त्यातील ९० रुग्णांना आताही नियमित मलमपट्टीची गरज आहे. त्यांच्यावर मलमपट्टी करण्याचं काम रमेश नंदनवार करतात. त्यांच्या पायाला जखम असल्यामुळे त्यांना स्वतःलाही नियमित मलमपट्टी करावी लागते. सध्या मलमपट्टीच्या साहित्यासाठीही त्यांना समाजसेवी संस्थांकडे हात जोडावे लागत आहेत. ते वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ नाहीत, त्यांना केवळ मलमपट्टीचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. पण रुग्णांची गरज पाहता वस्तीत एक सरकारी प्राथमिक उपचार केंद्र असावं, असं त्यांच्यासह वस्तीतील सर्वांना वाटतं.

समाजात कुष्ठरोगाबद्दल असलेल्या गैरसमजामुळे आधीच ते गाववेशीच्या बाहेर आले आहेत. शारीरिक व्यंगामुळे काहींना नोकरी करता येत नाही तर काहींना नोकरी मिळत नाही. तरीही कसबसं त्यांनी स्वतःचा संसार उभा केला आहे. सरकारी यंत्रणेकडून होणारी उपेक्षा त्यांच्या त्रासात अधिक भर घालत आहे. त्यामुळे अपेक्षित मूलभूत नागरी सुविधा वेळेत न मिळाल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा वस्तीतील रहिवाशांनी दिला आहे.