India

पुराबद्दल माहिती वेळेत न मिळाल्यानं वस्तीतील अनेकांना सहन करावं लागतंय नुकसान

महानगरपालिकेकडून मिळत असलेली मदत पुरेशी नसल्याचं त्रस्त नागरिक सांगत आहेत.

Credit : राकेश नेवसे

 

पुणे: धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबद्दल वेळेवर चेतावणी न मिळाल्यानं पुण्यातील नदीशेजारील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना गुरुवारी अचानक आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावं लागलं आहे. या पुरात अनेक कामगारवर्गीय नागरिकांच्या घरातील सर्व सामान भिजून खराब झालं आहे. तर अनेकांना आणखी काही दिवस त्यांना घरात राहता येणार नाहीये. असं असताना महानगरपालिकेकडून मिळत असलेली मदत पुरेशी नसल्याचं त्रस्त नागरिक सांगत आहेत. शिवाय झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, अशी मागणीदेखील ते करत आहेत. दरम्यान जिल्हा व्यवस्थापनाकडून झालेल्या नुकसानाचा पंचनामा केला जात असल्याचं पुण्याच्या तहसीलदारांनी सांगितलं.

पुण्यातील मुळा आणि मुठा नदीच्या संगमाशेजारील पाटील इस्टेट वसाहतीत राहणाऱ्या संगिता घोलप यांना वाढत्या पाण्याबद्दल महानगरपालिकेनं कोणत्याही प्रकारची चेतावणी दिली नाही, असं त्या सांगतात.

आपल्या घराचं झालेलं नुकसान दाखवताना संगीत घोलप. सर्व छायाचित्रं: राकेश नेवसे

"सकाळी पाचच्या आधी नदीचं पाणी घरात यायला लागलं, तेव्हा आम्ही झोपलो होतो. पाण्यामुळं जेव्हा आम्हाला जाग आली, तोपर्यंत खुप उशिर झाला होता. त्यामुळं आम्ही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घरातलं सामान जसंच्या तसं सोडलं आणि बाजूच्या शाळेत आसऱ्याला गेलो. महानगरपालिकेनं पाणी आल्यावर पाणी अजून वाढणार असल्याचं सांगितलं. पण ही माहिती आधी द्यायला हवी होती," घोलप म्हणाल्या.

त्यांचं घर पूर नियंत्रण भिंतीला खेटून असल्यानं त्यांच्या घरात पाणी लवकर शिरायला सुरुवात झाली. त्यामुळं त्यांच्या घरात असलेलं कपाट, शिवणयंत्र, किराणा सामान आणि इतर सर्व गोष्टी भिजून खराब झाल्या आहेत. त्यांच्यासह त्यांच्या घरात त्यांचे पती आणि एक मुलगी राहते. त्यांचे पती वर्तमानपत्र वाटपाचं काम करतात, तर त्या स्वतः, महिलांच्या कपड्यांचं शिवणकाम करतात. 

पावसात घरी आणलेले सर्व वृत्तपात्रांचे गठ्ठे भिजून गेली तर त्यांचं शिवणयंत्रदेखील खराब झाल्यानं त्या मोठ्या आर्थिक अडचणीत आल्या असल्याचं त्या सांगतात. त्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. 

पुणे शहराचे तहसीलदार सुर्यकांत येवले यांनी इंडी जर्नलशी बोलताना जिल्हा व्यवस्थापनाकडून सध्या विविध ठिकाणी पुरामुळं झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला जात आहे, असं सांगितलं. "त्यानंतर लवकरच पंचनामा सुरू करून नागरिकांना योग्य ती नुकसान भरपाई दिली जाईल," अशी माहिती त्यांनी दिली.

घोलप यांच्या शेजारी राहणाऱ्या लता आरे इंडी जर्नल वस्तीत गेलं होतं, त्यावेळीही त्यांच्या घरात शिरलेलं पाणी काढत होत्या. त्यासाठी त्यांना त्यांचा मुलगा मदत करत होता. घरात आलेल्या पाण्यामुळे त्यांच्याही घरातील सर्व सामान खराब झालं होतं. त्या त्यांच्या भिंतीवर पाण्यानं सोडलेली पुररेषा दाखवत पाण्याची पातळी दर्शवण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांच्या बाहेरच्या भिंतीवर दिसणाऱ्या पुराच्या रेषेवरून लक्षात येत होतं की पाणी किमान साडे सहा फुट उंचीवर गेलं होतं.

"घरात पाणी यायला लागल्यानंतर आम्ही सगळं सोडलं आणि महानगरपालिकेनं राहण्याची सोय केलेल्या शाळेत गेलो होतो. आज सकाळी पाणी कमी झाल्यानंतर आम्ही घरी येऊन पाणी काढत आहोत. पण अजूनही घरातून सगळं पाणी गेलं नाही. त्यात पाण्यामुळे घरात असलेला टिव्ही, मिक्सर आणि बाकी सगळं खराब झालं," आरे सांगतात. महानगरपालिकेनं त्यांच्यासाठी एका दिवसाच्या राहण्या आणि खाण्याची सोय केली होती. मात्र आता पुढं काय करायचं असा प्रश्न त्यांच्या समोर पडला आहे.

महानगरपालिकेच्या लोकांनी वाढत्या पाण्याबद्दल वस्तीतील लोकांना माहिती दिली, मात्र तोपर्यंत वस्तीत गुडघाभर पाणी आलं होतं, असं घोलप आणि आरे यांच्या घरापासून ५० मीटर अंतरावर राहणारे सिकंदर शेख सांगतात.

"सकाळी सहापर्यंत माझ्या घरात गुडघाभर पाणी आलं होतं. त्यानंतर सात वाजता महानगर पालिकेतील कर्मचारी आणि पोलीसांनी येऊन पाणी पातळी वाढणार असल्याचं सांगत घरं सोडायला लावली. पोलीसांची गाडी वस्तीबाहेर येऊन थांबली होती. मात्र लोकांना वस्तीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी कोणतीही मदत केली नाही," ते म्हणाले. वस्तीतल्या लोकांनी स्वतः जमेल ते सामान आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं असं ते सांगतात.

 

बाबुलाल गुप्ता.

पुण्याच्या संगमवाडी भागातील जुना बाजार वसाहतीतील सर्व नागरिकांच्या घरात पाणी शिरलं होतं. नदीचं पाणी शिरल्यामुळं झालेलं नुकसान फक्त घरांपुरतं मर्यादित नसून जुन्या बाजारातील दुकानांना देखील नुकसान सहन करावं लागलं आहे. "वाढत्या पाण्याबद्दल त्यांना कोणत्याही सरकारी यंत्रणेकडून चेतावणी देण्यात आली नाही," असं वस्तीत किरकोळ विक्रीचं दुकान चालवणारे बाबूलाल गुप्ता सांगतात.

त्यांच्या दुकानाशेजारी घरं असणारे शाम शितोळे यांच्याही घरात पावसामुळे पाणी शिरलं होतं. त्यामुळं त्यांच्या-त्यांच्या घरातील बरंच सामान घराबाहेर काढावं लागलं. त्यामुळं त्यांना जास्त नुकसान सहन करावं लागलं नाही. मात्र अचानक वाढलेल्या पाण्यामुळं त्यांच्या कुटुंबियांची बरीच धावपळ झाली, असं ते म्हणतात.

वस्तीत पाण्याचा स्तर वाढायला लागल्यामुळे गुप्तांनी त्यांच्या दुकानातील सामान उंचीवर ठेवलं, त्यामुळं त्यांना जास्त नुकसान सहन करावं लागलं नाही. मात्र दस्तगिर शेख यांच्या फॅब्रिकेशनच्या दुकानात पाणी गेल्यामुळं त्यांच्या दुकानातील अनेक महत्त्वाची यंत्रं आणि फर्निचर खराब झालं. शिवाय दोन दिवस त्यांना त्यांचं दुकान बंद ठेवावं लागल्यानं सहन करावं लागलेलं नुकसान वेगळंच.

"आम्ही इथं प्रचंड अडचणीत राहतो. काहीही झालं की वस्तीतील रहिवाशांना जास्त त्रास सहन करावा लागतो. इथं कधी आग लागेल किंवा काय होईल काही सांगता येत नाही," दस्तगिर खंत व्यक्त करतात. सरकारनं त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं अशी मागणी ते करतात.

 आपल्या दुकानाबाहेर उभे असलेले दस्तगीर शेख. (पांढरा टीशर्ट)

गरवारे महाविद्यालयामागं असणाऱ्या खिल्लारे वस्तीची परिस्थिती अधिकच वाईट होती. ही वसाहत महानगरपालिकेनं बांधलेली पूरनिंयत्रण भिंत आणि नदीपात्राच्या यांच्या मधोमध आहे. या वस्तीत पहाटे तीन वाजेपासून पाणी शिरण्यास सुरुवात झाली, अशी माहिती या वस्तीत चायनीजचं हॉटेल चालवणारे सुरज अभंगे यांनी दिली.

"रात्री तीनच्या दरम्यान वस्तीत पाणी शिरायला सुरुवात झाली. पाणी शिरायला लागल्यानंतर वस्तीतील लोकांनी एकमेकांना जागं केलं आणि वाढत्या पाण्याबद्दल सांगितलं. त्यामुळं ज्यांची घरं दोन मजली होती, त्यांनी त्यांच्या तळमजल्यातलं सामान उचलून वरच्या मजल्यात ठेवायला सुरुवात केली," घरात आलेल्या पाण्याची पातळी दर्शवताना अभंगे सांगतात.

"सकाळी आठ नऊच्या दरम्यान माजी नगरसेवक आणि आमदारांनी येऊन आम्हाला घरं खाली करायला सांगितली. पण तेव्हा पाणी जरा कमी व्हायला लागल्यामुळे आम्ही थांबलो. पण दुपारी पाण्याची पातळी पुन्हा वाढायला लागली. पाण्यामुळं पहिला मजला पुर्ण बुडला होता. त्यानंतर लोकं वरच्या मजल्यावर राहायला गेली. परंतु इथं सगळ्यांची घरं दोन मजली नाहीत, त्यामुळे सर्वांना त्यांच्या घरातंल सामान वाचवता आलं नाही," त्यांच्या हॉटेल आणि घरातील बरंच सामान पाणी गेल्यामुळं खराब झालं आहे. शिवाय त्यांना संपुर्ण दिवस घरं साफ करण्यात घालवावा लागला असल्याचं ते म्हणतात.

 

सुरज अभंगे यांच्या हॉटेलचं झालेलं नुकसान.

या वस्तीत राहणाऱ्या सर्वांकडं दोन मजली घर नाही, त्यामुळं प्रत्येकाला त्यांच्या घरातील सामान वाचवता आलं नाही. कस्तुरा लोंढे यांचं या वस्तीत एक मजली घरं आहे, शिवाय ते नदीपात्राच्या जवळ असल्यामुळे पाणी आधी त्यांच्या घरात शिरलं. त्यांच्या घरातील सर्व सामान भिजलं आहे. आता त्यांच्याकडे अंगावर घ्यायला गोधडी किंवा घालायला कपडे देखील राहिलेले नाहीत. 

"घरात आलेल्या पाण्यामुळे घरातला सगळा किराणा, तांदूळ, गहू, डाळ आणि जे काही होतं ते भिजून गेलं. घरात ठेवलेली पोरांची शाळेची कपडे आणि पुस्तकं पण भिजली आहेत, आता सरकारनं आमची काहीतरी मदत केली पाहिजे," लोंढे चिंता व्यक्त करतात.