India

निलंबनानंतर आबा बागुलांचा काँग्रेस नेतृत्वावर आरोप!

नाना पटोलेंनी आश्वासन देऊनही उमेदवारी नाकारल्याचा बागुल यांचा आरोप.

Credit : इंडी जर्नल

 

नुकतेच काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले पुण्याच्या पर्वती मतदारसंघातील बंडखोर उमेदवार आबा बागूल यांनी सोमवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले. पर्वती मतदारसंघाची उमेदवारी देण्याचं आश्वासन देऊन, ते ऐनवेळी पाळलं नसल्याचा आरोप बागुल यांनी केला. शिवाय पटोलेंच्या एकंदरीत वर्तनाकडं पाहता त्यांना काँग्रेस टिकवायची नसून बुडवायची आहे, असा दावादेखील त्यांनी केला आहे.

यावेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांना बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. पक्षाकडून तिकीट न मिळाल्यानं नाराज असलेल्या इच्छुक उमेदवार तसंच पसंतीचा मतदारसंघ मित्रपक्षाला गेल्यानं नाराज उमेदवारांनी अनेक ठिकाणी अपक्ष अर्ज केला आहे. काही नेत्यांनी ४ नोव्हेंबर रोजी त्यांचे अर्ज मागे घेतले असले, तरी अनेक मतदारसंघांमधून बंडखोर उमेदवार निवडणूक लढवत आहेत. शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेसनं बंडखोर उमेदवाराचं निलंबन केलं आहे.

यावेळी काँग्रेस पक्षातील पुण्यातील काही नेत्यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला. यात पर्वती मतदारसंघात माजी उपमहापौर आबा बागुल यांनीही अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसनं २६ काँग्रेस बंडखोरांवर कारवाई करत त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं. त्यात पर्वती मतदारसंघातील बागुल, कसबा पेठ मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांच्यासमोर उभ्या राहिलेल्या कमल व्यवहारे आणि शिवाजीनगरमधील बंडखोर उमेदवार मनीष आनंद, अशा ३ पुण्यातील ३  नेत्यांना निलंबित करण्यात आलं. बागुल यांनी आज याबद्दल पत्रकार परिषद घेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत.

"काँग्रेसनं २६ लोकांचं निलंबनाची नोटीस बजावली, असं सांगितलं जात आहे. मात्र अजून कोणाला नोटीस आलेली नाही. या लोकांना नोटीस न देता, त्यांचं म्हणणं न ऐकता त्यांना निलंबित केलं गेलं आहे. आम्ही कुठंही काँग्रेसबरोबर गद्दारी केठराविक ली नाही. मी जिथं अर्ज केला आहे, तिथं काँग्रेसचा उमेदवार उभा नाही. काँग्रेसची घटना पाहिली तर निलंबनाची एक प्रक्रिया आहे. त्यानुसार निलंबनाची कारवाई होणाऱ्या व्यक्तीला त्याचं म्हणणं मांडण्याची संधी दिली पाहिजे. पण तसं काही झालं नाही," बागुल सांगतात.

 

 

विधानसभेत संधी मिळवण्यासाठी बागुल गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होते. नाना पटोलेंनी त्यांना पर्वती मतदारसंघातून उमेदवारी देण्याचं आश्वासन दिलं होतं, असं बागुल सांगतात. "प्रांत अध्यक्षांनी मला कोरोना महामारीच्या काळात शब्द दिला होता. 'तुमचे नगरसेवक म्हणून सहा-सहा आणि आठ-आठ कार्यकाळ झालेत आणि तरी तुम्ही अजून इथंच राहिलात. पर्वती मी तुम्हाला देणार' असं शंभरवेळा त्यांनी मला सांगितलं," अशी चर्चा पटोलेंबरोबर झाल्याचं बागुल सांगतात.

मात्र यावेळी पर्वती मतदारसंघ महाविकास आघाडीमधील काँग्रेसच्या मित्रपक्षाकडे, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे गेला. तरीदेखील बागुलांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. मात्र त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मागणी करण्यासाठी नाना पटोलेंनी कोणत्याही प्रकारे संपर्क केला नसल्याचंही ते म्हणाले.

एखाद्या कार्यकर्त्यानं बंडखोरी केली तर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र नाना पटोलेंनी ३ वाजेपर्यंत (उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी) कोणताही संपर्क केला नाही," बागुल म्हणाले.

त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाकडून महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट होण्याच्या आणि इतर पक्षामधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांना उमेदवारी देण्याबाबत प्रश्न उपस्थित केले. शिवाय काँग्रेसचा खरंच विकास होत आहे का आणि यामुळं काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळतोय का, असे प्रश्न उपस्थित केले. आघाडीत असल्यामुळं महाविकास आघाडीत सर्व पक्षांना गेल्याच्या तुलनेत कमी उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.

पटोलेंचा काँग्रेसमध्ये येण्यामागचा नक्की उद्देश काय यावरदेखील बागुल यांनी यावेळी प्रश्न उपस्थित केला. "यांना काँग्रेस टिकवयाची नाही, यांना काँग्रेस संपवायची आहे. ते फक्त त्यांच्या पद आणि हक्कासाठी लढत आहेत. कार्यकर्ता संपला तरी चालेल. यामुळंच पुण्यात तीन उमेदवार उभे राहिले आहेत."

गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत, शिवाय त्या कधी होतील याची शाश्वती नसल्यानं अनेक नगरसेवकांनी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत उतरण्याचा प्रयत्न केला. बागुल यांनी लोकसभा निवडणुकीसाठीदेखील काँग्रेसकडून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळीही त्यांना उमेदवारी मिळालं नाही. त्यानंतर त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती.