India
आफ्रिकन नागरिकाच्या मृत्यूनंतर बंगळुरू पोलिसांविरोधात आंदोलन
डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो या आफ्रिकन देशातील नागरिकाचा सोमवारी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याची घटना बंगळुरू शहरात घडली.
डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो या आफ्रिकन देशातील नागरिकाचा सोमवारी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याची घटना बंगळुरू शहरात घडली. यानंतर शहरातील जे.सी. नगर पोलीस स्थानकाबाहेर या घटनेच्या विरोधात प्रदर्शनं झाली. जमलेले लोक ‘ब्लॅक लाइव्हस मॅटर’ च्या घोषणा देत होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागण्याच्या आधीच पोलिसांकडून जोरदार लाठीचार्ज करण्यात आला, या लाठीचार्जमध्ये काही लोकांच्या डोक्यालाही मार लागल्याचे फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर दिसत होती.
या दरम्यान अनेक आफ्रिकन नागरिक आणि विद्यार्थी तसंच दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले असून, काही लोकांना ताब्यात घेऊन शहरातील वेगवेगळ्या पोलीस स्थानकात नेण्यात आले.
कॉंगो या आफ्रिकन देशातील जोएल (२७) या व्यक्तीला पोलिसांनी अमली पदार्थांच्या संदर्भात रविवारी संध्याकाळी अटक केली आली होती.
कॉंगो या आफ्रिकन देशातील जोएल (२७) या व्यक्तीला पोलिसांनी अमली पदार्थांच्या संदर्भात रविवारी संध्याकाळी अटक केली आली होती. आंदोलनकर्त्यांमध्ये असलेला जोएलचा मित्र पत्रकारांशी बोलताना म्हणाला की जोएल एका मित्राच्या घरी बर्थडे पार्टीसाठी गेला होता, त्या दरम्यान त्याला अटक करण्यात आली. आणि पोलिसांच्या कस्टडीत असतानाच दुसऱ्या दिवशी म्हणजेच, सोमवारी सकाळी ६:३० च्या दरम्यान, जोएलचा मृत्यू झाल्याची पोलिसांनी सांगितलं. त्याचा मृत्यू ह्रिदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचंही पोलिसांनी सांगितलं. ही केस आता सीआयडीकडे वळवण्यात आल्यानं या केसचं गांभीर्य अधिक वाढलं आहे.
पुण्यातील 'असोसिएशन ऑफ आफ्रिकन स्टुडण्ट्स इन इंडिया'चे अंथोनी सिमोन पीटर यांनी इंडी जर्नलशी बोलताना आफ्रिकन विद्यार्थ्यांना भारतात सहन कराव्या लागणाऱ्या भेदभावपूर्ण वागणुकीकडे लक्ष वेधलं. "अशा प्रकाराच्या गोष्टींना आम्ही दररोज सामोरं जात असतो. पोलीसं आमच्याकडे नेहमीच संशयानं बघत असतात. काही चूकी नसताना देखील कित्येक आफ्रिकन नागरिकांना याआधी अटक झाल्याचं चित्र संपूर्ण भारतात पाहायला मिळतं. कोणाची चूक असेल, कोणी गुन्हेगार असेल तर त्याला कायद्यानुसार नक्कीच शिक्षा झाली पाहिजे. पण पोलिसांच्या कोठडीत एखाद्याचा मृत्यू होत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आहे. आणि या गोष्टीकडे सरकार किंवा अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आम्हाला भारतबद्दल खूप आदर आहे, ही महात्मा गांधी यांची भूमी आहे. आम्हाला सुरक्षित वाटावं, असं वातावरण तयार झालं पाहिजे."
#Bengaluru police seen using excessive force against a protester. 4-5 policemen lathi chage him even as he is bleeding from his head. He and several others from different African countries were protesting against the alleged custodial death of 27-yr-old Joel from Congo. pic.twitter.com/CJmaz9P1P8
— Pooja Prasanna (@PoojaPrasanna4) August 2, 2021
या घटनेविषयी बोलताना उत्तर बंगळुरूचे डीसीपी म्हणाले, "जोएल याला अंमली पदार्थाच्या संबंधात ताब्यात घेण्यात आलं होतं. आता भारतीय दंडसंहतेच्या कलम १७६ च्या अंतर्गत अनैसर्गिक मृत्यूची केस रजिस्टर करण्यात आली आहे. जोएल शिंडाणू मालू उर्फ जोएल विद्यार्थी व्हिसावर बंगळूरूमध्ये आला होता." ते पुढं म्हणाले, "पोलीस पेट्रॉलिंग दरम्यान पोलिसांनी थांबवून विचारलं असता, तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. तेवढ्यात त्याचा खिशातून प्लास्टिक पिशवीतुन अंमली पदार्थासारखा काहीतरी पडलं आणि पोलिसांना संशय आल्यानं त्याला अटक करण्यात आली होती."
ऍडिशनल कमिशनर ऑफ पोलीस सौमेंदू मुखर्जी मीडियाशी बोलताना म्हणाले, "खासगी रुग्णालयात जोएलवर जवळपास तासभर उपचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानं सिपीआरला प्रतिसाद दिला नाही. चार-पाच तासांनंतर आम्हाला त्याची कागदपत्रं आली आहेत. आणि आता आम्ही राष्ट्रीय मानवाधिकार नियमावली आणि सुप्रीम कोर्टाच्या नियमावलीनुसार प्रक्रिया करत आहोत. त्यातच जोएलचे मित्र आणि इतर लोक पोलीस स्थानकाबाहेर येऊन आंदोलन करू लागले. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी पोलिसांवर हल्ला केला, म्हणून त्यांच्यावर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. यात काही पोलिसही जखमी झाले आहेत."