Europe
तूर्की सरकारच्या दडपशाहीचा निषेध करताना ग्रुप योरूमच्या आणखी एका सदस्याचं निधन
इब्राहिम गोकचेक हे ३२३ दिवस उपोषणावर होते.
तूर्किमधील प्रसिद्ध डाव्या लोकसंगीत गट 'ग्रूप योरुम'च्या दुसऱ्या सदस्याचे आमरण उपोषण दरम्यान मृत्यु झालेले आहे. इब्राहिम गोकचेक हे ३२३ दिवस उपोषणावर होते, त्यांची प्रकृती बिगडल्याने त्यांना हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आले तिथे त्यांचा उपोषण मागे घेण्याचा निर्णय ही झाला, पण ७ मे रोजी त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आले. त्यांचे वय ४२ होते.
गेल्या महिन्यात ३ तारखेला 'हेलीन बोलेक' नावाच्या सदस्याचे उपोषणाच्या २८८ व्या दिवशी निधन झाले होते, त्या अवघ्या २८ वर्षाची होत्या. ग्रूप योरुम वर घालण्यात आलेल्या बंदी व गटातील अन्य सदस्यांना तुरुंगातून सोडण्याच्या मागणी करत, तसेच ह्या सरकार विरोधात निषेध दर्शवत हे उपोषण गेली ३२३ दिवस चालू होता. २०१६ पासूनच ह्या गटावर सरकारने बंदी घातली गेली होती व त्यांचे संबंध 'रेव्हल्युशनरी पीपल्स लिबरेशन फ्रंट' ह्या जपान, अमेरिका, इंग्लंड व तुर्की ह्या देशांनी अतिरेकी संघटना घोषित केलेल्या संघटनेशी आहे, असे सांगण्यात आले.
इब्राहिम व हेलीन ह्यांनी तुरुंगातूनच उपोषणाला सुरुवात केली होती, नोव्हेंबर २०१९ त्यांना सोडल्यानंतरही त्यांनी आपले उपोषण चालूच ठेवले होते. इब्राहिमची पत्नी वा अन्य एक सदस्य आज ही तुरुंगात आहेत.
तूर्कीचे राष्ट्रपती रेसेप तायीप एर्दोगान हे उजव्या विचारसरणीचे असून, त्यांनी त्यांच्या विरोधकांची, खासकरून डाव्या आणि पुरोगामी लोकांचा आवाज दाबण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. ग्रुप योरुम १९८५ पासूनच तुर्की मध्ये वेगवेगळे प्रयोग करत आलेली आहे, त्यांचे आता पर्यंत २४ अल्बम प्रसिद्ध झालेत व ही गाणी अरब देशांमध्ये तसेच जगातील अन्य देशांतील डाव्या आणि पुरोगामी विचारांच्या लोकांमध्ये प्रसिद्ध झालीत व त्यांना जगभरातून आदरांजली वाहिली गेली.