Americas
कोण आहेत पेरूचे नवे राष्ट्राध्यक्ष?
त्यांच्या विरोधात ‘पॉप्युलर फोर्स’ ह्या उजव्या पक्षाच्या केइको फुजिमोरी होत्या, त्या पेरूचे माजी हुकूमशहा आल्बेरतो फुजिमोरी ह्यांच्या कन्या आहेत.
दक्षिण अमेरिकेतल्या पेरू देशात पार पडलेल्या निवडणुकीत ‘फ्री पेरू’ समाजवादी पक्षाचे पेद्रो कास्तीयो यांनी जेतेपदावर दावा सांगितला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर हॅन्डल वरून पेरूच्या जनतेचं आभार मानत, हे सरकार जनतेला समर्पित राहील असं आश्वासन दिलं. तसंच त्यांनी विरोधी पक्षाला निकाल मान्य करण्याचं आव्हान केलं. त्यांच्या विरोधात ‘पॉप्युलर फोर्स’ ह्या उजव्या पक्षाच्या केइको फुजिमोरी होत्या, त्या पेरूचे माजी हुकूमशहा आल्बेरतो फुजिमोरी ह्यांच्या कन्या आहेत. आल्बेरतो फुजिमोरो १९९० च्या दरम्यान डाव्यांविरोधात केलेलं मानवी अधिकारांचं हनन आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेल मध्ये आहेत. पेद्रो कास्तीयो ह्यांना ५०.१२ टक्के तर फुजिमोरी ह्यांना ४९.८८ टक्के मतं मिळाली आहेत.
कोण आहेत पेद्रो कास्तीयो?
दक्षिण अमेरिकेतील पेरू सारख्या विकसनशील देशात गरीब कुटुंबात पेद्रो कास्तीयो ह्यांचा जन्म १९६९ साली झाला, त्यांचे आई-वडील निरक्षर व व्यवसायानं शेतमजूर होते. माजी राष्ट्रपती हुआन वेलॅस्को अल्वारादो यांनी केलेल्या कृषी सुधारणा कायद्या नंतरच त्यांना स्वतःच घर मिळालं. त्यांनी मानसशास्त्रात शिक्षण पूर्ण केलं आणि ते १९९५ साली शाळेत शिक्षक म्हणून आपल्या मूळगावी रुजू झाले. ते विद्यार्थी वयात असतानाच डाव्या चळवळीकडे आकर्षित झाले होते. १९८० च्या दरम्यान डावा पक्ष ‘शायनिंग पाथ‘ छापेमारी युद्ध लढत असताना कास्तीयो यांनी दूताचं काम करत त्यांना मदत केली होती, आणि आपल्या गावाचं संरक्षण केलं होतं.
या आधी २००२ सालच्या महापौरपदासाठी त्यांनी अयशस्वी लढाईदेखील लढली आहे. २०१७ पर्यंत ते ‘पेरू पॉसिब्ल’ पक्षाचे कॅहमारका प्रदेशाचे नेते राहिले. त्यांचे जुने वर्गमित्र त्यांच्याबद्दल जुन्या आठवणींना उजाळा देत म्हणातात की ते विद्यार्थी वयापासून नेहमीच गरीब आणि कामगार ह्यांच्या बद्दल संवेदनशील असत.
शिक्षक ते नेता
२०१७ पेरूमध्ये झालेल्या शिक्षक संपात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती, त्यात त्यांनी शिक्षकांसाठी तसंच अन्य कामगार वर्गासाठी वेतनवाढ, सार्वत्रिक कर्जमाफी, शिक्षकी कंत्राटीकरण कायद्यानं रद्द करण्याची मागणी तसंच शिक्षण क्षेत्रासाठी वेगळ्या अर्थसंकल्पाची तरतूद करण्याच्या मागणीला घेऊन देशभरातील शिक्षक आणि कामगार वर्गाला एकत्रित करण्याचं काम पेद्रो ह्यांनी केलंय. त्यात मोठ्या संख्येनं कामगारांनी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. चार महिने चाललेल्या ह्या संपाचे पडसाद इतर दक्षिण अमेरिकेतल्या देशांमध्येही उमटले होते. शेवटी पेरूच्या राजधानी लाईमा शहरात हा संप हिंसक होऊ लागल्यावर कास्तीयो ह्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला.
२०२१ च्या राष्ट्रपती निवडणूका
पेद्रो कास्तीयो यांनी चुरशीच्या लढाईत उजव्या नेत्या केईको फुजिमोरी ह्यांना खूपच कमी फरकाने मागे टाकत आपल्या जेतेपदाचा दावा केला आहे. फुजिमोरी ह्यांनी ह्या आधी २०११ आणि २०१६ च्या निवडणुकांमध्येही आपलं नशीब आजमावलं होतं. त्यावेळेसही त्या खूप कमी फरकानं हरल्या होत्या. आता झालेल्या निवडणुकीत कास्तीयो आणि फुजिमोरी व्यतिरिक्त इतर मुख्य १८ पक्ष मैदानात होते.
आताची लढाई ही सरळसरळ विचारसणीची लढाई आहे असं म्हणायला अवकाश आहे. पेद्रो हे स्वतःला मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट कम्युनिस्ट असण्याचा दावा करतात. एका मुलाखतीत त्यांनी कारखाने, खनिज, तेल आणि इतर गोष्टींचं राष्ट्रीयकरण करण्याचं समर्थान केलं आहे. तसंच कामगारांना वेतनवाढ आणि श्रीमंतांना अधिक कर लागू करण्याबद्दलही त्यांनी आश्वासन दिलं आहे.
ही लढाई श्रीमंत आणि गरीब ह्यांची असली तरी १९८० आणि १९९० च्या दरम्यान आंतरिक अशांतीसाठी डावेच जबाबदार असल्यानं पेरूच्या जनतेत आजही डाव्यांबद्दल तशीच प्रतिमा आहे. कास्तीयो ह्यांची पकड ग्रामीण भागात जास्त आहे, तसंच फुजिमोरो ह्या उद्योजकांना आणि नवीन उद्योगांना प्राधान्य प्रोत्साहन दिलं जाईल, असं म्हणाल्या आहेत. त्यांनी समाजवाद्यांना त्यांनी विकास विरोधी म्हटललं आहे. फुजिमोरी कुटुंबाची अजूनही शहरी भागात पकड मजबूत असली, तरी सध्या तरी पेरूच्या ग्रामीण जनतेनं त्यांच्या कौल कास्तीयो यांनाच दिल्याचं दिसून आलेलं आहे.