India
एनडीएची न थांबणारी गळती: भाजपपासून वायले झालेले मित्र पक्ष
२०१४ मध्ये पासून आतापर्यंत राष्ट्रीय लोकशाही आघाडी मधून १९ पक्ष बाहेर पडले आहेत.
शिरोमणि अकाली दल आणि बहुजन समाज पार्टी येणाऱ्या २०२२ च्या पंजाब विधानसभा निवडणूक एकत्रित लढणार असल्याचं शिरोमणि अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी शनिवारी सांगितलं. “हा आजचा दिवस ऐतीहासिक आहे, दोन्ही पक्षांचे विचार आणि लक्ष्य एक आहे. गरीब, शेतकरी, मजूर आणि ज्या ज्या लोकांना दाबले जाते, गळचेपी केली जाते, त्यांच्या हक्कांच्या लढाईसाठी दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत, व ह्यापुढे होणाऱ्या प्रत्येक निवडणूक एकत्र लढतील,” असं त्यांनी यावेळेस म्हटलं.
गेल्या वर्षी मंजूर झालेले कृषी कायदे आणि त्यानंतर उसळलेल्या आंदोलनाला आपला पाठिंबा देत अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल ह्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता आणि अकाली दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी मधून बाहेर पडलं होतं.
२०१४ मध्ये पासून आतापर्यंत राष्ट्रीय लोकशाही आघाडी मधून १९ पक्ष बाहेर पडले आहेत. त्यात राष्ट्रीय तसंच प्रादेशिक छोटे-मोठे पक्ष आहेत. केंद्रीय धोरणांवरून मतभेद, राज्य पातळीवर केंद्राचा वाढता हस्तक्षेप अशा अनेक कारणांवरून प्रादेशिक पक्षांनी भाजपसोबतची युती तोडल्याची अनेक उदाहरणं आहेत.
१) शिवसेना
एकेकाळी महाराष्ट्रात भाजपचा मोठा भाऊ म्हणवून घेणाऱ्या आणि २५ वर्षांपेक्षा जास्त काळ भाजपसोबत असलेल्या शिवसेनेनं २०१९च्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांनंतर भाजपासोबतची युती तोडली. २०१९ ची लोकसभा आणि तसंच विधानसभा निवडणूकसुद्धा शिवसेनेनं भाजपसोबत लढवली होती. मात्र मुख्यमंत्री पदाच्या आणि इतर वादांतून आघाडी मधून बाहेर पडत, शिवसेनेनं कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं.
२) तेलुगू देशम पार्टी
२०१४ च्या मोदी लाटेत आणि तेलंगणा आणि आंध्र प्रदेश वेगळे झाल्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीत चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. मात्र २०१७ नंतर आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जासाठीच्या आंदोलनात केंद्राकडून झालेला अपेक्षाभंग आणि तेलुगू जनतेचा विरोधात जाणारा कल बघून तेलुगू देशम पार्टी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतुन बाहेर पडली.
३) स्वाभिमानी पक्ष
शेतकरी आंदोलनातून तयार झालेले राजू शेट्टी आणि स्वाभिमानी पक्ष भाजपच्या स्वामिनाथन आयोग लागू करू म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडी सोबत गेले होते. पण २०१७ साली स्वामिनाथन आयोग लागू होत नसल्यानं आणि किमान आधारभूत किंमत शेतकार्यांना मिळत नसल्यानं ते आघाडीतून बाहेर पडले.
४) गोरखा जनमुक्ती मोर्चा
२०२१ च्या ऐन पश्चिम बंगालच्या निवडणुकांआधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी मधून गोरखा जनमुक्ती मोर्चा हा पक्ष बाहेर पडला. 'केंद्र सरकारनं गोरखा समाजाला अनुसूचित जमातींमध्ये समाविष्ट करण्याचं आश्वासन पाळलेलं नाही, त्यात गोरखांची मागणी आणि लढाईची दखलही घेतलेली नाही. ह्यापुढे आम्ही त्यांच्या विरोधात प्रत्येक आघाडीवर लढा देऊ,' असं पक्षप्रमुख बिमल गुरूंग म्हणाले होते.
५) ऑल झारखंड स्टुडन्ट यूनियन
ऑल झारखंड स्टुडन्ट यूनियनचे नेते सुदेश महतो ह्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी मधून २०१९ मध्ये काढता पाय घेतला. 'भाजप मतदारांना दिलेली वचनं पाळण्यास सपशेल अपयशी ठरलेली आहे. मला सत्तेसाठी पक्षाचा व लोकांच्या विश्वासाचा त्याग करायचा नाही,” असं महातो आघाडीतून बाहेर पडताना म्हणाले होते.
६) राष्ट्रीय लोक समता पार्टी
२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राष्ट्रीय लोक समता पार्टीचे बिहार मधून ३ खासदार निवडून आले होते. त्यांनी २०१८ ला आघाडीला सोडचिट्ठी दिली होती. उपेंद्र कुशवाहा यांची ही पार्टी शेवटी जदयू मध्ये विलीन झाली.
७) असोम गण परिषद
असोम गण परिषदेनं जानेवारी २०१९ मध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावच्या मतभेदांमुळं आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतर दोनच महिन्यांनी मार्च २०१९ मध्ये ते परत आघाडीत सामील झाले.
याव्यतिरिक्त भाजप आणि इतर प्रादेशिक पक्षांमध्ये वेळोवेळी खटके उडताच असतात. जनता दलाचे ६ आमदार २०२० मध्ये जदयू सोडून भाजप मध्ये सामील झाले, तेव्हा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपला युतीचा धर्म पाळण्याचा आणि तोडाफोडीचं राजकारण न करण्याचा सल्ला दिला होता. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या मेहबूबा मुफ्ती यांच्यासोबत जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर भाजपला अपवित्र युती केल्याचा आरोप झेलावा लागला होता. जून २०१८ मध्ये भाजपनं पाठिंबा काढल्यानं मुफ्ती यांचं सरकार पडून राज्यात राष्ट्रपती राजवट लावली गेली होती. यानंतर ऑगस्ट २०१९ मध्ये विशेष अधिकार कलम ३७० हटवून जम्मू आणि काश्मीरला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आलं.
आणि इतर प्रादेशिक पक्ष जसं की तामिळनाडूतील पट्टाली मक्कळ कच्ची, देसिया मोरपोक्कू द्राविड कळघम, आणि मुरलामारची द्राविड मुनेत्र कळघम, तसंच केरळमधील रेव्होल्यूशरी सोशलिस्ट पार्टी ऑफ केरळ (बोलशेवीक्), २०१४ साली स्थापित झालेली तेलगू सिनेस्टार पवन कल्याण ह्यांची जनसेना, बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी ह्यांची हिंदुस्थानी आवाम मोर्चा, स्वर्गीय रामविलास पासवान ह्यांची लोक जनाशक्ती पार्टी अशा अनेक प्रादेशिक पक्षांनी भाजपला सोडचिट्ठी दिली आहे.