India

आयोगानं जनमत चोरलं: नाना पटोले यांचा निवडणूक आयोगावर आरोप

अनेकांनी महाराष्ट्र निवडणूक प्रक्रियेवर अविश्वास व्यक्त केला आहे.

Credit : इंडी जर्नल

 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी गुरूवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील विधानसभा निकाल आणि निवडणूक आयोगानं दिलेल्या मतदानाच्या टक्केवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यानं त्याबद्दल स्पष्टीकरण दिलं. महाराष्ट्रातील निवडणुकीचा निकाल अनपेक्षित होता, असं म्हणत अनेकांनी निवडणूक प्रक्रियेवर अविश्वास व्यक्त केला आहे. त्यानंतर आयोगाची भूमिका, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट अशा सर्व बाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

महाराष्ट्र विधानसभेचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला. निकालानुसार महाविकास आघाडीला दारुण पराभव स्वीकारावा लागला. यात महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. स्वतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेदेखील फक्त दोनशे मतांच्या फरकानं थोडक्यात विजयी झाले. त्यानंतर पटोले यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत आयोगावर अनेक आरोप केले.

"(महाराष्ट्राच्या निकालानंतर) निवडणूक आयोगाच्या संपुर्ण प्रक्रियेवर आमचा संशय आहे. किती टक्के मतदान झालं याबद्दल दर दोन तासांनी आयोगाकडून आकडेवारी दिली जाणं अपेक्षित होतं. त्यानुसार ७ वाजतापर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी ९ वाजता येणं अपेक्षित असताना ९.३० वाजता आली, म्हणजे अर्धा तास उशिरा झाला. मग त्यानंतर १ वाजता येणारी आकडेवारी १.३० वाजता आली. एका प्रकारे सर्वचं आकडेवारी देताना आयोगाकडून उशिर झाला," आयोगाच्या वागणूकीवर पहिला आक्षेप नोंदवताना नाना पटोले म्हणाले.

"आयोगाच्या ५ वाजेच्या आकडेवारीनुसार ५८.२२ टक्के मतदान महाराष्ट्रात झालं. मग रात्री पर्यंत मतदान झालं असून एकूण टक्केवारी ६५.२ झाली असल्याचं त्यांनी रात्री ११ वाजता कळवलं. एका व्यक्तीला मतदान करण्यासाठी एक मिनिटाचा वेळ लागतो, जर ५ वाजताची ५८ टक्क्यांचं प्रमाण ६५ टक्क्यांवर जाण्यासाठी तर त्यासाठी एकाला एक मिनिटा प्रमाणे ६० तासांचा वेळ लागेल. तरी आयोगानं हे मतदान सहा तासांत उरकलं. त्यानंतर पुन्हा सकाळी त्यांनी सांगितलं की ६६.०५ टक्के मतदान झालं. म्हणजे जवळपास ७६ लाख मतांची यात वाढ झाली. मग ही वाढ झाली कशी?" आयोगानं संध्याकाळी दिलेल्या आकडेवारीत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दिलेल्या आकडेवारीत तफावत असल्याचं पटोले नोंदवतात.

 

 

या पत्रकार परिषदेनंतर भारतीय निवडणूक आयोगाच्या महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यानी एक्सवर (पुर्वीचे ट्वीटर) ट्वीट करत आयोगाची भूमिका मांडली. "महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान नोंदवण्यात आलं होतं. त्यानंतर अंतिम मतदानाची टक्केवारी ६६.०५ टक्के होती. बऱ्याचवेळा संध्याकाळी ६ नंतरही अनेकदा मतदान सुरू राहत असल्यानं ही एक सामान्य गोष्ट आहे," मुख्य निवडणूक अधिकाऱ्याचं ट्वीट म्हणतं.

"अगदी २०१९च्या निवडणुकीतही ५ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी ५४.४३ टक्के (अंदाजे) होती आणि अंतिम आकडेवारी ६१.१० टक्के नोंदवली होती. महाराष्ट्रात शहरी आणि निमशहरी मतदानाचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळं बरीच लोकं संध्याकाळी उशीरा मतदार येत राहतात, दर २ तासांनी दिली जाणारी ५ वाजेपर्यंतची आकडेवारी ही फोनवर झालेल्या संवादावर आधारित असते, हे नोंदवणं महत्त्वाच आहे," ट्वीट पुढं म्हणतं.

"दुसरीकडं पाहायचं झालं तर मतदान बंद होत्या वेळी पोलींग एजंटला देण्यात येणाऱ्या फॉर्म '१७ सी'मधील आकडेवारी ही मतदानाची अंतिम टक्केवारी आणि झालेल्या मतमोजणीशी जूळते, फॉर्म १७ सी मध्ये देण्यात आलेली माहिती उमेदवारांचा प्रतिनिधी मतमोजणीवेळी जुळवून पाहत असतो," अधिकारी नमुद करतात. एका अर्थानं मतदानाची आकडेवारी ही अचूक असून जर त्यात काही दोष होता, तर तो मतमोजणीच्या वेळीच निदर्शनास आला असता, असा दावा आयोगानं केला आहे.

मात्र पटोलेंनी याशिवायही अनेक आरोप आयोगावर केले. त्यानुसार आयोगानं रात्री ११ वाजेपर्यंत मतदान चालल्याचं सांगितलं असल्याचा दावा त्यांनी केला आणि त्याबद्दल पुरावे सादर करण्याची मागणी केली.

"आता तुम्ही आम्हाला सांगत आहात की रात्री ११ वाजेपर्यंत मतदान झालं, म्हणजे त्या मतदानाच्या रांगा दोन तीन किलोमीटरच्या असतील. निवडणूक पारदर्शक होण्यासाठी आयोगाकडून फोटोग्राफी, व्हिडिओज वगैरे सगळं केलं जातं, मग आयोगानं आम्हाला दाखवावं की दोन-दोन, चार-चार किलोमीटरच्या रांगा मतदान केंद्रासमोर लागल्या होत्या, त्याबद्दल पुरावे द्यावे," पटोले म्हणाले.

 

 

"या रांगा कोणत्या मतदान केंद्रावर लागल्या होत्या, एवढं मतदान कसं वाढलं यावर आयोगानं स्पष्टीकरण द्यावं. कारण की आम्ही आता आमच्या सर्व उमेदवारांशी चर्चा केली आहे, त्यात कोणीही म्हटलं नाही की आमच्या इथं इतक्या मोठ्या रांगा लागल्या होत्या, सगळीकडं संध्याकाळी ७ वाजता मतदान बंद झालं होतं. आमच्या सर्व आमदार आणि उमेदवारांची बैठक झाली आहे, याविषयाला आम्ही घेऊन आम्ही न्यायालयात जाणार आहोत. शिवाय यासाठी रस्त्यावरचा लढा देखील लढणार आहोत," पटोलेंनी इशारा दिला.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मतदानाची वेळ पुर्ण झाल्यानंतरही मतदान सुरू राहिल्याचं सांगितलं गेलं. जर एखाद्या मतदान केंद्रात मतदानाची वेळ संपण्याआधी मतदार आले असतील मात्र त्यांचं मतदान वेळेत झालं नसेल त्या मतदारांचं मतदान पुर्ण होईपर्यंत मतदानाचा वेळ वाढवला जातो. ही सुविधा फक्त वेळेआधी मतदान केंद्रात आलेल्या मतदारांचा उपलब्ध असते, त्या मतदारांना टोकन दिलं जातं आणि टोकन असलेल्या मतदारालाच मतदान करता येतं. या वेळेनंतर मतदान केंद्रावर आलेल्या टोकन दिलं जात नाही.

नाशिकमध्ये काही मतदान केंद्रावर रात्री उशीरापर्यंत मतदान झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यानुसार ओझरमध्ये रात्री १०.३० पर्यंत आणि मनमाडमध्ये ९.५० वाजेपर्यंत मतदान झाल्याचं दिसतं.

आयोगानं केलेल्या ट्वीटमध्ये वाढलेल्या वेळेबद्दलही स्पष्टीकरण देण्यात आलं. "महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये एकाच दिवशी मतदान झालं. झारखंडमध्ये मतदानाची वेळ ५ वाजता संपली, मात्र महाराष्ट्रात ती ६ वाजेपर्यंत होती. महाराष्ट्रात अनेक मतदान केंद्रांवर ६ नंतर मतदानासाठी गर्दी होती. झारखंडमध्ये फक्त ३०,००० मतदान केंद्र आहेत, तीच संख्या महाराष्ट्रासाठी १ लाखावर जाते," आयोगाचं ट्वीट म्हणतं.

 

 

भाजप आणि निवडणूक आयोग लोकशाहीशी खेळत आहेत, आयोगानं जनतेची मतं चोरली असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे. शिवाय या सर्व आकडेवारी आणि निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवरही संशय व्यक्त केला आहे. मतदान पुर्ण झाल्यानंतर आयोगानं पत्रकार परिषद घेत आकडेवारी का प्रकाशित केली नाही, असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

पटोले यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाहीत. मात्र असं असलं तरी काल पुण्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांची बैठक झाली होती. त्यानंतर पत्रकार परिषद घेत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या प्रोग्रामिंगवर संशय व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) हडपसर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार प्रशांत जगताप यांनी ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅटकडं लक्ष वेधलं.

व्हीव्हीपॅटमध्ये मतदानाच्या काही वेळापूर्वी निवडणूक चिन्हं टाकली जातात. त्यानंतर हे व्हीव्हीपॅट कंट्रोल युनिट आणि ईव्हीएमच्या मध्ये लावलं जातं. ईव्हीएममध्ये जेव्हा एखादी व्यक्ती मत टाकते तेव्हा त्यांची नोंद कंट्रोल युनिटमध्ये होते. मात्र ती नोंद होण्यापूर्वी व्हीव्हीपॅट मशीन तुम्ही कोणाला मतदान केलं त्या चिन्हाची एक पावती छापते. जरी ती पावती तुम्ही मत दिलेल्या व्यक्तीचं चिन्ह दाखवत असलं तरी कंट्रोल युनिटमध्ये मात्र नोंद वेगळ्या मताची होऊ शकते.

त्यासाठी त्या व्हीव्हीपॅटला वेळेनुसार वेगळं वर्तन करण्याचे आदेश देणारे प्रोग्राम दिले जाऊ शकतात. व्हीव्हीपॅट मशीन सकाळी सामान्यपणे वागणूक करेल आणि दुपारी ती मतनोंदणी करताना गोंधळ घालून पुन्हा संध्याकाळी सामान्यपणे वागणूक करण्याचे आदेश त्या व्हीव्हीपॅटला दिले जाऊ शकतात, हे जाणकारांनी अनेकदा नोंदवलं आहे. जगताप त्याचबद्दल बोलताना दिसले.

व्हीव्हीपॅटमध्ये दाखवलेली मतं आणि कंट्रोल युनिटनं मोजलेली मतं सारखीचं आहेत, हे तपासण्यासाठी कायद्यानुसार काही व्हीव्हीपॅट आणि कंट्रोल युनिटची मतं जुळवून पाहिली जाणं अपेक्षित आहे. मात्र आयोगानं अद्याप कोणत्याही निकालानंतर ही जुळवणी केलेली नाही.