India

पुणे: मावळ आणि शिरूरमध्ये आज पूर्वाश्रमीच्या मित्रांची लढत

दोन मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी आणि शिवसेना वि. शिवसेना.

Credit : इंडी जर्नल

 

आज मतदान झालेल्या पुणे जिल्ह्यातील तीनपैकी दोन मतदारसंघात राज्यातील फूट पडलेल्या दोन पक्षांमधील उमेदवारांमध्येच आमनेसामने लढत झाली. मावळमधील लढत शिवसेना विरुद्ध शिवसेना तर शिरूरमध्ये लढत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी झाली. या लढतीत स्थानिक प्रश्नांसोबत पक्षांमध्ये झालेल्या फुटीचा मुद्दा महत्त्वाचा ठरला आहे.

शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे विद्यामान खासदार अमोल कोल्हे विरूद्ध शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केलेले माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्यात लढत झाली. २०१९ मध्येदेखील याच दोन्ही उमेदवारांमध्ये लढत झाली होती. शिवाजीराव अढळराव पाटील २०१९ मध्ये त्यावेळी एकत्र असलेल्या शिवसेनेच्या तिकीटावर लढले होते. २०२४ मध्ये महायुतीनं ही जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला दिली. अजित पवारांकडून अमोल कोल्हेंना त्यांच्या बाजूनं आणण्याचे बरेच प्रयत्न झाले, मात्र कोल्हेंनी अजित पवारांना डावलून शरद पवारांची साथ कायम ठेवल्यानं अजित पवारांनी कोल्हेंचा पराभव करण्याचा एक प्रकारे विडा उचलला आहे.

मात्र कोल्हेंच्या विरोधात कोणता चांगला उमेदवार न मिळाल्यानं अजित पवारांना शेवटी शिवसेनेतुन आलेल्या पाटलांना टिकीट द्यावं लागलं. २०१९ मध्ये पराभव झाल्यानंतर पाटलांनी त्यांचा जनसंपर्क कायम ठेवला आहे, त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत मिळेल, असं शिरूरमधील मतदार आणि अखिल भारतीय किसान सभेसशी निगडित कार्यकर्ते अविनाश गवारी सांगतात. तर अमोल कोल्हे यांनी केलेल्या कामांपेक्षा शरद पवारांबद्दलची सहानुभूती कोल्हेंना सहकार्य करेल असा अंदाज जाणकार लावतात. थोडक्यात एका बाजूला पक्षाच्या जेष्ठ नेत्याबद्दल असलेली सहानुभुती तर दुसऱ्या बाजूला उमेदवाराचा मतदारांशी असलेला संपर्क आणि स्थानिक राजकारण्यांचा सहभाग हे मुद्दे या लढतीत निर्णायक ठरणार आहेत.

त्याचजागी मावळ मतदारसंघात यावेळी शिवसेनेच्या शिंदे गटाचे विद्यामान खासदार श्रीरंग बारणे विरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पाटील अशी लढत आहे. वाघेरे स्वतः डिसेंबरपर्यंत अजित पवारांसोबत होते. राष्ट्रवादीत असताना ते पिपंरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौरदेखील राहिले आहेत. मात्र 'देशात वाढती महागाई, बेरोजगारी आणि सांविधानिक संस्थांची अवहेलना या सारख्या विषयांनी त्रस्त होऊन' त्यांनी डिसेंबर महिन्यात शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केल्याचं ते सांगतात.

 

 

मात्र अजित पवार गट महायुतीत आल्यानंतर मावळमधून पुन्हा बारणे यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता होती आणि वाघेरेंना राष्ट्रवादीकडून लोकसभा लढवण्याची संधी मिळणार नसल्याचा अंदाज आल्यानं त्यांनी पक्ष बदलला, अशी शक्यता जाणकार व्यक्त करतात. बारणे यांनी २०१९ मध्ये अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यांना पराभूत केलं होतं. २०१४ मध्ये बारणेंनी याच मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे लक्ष्मण जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राहूल नार्वेकर यांचा पराभव केला होता. तर २००९ मध्ये शिवसेनेच्या गजानन बाबर यांनी मावळ लोकसभा मतदार संघावर शिवसेनेचा झेंडा फडकावला होता.

मावळ लोकसभेतील स्थानिक नागरिकांशी चर्चा केली असता ही लढत शिवसेना विरुद्ध शिवसेना कमी आणि तर बारणे विरुद्ध वाघेरे आणि हिंदुत्व व राष्ट्रवाद अशा मुद्द्यांनी प्रभावित असल्याचं जाणवून येतं.

मावळ आणि शिरूर हे दोन्ही मतदारसंघ क्षेत्रफळाच्या दृष्टीनं बरेच लांबवर पसरलेले आहेत. शिरूर मतदारसंघ पुण्याच्या पुर्वेकडून उत्तरेपर्यंत पसरला आहे. त्यात हडपसर, शिरूर, आंबेगाव, जून्नर, भोसरी आणि खेड-आळंदी असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. तर मावळमध्ये पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ तर रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत आणि उरण या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.

शिरूरमधील पुर्व हवेली आणि शिरूर तालूका मिळून तयार होणारा शिरूर विधानसभा मतदारसंघ आहे. बारामती लोकसभा मतदार संघाच्या सीमेशी या मतदार संघाची सीमा जोडली असल्यानं या भाग पहिल्यापासून राष्ट्रवादीचा गढ मानला जातो. मात्र राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटीनं इथल्या मतदारांना अडचणीत आणलं आहे.

"इथं दोघही चुरस आहेत कोणी कोणाला कमी नाही. गावातले सगळे कट्टर राष्ट्रवादी समर्थक होते, पण राष्ट्रवादीचे दोन भाग झाले आहेत. मग शरद पवार गटाकडे पळावं की अजित पवार गटाकडे पळावं अशी लोकांची धांदल उडाल्यामुळे निश्चितपणे काही सांगता येत नाही. बहुतांशी लोकं जुन्या विचारांची असल्यामुळे तुतारीकडे पळण्याचे संकेत आहेत," पूर्व हवेलीच्या खामगाव टेक गावातील मनोज कांबळे सांगतात.

तर खामगाव टेकच्या शेजारी असणाऱ्या टिळेकरवाडीमध्ये मात्र मतदार मात्र तुतारीच्या बाजूनं कौल देतील अशी शक्यता मनोज व्यक्त करतात, "अजित दादांकडून या भागाकडे पुरेस लक्ष देण्यात आलं नाही आणि त्यात सध्याचे आमदार अशोक पवार यांनी या भागाच्या विकासाची बरीच काम केल्यामुळे लोकं तुतारीचं बटण दाबण्याची शक्यता आहे."

 

 

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत शिरूरच्या लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघांपैकी फक्त एका मतदारसंघात भाजपचा आमदार निवडून आला होता, तर इतर पाचही आमदार राष्ट्रवादीचे होते. त्यानंतर या राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर चार आमदारांनी अजित पवारांची साथ दिली आहे. तर शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी शरद पवारांसोबत आहेत. त्याचा फायदा कुठेतरी शरद पवार गटाला होत आहे.

बारामती आणि शिरूरच्या सीमेवर असणाऱ्या ऊरुळी कांचन गावात मात्र दोन्ही उमेदवारांबद्दल नाराजी असल्याचं युवा व्यावसायिक पियुष लुंकड सांगतो. शिरूर लोकसभेत दोन वेळा खासदार म्हणून निवडणून आलेले माजी खासदार यांच्यावर पूर्व हवेलीकडे आणि शिरूरकडे दुर्लक्ष करण्याचा आरोप सातत्यानं झाले आहेत. तर अमोल कोल्हे यांनीही खासदार झाल्यानंतर ऊरुळी कांचनला भेट दिल्याचं त्याला आठवत नसून त्यात राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीचा परिणाम गावाच्या राजकारणात दिसत असल्याचं पियुष सांगतो.

पुण्याच्या दुसऱ्या बाजूला मावळच्या लढतीत हिंदूत्व हा एक महत्त्वाचा मुद्दा असणार असल्याचं मुक्त पत्रकार प्रणव पाटील सांगतात. "मावळ मतदार संघ खूप मोठा आहे, तो घाटाखाली पण आहे. घाटाखाली जी मतं आहेत ती दोन विभागात विभागली आहेत. खोपोली भागात शेतकरी कामगार पक्ष आणि कर्जतमध्ये शिवसेनेला पाठींबा मिळतो. पण त्या लोकांचं म्हणण आहे की त्यांचा उमेदवार कधी देत नाहीत, यावेळी खाली वंचित बहुजन आघाडीच्या म्हणून उमेदवार आहेत तर त्या भागातील मतं त्यांना मिळण्याची शक्यता आहे पण जास्त मतदार हे घाटावरती आहेत," मावळ मतदारसंघाची माहिती प्रणव देतात.

मावळची लढत तिहेरी असणार आहे. प्रणव यांनी उल्लेख केलेल्या माधवी जोशी यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार आहेत. त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून या जागेवर उमेदवारी हवी होती. पण ही जागा उद्धव ठाकरे गटाला गेल्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून टिकीट मिळवलं.

"त्यानंतर घाटावरचा लोणावळा आणि तळेगावचा भाग हा कट्टर हिंदुत्ववादी पट्टा आहे. पिंपरी चिंचवडचा काही भाग राष्ट्रवादी काँग्रेस आणि काही भाग हा भाजप शिवसेनेचा आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा बारणे यांना असल्यानं ही लढत चुरस नाही," प्रणव पुढं सांगतात. उद्धव ठाकरेंना मावळमध्ये कोणत्याही प्रकारची सहानुभूती नसल्याचंही त्यांचं मत आहे.

पिंपरी चिंचवडचे कामगार नेते दिलीप पवार यांनीही उद्धव ठाकरेंबद्दल मावळ मध्ये खूप पुर्वीपासून नाराजी असल्याचं सांगितलं. "उद्धव ठाकरेंनी २०१९मध्ये भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केलं हे लोकांना मान्य नव्हतं. जनतेनं त्या दोघांना मिळून (शिवसेना आणि भाजप) सत्तेत आणलं होतं, पण उद्धव ठाकरेंनी जो उद्योग केला, त्याचे गंभीर पडसाद दोन अडीच वर्षांनी त्यांना पहायला मिळाले. तो इतकाही काळ लागला नसता, पण कोरोनाचा दोन वर्षाचा काळ होता म्हणून ते जरा जास्त काळ बचावले," ठाकरेंचा पक्ष भाजपनं फोडल्याचा आणि बारणेंनी शिंदे गटात प्रवेश केल्याचा राग पिंपरी चिंचवडच्या नागरिकांमध्ये दिसतो का, असा प्रश्न केल्यावर पवार उत्तर देतात.

 

पिंपरी चिंचवड हे उद्योगांच शहर आहे. या शहरात कामगारांचीही मोठी संख्या आहे.

 

पुढं प्रणव यांनी पिंपरी चिंचवडच्या लोकसंख्येच्या रचनेचा फायदा बारणेंना होऊ शकतो, असा अंदाज लावला. "वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव आणि आजूबाजूचा सर्व भागात बाहेरून आलेली लोक जास्त आहेत आणि हे सगळे मोदींना पाठिंबा देतात. त्यानंतर आयटी कंपन्यांमध्ये जाणारे लोक ८० टक्के आहेत, त्यांची लोकसंख्या २ लाखांच्या आसपास आहे. त्यांच्यासाठी स्थानिक पक्ष इतके महत्त्वाचे ठरत नाहीत त्यांना केंद्रीय पक्ष जास्त आकर्षक वाटतात. त्याचा फायदा बारणे यांना होईल," प्रणव सांगतात.

त्याचवेळी पिंपरी चिंचवड हे उद्योगांच शहर आहे. या शहरात कामगारांचीही मोठी संख्या आहे. मोदी सरकारनं कामगार कायद्यात केलेल्या बदलांचा त्यांना परिणाम भोगावा लागणार आहे आणि पिंपरी चिंचवडचे कामगार वाघेरेंच्या बाजूनं ताकदीनं उभे असल्याचं दिलीप पवार सांगतात.

त्याचवेळी शिरूरमध्ये चित्र वेगळं असल्याची जाणीव होते. २०१९मध्ये या लोकसभा निवडणुकीत ही लढत राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे विरुद्ध दोन वेळचे खासदार अढळराव पाटील अशी होती. टिव्ही मालिकांवर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची भुमिका करणाऱ्या अमोल कोल्हेंना त्या निवडणुकीत ५८ हजार मतांनी विजय मिळाला होता. अनेक राजकीय विश्लेषक एक लाखांहून कमी मताधिक्यांनी मिळालेला विजय हा सुरक्षित विजय मानत नाही. यावेळीदेखील त्यांना निसटता विजय मिळेल, असं दिसतं. त्यामागचं कारण म्हणजे शरद पवारांबद्दल असलेली सहानुभूती. या सहानुभूतीमुळे कोल्हेंनी केलेल्या चुका मतदारांनी माफ केल्याचं त्यांच्याशी बोलल्यानंतर दिसून येतं.

काही नागरिकांनी अमोल कोल्हे यांनी निवडणुकीनंतर मतदारांना भेट दिली नसल्याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी आहे. मात्र केशवनगरचे रहिवाशी असलेले एक उद्योजक ज्यांचा दोन्ही गटांशी चांगला संबंध असल्यामुळे नाव छापण्याची परवानगी देत नाहीत ते सांगतात की अमोल कोल्हे यांनी केलेल्या विकास कामांचा आणि शरद पवारांबद्दल असलेल्या आदराचा फायदा कोल्हेंना होईल.

"अमोल कोल्हे यांनी केलेलं समाजाचं राजकारण, त्यांनी केलेली विकासाची कामं, अढळरावांबद्दलचा राग आणि शरद पवारांबद्दलची सहानुभुती याचा अंदाज घेता अमोल कोल्हे लागतील," ते सांगतात. त्यांच्याप्रमाणे मांजरी, केशवनगर आणि मुंढवा भागातील अनेक नागरिकांनी त्यांचं मत कोणाला जाणार हे स्पष्ट केलं.

शिरूर लोकसभा मतदारसंघ पुण्याच्या उत्तरेला असलेल्या आंबेगाव, जून्नर, भोसरी आणि खेड-आळंदी विधानसभांमध्ये प्रवेश करतो. हा प्रदेश आढळरावांचा प्रभावाचा पट्टा आहे. २०१९ नंतर पराभव झाल्यानंतर आढळरावांनी या भागात त्यांचा जनसंपर्क सुरू ठेवला आणि त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो असं सामाजिक कार्यकर्ते अविनाश गवारी सांगतात.

"शिरूर लोकसभेसाठी मुख्य दोन उमेदवार मिळून साधारणपणे ३० उमेदवार यावेळी लढत आहेत, मात्र इतरांना काही मताधिक्य नाही. त्यामुळे ही लढत कोल्हे विरुद्ध अढळराव अशी असणार आहे. आमच्या भागात मतदारांशी चर्चेत स्पष्ट कौल दिलेला नाही, दोघांकडे काही प्लस पाॅइंट आहेत आणि काही मायनस पॉइंट आहेत. पाटील जेव्हा २०१९ पडले तेव्हापासून ते मतदारसंघामध्ये फिरत होते. अमोल कोल्हे निवडून आले पण ते इकडे जास्त आले नाहीत. पण त्यांनी वेगवेगळी काम केली आहेत. आता सध्या ते पवार साहेबांसोबत आहेत आणि लोकांच्या मनामध्ये पवार साहेबांबद्दल सहानुभूती आहे," गवारी सांगतात.

 

 

गवारी आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील रहिवाशी असून सध्या दिलीपराव वळसे पाटील तिथं आमदार आहेत. राष्ट्रवादीची फूट झाल्यानंतर वळसे यांनी अजित पवारांची साथ दिली, त्याबाबत मतदारांमध्ये काही अंशी नाराजी असल्याचं गवारी सांगतात. "वळसे पाटलांना शरद पवारांनी त्यांचा मानसपुत्र मानलं होतं. जेव्हा कधी राष्ट्रवादी सत्तेत आली तेव्हा त्यांना मंत्रीपद दिलं जात होतं. पण एवढ सगळ असताना त्यांनी पवारांची साथ सोडली आणि अमोल कोल्हे यांनी पवारांची साथ सोडली नाही, म्हणून कोल्हेंसोबत नागरिकांची सहानुभुती आहे."

"पाटील जोपर्यंत शिवसेनेत होते तोपर्यंत त्यांना काही शिवसैनिकांचा पाठिंबा होता. मात्र पाटलांनी पक्ष बदलल्यानंतर काही शिवसैनिकांनी पाटलांची साथ सोडली. २०१९मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आढळरावांनी त्यांच्या मतदारसंघात त्यांचा संपर्क वाढवला होता, त्याचा फायदा त्यांना होईल पण शिवसेना आणि राष्ट्रवादीत झालेल्या फूटीचा आणि पक्ष बदलल्याचा फटका त्यांना बसू शकतो. तर या भागात बैलगाडा शर्यत हा एक भावनिक मुद्दा असून त्यात आढळराव पाटलांची भूमिका पाहता त्याचा फायदा होऊ शकतो," असं गवारी पूढं सांगतात.

पण त्या भागात राहणाऱ्या सर्वांना कोल्हेंना कोणती आघाडी असल्याचं वाटत नाही. आढळरावांचा जनसंपर्क आणि या भागात बहुतांश आमदार राष्ट्रवादीचे असल्याचा फायदा आढळरावांना मिळू शकतो, असं आंबेगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते निलेश साबळे यांना वाटतं. "केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा फायदा इथल्या आदिवासी नागरिकांना झाला आहे, त्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी नागरिकांना स्थानिक नेत्यांची मदत झाली आणि हा मतदानावर प्रभाव टाकणारा एक महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे," साबळे सांगतात.

साबळे यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या भागात काही ठिकाणी शरद पवारांबद्दल सहानुभुती आहे आणि ती नाकारली जाऊ शकत नाही. मात्र ती काही ठिकाणी असून संपुर्ण तालुक्यात अशी कोणती लाट आहे, असं म्हटलं जाऊ शकत नाही, असंही ते सांगतात.

शिवाय पक्ष फुटल्याचा एक वेगळा दुष्परिणाम शरद पवार गटाला भोगाला लागत असून नक्की त्या भागातील वेगवेगळ्या भागातील समुहातील नक्की कोणत्या नेत्यांना भेटावं याबद्दल शरद पवार गट अनभिज्ञ असल्याचं साबळे सांगतात.

ज्याप्रमाणे शिरूरमध्ये एकप्रकारे शरद पवारांचा दबदबा दिसतो. तसाच दबदबा अजित पवारांचा पिंपरी चिंचवडमध्ये होता. मात्र गेल्या काही वर्षांत भाजपकडून त्यांना तिथं चांगलं आव्हानं दिलं गेलं. राष्ट्रवादीच्या बऱ्याच जुन्या नगरसेवकांनी पुर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता, त्यानंतर राहिलेले नगरसेवकही अजित पवारांच्या बाजूनं होते. त्यामुळे राष्ट्रवादीची सर्व ताकद ही अजित पवारांकडे आहे. त्यांनी महायुतीत प्रवेश केल्याचा फायदा बारणेंना होऊ शकतो.

मात्र ज्या अजित पवारांवर अनेक वर्ष भाजपकडून भ्रष्टाचाराचा आरोप होत होता, त्याच अजित पवारांना सत्तेत घेतल्याचा राग भाजपच्या मतदारांमध्ये असल्याचं दिलीप पवार सांगतात. चिखलीस्थित एका पत्रकारानं दिलेल्या माहितीनुसार दोन्ही बाजू चांगल्या जोरात असल्यानं काही अंदाज लावता येत नाही. मतदारांनी नक्की कोणाला मत दिलं हे कळण्याचा काही मार्ग नाही. ते मतदानाला येताना दोन्ही पक्षांच्या बुथवर जाऊन भेटतात आणि मतदान झाल्यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या हातात हात देऊन त्यांना मत दिलं असं सांगत आहेत, त्यामुळे खरं कळण्यास काही मार्ग नाही, पत्रकार नाव न छापण्याच्या अटीवर माहिती देतात. त्यांनीही उद्धव ठाकरें बाबत कोणतीही सहानुभूती नसल्याचं सांगितलं.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे देहू शहर संघटक राजेंद्र काटे यांनी मात्र शिवसेनेच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. त्यांनी उद्धव ठाकरेंबाबत नागरिकांमध्ये सहानुभूती असल्याचं सांगितलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सांघवीतील सभेला नागरिकांनी मोठ्याप्रमाणात सहभाग घेतला होता, असं ते सांगतात. त्याचसोबत बारणे यांनी गेल्या दहा वर्षांत विकासाचं कोणतंही काम केलं नसल्याचं म्हटलं.

 

शिरूर लोकसभा मतदारसंघांत भोसरी आणि हडपसरसारखे शहरी भाग, पूर्व हवेली, लोणी, राजगुरूनगर सारखे निमशहरी भाग आणि शिरूर, आंबेगाव आणि जून्नर सारखे ग्रामीण भागदेखील आहेत.

 

शिरूर लोकसभा मतदारसंघांत भोसरी आणि हडपसरसारखे शहरी भाग आहेत. तर पूर्व हवेली, लोणी, राजगुरूनगर सारखे निमशहरी भाग आणि शिरूर, आंबेगाव आणि जून्नर सारखे ग्रामीण भागदेखील या मतदारसंघात आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या स्थानिकांचे प्रश्न वेगळे आहेत. केशवनगर, हडपसर, मुंढवा सारख्या शहरी भागात अजूनही रस्ते आणि इतर नागरी सुविधांवर मतदार त्रस्त आहेत. तर शहरापासून दूर जायला लागल्यावर स्थानिकांचे प्रश्न शेतीकडे अधिक झुकतात.

खेड-आळंदी भागातील स्थानिक पत्रकार ज्यांनी त्यांच नाव छापण्याची परवानगी दिली नाही, त्यांनी सांगितलं की त्यांच्या भागात अमोल कोल्हे यांना चांगला प्रतिसाद लाभत आहे. "लोकं सांगताना आढळराव सांगतात तर मत मात्र कोल्हेंना देणार आहेत. आढळरावांनी १५ वर्ष काही मोठं काम केलं नाही. कोल्हेंना फक्त पाच वर्ष संधी मिळाली आहे, पाच वर्षात ते काय काय करणार अशी चर्चा नागरिक करत आहेत," पत्रकार सांगतात.

शिवाय कोल्हेंनी काम चांगलं केलं आहे मात्र त्याचा प्रचार करायला ते कमी पडले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तसंच पवारांबद्दलची सहानुभुतीची लाटदेखील यात एक निर्णायक मुद्दा ठरेल, असं ते सांगतात. त्यांच्या अंदाजानुसार ही एक चुरशीची लढत असेल, मात्र कोल्हे या नक्की विजयी होतील.

राष्ट्रवादीचे पुणे शहराचे अध्यक्ष यांनी मात्र त्यांचे उमेदवार जिंकून येतील असा विश्वास व्यक्त केला, "सध्याचे जे खासदार आहेत, त्यांनी पाच वर्षात लोकांशी संपर्क ठेवलेला नाही. लोकांच्या अडीअडचणीला ते तिथं नव्हते. त्यामुळे जनतेत त्यांच्याबद्दल नाराजी होती आणि आहे. आमचे उमेदवार त्यांनी नागरिकांसोबत सतत संपर्क ठेवला आहे. याचा आम्हाला निश्चित फायदा होईल. शिवाय राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला तर अडकलेली विकासाची कामं पूर्ण होतील असा जनतेला विश्वास आहे."

त्याचवेळी त्यांनी सहानुभुतीवर विकास कामं होत नाहीत याची जाणिव मतदारांना आहे, त्यामुळे ते त्यांच्या उमेदवाराला मत देतील आणि आढळराव पाटील हे पुर्वी राष्ट्रवादीचे नेते होते, त्यामुळे पक्ष बदलल्याचा कोणताही दुष्परिणाम त्यांना भोगावा लागणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तर शिवसेनेच्या शिंदे गटाचे युवासेनेचे सचिव किरण साळी यांनीही मावळमध्ये त्यांच्या उमेदवाराच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला ,"ज्या मोदी साहेबांच्या नावावरती मतं घेतली आणि त्या मतांच्या जोरावरती (शिवसेनेचे) आमदार निवडून आले. परत त्यांच्याशीच गद्दारी केली अशांना मावळची जनता धडा शिकवेल. जसे मोदीसाहेब म्हणाले होते की त्यांची डुप्लिकेट शिवसेना आहे. खरी शिवसेना ही हिंदुत्वाची पाईक होती, काँग्रेसची नव्हती. त्याच्यामुळे मावळचे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकवणार म्हणजे फडकवणार."

"शिवाय संसदरत्न बारणे यांचं संसदेत जे काम आहे किंवा मतदारसंघात त्यांचं जे काम हे ते इतक्या उत्कृष्ठ पातळीच आहे, आणि लोकसभेमध्ये कसा प्रतिनिधी असावा, याच आदर्श उदाहरण बारणे यांनी उभं केलं आहे. त्यामुळे पुर्ण मावळची जनता त्यांच्या बाजूनं उभी राहिलं," साळी पुढं सांगतात.