India

महात्मा फुलेंच्या जन्मदिनी फुलेवाड्यात लहान-मोठ्यांची गजबज

यंदाच्या महात्मा फुले जयंतीचं आयोजन पहिल्यांदाच लोकसेवा प्रतिष्ठानानं केलं होतं.

Credit : Rakesh Nevase/Indie Journal

 

वैचारिक चर्चांमध्ये दंगलेले नागरिक, पुस्तकांच्या स्टॉलवर पुस्तकं चाळणारे वाचक, फुले वाड्याला कुतूहलानं बघणारे महात्मा फुलेंचे अनुयायी आणि मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी गडबड करणारी चिल्लीपिल्ली असं काहीसं चित्र मंगळवारी (११ एप्रिल) महात्मा फुले जयंतीनिमित्त महात्मा फुले वाड्यामध्ये पाहायला मिळालं. 

यंदाच्या महात्मा फुले जयंतीचं आयोजन लोकसेवा प्रतिष्ठानानं केलं होतं. "नाचून जयंती साजरी करण्यापेक्षा वाचून जयंती साजरी करण्याच्या विचार करून, लाखो रुपये डीजेवर खर्च करण्यापेक्षा लोकांच्या पोटात गेले पाहिजेत या उद्देशानं आम्ही वेगळ्या पद्धतीनं ही जयंती साजरी करत आहोत," या जयंतीचं वेगळेपण सांगताना प्रतिष्ठानातील संयोजक राकेश साळवे सांगतात. 

साळवे यांचा आठ वर्षाचा मुलगा आदित्य यानं जयंतीत सहभागी होताना महात्मा फुलेंची वेशभूषा साकारली होती. या छोट्या महात्मा फुलेंसोबत फोटो काढण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही. 

समाज प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचं निर्मूलन आणि स्त्रिया व मागासवर्गीय जातीच्या लोकांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहचवण्याचं काम करणाऱ्या महात्मा फुलेंची पुण्यतिथी या फुले स्मारकात साजरी केली जात होती परंतु या प्रकारे जयंती याआधी कधीच साजरी झाली नव्हती, अशी खंत महात्मा फुलेंच्या पाचव्या वंशज नीता होले-फुले यांनी व्यक्त केली. शिवाय जयंतीचं आयोजन करणाऱ्या प्रतिष्ठानाचं अभिनंदनही त्यांनी केलं.

 

सर्व फोटो: राकेश नेवसे

 

"२८ नोव्हेंबर १८९० साली त्यांनी पुण्याच्या गंज पेठेतील फुले वाड्यात त्यांचा देह ठेवला. त्यानंतर या फुले वाड्याचं रूपांतर महात्मा फुले स्मारकात करण्यात आलं. मात्र जयंतीच्या काळात नगरसेवक, आमदार आणि काही अनुयायी सोडले तर जास्त कोणी जयंतीनिमित्त फुले वाड्याला भेट देत नसतं," पेठेतील स्थानिक रहिवासी तेजस माने म्हणतात.

महात्मा फुले यांची कर्मभूमी असलेल्या पुण्यातील अनेक लोकांनासुद्धा या वास्तूची माहिती नसते. महात्मा फुलेंच्या कामाबद्दल त्यांच्या स्मारकाबद्दल अधिकाधिक लोकांना माहित व्हावं, समाजातील सर्व घटकांना एकत्र येण्याची संधी मिळावी, विचारांची देवाण घेवाण व्हावी हा ही जयंती साजरी करण्यामागचा उद्देश आहे, लोकसेवा प्रतिष्ठानचे श्रीधर चव्हाण सांगतात. 

जयंती साजरी करताना वेगळा उपक्रम म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेतून ३७ मुलांनी महात्मा फुलेंचं व्यक्तिचित्र रेखाटलं. तिथं आलेल्या सर्वांना या व्यक्तीचित्रांचं कुतूहल होतं. "ही काही कोणती स्पर्धा नाही, महात्मा फुलेंप्रती असलेला आदर दाखवण्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांनी त्यांचं व्यक्तिचित्र काढलं आहे," विद्यार्थ्यांसोबत आलेले शिक्षक म्हणाले.

महात्मा फुलेंच्या घरात त्यांचं आणि सावित्रीबाई फुले यांचं मोठं व्यक्तिचित्र आकारलं आहे. त्यांच्या बाजूला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सुद्धा एक प्रतिमा आहे. जयंती निमित्त आलेले अनेक जण फुलेंप्रती आदर व्यक्त करताना त्यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होतं होते. 

 

 

ज्योतीराम माळी खास जयंती निमित्त सोलापूरहून पुण्यात आले होते. "आज क्रांतीसूर्य जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त मी पुण्यात आलो आहे. फुलेंनी केलेलं मार्मीक लिखाणातून अस्पृश्य समाजाचं शोषण सर्वांसमोर मांडलं. त्यांच्या या लिखाणातून मी खूप प्रभावित आहे. त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहचावे म्हणून मी वाढदिवसावेळी अनेकांना त्यांचं एखादं पुस्तक भेट देत असतो," महात्मा फुलेंच्या घरात असलेली माहिती वाचता वाचता माळी म्हणतात.

फुले वाड्यात आंबेडकरी चळवळीशी संबंधित पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले होते. नागपूरहून शिक्षणासाठी पुण्यात आलेला प्रणव अंबुस्कर वेगवेगळी पुस्तकं चाळता चाळता म्हणतो, "मी गेली तीन वर्ष पुण्यात राहत आहे. बऱ्याच वेळा या वाड्याला भेट द्यायचा विचार मनात आला पण कधी शक्य झालं नाही. आज जयंतीचा योग साधला आणि इथं आलो. महात्मा फुलेंनी बहुजनांसाठी केलेलं काम खूप जास्त आहे. ते सांगायला अख्खा दिवस पुरणार नाही. आज ही पुस्तकं मी वाचू शकतो त्यात पण महात्मा फुलेंचं योगदान आहे."