Mid West

हेजबोल्लावरील पेजर हल्ला चाणाक्ष हल्ला की दहशतीचं नवं साधन

या हल्ल्याला सप्लाय चेन म्हणजेच पुरवठा साखळी हल्ला, असंही म्हटलं जात आहे.

Credit : इंडी जर्नल

 

लेबनॉनमधील हेजबोल्ला या अतिरेकी संघटनेच्या सदस्यांवर हल्ला करण्यासाठी इसरायलनं एका वेगळ्या पद्धतीचा वापर केला, ज्यात ३००० हून अधिक जण जखमी झाले, तर ९ जणांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये २ लहान मुलांचाही समावेश आहे. या हल्ल्यासाठी पेजर या एका संवादाच्या यंत्राचा वापर केला असल्यानं याला २१ व्या शतकातील युद्धनीती म्हणायचं की दहशतवादाचा प्रकार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या हल्ल्याला सप्लाय चेन म्हणजेच पुरवठा साखळी हल्ला, असंही म्हटलं जात आहे.

लेबनॉनमधील हेजबोल्ला या संघटनेला अमेरिका आणि युरोपीय युनियननं दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केलं आहे. गेल्या काही या संघटनेचे सदस्य एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी पेजरचा वापर करतात. लेबनॉनच्या स्थानिक वेळेनुसार काल दुपारी तीनच्या सुमारास हेजबोल्लाकडून वापरल्या जाणाऱ्या पेजर्समध्ये स्फोट झाले.

जगात मोबाईलचा वापर वाढण्यापूर्वी बहुतांश नागरिक पेजरचा वापर करत असत. अगदी २०२२ पर्यंत पेजर तंत्रज्ञानाचा वापर काही ठिकाणी होत होता. मात्र आता या यंत्राचा वापर बऱ्यापैकी कमी झाला आहे आणि त्याचं अस्तित्व जवळजवळ संपुष्टात आलं आहे. मुख्यत्वे १९९० ते २००० च्या काळात या यंत्राचा वापर लोकं एकमेकांना संदेश पाठवण्यासाठी वापर करत होते. यातून अतिशय छोटे आणि मर्यादित स्वरुपाचे संदेश पाठवले जाऊ शकतात. इसरायलची गुप्तचर यंत्रणा 'मोसाद'नं मोबाईल नेटवर्क यंत्रणेत बऱ्यापैकी शिरकाव केला असल्यानं हेजबोल्लानं या यंत्राचा वापर सुरू केला.

 

 

हेजबोल्लानं तैवान-स्थित गोल्ड अपोलो या कंपनीला पेजर्स बनवण्यास सांगितलं. पेजर आकारानं अत्यंत छोटे असतात आणि त्यात अतिशय लहान बॅटरी दिलेली असते.

हेजबोल्लाकडून वापरले जाणारे पेजर काही महिन्यांपूर्वीच बनवले असल्यानं त्यांच्या बॅटरीत कोणता मोठा दोष असेल, असं वाटत नाही. त्यातही जर या पेजर्समध्ये कोणता दोष होता, असं मान्य केलं तरी ते एकाच वेळी इतके पेजर्स एकसाथ फुटणं, हा निव्वळ योगायोग असू शकत नाही. त्यामुळं या घटनेमागे मोसाद असल्याचा आरोप हेजबोल्लानं केला आहे. इसरायलनं अद्याप या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी मोसादच्या काम करण्याच्या क्षमतेची आणि अमानवी मार्गांची माहिती जगासमोर आहेच.

हा हल्ला झाल्यानंतर मोसादनं हेजबोल्लामध्ये शिरकाव केला असल्याचीही चर्चा होत आहे. हेजबोल्ला अशा प्रकारच्या पेजर्सची मागणी करणार आहे, ती मागणी कोणत्या कंपनीकडं करणार आहे, त्या कंपनीकडून बनवल्या जाणाऱ्या पेजर्सपैकी कोणते पेजर्स हेजबोल्लाला दिले जातील, त्यांचं उत्पादन कधी होणार आणि त्यांच्यावर संदेश पाठवण्यासाठी हेजबोल्लाकडून कोणत्या रेडीओ फ्रिक्वेंसीचा वापर केला जाणार आहे, अशी सर्व माहिती आधीच उपलब्ध असल्याशिवाय हा हल्ला शक्य झाला नसता, असं जाणकार नोंदवतात.

या हल्ल्यासाठी मोसादनं किमान ५००० पेजर्समध्ये छोटी स्फोटकं पेरली असावीत, असं म्हटलं जात आहे. आता ती स्फोटकं नक्की कधी पेरली असतील याबद्दलची माहिती अजून समोर आलेली नाही. मात्र प्रत्येक पेजरमध्ये 'पेंटाएरिथ्रिटॉल टेट्रानायट्रेट' नावाचं स्फोटक वापरलं गेलं असल्याचं कळतं. या स्फोटानंतर पेजर तयार करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयात तैवानच्या पोलीसांनी छापा टाकला आहे. मात्र कंपनीच्या मालकानं हे पेजर त्याच्या कंपनीचे असले तरी ते युरोपमधील कारखान्यात तयार करण्यात आले आहेत, असा दावा केला आहे.

 

युद्धक्षेत्राच्या धूसर होणाऱ्या सीमा

सध्या या घटनेनं जगाचं लक्ष २१ व्या शतकातील युद्धाकडं ओढलं आहे. मध्ययुगीन काळापर्यंत तलवारी, भाले आणि बाण ही युद्धातली मुख्य हत्यारं होती. त्यानंतर दारूगोळ्याचा शोध लागल्यानंतर मध्ययुगाच्या शेवटच्या टप्प्यात तोफा आणि बंदुकांचा समावेश सुरू झाला. औद्योगिक क्रांतीनंतर मानवानं अधिक जास्त स्फोटक अशा दारूगोळ्याचा शोध लावला. त्यानंतर तोफा आणि बंदुका हे युद्ध लढण्याचं मुख्य हत्यार ठरलं. पहिल्या विश्वयुद्धात जगानं बंदुका आणि तोफांचा विध्वंस जवळून पाहिला. तर दुसऱ्या महायुद्धात लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र, रणगाडा, पाणबुड्या आणि अण्वस्त्र या सारख्या गोष्टींचा अधिक वापर झाला.

 

मोबाईलमुळं आता युद्ध जास्त वैयक्तिक आणि सूक्ष्म पातळीवर गेलं असल्याचं म्हटलं जातं.

 

या सर्व युद्धांमध्ये दारूगोळा वापरण्याची पद्धत मात्र जूनीच होती. त्यात ज्या ठिकाणी शत्रू आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारूगोळ्याचा वर्षाव केला जात होता. परंतु या पद्धतीत यशाची खात्री नव्हती, शिवाय दारूगोळा मोठ्या प्रमाणात वाया जात होता. त्यानंतर अमेरिका आणि युरोपची एकत्रित लष्करी आघाडी असलेल्या नेटोनं त्यांच्या युद्धनीतीत बदल करणं सुरु ठेवलं. १९९० च्या इराक युद्धात नेटोनं त्यांच्या युद्धनीतीत केलेला मोठा फरक दिसून आला.

या युद्धात अमेरिकेनं तयार केलेल्या ग्लोबल पोजिशनिंग सिस्टमचा वापर केला गेला आणि 'प्रिसीजन स्ट्राईक' म्हणजेच 'अचूक हल्ला' या नव्या युद्धनीतीला सिद्ध करण्यात आलं. यात एखाद्या ठिकाणी स्फोटकांचा वर्षाव करून तो संपूर्ण प्रदेश उद्ध्वस्त करण्याऐवजी फक्त ठरलेल्या लक्ष्यावर अचूक हल्ला करून त्याचा खातमा करायचा, असं या युद्धनीतीचा उद्देश होता. क्षेपणास्त्राला लक्ष्यावर अचूकरित्या केंद्रीत करण्यासाठी जीपीएस, लेझर गायडन्स आणि इतर अनेक पद्धतींचा वापर केला जातो.

मात्र आता युद्ध फक्त रणांगणात लढली जात नाहीत, आताच्या युद्धांना संमिश्र स्वरुप प्राप्त झालं आहे. आजच्या युद्धात मोबाईल एक महत्त्वाचं माध्यम झालं आहे. मोबाईल युगात या युद्धानं आता अचूकतेला नवा आयाम दिला आहे. मोबाईलमुळं आता युद्ध जास्त वैयक्तिक आणि सूक्ष्म पातळीवर गेलं असल्याचं म्हटलं जातं. २०२२ मध्ये अमेरिकेचं संरक्षण मंत्रालय आणि कॉंग्रेसनं एकत्रितपणे स्थापन केलेल्या एका समितीच्या अहवालात याबद्दल अधिक माहिती देण्यात आली आहे.

'स्पेशल कॉम्पिटिटिव्ह स्टडीज प्रोजेक्ट' असं या समितीचं नाव होतं आणि त्यांनी भविष्यातील युद्धाच्या स्वरूपावर भाष्य अहवालात केलं होतं. त्यांच्यानुसार आजच्या जगातील युद्धात एकीकडे स्फोटकं, क्षेपणास्त्र आणि गोळ्यांचा वर्षाव चालू असताना त्याचवेळी देशावर, व्यक्तीवर किंवा संस्थेवर सूक्ष्म आणि अचूक स्वरूपाचे हल्ले देखील वाढतील.

 

 

यात नागरिक, सैनिक किंवा राजकीय नेता वापरत असलेल्या मोबाईल किंवा त्यासारख्या दुसऱ्या एखाद्या माध्यमातून हे वैयक्तिक आणि सूक्ष्म हल्ले होऊ शकतात. हे हल्ले वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतो. त्यात शत्रू देशाच्या महत्त्वाच्या व्यक्तीची बदनामी करणं, त्याच्या खाजगी जीवनाचा वापर त्याच्यावर मानसिक दबाव आणायला करणं, त्याला ब्लॅकमेल करणं, त्याच्यावर सायबर हल्ला करणं, त्याच्या कुटुंबातील लोकांना धमकावणं अशा अनेक प्रकारच्या धोक्यांबाबत या अहवालात चर्चा करण्यात आली होती.

त्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे तुमच्या हातातल्या मोबाईलच्या मदतीनं तुमच्यावर क्षेपणास्त्रानं दागणं किंवा स्फोटकांचा हल्ला करणं शक्य होणार असल्याची भीती या अहवालात व्यक्त केली होती. आता इसरायलनं हेजबोल्लाच्या सदस्यांवर पेजरच्या माध्यमातून केलेला हल्ला हा या युद्धाच्या वैयक्तिकीकरणाचा आणि सुक्ष्मीकरणाचं उदाहरण आहे, असं काही जाणकार आणि निरीक्षक नोंदवतात.

 

पुरवठा साखळीच्या विश्वासाहर्तेवरील प्रश्नचिन्ह

इसरायलनं हिजबुल्लाच्या सदस्यांवर हल्ला करताना त्यांच्या हातात संवादासाठी वापरलं जाणार यंत्र वापरलं. ही एक गंभीर बाब आहे. लेबनॉनमध्ये फक्त हेजबोल्लाचे सदस्यच नाही, तर डॉक्टर्स, परिचारिकासुद्धा पेजर्स वापरतात. त्यांना यात दुखापत झाली असेल तर जबाबदार कोण, असा प्रश्नदेखील आता विचारला जात आहे. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या जगात जवळपास प्रत्येक नागरिकाच्या हातात संवादाचं यंत्र आहे. आपल्या हातात असलेल्या या यंत्राचा स्फोट घडवला जाणार नाही, याची शाश्वती नागरिकांना कोण देणार, आधीच पेगासिस सारख्या घटनांनंतर मोबाईलच्या मार्फत एखाद्या व्यक्तीच्या खाजगी जीवनात कुठपर्यंत हस्तक्षेप केला जाऊ शकतो याचा अंदाज लोकांना आला.

त्यानंतर आता तुमच्या हातातील हे डिवाईस एक जिवंत स्फोटक आहे, या माहितीनं नवा धक्का बसला आहे. शिवाय या यंत्राच्या माध्यमातून फक्त स्फोट घडवला जाऊ शकतो, एवढंच नाही तर रासायनिक किंवा जैविक हल्ला देखील शक्य आहे. एखाद्या मोबाईल निर्मात्या देशानं या प्रकारे मोबाईलचा वापर करून त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना लक्ष्य करायचं ठरवलं तर काय, तसंच ज्यांच्याशी युद्ध करायचं आहे, ते सोडून इतर नागरिकांवर यामुळं हल्ला झाला तर काय, असे अनेक प्रश्न या हल्ल्यानंतर उभे होत आहेत.

 

 

शिवाय ज्या कंपनीनं इसरायलला या पेजर्सचा पुरवठा केला, त्या कंपनीची भूमिकादेखील महत्त्वाची ठरते. सर्व पेजर्समध्ये स्फोटकं लपवण्यात आली होती, त्याची माहिती कंपनीला होती का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. कंपनीच्या मालकानं केलेल्या दाव्यानुसार पेजर ताइवान नाहीतर युरोपातील कारखान्यात तयार झाले होते. जर कंपनीला या प्रकारच्या हल्ल्याची जाणिव होती आणि तरीही त्यांनी हे सर्व घडून दिलं तर हा विक्रेता आणि ग्राहकातील विश्वासाला मोठा तडा देणारी घटना ठरेल. शिवाय यामुळं एकंदरीत सप्लाय चेन व्यापार पद्धतीवर देखील प्रश्नचिन्ह उभं होतं.

यात कंपनीची नक्की काय भूमिका होती याबद्दल चौकशीनंतर माहिती समोर येईल. मात्र तोपर्यंत या हल्ल्याला शत्रू विरोधात इस्राएलनं केलेला अचूक किंवा प्रिसीजन हल्ला न मानता दहशतवादी हल्ला मानावं अशी मागणी ठिकठिकाणी होत आहे. पहिलं विश्वयुद्ध हे सीमेवरती लढलं गेलं होतं, तरीही त्यात लाखो नागरिक आणि सैनिकांना त्यांचा जीव गमवावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या विश्वयुद्धानं सीमा ओलांडत शहरात प्रवेश केला आणि आधीपेक्षा जास्त नागरिक आणि सैनिकांना त्यांचा जीव गमवावा लागला. आता युद्धानं सर्व सीमा ओलांडल्या आहेत आणि ते तुमच्या हातातल्या यंत्रापर्यंत येऊन पोहोचलं आहे.