Asia

बलुचिस्तानचा प्रवास पुर्व पाकिस्तानच्या वाटेनं निघालाय का?

आकारमानानं बलुचिस्तान पाकिस्तानातील सर्वात मोठा प्रांत आहे.

Credit : इंडी जर्नल

 

बलुचिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या विविध फुटीरतावादी हल्ल्यांत सुमारे ७० हून अधिक नागरिक आणि सैनिकांचा जीव गेल्यानंतर काहीच दिवसात बलुचिस्तानचे खासदार अख्तर मेंगल यांनी पाकिस्तानच्या राष्ट्रीय सभेतून राजीनामा दिला. बलुचिस्तानमधील लोकांच्या प्रश्नांबद्दल आणि बलोच नागरिकांचं होणार शोषण थांबण्यात पाकिस्तानला कोणताही रस नाही, असा आरोप मेंगल यांनी केला. गेल्या काही वर्षांत बलुचिस्तानमधील परिस्थिती पाकिस्तानच्या हातातून सुटत चालली आहे आणि त्याच्यावर नियंत्रण कसं मिळवायचं याचा कोणताही अंदाज पाकिस्तानच्या व्यवस्थेला असल्याचं दिसत नाही. त्यामुळं आता बलुचिस्तानचं दुसरं बांगलादेश होणार का, अशी चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे.

आकारमानानं बलुचिस्तान पाकिस्तानातील सर्वात मोठा प्रांत आहे. पाकिस्तानच्या एकूण क्षेत्रफळाच्या ४४ टक्के भाग फक्त बलुचिस्तानात आहे. मात्र या प्रांताची लोकसंख्या अत्यंत कमी म्हणजे फक्त १.५ कोटी आहे. या भागातील मुळ रहिवासी हे वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये विभागले गेले आहेत, त्यात बलोच, पठाण आणि इतर काही महत्त्वाच्या टोळांच्या समावेश होतो. त्यांच्यात अनेक मतभेद आहेत, मात्र गेल्या दोन-तीन वर्षात त्यांच्यातील मतभेद बाजूला ठेऊन या टोळ्या एकत्र येत आहेत.

या प्रांताला पाकिस्ताननं १९४८ मध्ये बळजबरीनं त्यांच्या देशात समाविष्ट केलं आणि तेव्हापासून या भागात अनेकदा काळानं बंड आणि फुटीरता आंदोलनं झाली आहेत. बलुचिस्तानमध्ये १९४८, १९५८ ते १९५९, १९६२ ते १९६३ आणि १९७३ ते १९७७ मध्ये एकूण चार सशस्त्र फुटीरतावादी आंदोलनं झाली आहेत. तर पाचवं आंदोलन २००३ पासून आतापर्यंत सुरू आहे.

 

 

मधली अनेक वर्ष या आंदोलनाची तीव्रता कमी राहिल्यानंतर गेल्या काही काळात या आंदोलनानं पुन्हा जोर धरला आहे आणि त्याचा मोठा झटका पाकिस्तानला २६ ऑगस्ट रोजी पहायला मिळाला. २६ ऑगस्टला बलुचिस्तानच्या फुटीरतावाद्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान ७३ लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला. यात पाकिस्तानी सैनिक आणि काही नागरिकांचा समावेश होता. त्यातही हल्ला करणाऱ्यांनी नागरिकांना लक्ष बनवताना आधी त्यांची ओळख तपासली आणि फक्त पंजाब प्रांतातील नागरिकांना लक्ष केल्याचं विविध वृत्तातून समोर आलं.

२६ ऑगस्ट ही तारीख बलुचिस्तानसाठी महत्त्वाची आहे. या तारखेला २००६ मध्ये बलुचिस्तानचे नेते अकबर खान बुगती यांचा पाकिस्तानी सैन्याच्या कारवाईत मृत्यू झाला. बुगती पाकिस्तानच्या राजकारणात सक्रियरित्या सहभागी होते. त्यांनी कधीच स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी केली नाही. शिवाय त्यांनी बलुचिस्तानचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल म्हणून तर केंद्रात संरक्षण राज्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली होती. त्यांनी बलुचिस्तानला पाकिस्तानच्या व्यवस्थेत योग्य ते स्थान मिळावं, बलुचिस्तानला जास्त सार्वभौमत्व मिळावं आणि बलुचिस्तानच्या संसाधनांवर बलोच लोकांचा पहिला अधिकार असावा म्हणून प्रयत्न केला.

मात्र २००० च्या दशकात तत्कालीन पाकिस्तानी राष्ट्रपती परवेज मुशरफ यांच्याशी झालेल्या वादानंतर त्यांना अज्ञातवासात जावं लागलं. ते अज्ञातवासात असतानाच पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या कारवाईत त्यांचा आणि त्यांच्या अनुयायांचा मृत्यू झाला. त्यानंतर बुगतींचा मृतदेह त्यांच्या गावी नेण्यात आला मात्र त्यांचा कोणालाही त्यांचा मृतदेह पाहण्याची परवानगी दिली गेली नव्हती.

बुगती यांच्या हत्येच्या अठराव्या स्मृती दिनादिवशी फुटीरतावाद्यांची संघटना 'बलोच नॅशनल आर्मी'नं केलेल्या कारवाईत अनेक सैनिक आणि नागरिकांना त्यांचा जीव गमवावा लागला. हे हल्ले बलुचिस्तानमध्ये क्वचित कधीतरी घडत नसून गेल्या चार पाच वर्षात सातत्यानं घडत आहे. पाकिस्तानच्या एका संस्थेनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार यावर्षी फक्त ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानमध्ये सुमारे ६० अतिरेकी हल्ले झाले. त्यातील निम्मे हल्ले बलुचिस्तानमध्ये झाले. या हल्ल्यामध्ये २५० हून अधिकांना त्यांचा जीव गमवावा लागला.

 

 

बलुचिस्तानमध्ये गेल्या काही वर्षांपासून असे हल्ले होणं, ही सामान्य बाब झाली आहे आणि या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच्या नागरिक आणि सैनिकांसोबत चीनी नागरिकांचाही मृत्यू होत आहे. पाकिस्तान आणि चीननं मोठ्या अपेक्षेनं सुरू केलेल्या चीन पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोरचा (सीपीईसी) बराच भाग बलुचिस्तानमधून जातो. त्यामुळं बलुचिस्तानमध्ये मोठ्याप्रमाणात आर्थिक गुंतवणूक चीननं केली आहे.

मात्र त्या आर्थिक गुंतवणूकीचा कोणताही फायदा बलुचिस्तानच्या स्थानिक नागरिकांना झालेला नाही. शिवाय बलुचिस्तानच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचं शोषण पाकिस्तान आणि चीनकडून केलं जात असल्याची भावना बलोच नागरिकांमध्ये आहे. मोठी सागरी किनारपट्टी, भरपूर नैसर्गिक साधनसंपत्ती आणि इतर अनेक गोष्टींचं वरदान लाभलेल्या बलुचिस्तानचा कोणत्याही प्रकारे विकास झालेला नाही. पाकिस्तानमधील शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या सर्वात मागास, दुर्लक्षित आणि प्रचंड गरीब प्रांत म्हणजे बलुचिस्तान आहे.

संपुर्ण पाकिस्तानच्या आर्थिक विकास घडण्याची चमत्कारी शक्ती असलेल्या सीपीईसीचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे ग्वादर बंदरदेखील बलुचिस्तानमध्ये आहे. मात्र त्याचा फायदादेखील बलुचिस्तानच्या सामान्य नागरिकांपर्यंत पोहचलेला नाही. शिवाय बलुचिस्तानमध्ये सोनं आणि तांब्याच्या खाणी आहेत. या खाणी चीन चालवतं. पाकिस्तान आणि चीनमध्ये झालेल्या करारानुसार सोन्याच्या खाणीत निघणाऱ्या एकूण सोन्याच्या ५० टक्के सोनं हे पाकिस्तानच्या केंद्र सरकारला, ४८ टक्के सोनं चीनला तर फक्त २ टक्के सोनं बलुचिस्तानच्या राज्य सरकारच्या तिजोरीत जातं.

 

 

या सर्व गोष्टींसोबतच बलुचिस्तानमधील फुटीरतावाद आणि चीनी नागरिकांवर होणारे हल्ले नियंत्रणात आणण्यासाठीच्या कारवायांमध्ये अनेक बलोच नागरिक बेपत्ता झाले आहेत. त्याची धसधसही बलुचिस्तानच्या नागरिकांमध्ये आहे. अशाच एका बेपत्ता व्यक्तीची मुलगी असलेल्या महरंग बलोच सध्या पाकिस्तानी व्यवस्थेसाठी आव्हानं निर्माण करत आहे. ३१ वर्षीय महरंग शिक्षणानं डॉक्टर आहेत आणि बलुचिस्तानमधील नागरिकांच्या बेपत्ता होण्याबद्दल, मानवाधिकारांच्या हननाबद्दल आणि न्यायबाह्य हत्यांबद्दल सरकार आणि सैन्याला प्रश्न विचारत आहेत.

महरंग बलोच फुटीरतावादाची भूमिका घेत नाहीत, मात्र त्या पाकिस्तानी व्यवस्थेसाठी डोकेदुखी ठरत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी ग्वादर बंदरासमोर बलोच नागरिकांचं मोठं आंदोलन उभं केलं होतं. त्यानंतर यावर्षी त्यांनी बलुचिस्तान ते पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपर्यंत मोर्चा काढला होता. त्या सातत्यानं त्यांचे प्रश्न समाजमाध्यम आणि आंतरराष्ट्रीय माध्यमसंस्थाकडे मांडत आहेत. 

त्यांनी केलेल्या आंदोलनामागे भारतीय गुप्तचर संघटनांचा हात असल्याचं पाकिस्तानच्या माजी काळजीवाहू पंतप्रधानांनी म्हटलं होतं. १९७१ मध्ये पुर्व पाकिस्तान म्हणजेच आजच्या बांगलादेशमध्ये ज्या बाबींमुळे जनसामान्यांचा उद्रेक झाला, त्यासर्व बाबी आता स्पष्टपणे बलुचिस्तानात दिसतात. त्यामुळं आता पाकिस्तानात अजून एकदा फाळणी पहायला मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.