India

झारखंडमध्ये इंडिया आघाडीला बहुमत

इंडिया आघाडीनं झारखंडच्या एकूण ८१ विधानसभा मतदारसंघांपैकी ५७ जागांवर बढत मिळवली आहे.

Credit : इंडी जर्नल

 

महाराष्ट्रात इंडिया आघाडीला धक्का मिळाला असला तरी झारखंडनं मात्र इंडिया आघाडीला दिलासा दिला आहे. झारखंडच्या विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्च्याच्या नेतृत्वात इंडिया आघाडीनं झारखंडच्या एकूण ८१ विधानसभा मतदारसंघांपैकी ५७ जागांवर बढत मिळवली आहे. त्यामुळं झारखंडमध्ये इंडिया आघाडीचं सरकार येणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

भारतीय निवडणूक आयोगानं आज झारखंड आणि महाराष्ट्रासाठी विधानसभा निवडणुकांचा आणि उत्तर प्रदेश, पंजाब, केरळ आणि इतर राज्यांतील विधानसभेच्या पोटनिवडणुकांचा निकाल जाहीर केला. यात महाराष्ट्रात महायुती म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार पुन्हा येणार हे स्पष्ट झालं. झारखंडमध्येही जनतेनं पुन्हा इंडिया आघाडीला सत्ता दिली आहे.

झारखंडमध्ये सध्या सत्तेत असलेल्या हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चानं (जेएमएमनं) यावेळी ४१ जागा लढवल्या होत्या. त्यांचा मुख्य मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसनं ३० जागा, राष्ट्रीय जनता दलानं ६ आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षनं (मार्क्ससिस्ट आणि लेनिनिस्ट) चार जागा लढवल्या होत्या. त्यातील ५७ जागांवर इंडिया आघाडीला बढत मिळवता आली आहे. त्यात ३५ जागांवर जेएमएम पुढं आहे, काँग्रेस १५ जागांवर पुढं आहे, तर आरजेडी चार, तर कम्युनिस्ट पक्ष एका जागेवर आघाडीवर आहे.

 

 

त्यांच्या विरोधात असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) फक्त २३ जागांवर समाधान मानावं लागत आहे. एनडीएचा प्रमुख पक्ष असलेल्या भाजपनं यावेळी ६८ जागांवर उमेदवार उभे केले होते. तर ऑल झारखंड स्टूडंट युनियननं १० आणि जनता दलानं (युनायटेड) दोन तर लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) यांनी एक जागा लढवली होती. भाजपाला २२ जागांवर बढत मिळाली असून त्यांच्या सर्व मित्र पक्षांना एका एका जागेवर समाधान मानावं लागणार असं दिसतं.

भाजपकडून झारखंडमध्ये प्रचारात राज्यात वाढत्या 'घुसखोरांची' संख्या कमी करण्याचं आश्वासन देऊन हिंदू मतांचं धृवीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र जेएमएमच्या आदिवासी प्रतिनिधीत्वाच्या प्रचारासमोर भाजपच्या प्रचाराचा निभाव लागला नाही. मुख्यमंत्री सोरेन यांनी बरहेट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत १७,००० मतांची आघाडी घेतली, मात्र त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांना मात्र अटीतटीच्या सामन्यात मात खावी लागली. हेमंत सोरेन यांना अटक झाल्यानंतर कल्पना सोरेन यांनी पक्षाचा कार्यभार सांभाळला होता.

भाजपचे झारखंड प्रदेशाध्यक्ष बाबूलाल मरांडी यांनीही विजय मिळवला. तर एकेकाळी मुख्यमंत्री असलेले आणि राजीनामा द्यावा लागला म्हणून नाराज होऊन जेएमएम सोडून जाणारे चंपाई सोरेन यांनी सरायकेला विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला.