Mid West
सीरिया असद राजवटीला उलथवण्यापर्यंत कसं पोहोचलं?
१३ वर्षांहून अधिक काळात जे बंडखोरांना जमलं नाही, ते त्यांनी १३ दिवसांच्या आत कसं केलं?
सिरीयाच्या बंडखोरांनी सिरीयाच्या राजधानीवर ताबा मिळवल्यानंतर राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांनी सिरीया सोडून रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये राजाश्रय घेतला आहे. साधारणपणे २०११ मध्ये सिरीयात सुरू झालेल्या या गृहयुद्धात अनेक संघटना आणि देशांनी त्यांचे हितसंबंध जपण्याचा प्रयत्न केला. मात्र १३ वर्षांहून अधिक काळात जे बंडखोरांना जमलं नाही, ते त्यांनी १३ दिवसांच्या आत कसं केलं? आणि यानंतर सिरीयाचं हे गृहयुद्ध थांबण्याची काही शक्यता आहे का?
सिरीयात सध्या काय चाललंय?
सिरीयन बंडखोरांनी सिरीयाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांचा पाडाव केल्यानंतर आता ते सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत आहेत. असदचे पंतप्रधान मोहम्मद जलली यांनी देशाची सत्ता बंडाखोरांच्या हातात देण्याची तयारी दर्शवली असून अबू मोहम्मद अल गोलानीनं सिरियाचे पंतप्रधान आणि उपराष्ट्रध्यक्ष फैजल मकदाद यांची भेट घेतल्याच कळत. या प्रक्रियेसाठी काही दिवस लागण्याची शक्यता असून एचटीएसच्या ताब्यात असणाऱ्या प्रदेशाचे पंतप्रधान मोहम्मद अल बशीर हे सिरीयाच्या काळजीवाहू सरकारचे प्रमुख असतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
२७ नोव्हेंबर २०२४ रोजी सिरीयन बंडखोरांनी अचानक एक मोठी कारवाई सुरू केली आणि सिरीयन सरकारच्या ताब्यात असलेल्या अनेक महत्त्वाच्या प्रदेशांवर एकाचवेळी हल्ला केला. या कारवाईनंतर सिरीयन सरकारच्या सत्तेत असलेल्या १३ गावांचा ताबा बंडखोरांकडं आला. यात अलेप्पो आणि इडलीबच्या राज्यातील बहुतांश भागाचा समावेश होतो. २९ नोव्हेंबर रोजी बंडखोरांनी सिरीयातील सर्वात मोठं शहर असलेल्या अलेप्पोवर २०१६ नंतर पहिल्यांदाच ताबा मिळवला.
१ डिसेंबरला सरकारी सैन्यानं बंडखोरांच्या ताब्यात आलेला नवा प्रदेश परत मिळवण्यासाठी प्रतिहल्ला केला, मात्र सिरीयन सरकारच्या मित्र राष्ट्रांनी विशेष मदत न केल्यानं या हल्ल्याचा काही फायदा झाला नाही. २ ते ४ डिसेंबरच्या काळात रशियानं केलेल्या काही हवाई हल्ल्यांमुळं सिरीयाला काही भाग परत मिळवता आला, मात्र बंडखोर सिरीयातील हामा शहरापर्यंत आले होते. शेवटी ५ डिसेंबरला हामा सरकारच्या हातातून गेलं.
BREAKING:
— sarah (@sahouraxo) December 10, 2024
Israel is intensely bombing multiple cities simultaneously across Syria tonight, while Israeli tanks are rapidly approaching Damascus, Syria’s capital.
This is not about “liberation”.
This is about the expansion of Greater Israel. pic.twitter.com/O7LbbXJBXg
६ डिसेंबरला बंडखोरांनी होम्स शहराच्या आसपासच्या प्रदेशावर ताबा मिळवला. होम्स सिरीयाचं तिसरं मोठं शहर आहे आणि या शहराच्या पाडावानंतर बंडखोर सिरीयाची राजधानी दमास्कसच्या वेशीवर पोहोचल्यात जमा झालं होतं. त्यानंतर ७ डिसेंबरला बंडखोरांनी होम्सवर ताबा मिळवला आणि ८ डिसेंबर रोजी दमास्कसमध्ये प्रवेश केला. मात्र तोपर्यंत बशर अल असद यांनी त्यांच्या कुटुंबासह सिरीया सोडली होती आणि ते मॉस्कोमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर बंडखोरांनी सिरीयाच्या सरकारी वाहिनीवर येऊन त्यांच्या विजयाची घोषणा केली.
दरम्यान, गेले काही दिवस इसरायलदेखील सिरीयावर सतत हल्ले करत आहे. सध्या सिरीयामधील महत्त्वाची विमानतळं तसंच लष्करी महत्त्वाच्या इतर मूलभूत सुविधांवर इसरायलचे हवाई हल्ले सुरु आहेत. इसरायलनं ताब्यात घेतलेल्या गोलान हाईट्स प्रदेशाच्या बफर झोनमध्ये इसरायलनं ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही म्हटलं जात आहे. मात्र हा दावा इसरायलकडून फेटाळण्यात आला आहे.
गृहयुद्धापुर्वीचं सिरीया
सिरीयात असद कुटुंबाची गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता आहे. बशर अल असदचे वडील हाफिज अल असद १९७१ मध्ये सिरीयाचे राष्ट्राध्यक्ष झाले. मात्र त्या आधीपासून सिरीयाच्या सत्तेशी त्यांचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे संबंध होता. हाफिज अल असद यांनी सत्तेत आल्यानंतर सिरीयाला एका पक्षाची सत्ता असलेला देश बनवलं आणि या पक्षाची सर्व शक्ती त्यांच्या हाती एकवटली.
सन २००० मध्ये हाफिज अल असद यांचा मृत्यू झाला. त्यानंतर लगेच बशर अल असद वारसा हक्कानुसार सिरीयाच्या राष्ट्राध्यक्ष पदावर बसले. सिरीयात निरंकुश एकाधिकारशाही राज्यव्यवस्था आहे. तिथं दर ७ वर्षांनी निवडणूक घेतली जाते आणि कथितरित्या राष्ट्राध्यक्षाची निवड केली जाते. बशर सत्तेत आल्यापासून २००७, २०१४ आणि २०२१ मध्ये निवडणुका झाल्या आहेत. सर्वच निवडणुकांमध्ये बशर यांना ९५ टक्क्यांहून अधिक मतं मिळाल्याचं सांगितलं जातं. हाफिज सत्तेत आल्यापासून त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या सत्तेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र त्यात विशेष यश मिळालं नाही.
अरब स्प्रिंग आणि सिरीया
त्यानंतर २०११ मध्ये बहुतांश अरब देशांमध्ये तिथल्या सत्ताधाऱ्यांविरोधात उठाव झाला, त्याला 'अरब स्प्रिंग' असं म्हटलं जातं. या अरब स्प्रिंगची सुरुवात ट्युनिशियामध्ये झाली, पुढं त्याचं लोण इजिप्त, लिबिया, येमन, सिरीया आणि बहारिन आणि इतर अनेक देशांमध्ये पसरलं. तर जॉर्डन, इराक, लेबनॉन, मोरोक्को, कुवेत, साऊदी अरेबिया आणि इतर अनेक देशांमध्ये या अरब स्प्रिंगमुळं बंड, आंदोलनं, सशस्त्र उठाव आणि निदर्शनांसारख्या अनेक घटना घडल्या.
या देशांमध्ये लोकशाही प्रस्थापित व्हावी, अशी मागणी या उठावात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी केली होती. मात्र काही अपवाद सोडता या उठावांना विशेष यश मिळालं नाही. सिरीयातही तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्या विरोधात उठाव झाला.
‘It’s our Syria now, not Assad’s anymore,’ say Syrians amid fall of the Assad regime.
— Middle East Eye (@MiddleEastEye) December 9, 2024
Syrians in London share their hopes and dreams after the fall of the Assad regime on Sunday. “I’ve been waiting 14 years for this moment,” says PhD student Selma. pic.twitter.com/ORDfOgbLZ2
असद यांनी राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन देशात लोकशाही पद्धतीनं निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली होती. शिवाय तिथे नागरिक आर्थिक असमता, महागाई आणि बेरोजगारीसारख्या अनेक प्रश्नांनी त्रस्त होते. मात्र असदनं त्यांची ही मागणी मान्य करण्याऐवजी या उठावाला दाबण्यासाठी सैन्याचा वापर केला. परिणामी सिरीयाच्या नागरिकांमध्ये असदबद्दल असलेला राग वाढला आणि या आंदोलनाला गृहयुद्धाचं स्वरुप प्राप्त झालं. शिवाय असद स्वतः शिया मुस्लिम असल्यानं सुन्नी बहुल सिरीयावर एका सुन्नी व्यक्तीची सत्ता असावी, अशीदेखील काही नागरिकांची इच्छा होती.
तेव्हापासून या लढ्यात अमेरिका, रशिया, इराण, तुर्कीये आणि इतर अनेक देशांनी या युद्धात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पद्धतीनं प्रभाव टाकण्याचा आणि त्यांचे हितसंबंध जपण्याचा प्रयत्न केला.
गृहयुद्धाची गुंतागुंत
क्वचिकतचं एखाद्या देशातील गृहयुद्ध सिरीयाएवढं गुंतागुतींचं असतील. फेब्रुवारी २०११ मध्ये सिरीयात काही ठिकाणी बशर विरोधात आंदोलनं करण्यात आली. त्यानंतर जून २०११ मध्ये या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झालं. शस्त्रधारी आंदोलकांनी केलेल्या हल्ल्यात सिरीयाच्या सैन्यातील १२० सैनिकांनी जीव गमावला.
जुलै २०११ मध्ये सिरीयन सैन्यातील काही सैनिकांनी सरकार विरोधात विद्रोह केला आणि 'फ्री सिरीयन आर्मीची' स्थापना केली. त्यानंतर इतर अनेक ठिकाणी या आर्मीसारख्या संघटना उभ्या राहिल्या आणि त्यांनी केलेल्या बंडखोरीला २०१२ च्या मध्यात गृहयुद्धाचं स्वरुप प्राप्त झालं. या बंडखोरांना नाटो, युरोपीयन महासंघ आणि गल्फ कोऑपरेशन काउंसिल सारख्या संघटनांनी म्हणजेच अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांनी शस्त्र पुरवठा सुरू केला.
त्यामुळं सुरुवातीला या बंडखोर सैन्यांनी सरकारी सैन्याविरोधात बऱ्याच ठिकाणी विजय मिळवला. त्यामुळं यानंतर इराण आणि रशियानं सिरीयन सरकारला मदत करण्यासाठी त्यांच्या सैन्य कारवाया सुरू केल्या. इराणनं २०१३ मध्ये सिरीयन सरकारच्या मदतीला हात पुढं केला आणि त्यांना शस्त्रसाठा आणि प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्याचसोबत इराणनं काही सैनिक आणि त्यांचं प्याद असणाऱ्या हेजबोल्लालादेखील या युद्धात उतरवलं. बशर शिया असल्यानं इराण त्यांच्या सरकारच्या संरक्षणार्थ युद्धात उतरल्याचं सांगितलं जातं.
तर सप्टेंबर २०१५ मध्ये रशियानं त्यांच्या सैनिकांना असद सरकारच्या पाठींब्यासाठी सिरीयात आणलं. त्यासाठी असद यांनी स्वतः रशियन सरकारकडं विनंती केली होती. तसंच त्याआधीपासून रशिया असद सरकारची मदत करत होतं. या काळात सिरीयात इस्लामिक स्टेटची शक्ती वाढली होती आणि त्यामुळं दहशतवादाला नियंत्रणात आणण्यासाठी या युद्धात उतरत असल्याचं रशियाचं म्हणणं होतं.
एकीकडं विविध देश या युद्धात त्यांचे हितसंबंध जपण्याचा प्रयत्न करत असताना या भागात इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सिरीया (आयसिस) त्यांचा जम बसवत होते. त्यांचं युद्ध सिरीया सरकार आणि रशिया विरोधातदेखील होतं आणि सिरीया सरकारविरोधात उतरलेल्या बंडखोर सैन्यालाशीही ते लढा देत होते. आयसिसची वाढती शक्ती पाहता अमेरिकेनंही या युद्धात प्रत्यक्षपणे सहभाग घेत आयसिसचा ताबा असलेल्या ठिकाणांवर बॉम्ब वर्षाव सुरू केला.
त्याचवेळी अमेरिकेनं सिरीयातील कुर्दीश वंशांच्या 'सिरीयन डेमोक्रॅटिक फोर्सेसला' (एसडीएफ) पाठिंबा देत त्यांचं सैन्य युद्धात उतरवलं. या एसडीएफचा लढा असद सरकारविरोधात कमी आणि तुर्कीयेविरोधात जास्त होता.
रशिया, इराण, अमेरिका आणि मित्रराष्ट्र, सिरीयातील बंडखोरांनी एकाचवेळी लढा देत असलेल्या आयसिसचा २०१७ मध्ये बऱ्यापैकी पाडाव झाला. मात्र त्याच्या काही काळ आधी तुर्कीयेनं या युद्धात सहभाग घेतला. ऑगस्ट २०१६ मध्ये तुर्कीयेनं उत्तर सिरीयात त्यांचं सैन्य उभं केलं, त्या मागचं कारण म्हणजे ईशान्य सिरीयात निर्माण झालेला रोजावाचा स्वायत्त भाग.
या रोजावाच्या स्वायत्त भागात कुर्दीश वंशाची लोकं बहुसंख्येनं आहेत. रोजावाच्या सीमेला लागून तुर्कीयेतील कुर्दीश वंशाच्या नागरिकांची वस्ती आहे. रोजावामुळं तुर्कीयेतील कुर्दीश वंशाचे नागरिक अधिक स्वायत्तता किंवा तुर्कीयेमधून वेगळं होण्याची मागणी करू शकतात, अशी भीती तुर्कीयेच्या नेतृत्वाला आहे. त्यामुळं तुर्कीयेनं सैन्य कारवाई करत सिरीयातील असद सरकार, रोजावातील एसडीएफ आणि आयसिस विरोधात युद्ध पुकारलं.
गेल्या पाच वर्षांपासून उत्तर सिरीयाचा काही भाग तुर्कीयेच्या ताब्यात आहे.
२०२० पासून गृहयुद्धाच्या तोफा थंड
या गुंतागुंतीच्या युद्धाला २०१९मध्ये रशिया, इराण, हेजबोल्ला आणि असदच्या सरकारी सैन्यानं केलेल्या सैन्य कारवाईनंतर बऱ्यापैकी स्थिरता आली होती आणि युद्धात सहभागी बहुतांश गटांनी शस्त्रसंधी मान्य केली होती. २०२०मध्ये सिरीयातील एकूण भूप्रदेशापैकी दोन तृतीयांश भाग असदच्या नियंत्रणात आला होता. तर २०२३ पर्यंत सिरीयातील सरकारविरोधी सैन्याला बऱ्यापैकी नष्ट करण्यात असदच्या सैन्याला यश मिळालं होतं. २०२३ मध्ये मुख्य करून होणाऱ्या लढाया या तुर्कीयेच्या सैन्यात आणि सिरीयातील काही ठराविक गटांमध्ये होत होत्या.
मात्र २७ नोव्हेंबर २०२४ रोजी सिरीयन बंडखोरांनी अचानक एक मोठी कारवाई सुरू केली आणि सिरीयन सरकारच्या सत्तेत असलेल्या १३ गावांचा ताबा मिळवला. त्यानंतर ७ डिसेंबरपर्यंत या बंडखोरांनी असदच्या सैन्याचा अनेक ठिकाणी पराभव करत सिरीयाची राजधानी डमासकसकडं वाटचाल सुरू केली होती. ८ डिसेंबरला त्यांनी दमास्कसवर ताबा मिळवला. तोपर्यंत बशर अल असद यांनी त्यांच्या कुटुंबासह सिरीया सोडली होती आणि ते मॉस्कोमध्ये दाखल झाले होते.
१३ वर्षांचा लढा मात्र १३ दिवसांच्या आत पाडाव
१३ वर्ष गृहयुद्ध लढणाऱ्या बशर सरकारचा पराभव होण्यामागं रशिया-युक्रेन युद्ध आणि इसरायलनं पॅलेस्टिनमध्ये सुरू असलेलं युद्ध कारणीभूत असल्याचं मानलं जातं. गेल्या १३ वर्षात बशर सरकारला रशिया आणि इराणकडून मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत होता. मात्र रशियाची बरीच शक्ती युक्रेन युद्धामध्ये खर्ची झाली आहे, तर इराणदेखील पॅलेस्टिनमध्ये गुंतलेलं होतं. त्यात सिरीयन सरकारला हेजबोल्लाची मोठ्याप्रमाणात मदत होत होती. मात्र इसरायलनं केलेल्या कारवाईनंतर हेजबोल्ला संपल्यात जमा झालं आहे. त्यात इसरायलनं गझा आणि लेबनॉन विरोधात पुकारलेल्या युद्धादरम्यान त्यांनी सीरियावर देखील हवाई हल्ले केले.
त्यामुळं सिरीया सरकारकडं मित्रराष्ट्र आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या मदतीची कमतरता होती, त्याचा फायदा बंडखोरांनी घेतल्याचं दिसतं. असद सरकारविरोधातील या विजयात हयात ताहरीर अल-शाम (एचटीएस) गट आणि त्यांचा नेता अबू मोहम्मद अल जोलानीचा वाटा मोठा आहे. एचटीएसची स्थापना तशी २०११मध्येच झाली होती, मात्र तेव्हापासून आतापर्यंत या संघटनेनं अनेकदा त्यांचं नाव बदललं आहे.
या संघटनेचा अल कायदाशी थेट संबंध होता. २०१६ मध्ये सिरीयातील शाम किंवा लेव्हांट भागाच्या स्वातंत्र्यासाठी या संघटनेनं त्यांच्या मूळ संघटनेतून काढता पाय घेतला आणि स्वतःला नवं नाव दिलं. सिरीयात सुन्नी मुस्लिमांची सत्ता आणण्याचा प्रयत्न ही संघटना करत आहे.
या युद्धामुळं आतापर्यंत ४,७०,००० ते ६,१०,००० सैनिक आणि नागरिकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे, तर ६७ लाख सिरीयन नागरिकांना अंतर्गत विस्थापनाला सामोरं जावं लागलं आहे. ६६ लाख नागरिक सिरीया सोडून इतर देशात वास्तव्यास गेल्याचा अंदाज आहे. मात्र काल झालेल्या घटनेनंतरही सिरीयातील गृहयुद्ध संपलं असल्याचं म्हटलं जाऊ शकत नाही.
युद्धामुळं देशाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आकडेवारीनुसार सध्या सिरीयात राहत असलेल्या कुटुंबांपैकी ८५ टक्के कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न त्यांच्या दैनंदिन गरजा पुर्ण होण्याइतपतही नाही. असद सरकारविरोधी भूमिका घेतल्याबद्दल हजारो नागरिकांना सरकारनं तुरुंगात पाठवलं गेलं असल्याचं काही संघटनांचं म्हणणं आहे. त्यात काही नागरिकांना त्यांचा जीवदेखील गमवावा लागला आहे.
सध्या शांतता असलेल्या ठिकाणीदेखील अनेक नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागत आहे. दोन्ही पक्षांकडून झालेल्या हल्ल्यात मुख्यत्वे करून नागरिकांचा जीव जात आहे. सिरीयन सरकारनं विरोधकांच्या ताब्यात असलेल्या भागांमध्ये मदतकार्य पोहचून देण्यात अडथळे निर्माण केले होते. सिरीयातील ४४ लाख नागरिक अद्यापही संयुक्त राष्ट्रांकडून येणाऱ्या मदतीवर जीवन जगत आहेत. युद्धात हजारो नागरिकांचं घरं उद्धवस्त झाली आहेत.
या युद्धामुळं सिरीयन नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. बंडखोरांच्या विजयानंतर आता हा त्रास थांबणार की अजून वाढणार या विचारानं तिथले नागरिक चिंतीत आहेत.