India

एचएमपीवी विषाणू ना नवा, ना दुर्मिळ; घाबरण्याचं कारण नाही: आरोग्य मंत्रालय

चीनमध्ये एचएमपीवी विषाणूच्या लागणीचं प्रमाण वाढल्यानं जगभरात चिंतेचं वातावरण आहे.

Credit : इंडी जर्नल

 

चीनमध्ये एचएमपीवी विषाणूच्या लागणीचं प्रमाण वाढल्यानं जगभरात चिंतेचं वातावरण आहे, त्यात कर्नाटकातील दोन लहान मुलांना या विषाणूची लागण झाल्याची बातमी आल्यानंतर देशभरात चिंतेचं वातावरण आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागानं एक परिपत्रक काढत सुचना जारी केल्या आहेत. हा एक सामान्य आणि हंगामी विषाणू असल्याचं या परिपत्रकात म्हटलं आहे.

साधारणपणे चार वर्षांपूर्वी म्हणजे २०१९ च्या शेवटच्या टप्प्यात चीनमध्ये कोरोना विषाणूच्या लागणीला सुरुवात झाली. नंतर या विषाणूचा प्रसार जगभर झाल्यानं जगातील कित्येक कोटी लोकांना त्यांची लागण झाली, लाखोंना त्यांचा जीव गमवावा लागला. शिवाय जगाच्या अर्थव्यवस्थेवर कोरोनाच्या साथीचा भीषण परिणाम झाला.

काही दिवसांपूर्वीच चीनमध्ये पुन्हा एका आजारानं तोंड वर काढलं असून या आजारामुळं चीनच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे, असा अर्थाची चर्चा समाजमाध्यमांवर होतं आहे.

चीनमध्ये श्वसनाच्या आजारांच्या लागणीत वाढ होत असल्याचं गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं होतं. तर त्याचवेळी चीनमध्ये न्युमोनियाच्या घटनांकडं लक्ष ठेवण्यासाठी एका व्यवस्था उभारण्यात आली. काही समाजमाध्यमांवर चीनमध्ये दवाखान्यात वाढत्या गर्दीच्या चित्रफिती वायरल होऊ लागल्या. त्यामुळं चीनमध्ये एका नव्या आजाराची साथ पुन्हा वाढली आहे आणि कोरोना महामारीसारखी स्थिती पुन्हा निर्माण होत असल्याची भीती जनसामान्यांमध्ये निर्माण झाली.

 

 

मात्र सध्या चीनमध्ये कोणत्याही नव्या विषाणूची लागण होत नसून 'ह्युमन मेटा न्यूमो वायरस' (एचएमपीवी) या विषाणूच्या लागणीचं प्रमाण वाढलं आहे. एचएमपीवी हा एक साधा विषाणू असून गेल्या अनेक वर्षांपासून माणसाला या विषाणूची लागण होत आली आहे. इतर देशांप्रमाणे चीनमध्येही हिवाळा किंवा वसंत ऋतूच्या काळात या प्रकारच्या श्वसनाच्या किंवा साथीच्या आजारांमध्ये वाढ होणं अपेक्षित असतं. चीनमध्ये हिवाळा सुरू असल्यानं या साथीचं प्रमाण वाढलं आहे.

तरीही चीनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उलट यावर्षी श्वसनाच्या आजारांच्या लागणीचं प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा बरचं कमी आहे. त्यामुळं तिथं चिंताजनक स्थिती निर्माण झालेली नाही, असं स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिलं. फक्त १६ डिसेंबर ते २२ डिसेंबरच्या काळात या एचएमपीवी विषाणूच्या लागणीचं प्रमाण थोडं वाढलं होतं, अन्यथा कोणत्याही चिंतेची आवश्यकता नसल्याचं चीनी सरकारचं म्हणणं आहे.

या एचएमपीवी विषाणूची ओळख शास्त्रज्ञांनी २००१ मध्येच केली होती आणि त्याच्या काही दशकांपूर्वीपासूनच म्हणजे साधारणपणे १९५८ पासून या विषाणूच्या साथी जगभरात आल्या आहेत, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. यापूर्वी अमेरिका आणि कॅनडात या विषाणूची साथ येऊन गेली आहे. शिवाय हा आजार इन्फ्लुएंझा इतकाच सामान्य असल्याचंदेखील शास्त्रज्ञ म्हणणं आहे. मानवामध्ये सर्दी तापाला कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूंमध्ये याचं वर्गीकरणं केलं जातं.

सध्या या विषाणू विरोधात कोणतीही लसं किंवा औषधं उपलब्ध नाही, मात्र मानवी रोगप्रतिकारक शक्तीला या विषाणूचा सामना करण्याची सवय असल्यानं याबद्दल विषेश चिंता करण्याची गरज नसल्याचं शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांचं म्हणणं आहे. शिवाय या विषाणूसाठी लस तयार केली जात आहे आणि काहीच काळात ती बाजारात उपलब्ध होणार आहे.

 

 

तरीही या आजाराची लागण होऊ नये म्हणून काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. या विषाणूची लागण मुख्यत्वे लहान मुलं, वयोवृद्ध आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या लोकांना होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं वैयक्तिक स्वच्छतेची निगा राखली तरी या विषाणूपासून आपला बचाव होऊ शकतो, असं तज्ज्ञ म्हणतात. त्यासाठी आजारी असल्यास तोंडावर मास्क बांधणं, हात नियमित रित्या धूणं, खोकताना किंवा शिंकताना तोंड झाकणं इत्यादी सारख्या खबरदाऱ्या बाळगून आपण आपला बचाव करू शकतो, असंही डॉक्टर सांगतात.

महाराष्ट्र सरकारनं जारी केलेल्या परिपत्रकात देखील याच सूचना करण्यात आल्या आहेत. चीनमधून आलेल्या या तथाकथित नव्या विषाणूच्या अहवालांबाबत चिंतेचं कारण नाही, सरकारकडून या संदर्भात आवश्यक दक्षता घेण्यात येत असून नाहक भीतीचं वातावरण निर्माण करू नये, अशा सूचना या परिपत्रकात करण्यात आली आहे.

अगदी दोन रुग्ण सापडलेल्या कर्नाटक सरकारनं देखील या रुग्णांना देशातील पहिला रुग्ण म्हणण्याची आवश्यकता नसल्याचं स्पष्ट केलं आहे. हा एक आधीपासून असलेला विषाणू असून या विषाणूची लागण दरवर्षी अनेकांना होतं असते, असं सरकारनं सांगितलं.