India

खा. हेमंत पाटलांवर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबरच्या काळात नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुमारे ३१ रुग्णांचा मृत्यू झाला होता.

Credit : Indie Journal

 

नांदेडच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता (डीन) यांना शौचघर साफ करण्यास भाग पडणाऱ्या शिवसेनेच्या (शिंदे) खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात बुधवारी (४ ऑक्टोबर) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत पोलीस तक्रार दाखल करण्यात आली. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्युकांडानंतर पाटील त्या दवाखान्यात भेट द्यायला गेले होते. त्यावेळी स्वच्छतागृहाची अवस्था बघून संतापलेल्या पाटील यांनी थेट महाविद्यालयाच्या अधिष्ठात्याला ते स्वच्छतागृह साफ करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता डॉ श्याम वाकोडे यांनी पाटलांविरोधात तक्रार दाखल केली. हा सर्व प्रकार जनतेचा रोष वळवण्यासाठी जाणूनबुजून घडवून आणण्यात आला आहे, असा आरोप होत आहे.

३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबरच्या काळात नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुमारे ३१ रुग्णांचा मृत्यू झाला होता. यात काही नवजात बालकांचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून या घटनेवर तीव्र प्रतिसाद उमटत होते. त्यानंतर मंगळवारी (३ ऑक्टोबर) पाटील यांनी त्या महाविद्यालयाला भेट दिली आणि परिस्थितीचा अंदाज घेतला.

त्यावेळी त्यांनी महाविद्यालयाचे अधिष्ठाता वाकोडे यांची भेट घेतली. वाकोडे केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्याची तयारी करत होते. पाटील यांनी वाकोडेंना दवाखाना दाखवण्यास सांगितलं आणि एका वॉर्डातील स्वच्छतागृह दाखवण्याची मागणी केली. तिथलं स्वच्छतागृह खराब अवस्थेत आढळल्यानं पाटील यांनी वाकोडे यांना ते साफ करायला सांगितलं. त्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाली. त्यानंतर पाटील यांनी वाकोडे यांना अजून एक स्वच्छतागृह साफ करण्यास सांगितलं. त्यामुळे त्यांचा रक्तदाब वाढला अशी माहिती वाकोडे यांनी तक्रारीत दिली.

वाकोडेंसोबत घडलेला प्रकार जाणूनबुजून करण्यात आला होता, अशी माहिती नांदेडच्यी युवा पँथरचे नेते राहुल प्रधान यांनी दिली. "मंगळवारी दुपारच्या दरम्यान हेमंत पाटील काही कार्यकर्त्यांना घेऊन तिथं (वैद्यकीय महाविद्यालय) गेले होते. सरकारच्या अपयशामुळे सरकारविरोधात उठलेल्या रोषाला काहीतरी वेगळं वळण देण्याच्या उद्देशानं ते तिथं गेले होते. तिथं जाऊन (महाविद्यालयाचे) अधिष्ठता यांना हमरीतुमरी केली आणि त्यांना त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर काढलं आणि बाथरूम साफ करायला लावलं. त्याचा विडिओ रेकॉर्ड केला आणि स्वतःच्या सोशल मिडीयाला टाकून काही वृत्त वाहिन्यांना देऊन प्रसारित केला," प्रधान सांगतात.

 

 

पाटील आणि त्यांच्या १५ सहकाऱ्यांवर भारतीय दंडविधानाच्या कलम ३५३ (सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी हल्ला किंवा गुन्हेगारी शक्तीचा वापर), कलम ५०० (बदनामी) आणि कलम ५०६ (धमकावणे), याशिवाय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबद्दल प्रधान यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. "हा झालेला प्रकार चुकीचा आहे हे आम्ही तिथल्या बहुजन कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलं. दवाखान्यात झालेल्या मृत्यूंसाठी पूर्णपणे डॉक्टर जबाबदार नाहीत, त्याला सरकारी यंत्रणाही तेवढीचं जबाबदार आहे." महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही घडलेल्या घटनेबद्दल तीव्र संताप असून त्यांनी आज महाविद्यालयात कामबंद आंदोलन पुकारलं आहे.

नांदेडमध्ये वैद्यकीय महाविद्यालयात घडलेल्या घटनेनंतर महाराष्ट्रात इतर ठिकाणच्या अशा घटना समोर येत आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार संभाजीनगरच्या घाटी शासकीय रुग्णालयात २४ तासांत १८ जणांचा मृत्यू झाला. शासकीय रुग्णालयात वाढत्या मृत्यूमागे सरकारचा कारभार गलथान जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार नांदेडच्या महाविद्यालयात सुमारे ४२ टक्क्यांहून अधिक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा रिकाम्या आहेत. वरिष्ठ निवासी डॉक्टरच्या ६० टक्के जागांवर अजून कोणालाही नियुक्त करण्यात आलेलं नाही. विशेष म्हणजे या दवाखान्यात वर्षाला ६.२१ लाख रुग्ण उपचारासाठी येतात. या विद्यालयाची रुग्ण क्षमता ५०० खाटांची असताना त्यात प्रत्यक्षात मात्र दुप्पटीपेक्षा जास्त रुग्ण महाविद्यालयात दाखल आहेत.

याशिवाय रुग्णालयात वाढत्या मृत्यूमागे औषधांचा अपुरा पुरवठा एक कारण असल्याचं म्हटलं जात आहेत. शासकीय रुग्णालयात औषधांचा पुरवठा अतिशय कमी असून शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाला अत्यावश्यक औषध घेण्यासाठी केलेल्या आर्थिक तरतुदीपैकी एक रुपयाही खर्च केला नसल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय महाविद्यालयाला वैद्यकीय यंत्रसामग्री विकत घेण्यासाठी देण्यात आलेल्या ६७ लाख रुपयांपैकी एक रुपयाही खर्च केलेला नाही. त्याजागी ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी वर्ग करण्यात आली.

 

महाविद्यालयाला वैद्यकीय यंत्रसामग्री विकत घेण्यासाठी देण्यात आलेल्या ६७ लाख रुपयांपैकी एक रुपयाही खर्च केलेला नाही.

 

मंगळवारी वाकोडे यांनी केलेल्या दाव्यानुसार हाफकिन कंपनीकडून औषधांचा अपेक्षित पुरवठा झाला नाही. मात्र शिवसेनाच्या (उबाठा) प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडे हाफकिन कंपनीची सुमारे २२२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे हाफकिनकडून औषधांचा पुरवठा झालेला नाही. तसेच आरोग्य खात्यातील सर्व स्थरावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनेक पदं रिकामी आहेत. त्यामुळे स्थिती महाराष्ट्रात ही परिस्थिती ओढवली असल्याचं सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. 

महाराष्ट्रात आरोग्य विभागात अधिकाऱ्यांची कमतरता असताना सरकार नवी भरती करताना दिसत नाही. शिवाय कामावर रुजू असलेल्या अधिकाऱ्यांनाही अत्यंत हीन वागणूक मिळत आहे. अशामुळे शेवटी महाराष्ट्रातील जनतेचे हाल होत आहेत, अशी खंत जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळे खासदार हेमंत पाटील आणि नांदेडच्या घटनेला जबाबदार असलेल्या लोकांवर कारवाई होणं गरजेचं असल्याचं जाणकार म्हणतात.

"झालेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे आणि एका उच्च पदस्थ डॉक्टरला अशी हीन वागणून देणं ही पूर्णपणे चुकीची आहे. त्यांनी केलेला प्रकार जाणूनबुजून केला आहे, वाकोडेंच्या जागी एखादा सवर्ण जातीचा अधिकारी असता तर त्यांनी तसा प्रकार केला नसता. हे अनुसूचित जमातीच्या वर्गातून असल्या कारणाने त्यांनी हे केलं असावं असं आमचं मत आहे. पाटलांवर कारवाई झाली पाहिजे, गुन्हे दाखल झाले पाहिजेत," अशी मागणी प्रधान करतात.