Americas

हैतीतील हिंसाचार: जगातील पहिल्या कृष्णवर्णीय प्रजासत्ताकाची पडझड

हिंसाचार सुरु झाल्यापासून अनेक सामान्य नागरिकांचा मृत्यू, लाखो निर्वासित.

Credit : इंडी जर्नल

 

२९ फेब्रुवारीला हैतीचे अंतरिम पंतप्रधान आणि राष्ट्रपतीपदाचा कार्यभार सांभाळणारे आरिएल हेन्री हैतीतील गुन्हेगारी टोळ्यांच्या हिंसाचाराला नियंत्रणात आणण्यासाठी मदतीचा करार करण्यासाठी केनियाच्या दौऱ्यावर गेले असताना हैतीतील काही गुन्हेगारी टोळ्यांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू केला आणि हैतीच्या राजधानीला वेठीस धरलं. हेन्री यांनी त्यांच्या पंतप्रधान पदाचा राजनामा द्यावा आणि देशात निवडणुका घेऊन लोकमान्यता असलेलं सरकार स्थापन करावं, अशी मागणी या टोळ्या करत आहेत. वाढत्या हिंसाचाराला नियंत्रणात आणण्यासाठी परराष्ट्राची मदत घेणाऱ्या हैतीनं यापूर्वी अनेकदा त्यांच्या देशातील स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी परकीय देशांची मदत घेतली आहे. परंतू परकीय देशांच्या हस्तक्षेपाबाबत हैतीचा एकंदरीत अनुभव चांगला नाही. देशात अशा प्रकारचा हिंसाचार कशामुळं बळावला आणि हैतीचं भविष्य आता काय आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हैतीतील टोळ्यांनी राजधानी पोर्त-ओ-प्रिन्समधील देशातील एकमेव विमानतळाकडे जाणारा मार्ग बंद केला आहे. त्यामुळे केनिया सरकारकडून मदत घ्यायला गेलेले हेन्री यांचा त्यांच्या देशात येण्याचा मार्ग बंद झाला आहे. हैतीतील टोळ्यांनी एकत्रित येऊन एक गट तयार केला आहे. या गटाचा प्रमुख 'जिमी बार्बिक्यू शेरिझिए' देशातील सत्ता स्वतःला मिळावी म्हणून किंवा कोणत्या तरी राजकीय नेत्याच्या इशाऱ्यावर हा हिंसाचार करत, असल्याचा अंदाज आहे. शिवाय या टोळ्यांनी देशातील दोन मोठ्या कारागृह तोडून तिथल्या ४,००० कैद्यांना हिंसाचारासाठी मोकळं केलं आहे. समोर असलेल्या माहितीनुसार टोळ्यांचा प्रमुख सध्या हेन्रींचं मंत्रिमंडळ आणि हैती पोलीस प्रमुखाला पकडण्याच्या प्रयत्नात आहे.

या हिंसाचारामुळे आतापर्यंत ५०हून अधिक लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे, तर १५ हजार लोकांची घरं उध्वस्त झाली आहेत. ३ लाख ६२ हजार नागरिकांना देशांतर्गत विस्थापनाला तोंड द्यावं लागलं आहे. देशातील अनेक दवाखाने बंद पडल्यानं ३,००० हून अधिक गरोदर महिलांना कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय गरोदरपणाला सामोरं जावं लागेल, अशी भीती संयुक्त राष्ट्र संघटनेनं व्यक्त केली आहे. देशाच्या राजधानीला वीज पुरवठा करणाऱ्या कंपनीवर हल्ला झाल्यापासून अनेक ठिकाणी अंधार आहे. शिवाय पाणी पुरवठ्यालाही फटका बसला आहे. संयुक्त राष्ट्र सघंटनेची मदत मिळण्यातही मर्यादा आल्या आहेत. त्यातून नागरिकांना अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.

वाढत्या टोळी हिंसाचाराला आळा घालण्यासाठी फक्त देशात ९,०००च्या आसपास पोलीस बळ असूनदेखील अत्याधुनिक हत्यारांनी सुसज्ज टोळ्यांना सामोरं जाण्यासाठी ते पुरेसं नाही. देशातील काही नागरिक केनियातून येणाऱ्या १,००० पोलीसांकडे डोळे लावून बसले आहेत. तर काहींच्या मते फक्त १,००० पोलीसांच्या मदतीनं देशातील स्थिती सुधारणार नसून त्याच्यासाठी याहुन मोठ्या पोलीस बलाला बऱ्याच काळासाठी देशात तैनात केल्या शिवाय गत्यंतर नाही. या हिंसाचारानंतर १३ मार्च रोजी हेन्री यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाचा सशर्त राजीनामा द्यायची तयारी दर्शवली.

 

 

केनियातील उच्च न्यायालयानं अशाप्रकारे परकीय देशाला पोलीस मदत देणं, केनियाच्या संविधानाच्या विरोधात असल्याचा निर्णय दिला होता. तरीही केनिया सरकार हा निर्णय बाजूला ठेवून हैती सरकारला मदत करणार आहे. तर दुसरीकडे पाच देशांनी हैती सरकारच्या मदतीसाठी सैन्यदल पाठवण्याची तयारी दर्शवली. मात्र हैतीत सुरक्षाव्यवस्था सांभाळण्यासाठी दुसऱ्या देशाची मदत घेण्याची गरज निर्माण होण्याची आणि एका टोळी प्रमुखानं देशाच्या पंतप्रधानाचा राजीनामा मागण्याची परिस्थिती निर्माण कशी झाली?

 

जगातील पहिलं कृष्णवर्णीय प्रजासत्ताक

हैती उत्तर अमेरिकन खंडात मेक्सिकन आखातीच्या बाजूला असलेल्या कॅरेबियन बेटांपैकी एका बेटावरील देश आहे. हैती असलेल्या बेटाला हिस्पॅनिओला म्हणतात आणि या बेटावर हैती शिवाय 'डॉमिनिक गणराज्य' हा देश आहे. एकाच बेटावर असून देखील या दोन्ही देशांमधील परिस्थितीत प्रचंड अंतर आहे. डॉमिनिक गणराज्य तुलनात्मकदृष्ट्या हैतीपेक्षा बराच पुढारलेला आहे.

भारताकडे जाणारा सागरी मार्ग शोधण्यासाठी निघालेल्या कोलंबसनं १४९२ साली याच बेटावर अमेरिकन खंडातील पहिली वसाहत बनवली होती. त्यावेळी या बेटावर 'टैनो' ही अमेरिकन इंडियन जमात राहत होती. १७व्या शतकाच्या सुरुवातीला या संपूर्ण बेटावर स्पॅनिश साम्राज्यानं ताबा होता. मात्र शतकाच्या शेवटापर्यंत फ्रेंचांनीही या बेटाचा काही भाग स्पॅनिश साम्राज्याकडून हिसकावला.

जो भाग आज हैती म्हणून ओळखाला जातो, त्याच्यावर फ्रेंचांनी ताबा मिळवून वसाहत स्थापन केली होती. तर डॉमिनिक गणराज्याचा भाग स्पेनच्या नियंत्रणात होता. फ्रेंचांसाठी ही वसाहत अतिशय महत्त्वाची होती आणि १८ व्या शतकात फ्रेंचांची सर्वात फायदेशीर वसाहत म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं होतं. मात्र तिला फायदेशीर बनवण्यासाठी फ्रेंचांनी तेथील स्थानिक जमात संपवली आणि तिथं पश्चिम अफ्रिकेतून आणलेल्या कृष्णवर्णीय गुलामांना ऊसाच्या शेतात कामाला लावलं. या वसाहतीतून फ्रेंचांनी प्रचंड पैसे कमवल्याचे मानलं जातं. मात्र त्यासाठी त्यांनी वसाहतीतील गुलामांवर प्रचंड अत्याचार केले आणि देशातील नैसर्गिक संसाधनं उध्वस्त केली. कृष्णवर्णीय जमातीवर झालेल्या अत्याचाराचा परिणाम म्हणून वसाहतीतील गुलामांनी फ्रेंचांविरोधात बंड केला. त्यात यशस्वी झालेल्या कृष्णवर्णीय नागरिकांनी १८०४ साली स्वतःला एक स्वतंत्र प्रजासत्ताक म्हणून घोषित केलं.

 

 

हे स्वतंत्र प्रजासत्ताक जगातील पहिलं कृष्णवर्णीय गणराज्य होतं. मात्र त्याला जगाकडून कधी मान्यता मिळाली नाही. जर या प्रजासत्ताकाला मान्यता दिली तर आपल्या देशातील कृष्णवर्णीय गुलामांवर त्याचा परिणाम होईल आणि ते आपल्याविरोधात बंड करतील, अशी भीती तेव्हाच्या देशांना होती. त्यात या नव्या देशाचं वसाहतवादामुळे होणारं शोषण स्वतंत्र प्रजासत्ताक झाल्यानंतरही थांबलं नाही. १८२५ साली फ्रेंचांनी नौदलाचा ताफा हैतीच्या समुद्र किनाऱ्यावर पाठवला आणि हैतीला पुन्हा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. हैतीच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षानं १.५ कोटी फ्रांक्सची नुकसान भरपाई फ्रांसला देण्याचं मान्य केल्यानंतर फ्रेंच नौदल माघारी आलं. त्या रकमेच्या बदल्यात फ्रेंचांनी हैतीला देश म्हणून मान्यता दिली. ही रक्कम हैतीसारख्या नव्या देशासाठी खूप मोठी होती. त्यासही हैतीला फ्रेंच बँकेकडून कर्ज घ्यावं लागलं आणि ते चुकवण्यासाठी त्यांना पुढील १२२ वर्षं लागली.

त्यानंतरच्या १९व्या शतकातील काळात हैतीनं स्पेनच्या ताब्यात असलेला हिस्पॅनिओला बेटाचा बाकीचा भाग मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना काही प्रमाणात यशही मिळालं. मात्र त्याप्रदेशातील लोकांना त्यांच्यावर हैतीची सत्ता असणं मान्य नव्हतं. त्यातून हैतीविरोधात सातत्यानं सशस्त्र बंड होत राहिले. अंततः हैतीनं हिस्पॅनिओला एकत्र करण्याचा विचार बंद केला आणि डॉमिनिक गणराज्याची स्थापना झाली.

 

हिंसाचार आणि एकाधिकारशहांचं विसावं शतक

१९व्या शतकाच्या शेवटी आणि २०व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात हैतीवर जर्मनीचा प्रभाव वाढत होता, जे शेजारच्या अमेरिकेला मान्य नव्हतं. जर्मनीतील व्यापाऱ्यांचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी एका संधीचा फायदा घेत १९१५ साली अमेरिकेनं हैतीत त्यांचं सैन्य उतरवलं. त्यानंतर साधारणपणे १९ वर्ष म्हणजे १९३४ पर्यंत हैती अमेरिकेच्या नियंत्रणात होती. या काळात हैतीतील पायाभूत सुविधा सुधारल्या. मात्र अमेरिकेबद्दलचा असंतोषदेखील वाढत होता. त्यातून अमेरिकेच्या ताब्याविरोधात सशस्त्र उठाव झाले.

१९३४ साली अमेरिकेनं हैतीतील त्यांचं सैन्य माघारी घेतलं. परंतु त्यांचं हैतीच्या अर्थव्यवस्थेवर असलेलं थेट नियंत्रण १९४१ पर्यंत कायम होतं. १९५७ पर्यंत हैती अमेरिकेच्या एखाद्या वसाहती प्रमाणेच होतं. त्यानंतर १९५७ साली झालेल्या निवडणुकीत फ्रांस्वा डुवालीए हैतीच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले आणि हैतीत डुवालीए घराण्याची सत्ता सुरू झाली. फ्रांस्वा त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९७१ पर्यंत सत्तेत होते. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा जॉन क्लॉड सत्तेत आला. या दोघांच्या काळात त्यांच्याविरोधात आवाज उठवणाऱ्या हैतीच्या चाळीस ते साठ हजार नागरिकांची हत्या करण्यात आली. शिवाय त्यांच्यामुळे देशातील अनेक सुशिक्षित नागरिक देश सोडून गेले.

 

 

फ्रांस्वा डुवालीए यांनी त्यांची सत्ता टिकवण्यासाठी सैन्याऐवजी एका खासगी सैन्याची निर्मिती केली. त्या सैन्याला 'टॉनटॉन्स माकुट' असं नाव देण्यात आलं होतं. त्यांचा वापर त्यांच्या मुलानेही सुरू ठेवला. सध्या हैतीत धुमाकूळ घालत असलेल्या टोळ्यांचा संबंध याच खासगी सैन्याशी लावला जातो. ही एकसंध संस्था नव्हती आणि डुवालीएच्या आदेशानुसार काम करणाऱ्या अनेक टोळ्या यात कार्यरत होत्या.

१९८६ साली जॉन क्लॉड डुवालीएनं हैती सोडलं आणि तेव्हापासून हैतीत सुरू झालेलं राजकीय अस्थैर्य अजूनही कायम आहे. सततचा हिंसाचार आणि राजकीय अस्थैर्यामुळे १९९४ साली पुन्हा अमेरिकेचं सैन्य हैतीत दाखल झालं. त्यानंतरची दहा वर्षे हैतीनं काही प्रमाणात राजकीय स्थैर्य पाहिलं. मात्र ते फारच अल्पकालीन होतं.

 

आजच्या असंतोषाचं कारण

हैतीत लोकनियुक्त नेत्याची सत्ता असावी, अशी हैतीच्या नागरिकांची इच्छा आहे. मात्र त्यात अनेक अडथळे येत राहिले. २१व्या शतकाच्या सुरुवातीपासून हैतीत अनेकदा निवडणुका झाल्या, अनेकदा देशात अंतरिम सरकारांची सत्ता राहिली. २०१६साली झालेल्या निवडणुकीत जोव्होनेल मोईस राष्ट्राध्यक्ष पदी निवडून आले. जुलै २०२१ मध्ये त्यांनी सध्याचे अंतरिम पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष एरियल हेन्री यांना देशाचा पंतप्रधान म्हणून नियुक्त केलं आणि या नियुक्तीच्या दोन दिवसांत मोईस यांची हत्या झाली.

मोईस यांच्या हत्येचं कारण अद्यापदेखील स्पष्ट नाही आणि या हत्येत हेन्री यांचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २०२०पासून हैतीची राजधानी 'पोर्त ओ प्रिंसचा' ८० टक्केहून अधिक भाग विविध टोळ्यांच्या नियंत्रणात आहे. या टोळ्यांचा संबंध फ्रांस्वा डुवालीए यांनी स्थापन केलेल्या खासगी सैन्याशी आहे. या खासगी सैन्याचा वापर फ्रांस्वा डुवालीएनं त्याच्या विरोधात उठणारा आवाज दाबण्यासाठी केला. नंतर त्याच्या मुलानेही या खासगी सैन्याचा वापर केला. मात्र त्यांची सत्ता गेल्यानंतरही या खासगी सैन्याचा वापर कायम राहिला. या सैन्याला विघटित करण्यात आलं मात्र त्यांचं निःशस्त्रीकरण झालं नाही. त्यातून या सैन्याचं रुपांतर टोळ्यांमध्ये झालं.

 

 

या टोळ्यांमध्ये माजी सैन्य अधिकारी, सैनिक, पोलीस अधिकारी कार्यरत आहेत. टोळीत सहभागी झालेल्या या पोलीस अधिकाऱ्यांनी अनेकदा सरकारविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतला. या सरकारविरोधी कारवायांमुळे काही तरूणांनी एकत्र येत स्वसंरक्षण गटांची स्थापना केली. या गटांना सरकारचा पाठिंबा मिळाला. पुढे या गटांचंही रुपांतर टोळ्यांमध्ये झालं. २०१०साली हैतीत आलेल्या भूकंपामुळे या नव्या टोळ्यांनी जुन्या टोळ्यांची जागा घ्यायला सुरुवात केली. २०१७ नंतर हैतीतील सरकार अधिक कमकुवत होत गेलं आणि या टोळ्यांचा प्रभाव वाढत राहिला.

एका अंदाजानुसार हैतीत २०० हून अधिक टोळ्या आहेत. त्यातील निम्म्याहून अधिक टोळ्या फक्त राजधानीत आहेत. काही टोळ्यांनी राजकीय पक्षांशी जुळवाजुळव देखील केली होती. काही टोळ्या सरकारसाठी काम करतात, तर काही टोळ्या सरकारविरोधी कारवाया करतात. जून २०२० मध्ये हैतीतील ९ टोळ्यांनी एकत्र येत संघटना स्थापन केली. ही संघटना स्थापन करण्यामागे 'जिमी बार्बिक्यू शेरिझिए' या माजी पोलीस अधिकाऱ्याचा हात आहे. या संघटनेला तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मोईस यांचा पाठिंबा होता मानलं जातं. या संघटनेनं स्थापन झाल्यानंतर अनेक सामूहिक हत्या केल्या आहेत.

मोईस यांची हत्या झाल्यानंतर या संघटनेनं आरोपींना पकडण्यात पोलीसांची मदत केली होती. त्यांच्या हत्येत हेन्री सहभागी असल्याचं शेरिझिएला वाटतं. त्यामुळे त्यानं सातत्यानं सरकारविरोधात आवाज उठवला आहे. शिवाय शक्य तेव्हा सरकारची कोंडी करण्यातही त्यांना यश मिळालं आहे. ऑक्टोबर २०२१मध्येही त्यांनं सरकारची कोंडी करण्यासाठी देशातील सर्वात मोठ्या इंधन साठ्याकडे जाणारा मार्ग एक महिना बंद केला होता आणि हेन्री यांनी देशाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. त्यावेळी हेन्री यांनी राजीनामा देण्यास नकार दिला. २०२२च्या मध्यापर्यंत जवळपास सर्व टोळ्यांनी एकतर सरकारच्या बाजूनं किंवा सरकारच्या विरोधात लढणाऱ्या टोळ्यांच्या समुहात सहभाग घेतला होता.

टोळ्यांच्या वाढत्या उपद्रवाला कंटाळून काही नागरिकांनीही त्यांच्या संघटना स्थापन करत या टोळ्यांविरोधात युद्ध पुकारलं. या सर्व घटनांना नियंत्रणात आणण्यात हैती पोलीस पुर्णपणे अयशस्वी ठरले आहे. उलट काही ठिकाणी त्यांनी या प्रकारच्या हिंसाचारात सहभाग घेतल्याचं दृष्य आहेत. तर काही ठिकाणी पोलीसांनी जबाबदाऱ्या वाऱ्यावर सोडत काढता पाय घेतल्याचंही दिसलं आहे.

 

 

त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघटनेनं हैती सरकारच्या मदतीला केनियातील पोलीस दल पाठवण्याचा विचार केला होता आणि यासाठी करार करण्यासाठी नुकताच राजीनामा देणारे पंतप्रधान हेन्री केनियाला गेले असताना हा हिंसाचार जास्त भडकला. हैतीच्या सामान्य नागरिकांचा परकीय सैन्याचा अनुभव चांगला नाही. या देशात आतापर्यंत चार वेळा परकीय देशांच्या सैन्यानं किंवा सरकारनं हस्तक्षेप केला आहे आणि दरवेळी सामान्य नागरिकांना त्याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. २०व्या शतकाच्या सुरुवातीला जर्मनीशी संबंध वाढल्यामुळे अमेरिकेनं त्यांचं सैन्य हैतीत पाठवलं होतं. मात्र या अमेरिकन सैन्यानंं सामान्य नागरिकांवर बरेच अत्याचार केले.

डुवालीएच्या काळात देखील काही परकीय देशांनी हैतीच्या राजकारणात हस्तक्षेप केला होता. तर डुवालीएची सत्ता गेल्यानंतर पुन्हा ९०च्या दशकात अमेरिकन सैन्यानं सहा महिन्यासाठी हैतीत तळ ठोकला होता. २१व्या शतकाच्या सुरुवातीला संयुक्त राष्ट्र संघटनेनं पाठवलेल्या शांती सेनेनं हैतीच्या नदीला प्रदूषित केल्यामुळे कॉलरामुळं (पटकी) दहा हजार नागरिकांना त्यांचा जीव गमवावा लागला होता. त्यानंतरही हेन्री त्यांच्या देशात परकीय देशांचं सैन्य आणू पाहत आहे, यावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

 

हैतीतील नागरिकांसमोर जगण्या-मरण्याचे प्रश्न

हैतीतील नागरिकांना या हिंसाचारासोबत इतर अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागत आहे. २००४ मध्ये हैती चक्रीवादळाच्या तडाख्यात आल्यानं ३,००६ नागरिकांना त्यांचा जीव गमवावा लागला. २०१० प्रमाणे २०२१ साली झालेल्या भूकंपात २,२४८ नागरिक मृत्यूमुखी पडले. या देशाला कॉलराच्या साथीनं सातत्यानं धक्के दिले आहेत. २०१० साली भूकंपानंतर आलेल्या कॉलराच्या साथीत दहा हजार नागरिक मृत्यूमुखी पडले, तर आठ लाख नागरिकांना कॉलराची लागण झाली होती. ही साथ २०११ मध्ये पुन्हा तीव्र झाली होती. तर २०१५ आणि २०१६ मध्येदेखील कॉलराची साथ आली होती. फेब्रवारी २०२२ मध्ये हैतीला कॉलरा मुक्त म्हणून जाहीर करण्यात आलं. तरी ऑक्टोबर २०२२ मध्ये पुन्हा कॉलरानं हैतीत डोकं वर काढलं. 

याशिवाय विसाव्या शतकात हैती सोडून अमेरिकेत वास्तव्यास गेलेल्या हैतीच्या नागरिकांना वर्ण भेदाचा सामाना करावा लागला. तर हैतीतून अमेरिकेकडे होणारं विस्थापन अजूनही थांबलेलं नाही. अमेरिकेत जाऊ पाहणाऱ्या अनेक हैतीयन नागरिकांना अमेरिकेच्या तटरक्षक दलाकडून अटक करून पुन्हा हैतीत सोडलं जातं. काही दिवसांपुर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि पुन्हा राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत असलेले डॉनल्ड ट्रम्प यांनी हैतीचं वर्णन करताना अतिशय खालच्या शब्दांचा वापर केला होता.

आताची स्थिती पाहता परकीय देशाच्या पोलीसांना हैतीत घुसून ही परिस्थिती नियंत्रणात आणता येईल का? त्यामुळे पुन्हा रक्तपात वाढणार नाही ना? परकीय देशाकडून मदत घेतल्यानंतर आलेलं स्थैर्य किती दिवस टिकेल? आणि जगातील पहिल्या कृष्णवर्णीय प्रजासत्ताक राष्ट्रात लोकशाही पुनर्स्थापित होऊन अपेक्षित स्थिरता मिळेल का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.