India
लखबीरची हत्या करणाऱ्या निहंगानंच त्याला सिंघू सीमेवर नेलं?
या घटनेभोवती आता नियोजित षड्यंत्र असल्याच्या शंका उमटू लागल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच सिंघू सीमेवर शेतकरी आंदोलनादरम्यान पंजाबच्या तर्न तारण येथील एका दलित युवकाची काही निहंग पंथीयांनी हत्या केल्याची घटना घडली होती. ही निहंगांनी गुरु ग्रंथ साहिब या शीख धर्मग्रंथाची विटंबना केल्यानंतर केलेली हत्या होती असा समज असतानाच 'द कॅराव्हॅन' आणि 'द इंडियन एक्स्प्रेस' यांनी केलेल्या वार्तांकनानुसार हत्या करणारा निहंग पंथीयच लखबीर सिंघला सिंघू सीमेवर घेऊन गेला होता, ज्यामुळं या घटनेभोवती आता नियोजित षड्यंत्र असल्याच्या शंका उमटू लागल्या आहेत.
दिल्लीच्या सिंघू सीमेवर घडलेल्या हत्येप्रकरणी बाबा जी सरबजीत सिंघ नावाच्या निहंग शिखाला अटक करण्यात आली होती. त्याच्यावर आरोप होता, जो त्यानं कबूलही केला होता, की त्यानं लखबीर सिंग या जलंधर जिल्ह्यातील व्यक्तीला ग्रंथाची 'बेअदबी' केल्यामुळं मारून टाकलं. या घटनेला आधीपासूनच लखबीरला ओळखणारे गावकरी व त्याची बहीण यांनी अनेक शंका उपस्थित केल्या होत्या, जसं खिशात १० रुपयसुद्धा नसणारा लाखबीर सिंघू सीमेवर गेला कसा, त्यानं ग्रंथाची बेअदबी का केली असावी आणि त्याच्या अंगावर शीख धार्मिक वस्त्र कोणी चढवली असावी?
आता या वार्तांकनानंतर त्याला एक नवीनच पैलू जोडला जात आहे. 'द कॅरवॅन' च्या जतिंदर कौर तूर यांनी केलेल्या बातमीनुसार मुख्य आरोपी सरबजीत सिंग या निहंग शीखाला मृतक लखबीर सिंग याच्या ‘चिमा कलन’ या गावी हत्येच्या काही आठवड्यांपूर्वीच वारंवार पाहण्यात आलं असल्याचं स्थानिक सांगत आहेत. सरबजीत सिंग या गावी ३ महिन्यापासून येत-जात असून त्यानंच लखबीर सिंगला सिंघू बॉर्डर वर आणलं असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.
सरबजीत सिंग या गावी ३ महिन्यापासून येत-जात असून त्यानंच लखबीर सिंगला सिंघू बॉर्डर वर आणलं असावं.
गावाच्या एका निनावी स्थानिकानुसार, १२ ऑक्टोबर म्हणजेच हत्येच्या ३ दिवसाआधी त्याने लखबीरला दोन निहंग शीखांसोबत बोलोरे कॅम्पर या गाडीमध्ये बसलेलं त्यानं पाहिलं होतं, तसंच काही इतर गावकरी म्हणतात गेल्या दोन-तीन महिन्यात अनेकवेळा ही गाडी सुखबीरला चालवताना गावकऱ्यांनी बघितलं आहे. गावातील बसस्टँड जवळ नव्यानं झालेल्या लंगर हॉल जवळ तो नेहमीच दिसायचा व त्याची राहण्याची सोयपण इथेच झालेली होती. स्थानिकांच्या माहितीनुसार सरबजीत गुजराती, मराठी आणि इतर भाषा त्याला ज्ञात होत्या.
लखबीरचे नातेवाईक व गावकरी. फोटो- द कॅराव्हॅन
यापूर्वी कॅरवॅननंच केलेल्या एका वार्तांकनात लखबीर सिंघची बहिण राज कौर सात्यत्यानं म्हणत होती की, "लखबीर स्वतः एकट्याने सिंघू बॉर्डरला जाऊच शकत नाही, तिथं त्याचं जाण्याचं काही कारणच नाही, त्याला नक्की कोणीतरी आमिष दाखवून नेलं असणार."
द कॅरावनच्या पत्रकारानं गावाच्या लोकांशी संवाद साधला असता, तिथल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे की, "लखबीरवर असलेल्या अपवित्र कामाचा आरोप खोटा असून, त्याची उघडपणे हत्या करण्यात आली आहे."
"लखबीरवर असलेल्या अपवित्र कामाचा आरोप खोटा असून, त्याची उघडपणे हत्या करण्यात आली आहे."
निहंग सरबजीतने हत्येची कबुली दिली आणि पोलिसांना तो १५ ऑक्टोबरच्या रात्री शरण आला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच १६ तारखेला अजून एक निहंग शीख नारायण सिंग देखील अमृतसरच्या अमरकोट गावाच्या पोलिसांना शरण आला व त्याला अटक करण्यात आलं.
राकेश कौशल, जे अमृतसर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक आहेत, व ज्यांनी नारायण सिंग याला अटक केली, ते कॅराव्हॅनशी बोलताना म्हणतात, "नारायण सिंघ यानं स्वतः घटना घडल्याची पाहिली नाही, तो १५ ऑक्टोबरच्या सकाळी ५:३० वाजता घटना स्थळी पोहचला आणि त्यानं सरबजीतला लखबीरला मारताना बघितलं आणि घटनेची विचारणा केली, तेव्हा त्यानं लखबीरनं ग्रंथाची बेअदबी केल्याचं नारायणसिंगला सांगितलं. सरबजीत यानं आधीच लखबीर सिंघचं मनगट कापलं होतं ज्यानंतर बेअदबी बाबत कळल्यावर रागात असलेल्या नारायणसिंग यानं लखबीरचा पाय तोडला, आणि त्याला बॅरीकेडवर लटकवलं. तेव्हा त्याच्या सोबत इतर निहंग देखील होते."
याच वृत्तात पुढं एक गावकरी १२ तारखेला झालेली घटना सांगतो की, "लखबीर सिंग जवळच्या धान्य मार्केटला गेला होता. तिथं त्याला एका गुरशीखाने काम करण्यास मनाई केली कारण तो व्यसनी होता. त्यानंतर लखबीर बाजार सोडून चालू लागला, तिथं त्याला एक स्थानिक नसलेला माणूस आपल्या दुचाकी वाहनावर बसवून जवळच्या स्मशानभूमी जवळ घेऊन गेला आणि तिथं त्यानं दोन निहंग शिखांना त्याला सुपूर्द केलं. पुढे त्या निहंग शिखांना भेटल्यानंतरचा संवाद कोणालाच माहित नाही मात्र त्या रात्री लखबीरला गाववाल्यांनी स्थानिक गौशालेत गुरांना चारताना पाहिलं होत."
दुसऱ्या दिवशी सकाळी लखबीरला शेवटचं धान्य बाजारात अमृतपाल सिंग यांनी बघितलं, अमृतपाल हे स्थानिक गावकरी असून खासगी बँकेसाठी काम करतात. अमृतपाल यांनीच सर्वात शेवटी लखबीर सिंगला गावात बघितलं आणि त्यानंतर तो कशाप्रकारे सिंघू बॉर्डर वर पोहचला कोणालाच माहित नाही.
मुखविंदर सिंग भुल्लर, बटाला शहराचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक यांनी निहंग सरबजीत बद्दल कॅराव्हॅनच्या पत्रकाराला माहिती देताना म्हटलं, "३५ वर्षीय सरबजीत आपल्या मामाच्या घरी वयाच्या ६व्या वर्षापासून राहायला होता. त्यानं २००० साली दहावी दिली. त्यानंतर तो चार-पाच वर्ष दुबईत होता. त्याचं २००७ला लग्न झालं होतं मात्र २०१७ला त्याचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यानं पंजाब सोडत महाराष्ट्रात नांदेडमध्ये हुजूर साहेब इथं सेवा केली आणि इथेच तो निहंग झाला."