Asia
समजून घ्या: भारत-चीन संघर्षाकडे नक्की कसं पाहायचं?
भारत आणि चीन या आशिया खंडातील दोन मोठ्या बलाढ्य देशांत सीमेवर नव्याने संघर्ष सुरु झाला आहे.
भारत आणि चीन या आशिया खंडातील दोन मोठ्या बलाढ्य देशांत सीमेवर नव्याने संघर्ष सुरु झाला आहे. ५ मे २०२० पासून दोन्ही देशांत असलेल्या मानलेल्या सीमेवर म्हणजेच LAC वर (ज्याचे अधिकृत सीमांकन झालेले नाही) दोन्ही देशांचे लष्कर, PLA- पीपल्स लिबरेशन आर्मी आणि भारतीय सैन्याचे ITBP इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस समोरासमोर आले आहे. लडाख या केंद्रशासित प्रदेशाला लागून असलेल्या LAC सीमेवरील भागात हा 'स्टँड-ऑफ' झाला आहे, ज्याचं परिवर्तन चकमकीत होऊन त्यात भारताचे २० सैनिक मरण पावल्याची माहिती भारतीय सैन्यानं दिली आहे.
५ मे पूर्वीचा 'स्टेटस क्वो' आणि त्यानंतरचा मिलिटरी स्टँड-ऑफ
हा स्टँड-ऑफ मुख्यत्वेकरून लडाखमधील पाच ठिकाणी घडून आला आहे: पॅनगोंग लेकचा उत्तरी काठ, गलवान नदीचे खोरे आणि दौलतबेग ओल्डी जवळील पेट्रोलिंग पॉईंट्स १४, १५ व १७. तसेच सिक्कीमजवळील नाकू-ला पास या भागात ही तणाव आढळून आला आहे.
भारत-चीन या दोन्ही देशांत पूर्वेला अरुणाचल प्रदेश व सिक्कीम आणि पश्चिमेला लडाखमध्ये सीमेवरून वाद आहेत. मध्य भागात म्हणजे हिमाचल प्रदेश व उत्तराखंडला लागून असलेल्या सीमेवर फारसा तणाव दिसून येत नाही.
५ मे रोजी PLA आणि भारतीय सैन्याच्या तुकडीत एकमेकांच्या भागात अडवाअडवीमुळे जमिनीवर प्रत्यक्ष हमरीतुमरी झाली. पुढील काही दिवसांत चीनच्या PLA ने पॅनगोंग लेकच्या भागातील पर्वतीय भागांत त्यांच्या ठरलेल्या पूर्वीच्या स्थानावरून पुढे सरकून फिंगर एरिया ५ पर्यंत आत आले. पॅनगोंग लेक भागात जमीन पर्वतीय पट्ट्यात विभागली गेली आहे. अश्या पर्वतीय पट्ट्यांना फिंगर १ ते फिंगर ८ अशी नावं दिली गेली आहेत. आतापर्यंत ठरलेला 'स्टेटस क्वो अँटे' म्हणजे पॅनगोंग लेक एरियातील फिंगर ४ वर भारतीय सैन्याचा तळ आहे व फिंगर ८ पर्यंतच्या जमिनीवर भारताचा दावा आहे.
चीनचा कायमस्वरूपी लष्करी तळ फिंगर ८ नंतरच्या भागात आहे. फिंगर ४ ते फिंगर ८ या भागात कोणत्याही सैन्याचे बेस नाही (No Man's Land). भारतीय सैन्य फिंगर ८ पर्यंत गस्त घालू शकत होते. परंतु ५ मे नंतरच्या चालू स्टँड-ऑफ काळात भारतीय सैन्याला पुढे गस्त घालण्यास PLA ने अडवले आहे आणि चिनी सैन्याने फिंगर ४ च्या जवळ स्वतःचा लष्करी तळ ठोकला आहे. पॅनगोंग भाग व्यतिरिक्त गलवान नदीच्या खोऱ्याच्या भागातही PLA ने तात्पुरते तंबू बांधून वास्तव केले आहे (गलवान भागात यापूर्वी तणाव १९६२च्या लढाईतच होता त्यानंतर या भागात तणाव निर्माण होण्याची ही पहिली घटना आहे) सोबतीला रडार व लष्करी साहित्य जमवले आहे.
सद्य परिस्थिती आणि सैन्यांतील तणाव
या स्टँड-ऑफमुळे तयार झालेला तणाव दोन्ही लष्करांच्या जनरल पदाच्या अधिकाऱ्यांनी बोलणी करून कमी करण्याचे ठरवले आहे. सोबतीला सचिव पातळीवरही चर्चेने मार्ग सोडवण्यासाठी दोन्ही देशांतून सक्तीचे प्रयत्न केले जात आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या मदतीने बोलण्या सफल होण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासून १५ जूनपर्यंत किमान दोनवेळा मेजर जनरल पातळीवर बोलणी झाली आहेत आणि बऱ्याचवेळा कमांडर पातळीवरील अधिकाऱ्यांनी एकमेकांत बोलणी केलेली आहेत. ९ जूनच्या बोलणीवरून दोन्ही देशाच्या लष्कराने सुरुवातीला पेट्रोलिंग पॉईंट १५ व १७ आणि गलवान एरिया या भागातील स्टँड-ऑफ पासून अडीच किमी मागे सरकण्याचे मंजूर झाले होते.
परंतु १५ जूनच्या मध्यरात्री भारतीय सैन्याच्या बिहार रेजिमेंट आणि PLA मध्ये मागे सरकण्यावरून वाद झाला आणि हा वाद विकोपाला जाऊन भारतीय सैन्यातील १ कमांडर व २ सैनिकांना प्राणाला मुकावे लागले आहे. किमान १७ सैनिक गंभीर जखमी अवस्थेत होते परंतु शून्याच्याही खाली असलेल्या तापमानात High-Altitude च्या वातावरणात त्यांचा मृत्यू झाल्याचे १६ जून रोजी उशिरा समजले आहे. दोन्ही सैन्यात झालेल्या या लढाईत फायरिंग झाली नाही. लढाईत काठ्या, सळया, दगडधोंडे वापरले गेले असल्याचे समजते. चीनच्या सरकारने सैन्यातील जखमी आणि मृत सैनिकांचा आकडा प्रस्तुत केला नसल्याने संख्या अस्पष्ट आहे परंतु त्यांनी PLA सैन्याला या लढाईदरम्यान भारतीय सैन्याकडून क्षती पोहचल्याचे मान्य केले आहे.
चीनच्या आक्रमक भूमिकेला असलेली सामरिक पार्श्वभूमी
लडाखमधील अतिशय महत्वाच्या अश्या उंच आणि सामरिक महत्व असलेल्या दौलतबेग ओल्डी भागात भारताने रस्ता बांधला आहे. याची योजना २००८ मध्येच तयार झाली होती परंतु हा प्रदेश सतत बर्फाच्छादित आणि कठीण वातावरणात असल्याने बांधकाम पूर्ण होण्यात बराच काळ गेला. परंतु हा २५५ किमी रस्ता बांधून पूर्ण झाला आहे. हा रस्ता काराकोरम पासच्या अगदी समोर येऊन पोहचतो. काराकोरम पास म्हणजे शिंगजान या चीनच्या व्यापारी मार्गाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या अश्या भागाला जोडणारा एक मार्ग आहे. हा पूर्ण भूभाग चीनच्या ऐतिहासिक सिल्क रूट चा भाग आहे, भारताने इथे बारा महिने चालू राहू शकणारा १६,००० फूट उंचीवर असलेला रस्ता बांधला आहे.
इतक्या उंचावरून चीनच्या हालचालींवर सहज नजर ठेवण्यासाठी ही जागा सामरिक दृष्ट्या महत्वाची ठरते. शिवाय हा रस्ता अकसाई चीन मधून जाणाऱ्या तिबेट-शिंगजान या महत्वाच्या हायवेजवळ आहे. या रस्त्यामुळे भारताच्या दौलतबेग जवळील भारतीय हवाईदलाचे हेलीपॅड पुन्हा कार्यरत करण्यास मदत होईल आणि सैन्यसामान पुरवठा अत्यंत सुकर होऊ शकतो. चीनला भारताची ही उपलब्धी धोकादायक ठरू शकते इतके या रस्त्याचे भविष्याच्या दृष्टीने महत्व आहे. या भागात भारतीय लष्कराचे कायमस्वरूपी वास्तव्य असल्याचे भारताला लष्करी आणि सामरिक फायदे आहेत. POK मध्ये गिलगिट भागातील चीन-पाकिस्तानच्या CPEC China Pakistan Economic Corridor या महत्वकांक्षी हायवे प्रोजेक्टवरही भविष्यात लक्ष ठेवता येऊ शकते.
चीनच्या आक्रमक भूमिकेमागील राजकीय उद्दिष्टे
चीनने भारतीय सीमेवर अशी लष्करी आक्रमकता दाखवल्यामागे बरीच कारणे सांगितली जात आहेत. भारताने जम्मू आणि काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून दोन्ही भाग विभागून केंद्रशासित प्रदेश केल्याने चीनला आपत्ती आहे असे काही विश्लेषकांचे मत आहे. त्याला पुष्टी देणारे चीनच्या एका थिंकटॅंकचेही विश्लेषण समोर आले आहे. भारत-अमेरिकेत वाढता एकोपा आणि मैत्री हे चीनच्या पथ्यावर पडले नाही. तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या मदतीने चीनविरुद्ध १० देशांचे D10 (डेमोक्रॅसी १०) हे संघटन करण्यात आले आहे (G7 देश- कॅनडा, फ्रांस, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंग्डम, युनायटेड स्टेट्स व ऑस्ट्रेलिया, भारत, दक्षिण कोरिया) याने चीनला हेतुपूर्वक एकटे पाडण्याचा डाव या देशांचा आहे म्हणूनही चीन नाराज आहे असा एक मतप्रवाह समोर येतो. परंतु याहीपेक्षा चीनच्या या आक्रमकतेमागे अंतर्गत तणाव आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया या देशांशी वाढते मतभेद कारणीभूत आहेत.
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी चीनच्या अध्यक्षपदावर कायमस्वरूपी राहण्याची सोय २०१८ साली करून घेतली आहे. जिनपिंग हे चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे चेअरमन, PLA चे कमांडर इन चीफ आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष आहेत. म्हणजेच चीनचे राजकीय आणि लष्करी नेतृत्व हे एकट्या जिनपिंग यांच्याकडेच आहे. एकहाती व्यक्तीकेंद्रित सत्ता पक्षाच्या इतर वरिष्ठांचे महत्त्व नाहीसे करते. तसेच कोविड-१९ काळात देशांतर्गत परिस्थिती हाताळण्यात सरकारला आलेले अपयश, आर्थिक मंदी व बेरोजगारी, २०१९ मधील देशांत झालेले सरकार विरोधी आंदोलन, शी जिनपिंग यांच्या विरोधात वाढलेला मतप्रवाह, नागरी हक्कांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधी सरकारची अतिकठोर भूमिका, अंतर्गत कठोर सर्व्हेलन्स पॉलिसीमुळे निर्माण होणारा असंतोष, हॉंगकॉंगमधील आंदोलने दडपल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली टीका, तैवानमुळे वन चायना पॉलिसीला वाढता धोका, शी जिनपिंगच्या आमरण सत्तेवर राहण्याने सरकारमध्ये आलेले अति केंद्रीयिकरण अश्या बऱ्याच अंतर्गत गोष्टींत चीन सध्या व्यस्त आहे. शिवाय अमेरिका-चीन मधील व्यापारी युद्ध, करोनामुळे तयार झालेले ऑस्ट्रेलियाशी व्यापारी मतभेद, जपान व व्हिएतनाम सोबत असलेल्या दक्षिणी चिनी समुद्रातील मतभेद,
OBOR सारख्या अतिमहत्वकांक्षी प्रोजेक्टमुळे गरीब व विकसनशील देशांना दिलेली कर्जे हेही चीनसमोर भविष्यात अडचणी निर्माण करू शकतात. अशी बाह्य जगातील तणाव परिस्थिती हाताळताना चीन स्वतःला कुठेही कमजोर दाखवू इच्छित नाही. चीन या स्टँड-ऑफ मध्ये कुठेही कमकुवत झाला आहे हे चीनला भारताला दाखवून द्यायचे नाही आणि यामुळे LAC वर वाटाघाटी करताना चीन भारताला कोणत्याही सवलती देणार नाही हे दाखवण्यासाठी चीन LAC वर आक्रमकता दाखवून सतत नाजूक परिस्थिती ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. LAC वरील PLA च्या हालचाली म्हणजे चीनचा भारतावर मानसिकदृष्ट्या वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न आहे. पाकिस्तानशी वाढलेली जवळीक, तिबेटबद्दल वाढता संशय आणि LAC वर नाजूक परिस्थिती टिकवून ठेवण्याकडे चीनचा एकंदर कल आहे.
अंतर्गत मतभेद आणि असंतोषाचे निरसन हे अति राष्ट्रवाद (Ultranationalism) अवलंबून होऊ शकते हे चीनला माहीत आहे. भारताच्या सीमेवर आक्रमक अजेंडा चालवून चिनी नागरिकांना राष्ट्रवादाच्या आडोश्यात एकत्र आणण्याचे काम सध्या चीन करत आहे यात शंका नाही. इंग्लिश लेखक सॅम्युअल जॉन्सनने म्हणलेच आहे, "patriotism is the last refuge of a scoundrel".