Americas

जाणून घ्या अमेरिकन निवडणुकांची कार्यप्रणाली

३ नोव्हेंबर २०२० रोजी अमेरिकेत अध्यक्षीय निवडणूक होणार आहे.

Credit : AFP

येत्या ३ नोव्हेंबर २०२० रोजी अमेरिकेत अध्यक्षीय निवडणूक होणार आहे. जगाच्या जुन्या लोकशाही राष्ट्राची अध्यक्षीय निवडणूक सगळ्यात लांबलचक चालणारी प्रक्रिया आहे. दोन महिन्यांवर आलेल्या या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षीय पद्धतीच्या या शासन प्रणालीची निवडणूक कार्यपद्धती थोडक्यात जाणून घेऊया.

पन्नास फेडरल राज्यांत विभागला गेलेल्या राष्ट्राच्या युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका अर्थात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया चालू कार्यकाळात जवळपास दीड वर्षांआधीच सुरू होते.

अमेरिकेच्या शासनप्रणालीमध्ये युनायटेड स्टेट्स काँग्रेस ही लेजिसलेटिव्ह बॉडी आहे. याचे प्रतिनिधी हाऊस ऑफ रीप्रेझेन्टेटिव्ह आणि सिनेट अश्या दोन चेंबर्समध्ये विभागले गेले असतात. प्रत्येक राज्यातून दोन असे सिनेट सदस्य निवडून येतात आणि हाऊससदस्य त्या त्या राज्याच्या लोकसंख्येनुसार प्रतिनिधी निवडून येतात. या काँग्रेसचा अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत सहभाग नसतो.

 

राष्ट्राध्यक्ष पात्रता आणि कार्यकाळ

राष्ट्राध्यक्षाचा कार्यकाळ साधारण चार वर्षांचा असतो. राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी वय वर्षे ३५ च्या पुढील उमेदवाराने जन्मतः अमेरिकन नागरिक असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराची किमान १४ वर्षांपासून अमेरिकेत स्थायिकता आवश्यक आहे. अमेरिकेत सध्या द्विपक्षीय पद्धतीने निवडणुका पार पडतात. परंतु याचा अर्थ असा नाही की अमेरिकेच्या राजकारणात इतर पक्ष अस्तित्वात नाहीत. मुख्य राजकीय पक्ष डेमोक्रॅटिक पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी व्यतिरिक्त अमेरिकेत ग्रीन पार्टी, लिब्रटेरीयन पार्टी, कॉन्स्टिट्युशन पार्टी असे काही किरकोळ थर्ड पार्टी आहेत. इच्छुक उमेदवाराला राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी आधी डेमोक्रॅटिक किंवा रिपब्लिकन किंवा थर्ड पार्टी च्या नामनिर्देशन (nomination) प्रक्रियेला सामोरे जावे लागते.

 

राष्ट्राध्यक्ष निवडणूक प्रक्रिया

ही प्रकिया वेगवेगळ्या पातळीवर विभागली गेली आहे. 

  • प्रायमरीज आणि कॉकसेस
  • नॅशनल कॉन्व्हेंशन/अधिवेशन
  • जनरल इलेक्शन/सार्वजनिक निवडणूक
  • इलेक्टोरल कॉलेज
  • इनोगोरेशन/ शपथविधी

दोन्ही पक्षाची नामनिर्देशन (नॉमिनेशन) प्रक्रिया वर्षभर आधीपासून सुरू होते. याची पहिली पातळी म्हणजे प्रायमरीज आणि कॉकसेस. एखाद्या उमेदवाराने अध्यक्षीय निवडणुका लढण्याची इच्छा जाहीर केली की तो इच्छुक उमेदवार डेमोक्रॅटिक किंवा रिपब्लिकन पक्षाचे नॉमीनेशन जिंकण्याच्या प्रक्रियेतून जातो. प्रथमतः इच्छुक उमेदवाराला संबंधित पक्षाचे नॉमिनेशन जिंकून उमेदवारी सिद्ध करावी लागते. एका पक्षाची नॉमीनेशन जिंकण्यासाठी उमेदवाराला पन्नास राज्यांतून पक्षाच्या डेलीगेट्स मार्फत निवडून यावे लागते अर्थात ही निवडणूक अप्रत्यक्ष पद्धतीने पुढे सरकते. डेलीगेट्स मिळवण्यासाठी हे इच्छुक उमेदवार टीव्ही डिबेट्स मध्ये सहभागी होतात आणि स्वतःची उमेदवारी कशी योग्य आहे हे सांगतात. यात आरोग्यसेवा, शिक्षण, अर्थव्यवस्था, नागरी हक्क, हवामान बदल, इमिग्रेशन, स्थानिक धोरणे आणि परराष्ट्र धोरण इत्यादी विविध मुद्द्यांवर हरेक उमेदवार आपली मते मांडतात. उमेदवारांची नॉमिनेशन मिळवण्यासाठी दोन पद्धतीने निवडणूक होते - प्रायमरीज आणि कॉकसेस.

 

प्रायमरीज-कॉकसेस आणि पक्षाचे अधिवेशन

प्रायमरीज म्हणजे बॅलेट पद्धतीने गुप्त मतदान आणि कॉकस म्हणजे हात उंचावून आवाजी मतदान. प्रत्येक राज्यात कोणत्या पद्धतीने नॉमीनेशन घ्यायचे आहेत हे स्टेटने ठरवायचे असते.

प्रत्येक राज्यात स्थानिक पातळीवर संबंधित पक्षाचे सदस्य एकत्र येऊन पक्षाच्या अधिवेशनासाठी प्रतिनिधी(डेलीगेट्स) निवडतात. हे डेलीगेट्स/प्रतिनिधी पुढे जाऊन पक्षाच्या अधिवेशनात राज्याचे प्रतिनिधित्व करतात. 

आता यात दोन प्रकारचे प्रतिनिधी असतात. सुपर डेलीगेट्स अथवा अनप्लेज्ड (unpleadged) आणि प्लेज्ड डेलीगेट्स. प्लेज्ड डेलीगेट्स प्रायमरीज आणि कॉकसेसमध्ये निवडून येतात. हे डेलीगेट्स प्रेसिडेंशीअल उमेदवारांना बांधील असतात, अर्थात पक्षाच्या अधिवेशनात संबंधीत उमेदवाराला नॉमीनेशनसाठी निवडण्यात बांधील असतात. अनप्लेज्ड डेलीगेट्स म्हणजे अधिवेशनात कोण्या एका उमेदवाराला बांधील नसलेले प्रतिनिधी. अनप्लेज्ड डेलीगेट्स संख्येत कमी असले तरी कधी कधी महत्वाचे ठरतात. अर्थात समजा, डेमोक्रॅटिक पार्टीकडून चार उमेदवार नॉमीनेशनच्या शर्यतीत असतील आणि त्यातील कोण्या दोन उमेदवारांच्या डेलीगेट्समध्ये फारसा फरक नसेल तर अधिवेशनात उपस्थित अनप्लेज्ड/सुपर डेलिगेट्स दोन्ही इच्छित उमेदवारांपैकी एकास समर्थन देऊन संबंधित पार्टीचा अध्यक्षीय निवडणूकीचा दावेदार म्हणून निवडू शकतात. नामनिर्देशन जिंकलेला उमेदवार सहसा राष्ट्रीय अधिवेशनात स्वतःचा उपराष्ट्रपती कोण असेल हे जाहीर करतो.

उदा. डेमोक्रॅटिक पार्टीमध्ये एकूण ४७५० डेलीगेट्स आहेत. उमेदवाराला पक्षीय अधिवेशनात नॉमीनेशन जिंकण्यासाठी निम्मे डेलीगेट्स स्वतःकडे असणे जरुरी आहे. ४७५० पैकी ३९७९ हे प्लेज्ड डेलीगेट्स असतात जे संबंधित उमेदवाराला नॉमीनेशनसाठी निवडून आणण्यास बांधील आहेत. जितके जास्त डेलीगेट्स तो त्या पक्षाचा राष्ट्राध्यक्ष पदाचा अंतिम दावेदार होतो. एखाद्या पक्षाने आपला अंतिम उमेदवार आधीच ठरवला असेल तर नॉमीनेशनची प्रक्रिया (प्रायमरीज) टाळू शकतो आणि थेट पक्षाच्या अधिवेशनात पक्षाच्या सर्व डेलीगेट्सना बोलवून अंतिम दावेदारास प्रोत्साहन देऊ शकतो.  उदा. यावेळी रिपब्लिकन पक्षाने चालू कार्यकाळातील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची निवड २०२० साठी अंतिम दावेदार म्हणून निश्चित केल्याने पक्षाने प्रायमरीज घेतल्या नाहीत.

 

प्रचार आणि सार्वजनिक निवडणुक

अधिवेशनात नामनिर्देशन झाल्यानंतर दोन्ही पक्षाचे दावेदार प्रचाराच्या धामधुमीत व्यस्त होतात. या प्रचारात भरमसाठ पैसा खर्च केला जातो. अमेरिकेत जनरल इलेक्शन नोव्हेंबरच्या पहिल्या सोमवारनंतर येणाऱ्या मंगळवारी या ठरलेल्या वारीच होते. यात बदल करणे सहसा अशक्य आहे. जगाच्या महासत्तेची अध्यक्षीय निवडणुक जगभरातील नेते, राजकीय विश्लेषक, नॉनस्टेट ऍक्टर्स आणि नागरिक पाहत असतात. 

 

इलेक्टोरल कॉलेज

अमेरिकेचे नागरिक राष्ट्राध्यक्षासाठी अप्रत्यक्ष मतदान करतात, याचा अर्थ नागरिक डायरेक्ट राष्ट्राध्यक्ष निवडत नाहीत. प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येनुसार त्या राज्यात पक्षाचे "इलेक्टर्स" नेमले जातात. जर तुम्हाला नागरिक म्हणून एखाद्या उमेदवाराला मतदान करायचे असल्यास तुम्ही त्या पक्षाच्या इलेक्टरला निवडू शकता. निवडून आलेले इलेक्टर्स म्हणजे इलेक्टोरल कॉलेज, जे पुढे जाऊन राष्ट्राध्यक्षाची निवड करतात. 

आता यात गंमत म्हणजे एखाद्या राज्यात एकूण इलेक्टर्सपैकी ज्या पक्षाचे जास्त इलेक्टर्स निवडून येतात तो पक्ष ते संपूर्ण राज्य जिंकतो. याला 'विनर्स टेक्स इट ऑल' म्हणले जाते.

उदा. कॅलिफोर्निया राज्यात एकूण ५५ इलेक्टर्स आहेत. त्यापैकी समजा रिपब्लिकन पक्षाचे २० आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे २५ इलेक्टर्स निवडून आले तर कॅलिफोर्निया राज्यातील सर्वच्या सर्व ५५ इलेक्टर्स हे डेमोक्रॅटिक पक्षाच्या खात्यात जातील. या पद्धतीने इलेक्टोरल कॉलेजमध्ये ज्या पक्षाला सर्वात जास्त इलेक्टर्स मिळतात तो पक्ष अंतिम लढत जिंकतो आणि त्या पक्षाचा दावेदार हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनतो. या पद्धतीवर बरेच वाद आहेत. कारण देशभरातील जनतेने पसंत केलेल्या उमेदवाराला जास्त मते मिळूनही तो इलेक्टोरल कॉलेजमध्ये कमी आकडा मिळून तो हरू शकतो. (असे सहसा होत नाही, कारण इलेक्टर्स पॉप्युलर वोट्सच्या आधारावर राष्ट्राध्यक्ष निवडतात.)

जसे २०१६ साली झाले, हिलरी क्लिंटन यांना पॉप्युलर वोट्स (जनतेतून सर्वात जास्त % पसंती असलेला उमेदवार) मिळूनही त्या इलेक्टोरल कॉलेजमध्ये हरल्या आणि डोनाल्ड ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली. शिवाय एखाद्या राज्याला लोकसंख्येनुसार जास्त इलेक्टर्स असल्याने निवडणुकीत त्या राज्याचे अनन्यसाधारण असे महत्व असते यामुळे कमी लोकसंख्या असलेल्या राज्यांना उमेदवारांकडून कमी महत्व दिले जाते.

देशभरातून एकूण ५३८ इलेक्टर्स निवडले जातात. त्यात एखाद्या पक्षाला २७० पेक्षा अधिक इलेक्टर्स मिळाले तर तो पक्ष ही निवडणूक जिंकतो. (मॅजिक फिगर २७०)

 

इनोगरेशन

अमेरिकन काँग्रेस या इलेक्टोरल कॉलेजची मते मोजण्याचे काम करते. अश्याप्रकारे इतकी मोठी आणि किचकट प्रक्रिया झाल्यानंतर जानेवारीमध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा शपथविधी सोहळा पार पडतो आणि जगभर हा सोहळा सर्व मीडियातून प्रसारित केला जातो.

(टीप: लेखात काही इंग्रजी शब्द वाचकांच्या सोयीसाठी अपरिहार्यतेमुळे वापरले आहेत.)