Europe
युरोपच्या शेवटच्या हुकूमशाहीची शेवटची घरघर?
हा बेलारूसच्या इतिहासात एक महत्वाचा टप्पा ठरू शकतो.

'युरोपातील शेवटची हुकुमशाही' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेलारूसमध्ये ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात जनआंदोलनं सुरू झाले आहेत. बेलारूसमध्ये ९ ऑगस्ट रोजी झालेल्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणूकीत जवळपास २६ वर्षांपासून सत्तेत असलेले अलेक्झांडर लुकाशेंको पुन्हा निवडून आले आले आहेत. निवडणुका प्रामाणिक व पारदर्शक पद्धतीने न झाल्याची तक्रार करत लुकाशेंकोचे विरोधी उमेदवाराचे समर्थक रस्त्यावर उतरले होते. शांततामय वातावरणात आंदोलनं सुरू असताना लुकाशेंको यांच्या हातातील बाहुली असलेल्या पोलीस व सुरक्षा अधिकाऱ्यांनी आंदोलने दडपण्यास सुरुवात केली. यानंतर जे काही सुरू झाले ते बेलारूसच्या इतिहासात एक महत्वाचा टप्पा ठरू शकतो.
युक्रेन, पोलंड आणि रशियासारखे शेजारी असलेल्या बेलारूसने इतक्या मोठया प्रमाणात जनआंदोलन इतिहासात एकदाही कधीच पाहिले नाही. १९९४ पासून सतत सत्तेत असलेल्या राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको हे ८०% मतांनी जिंकून आलेले आहेत असे येथील निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. यांच्या विरोधात उभ्या असलेल्या शिक्षिका राहिलेल्या स्वेतलाना टीकानोव्ह्स्कीया यांना फक्त १०% मते मिळाली आहेत. जर मतमोजणीमध्ये पारदर्शकता असेल तर स्वेतलाना यांना किमान ६०% मते मिळत असल्याचे स्वेतलाना यांनी बोलून दाखवत त्यांनी निवडणूकीचे निकाल अमान्य केल्याचे जाहीर केले. परंतु अचानक त्यांच्या मुलांना जीवाला धोका असल्याच्या भीतीने स्वेतलाना लगेचच लिथूएनियाला निघून गेल्या आहेत.
हुकुमशाही वृत्तीच्या अलेक्झांडर लुकाशेंको यांनी दोन दशकात संपूर्ण बेलारूसचे राजकारण व्यक्तिकेंद्री आणि अधिक अधिकारशाही बनवले आहे. बेलारूसच्या राजकीय विश्लेषकांच्या मते, लुकाशेंकोचे बहुतांश मतदार हे कामगार व शेतकरी वर्गातून आहेत. निवडणुकांच्या निकालात फेरफार केल्याच्या आरोपामुळे रस्त्यावर उतरून आंदोलनं करणाऱ्या आंदोलकांना जबरीने धरपकड करून पोलिसांनी आत टाकले त्यानंतर सामान्य जनतेतून हे आंदोलन वाढत जाऊन एक मोठे जनआंदोलन बनले आहे. आजपर्यंत बेलारूसच्या विविध शहरांतून किमान लाख-दीड लाखभर लोक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. आतापर्यंत किमान ६००० आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. टीअर गॅस, रबर बुलेट्स, फ्लॅश ग्रानेड इत्यादींचा बिनधोकपणे वापर करत आंदोलनं दडपण्याचा प्रयत्न केला गेला. पोलीस आणि आंदोलकांच्यात झालेल्या संघर्षात किमान २०० जखमी व दोन आंदोलकांचा मृत्यू झाला आहे.
यानंतरही सोशल मीडियाद्वारे आंदोलकांनी जखमी व ताब्यात असलेल्या अनेकांची माहिती, फोटो पसरवत आंदोलन आणखी तीव्र केले आहे. टेलिग्राम चॅनेलवरून वेळोवेळी आंदोलकांना योग्य त्या सूचना, पोलिसांबद्दल माहिती दिली जात आहे. मागच्या आठवड्यात झालेल्या मोठ्या संघर्षानंतर काही काळासाठी बेलारूसमधील काही शहरांत इंटरनेट सुविधा ठप्प करण्यात आली. आश्चर्य म्हणजे वय, वर्ग आणि विचारधारेच्या पलीकडे या आंदोलनाला कोणताही ठळक असा चेहरा नाही. फुलं, पांढरी रिबीन्स बांधून फुगे घेऊन रस्त्यावर येणाऱ्या आंदोलकांकडे पाहून खरोखरच हे एक शांततामय जनआंदोलन आहे हे स्पष्ट होते.
जगभरातून या परिस्थितीवर टिप्पण्या आलेल्या आहेत. अमेरिका व युरोपियन युनियन यांनी निवडणुकांत झालेल्या फेरफार बद्दल शंका व्यक्त केली आहे. युरोपियन युनियनच्या नेत्यांनी बेलारूसवर काही प्रमाणात निर्बंध लावण्याचे ठरवले आहे. याबद्दल आणखी सविस्तर चर्चा पुढील काही दिवसांत अपेक्षित आहे. याआधीही ह्यूमन राईट्सच्या पायमल्लीवरून बेलारूसवर EU ने निर्बंध लावले होते, ते २०१६ मध्ये थोडेफार सैल करण्यात आले. युरोपातील नाटो देश व रशिया यांत एक बफर असलेल्या स्लाव्हीक वंशीय बेलारूसच्या सद्यस्थितीबाबत पुतीन यांनी फारशी प्रतिक्रिया दिलेली नसली तरी क्रेमलिन एकदम बारीक लक्ष ठेऊन आहे यात शंका नाही.
त्यांनी अलेक्झांडर लुकाशेंको यांना विजयाच्या शुभेच्छा देताना परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात आणण्याबाबत विधान केले आहे. तसेही अलेक्झांडर लुकाशेंको आणि पुतीन यांच्यात सहसा फारसे चांगले संबंध आहेत असे म्हणता येत नाही. कारण मागच्याच वर्षी लुकाशेंकोने रशियन राजदूताला काढून टाकले व यावर्षी ३३ जणांना रशियन मारेकरी असल्याच्या आरोप लावून ताब्यात घेतले आहे. परंतु जरी दोघांत संबंध सुरळीत नसले तरीही युक्रेन पाठोपाठ दुसऱ्या स्लाव्ह देशात लोकशाहीचे वारे वाहू लागले तर मॉस्कोपर्यंत ही लाट येण्याची शक्यता नाकारता येणार नाही हेही पुतीन जाणून आहेत.
पोलंड, युक्रेन, रशिया, रोमानिया सारख्या देशांतून बेलारूसच्या आंदोलकांसाठी सोशल मीडियाद्वारे आणि काही प्रमाणात रस्त्यावर येऊन प्रोत्साहन केले जात आहे.
कोविड-१९ च्या परिस्थितीला "माझ्या देशांत कोणीही या आजाराने मरणार नाहीत," अश्या फुशारक्या मारत हलक्यात घेणाऱ्या अलेक्झांडर लुकाशेंको यांच्या शासनावर बेलरुसीयन्स लोकांचा विश्वास नाहीसा झाला आहे. बेलारूसमध्ये आतापर्यंत ७०,००० कोवीड-१९ केसेस आणि ६०० मृत्यू अशी नोंद झाली आहे.
एकूण कैद झालेल्या आंदोलकांपैकी काही २००० आंदोलकांना मुक्त केल्याचे अलेक्झांडर लुकाशेंकोच्या सरकारने हल्लीच जाहीर केले आहे. परंतु या आंदोलनाचे अंतिम परिणाम आणि स्वरूप कसे असेल हे स्पष्ट झाले नाही. काही विश्लेषकांच्या मते हे आंदोलन नागरिकांच्या रागाचे असंतोषाचे प्रतीक आहे जे कालांतराने निवळून जाऊ शकते. काही स्वतंत्र निरीक्षांच्या मते, बेलारूसची लोकशाहीकडे जाणाऱ्या वाटचालीत ही आंदोलने एक सुरुवात ठरू शकते.