Americas

क्युबामध्ये सरकारविरोधी, सरकार समर्थक दोन्ही गट रस्त्यावर

खरं तर समाजवादी सरकार असणाऱ्या क्युबामध्ये आंदोलनं खूपच क्वचित पाहायला मिळतात.

Credit : Indie Journal

क्यूबामध्ये गेल्या काही दिवसांपासून तिथल्या सरकारच्या विरोधात जनता रस्त्यावर येऊन प्रदर्शन करताना दिसत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय वृत्त माध्यमांच्या मते गेल्या रविवारी राजधानी हवाना शहरात झालेल्या प्रदर्शनाला सरकारकडून दडपण्यात आलं, तसंच या आंदोलनांदरम्यान काही लोकांना जेरबंध करण्यात आलं होतं. समाज माध्यमांवरून लोकांनी सरकार घेरलं असून विविध क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तींनी, विशेषतः अमेरिकन हॉलिवूड नायक-नायिका तसंच वेगवेगळ्या इन्फ्लुएन्सर्सनी क्युबा सरकार विरोधात आपला निषेध नोंदवला आहेत. #SOSCUBA हा हॅशटॅग वापरत इतर देशांनी क्युबन जनतेची मदत करा, असं आवाहन देखील केलं आहे.

 

सोविएत संघाच्या विघटनानंतर फिडेल कॅस्ट्रो सरकार विरोधात हवाना शहरातले बरेच लोक आधी १९९४ साली रस्त्यावर आले होते.

 

खरं तर समाजवादी सरकार असणाऱ्या क्युबामध्ये आंदोलनं खूपच क्वचित पाहायला मिळतात. सोविएत संघाच्या विघटनानंतर फिडेल कॅस्ट्रो सरकार विरोधात हवाना शहरातले बरेच लोक आधी १९९४ साली रस्त्यावर आले होते. त्यानंतर आता २ दशकांपेक्षाही अधिक काळानंतर आता पुन्हा एकदा क्युबन जनता आंदोलन करताना दिसत आहे. पण कोव्हीडमुळं निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती आणि अमेरिकेनं लादलेल्या प्रतिबंधामुळं त्यावर मात करण्यात येणाऱ्यासमस्या, यामुळं क्युबाला पॅनडेमिक मधून बाहेर पडताना अनेक अडचणी येताना येताना दिसत आहेत. सध्याच्या आंदोलनाचं हेच मुख्य कारण असल्याचं म्हटलं जात आहे.

क्युबा समाजवादी देश असल्यानं बहुल जनता ही कल्याणकारी योजनेवर अवलंबून आहे. सर्वच प्रकारच्या उत्पादन आणि वितरण ही सरकारच्या अधीन किंवा सरकार च्या देखरेखितच होत असत. मात्र जवळपास १ कोटी असलेल्या क्युबा देशात काही भागात अन्नपुरवठा नीट होत नसल्याची तक्रार गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध भागात होत होती. दिवसातून फक्त्त काहीच तास वीज पुरवठा तसंच इंटरनेट नसल्याचंही म्हटलं जातंय. त्यात सुरुवातीच्या काळात चांगल्या पद्धतीनं कोरोना वायरस परिस्थिती हाताळणाऱ्या क्युबात सध्या सरासरीपेक्षा खूप जास्त संख्येनं केसेस आढळत आहेत.

कॅरिबियन बेट राष्ट्र असलेल्या क्युबाची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून असून, कोरोनामुळे तिथली अर्थव्यवस्था ढासळली आहे. त्यात अमेरिकासारख्या बलाढ्य साम्राज्यवादी देशानं लादलेले प्रतिबंध तसंच आंतरराष्ट्रीय पटलावर क्युबाच्या अर्थव्यवस्थेची नाकेबंदी आणि त्याचे क्युबाच्या अर्थव्यवस्थेवर एकंदरीत होणारे परिणाम, या सर्व गोष्टींमुळे जनता त्रस्त होऊन रस्त्यावर आलेली दिसत आहे.

या आंदोलनाबाबत बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले, "आम्ही क्युबाच्या जनतेसोबत आहोत, जे ऐतिहासिक मूलभूत अधिकारांसाठी साम्यवादी हुकूमशाही देशात स्वातंत्र्यासाठी लढत आहेत. कित्येक वर्षानंतर असं क्युबा मध्ये बघायला मिळतंय." यावर उत्तर देत क्युबाचे राष्ट्रपती मिगेल डियाझ कनाल रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की "जे गेल्या ६० वर्षात क्युबावर निर्बंध लावून आहेत आणि ते स्वतःला जगाचे उद्धारकर्ते कसे म्हणवून घेऊ शकतात? एकदा निर्बध हटवून बघा, की आम्ही काय केलेलं आहे, इतक्या कमी संसाधनात आणि ते ही बलाढ्य देशांशी आर्थिक युद्ध लढता लढता."

 

"जे गेल्या ६० वर्षात क्युबावर निर्बंध लावून आहेत आणि ते स्वतःला जगाचे उद्धारकर्ते कसे म्हणवून घेऊ शकतात? एकदा निर्बध हटवून बघा."

 

रविवारी देशातील वाढलेल्या असंतोषाचा आढावा घेण्याकरता कनाल त्यांच्या समर्थकांसोबत हवानाच्या रस्त्यावर निघाले होते, त्या वेळी ते लोकांना संबोधित करून, क्रांतिकार्यांनी रस्त्यांवर उतरुन प्रतिक्रांती कारवाया करणाऱ्या लोकांना धडा शिकावावा, असं आवाहन केलं. तसंच साम्राज्यवादी शक्तींपासून क्रांतीला वाचवण्याचं आवाहनही केलं.

 

 

यादरम्यान स्पेनच्या मीडिया विश्लेषक हूलियन मासीया तोवार यांनी दावा केला आहे की, क्युबा मध्ये अशांतता पसरवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून विदेशातून समाज माध्यमांवर मोहीम चालवली जात आहे. त्यांनी अर्जेंटिनाचे उजव्या विचारसरणीचे राजकीय कार्यकर्ते अगुस अँतोनेली यांचावरती आरोप केले आहेत की या अशांती मागे त्यांचा हात आहे. अँतोनेली यांनी दक्षिण अमेरिकेच्या डाव्या चळवळी आणि संघटना अस्थिर करण्याचा प्रयत्न वेळोवेळी केलेला आहे. त्याचसोबत अमेरिकेच्या वॉशिंग्टनमधून काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मॉर्गन अर्त्युखीना यांनी काही कागदपत्रं समोर आणत दावा केला आहे की अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटनं अमेरिकी सरकारकडं जवळपास ३ कोटी डॉलर्सची तरतुद मागितली होती, व या मागणीचं उद्दिष्ट, 'क्युबामध्ये असलेल्या सरकारच्या टीकाकारांना प्रोत्साहन' देणं हे असल्याचं सांगण्यात आलं होतं.  

 

 

 

दक्षिण अमेरिकेच्या टेलेसुर या न्यूज वेबसाइटवर आलेल्या एका बातमीनुसार, क्युबाच्या विरोधात चालू असलेल्या मोहिमेत रोबोट्स,अल्गोरिथम आणि नुकत्याच बनवल्या गेलेल्या समाज माध्यमांवरील अकाऊंट्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला आहे. क्युबातील इतर विरोधी पक्षांना अमेरिकेतील मायामी शहरातून विविध संघटनेकडून फंडस् येतात तसंच अमेरिकन मानवीय मदत म्हणून येणाऱ्या फंडस्चा वापर क्युबामध्ये अशांतता पसरवायला केला जात असल्याचेही आरोप केले आहेत.

 

क्युबाला जगभरातून पाठिंबा

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मारिया झखरोव्हा यांनी क्युबाच्या अंतर्गत गोष्टींमध्ये बाहेरील देशांनी हस्तक्षेप करून प्रभावित करण्याचं काम करु नये, सार्वभौमत्वाचा आदर करावा, आणि बाहेरील हस्तक्षेप अस्वीकार्य आहे, असं म्हटलं आहे.

दक्षिण अमेरिकेतील अन्य डाव्या सरकारांनी देखील अमेरिकेला खडे बोल सुनावले आहेत. बोलिव्हियाचे राष्ट्रपती लुईस आर्से अमेरिकेवर निशाणा साधत म्हणाले, "क्युबाच्या अंतर्गत समस्यांचं निवारण हे कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय क्युबन लोकांनी केलं पाहिजे. त्यांना असं करण्याचा कोणताही अधिकार नाही आहे, ज्यांनी ६० वर्षांनापासून क्युबावर निर्बंध लावले आहेत." बोलिव्हियाचे पूर्व राष्ट्रपती इव्हो मोरालेस यांनी सुद्धा म्हटलं आहे की, २०१९ मध्ये त्यांच्या सरकारचं सत्तापालट करण्यात अर्जेंटिनाचे तत्कालीन राष्ट्रपती मॉरिशिओ मौक्री आणि इक्वाडोरचे पूर्व राष्ट्रपती लेनिन मोरेनो यांनी महत्वाची भूमिका बजावली होती, ज्याचे पुरावे आता लोकांसमोर आलेले आहेत. मोरालेस यांच्या मते, क्युबामध्येही हाच कट रचण्यात आला आहे.

 

दक्षिण अमेरिकेतील अन्य डाव्या सरकारांनी देखील अमेरिकेला खडे बोल सुनावले आहेत.

 

निकारागुआचे राष्ट्रपती डॅनियल आर्तोगे म्हणाले, क्युबाचं चित्र बघता कळत आहे की, क्युबामधील अस्थिरता साम्राज्यवादी शक्तींनी घडवून आणली आहे. "अमेरिका जगात अशांती पसरवणारा देश आहे, त्याला क्युबा मध्ये हष्टक्षेप करण्याच्या किंवा क्युबा बद्दल बोलण्याचा काहीच अधिकार नाहीये," ते पुढं म्हणाले.

मेक्सिकोचे राष्ट्रपती आंद्रेज मॅन्युएल लोपेझ ओब्रादोर म्हणाले, "आम्ही क्युबाच्या सरकार आणि जनतेसोबत आहोत. या समस्येचं निवारण कोणत्याही हिंसेशिवाय क्युबन लोक करतील. क्युबा सार्वभौम देश असून इतर देशांनी त्याच्या सार्वभौमत्वाचा आदर करावा.