Americas

ब्राझीलची जनता राष्ट्रपती हैर बोल्सनारो विरोधात रस्त्यावर

ही निदर्शनं रस्त्यावरच मर्यादित न राहता समाज माध्यमांवर आणि जगातील अनेक देशांमधल्या ब्राझीलच्या दूतावासांबाहेर देखील झाली.

Credit : Politika

नेहमी वादग्रस्त भाषणं आणि धोरणांमुळे वादात असणारे अति-उजवे पुराणामतवादी ब्राझीलचे राष्ट्रपती हैर बोल्सनारो यांच्या विरोधात काल ब्राझीलच्या शहरांमध्ये लोक रस्त्यांवर उतरले होते, "रक्तपिपासू बोल्सनारो खुर्ची सोडा, उपासमार आणि बेरोजगारी वाढवणारं सरकार बाहेर पडा," अशा विविध घोषणा देताना जनता दिसली. 

ब्राझीलमध्ये बोल्सनारो सरकारकडून कोरोनाच्या काळात झालेल्या गहाळ कारभार आणि गैरव्यवस्थापनामुळे २१ कोटी जनसंख्या असणाऱ्या ब्राझीलमध्ये ५ लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, आणि आतापर्यंत १ कोटी ७० लाख लोक कोव्हिडनं संक्रमित झाले आहेत.

“हा जनतेचाआक्रोश आहे, आणि लोक बोल्सनारोला धडा शिकवणार आहेत,” असं ब्राझिलियन वर्कर्स पार्टीच्या अध्यक्षा ग्लेईसी हॉफमन म्हणाल्या. 

काल झालेली विरोध निदर्शनं डाव्या पक्षांनी आयोजित केली होती. त्यात कामगार युनिअन, विध्यार्थी संघटना तसंच सामान्य जनतेनं भाग घेतला होता. ही निदर्शनं रस्त्यावरच मर्यादित न राहता समाज माध्यमांवर आणि जगातील अनेक देशांमधल्या ब्राझीलच्या दूतावासांबाहेर देखील झाली. 

बोल्सनारो यांच्या विरोधात सिनेट सदस्यांची कमिटी निवडली गेलेली आहे, जे बोल्सनारो यांनी केलेला गहाळ कारभार तसंच गैरव्यवस्थापनाबद्दलचा अहवाल सादर करणार आहेत, आणि कायदेशीर लढाई लढणार आहेत. त्यामुळे बोल्सनरो सरकारच्या अडचणीत अधिक भर पडेल अशी शंका आहे.  

त्यात बोल्सनारो सरकार कोरोनासारख्या जागतिक आपत्तीबद्दल अजूनही गंभीर नसल्याचं चित्र दिसत आहे. त्यात त्यांची अवैज्ञानिक विधानं लोकांना नेहमीच गोंधळात टाकतअसतात. 

 

१) “दळणवळणावरती निर्बंध लावणं हा भेकडपणा आहे.”

(एप्रिल २४, २०२१: कोव्हीड निर्बंधाबद्दल बोलताना.)

२) “९० टक्के लोकांसाठी हा एक साधारण फ्लू आहे.”

(मार्च २७, २०२०: त्यांच्यामते शारिरीकरित्या कमजोर असणाऱ्या लोकांनाच कोरोनाचा त्रास होणार आहे.)

३) “तर काय? माफ करा पण मी काहीही एक करू शकत नाही, माझं नाव मसीहा(बोल्सनरो ह्यांचे दुसरे नाव) असलं, तरी मी चमत्कार घडवू शकत नाही.”

(एप्रिल २५, २०२०.)

४) “मृतांबद्दल मला माफ करा, पण आपण सर्वच एक दिवस मरणार आहोत, इथला प्रत्येक जण कधीनाकधी मारणार आहे, आपण वास्तवाला सामोरं जायला शिकायला हवं. आपण पळ काढू शकत नाही.”

(एप्रिल २८, २०२०)

५) “कोरोनाच्या लसी मुळे जर कोणाचं मगरीत रूपांतर झालं, कोणी सुपरमॅन बनलं किंवा कोणत्या बाईला दाढी आली, तर त्याची जबाबदारी सरकार घेणार नाही.” 

(नोव्हेंबर १०, २०२१: कोरोनाच्या लसीनंतरच्या परिणामांबद्दल बोलताना) 

६) “मी कोरोनामधून फक्त्त हैड्रोक्लोरीकीन औषधानं बरा झालो, कदाचित मी जगातील एकमेव राष्ट्रप्रमुख असेन ज्यानं असं केलं असेल. मी हट्टी आहे आणि मी मागे हटणार नाही”  

(एप्रिल ७, २०२०: ज्यावेळी कोरोनाने ३ लाख ४० हजार लोक कोरोनानं मृत झाले होते.)

 

अशी अनेक वादग्रस्त विधानं त्यांनी केली आहेत. त्यात त्यांनी ऍमेझॉनच्या आदिवासी लोकांची खिल्ली उडवली होती तसंच ९ कोटी पेक्षा जास्त म्हणजेच ब्राझीलची अर्धी जनसंख्या कृष्णवर्णीय असताना देखील त्यांनी वांशिक टिप्पणी केली होती. २०२२ मध्ये ब्राझील मध्ये निवडणूका आहेत, आणि बोल्सनारो यांच्या लोकप्रियतेत घट झाल्याचं दिसत आहे.