India

बीडमध्ये चोरीच्या आरोपातून पारधी कुटुंबावर जमावाचा हल्ला

ही घटना २५ तारखेच्या रात्री घडली.

Credit : indie journal

पाटोदा। बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील पारनेर या गावात शनिवारी एका पारधी वस्तीवर काही लोकांनी हल्ला केला, या हल्ल्यात १ वर्षीय लहानग्याचा आणि एका ६८ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला असून, आठ ते दहा लोक जखमी झाले आहेत. ही घटना २५ तारखेच्या रात्री घडली असून त्यानंतर १० जणांना अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि हत्येच्या कलमांतर्गत ताब्यात घेण्यात आलं आहे. 

अरुण काळे (३२), यांनी काही दिवसांपूर्वी गावातील भगवान औटे यांचं बोकड चोरलं होत, त्या वेळी झालेल्या हाणामारीत अरुण काळे याने भगवान यांच्यावर चाकूने हल्ला केला होता, या हल्ल्यात भगवान औटे जखमी झाले आणि त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अरुण काळेवर वेळोवेळी अशा चोऱ्यांचे आरोप होत आले आहेत असं पाटोदा पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. 

गावातील अशोक दहिवले, बबन औटे, बाळू औटे, कचरू औटे, विनोद, युवराज आणि विष्णू औटे आणि इतर १० ते १२ जणांनी अरुण यांच्या घरात येऊन त्यांना जातीवाचक शिव्या देत घरातील सर्वांना काठ्यांनी अमानुषपणे मारहाण करण्यास सुरुवात केली, तसेच त्यांच्या मालमत्तेचं नुकसान केलं. याच मारहाणीत एक वर्षीय सिद्धांत अरुण काळे याच्या डोक्याला जखम झाल्याने त्याचा मृत्यू झाला व देवराबाई काळे, तारामती काळे, सोजरबाई भोसले, विधी भोसले आणि करिष्मा चव्हाण या महिला जखमी झाल्या आहेत. त्यांना बीड जिल्हा रुग्णालायात भरती केलं असून त्यांच्यावर तिथे उपचार सुरु आहेत. तर जखमी झालेले अकीमान काळे (६८) यांचा २७ सप्टेंबर म्हणजेच घटनेच्या २ दिवसानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला.     

या प्रकरणी भिवराबाई अकीमान काळे (६५) यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींवर गु.र.नं. १७०/२०२१, कलम ३०२, ३०७, ३२४, १४७, १४८, १४९, ५०४, ५०८ सोबतच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१५ असा गुन्हा दाखल करण्यात आला. 

 

 

दलित अत्याचारविरोधी कार्यकर्ते व लेखक केशव वाघमारे सांगतात, "पारधी समूहातील लोकांना नेहमीच चोरी आणि इतर घटनांमध्ये गृहीत धरलं जातं. आपण या घटनेत गृहीत जरी धरलं की एका पारधी व्यक्तीने चोरी केली होती, पण मुद्दा हा आहे की, या घटनेत पोलिसांना कायदेशीर कारवाई करु द्यायची होती. या हल्लेखोरांना कोणी अधिकार दिला की, ४०-४५ लोक जातात आणि संपूर्ण वस्तीवर हल्ला करतात?" 

वाघमारे पुढे म्हणतात, "जर हा फक्त्त चोरीचा वाद होता, तर त्या एक वर्षाचा बाळाचा त्यात काय दोष होता? ६८ वर्षीय वृद्ध माणसाला जीवे मारणं, तसेच १३ वर्षीय मुली पासून ते महिलांपर्यंत मारहाण करणं ही माणुसकीला काळिमा फासणारी गोष्ट आहे. हा जो गुन्हा आहे, हा बाल हत्याकांडाचाही आहे."  

"एखाद्या पारधी कुटुंबाकडे थोडीशी जमिन आहे असं असेल, तर बऱ्याचदा असं होतं की ही जमीन कोणाला तरी हवी असते, बळकवायची असते. त्यातही एखाद्या पारधी व्यक्तीकडे जमीन असणे हे काही लोकांना बघवत नाही. या लोकांना अशाप्रकारे धमकावून यांना गावाबाहेर कडून ती जमीन लाटण्याचेदेखील प्रयत्न होत असतात आणि अशात शेळीची चोरी यासारखी निमित्त करून या जमीनी लाटण्याची उदाहरणे देशभरात अनेक आहेत," असं वाघमारे पुढे सांगतात.

स्वातंत्र्योत्तर इतिहासात १९७८ च्या एका सरकारी आदेशानुसार पहिल्यांदाच पारधी आणि मातंग समाजातील व्यक्तींना काही गायरान जमिनींचे सातबारे मिळाले. ती जमीन पारधी कुटुंबाच्या नावावर झाल्यानंतर गावातील काही सवर्ण मंडळी त्याबाबत अनेक वर्षांपासून द्वेष मनात धरून आहेत. त्यातूनच अशा घटना वारंवार या पट्ट्यामध्ये घडताना दिसतात असं अनेक अभ्यासातून समोर आलेलं आहे. 

याविषयी बोलताना बीडमधील सामाजिक कार्यकर्ते आणि भटक्या विमुक्त समूहांसाठी काम करणारे अशोक तांगडे म्हणतात, "त्या गावामध्ये याआधीही दलितांवर अत्याचार झालेला आहे, हे गाव अशा अत्याचाराच्या गोष्टींमूळे कुप्रसिद्ध आहे. हे जे पीडित पारधी कुटुंब आहे, यांच्याकडे स्वतःची जमीन आहे, स्वतःच्या शेळ्या आहेत. त्यांचं स्वतःचं चांगलं घर आहे, ते शेळीपालनाचा व्यवसाय करतात. यांचा व्यवसाय नीट कसा चालू आहे, याचा राग धरुन गावकऱ्यांनी सामूहिकपणे केलेला हा हल्ला आहे."

 

 

"उलट या समूहांनी खूप काळाआधीच चोऱ्या सोडलेल्या आहेत व ते स्थायिक झालेले आहेत. ते कायदेशीर जीवन जगत असताना, तुम्हाला का असं वाटतं कि त्यांनी पुन्हा चोऱ्या करायला पाहिजे? पारधी हे इथले सॉफ्ट टार्गेट आहेत. अशा अत्याचाराच्या छोट्या-छोट्या घटना तर घडतच असतात अगदी रोजच्या रोज, ज्या कधी रेकॉर्डवर येत नाहीत. जर चोरी केली होती तर कायद्यानं कारवाई करायला हवी होती, संपूर्ण गाव उठून मारायला येतं. यात एका बाळाचा, एका वृद्धाचा मृत्यू होते, स्त्रियांना मारहाण होते, म्हणजेच हा विषय नक्कीच फक्त्त चोरीचा नाही," अशी शंका तांगडे पुढे व्यक्त करतात. 

वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी बबन वडमारे इंडी जर्नलशी बोलताना म्हणाले, "हा हल्ला गावकऱ्यांनी एक बैठक घेऊन अगदी ठरवून केलेला आहे. हा हल्ला जातीय द्वेष भावनेनेच करण्यात आलेला आहे. अशा जाचाला मागास जातींना नेहमीच सामोरं जावं लागतं आणि या प्रकरणात जितके प्रस्थापित पक्ष आहेत, ते आरोपींना पाठीशी घालू इच्छित आहेत. पारधी समाजावर आणि पोलीस यंत्रणेवर दबाव आणून तपासाची दिशा भरकटवण्याचं काम हे पक्ष करत आहेत. वंचित बहुजन आघाडी या घटनेचा निषेध करते."     

याबाबत त्यांचं मत जाणून घेण्यासाठी स्थानिक आमदार व भारतीय जनता पक्षाचे नेते सुरेश धस, यांना वारंवार संपर्क करण्याच्या प्रयत्नांनंतरही त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. बीडमधील केज तालुक्यात मांगावडगाव याठिकाणी गेल्यावर्षी देखील अशा प्रकारचं पारधी हत्याकांड घडलं होत, त्या बद्दलदेखील इंडी जर्नलने वार्तांकन केले होते.