India

बीड जिल्ह्यात क्षुल्लक कारणावरून १५-वर्षीय मुलाची हत्या

आरोपींनी ६ महिन्यांपूर्वीही याच कारणासाठी गुलामची मारहाण केली होती.

Credit : इंडी जर्नल

 

फक्त येण्या-जाण्यासाठी त्याच्या शेताचा वापर करत असल्याच्या करणावरून बीडमधील एका १५-वर्षीय मुलाला मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

आधी इशारा दिल्यानंतरही आपल्या शेताचा वापर ये जा करण्यासाठी वापरतो, या कारणावरून तीन शेतकऱ्यांनी एका अल्पवयीन मुस्लिम मुलाचा मारहाण करून खून करून त्याला आत्महत्या दर्शवण्याचा प्रयत्न करण्याची केला. मंगळवारी (१८ एप्रिल) बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यातील नित्रुड गावात ही घटना घडली. गुलाम मोहंमद‎ मुर्तजा शेख असं या १५-वर्षीय-मुलाचं नाव आहे.

गुलाम सकाळी ७ वाजता त्याच्या आजोबांच्या शेतात सरपण आणण्यासाठी गेला होता. बरोबर त्याचा भाऊ समरीन (१३) आणि बहीण‎ हुजेफा (१२) होते. तिथून परत येत असताना ८.३० ते ९‎ वाजेच्या सुमारास गुलाम व त्याच्या भावंडास‎ शेतातून ये-जा का करता, म्हणत आरोपी पिंटू ऊर्फ‎ कैलास शिवाजी डाके, महादेव सुंदर डाके‎ (दोघे रा. नित्रुड) व हनुमंत वानखेडे‎ (रा. टालेवाडी, ता. माजलगाव) या‎ तिघांनी मारहाण‎ करायला सुरुवात केली.

त्यानंतर गुलामच्या लहान भावंडांनी घराकडे धाव‎ घेतली आणि घरच्यांना दत्ता‎ माणिक डाके यांच्या शेतात तिघे गुलामला मारहाण‎ करत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर वडील‎ मुर्तजा शेख (५२) घटनास्थळी‎ निघाले असता तिथं त्यांचे नातेवाईक आधीच उपस्थित होते. त्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी पिंटू ऊर्फ कैलासनं नातेवाईकातील एकाला फोन‎ करून गुलामनं फाशी घेतली असल्याचं सांगितलं.

नातेवाईक‎ तिथं पोहचले असता आरोपी महादेव ‎तिथून पळून गेला होता तर पिंटू व हनुमंत गुलामला‎ झाडाला लटकवत होते. ते दोघं देखील‎ पळून जाण्याच्या तयारीत होते,‎ असं फिर्यादीत म्हटलं आहे.‎ बीडमधील माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड ठाण्यात या संदर्भात तक्रार‎ नोंदवली असून खटल्याचा तपास दिंद्रुड ठाण्याचे सहायक पोलीस‎ निरीक्षक अण्णासाहेब खोडेवाड करत‎ आहेत.‎

 

 

खुनाचा प्रकार समोर आल्यानंतर आसपासच्या गावातील मुस्लिम समुदायातील नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर जमा होऊन आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळं परिस्थिती काही काळ चिघळली होती. मात्र पोलिसांनी तात्काळ तिघांवर गुन्हा दाखल केला. गुलाम याच्या कुटुंबीयांशी यासंदर्भात कोणताही संपर्क होऊ शकला नाही.

"हा जमिनीच्या वादातून घडलेला गुन्हा आहे. यात हिंदू मुस्लिम असे पक्ष असले तरी हा सांप्रदायिक मुद्दा नाही. केवळ जमिनीचा वाद आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. काही काळासाठी परिस्थिती बिघडली होती. मात्र आता सर्व शांत आहे," सहायक पोलीस‎ निरीक्षक खोडेवाड यांनी माहिती दिली. स्थानिक पत्रकारांनीही खोडेवाड यांनी दिलेल्या माहितीला दुजोरा दिला.

समाजवादी पक्षाचे बीडचे जिल्हाध्यक्ष मुजम्मिल पटेल यांनी सुद्धा ही हत्या केवळ वैयक्तिक वादातून झाल्याचं म्हणलं आहे. "आरोपीच्या शेतापासून थोड्या अंतरावर गुलामच्या आजोबांची जमीन आहे. त्या शेतात जाण्यासाठी गुलामनं याआधीही आरोपीच्या शेताचा वापर केला होता. ही बाब आरोपीला आवडत नव्हती. त्यामुळं सहा महिन्यापूर्वीसुद्धा असा प्रकार घडला होता," पटेल सांगतात.

"आरोपी कैलासनं मृत गुलामला सहा महिन्यापूर्वी शेताचा वापर येण्या जाण्यासाठी करतो या कारणामुळं झाडाला बांधून मारहाण केली होती. मात्र त्यावेळी गावातील लोकांनी आरोपीला समज देऊन प्रकरण मिटवलं होतं. गुलामच्या आजोबांच्या शेतात जाण्यासाठी दुसरा रस्ता आहे. पण वेळ वाचवण्यासाठी बऱ्याच वेळा आरोपीच्या शेतातून गुलाम आणि त्याचे भावंडं ये-जा करत होते. ही बाब आरोपीला पटत नव्हती," पटेल पुढं सांगतात.

"या खुनाला धार्मिक किंवा सांप्रदायिक रंग देण्याचा प्रयत्न समाजमाध्यमांवर होतं आहे. मात्र हा त्यातला प्रकार नाही. माजलगाव एकोप्यानं नांदणारं शहर आहे. इथं कोणत्याही प्रकारचा धार्मिक तणाव नाही," पटेल म्हणतात.

गुलाम इयत्ता नववीत शिकत होता. त्याचे वडील मुर्तजा शेख मजूर म्हणून काम करतात. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपींना माजलगाव न्यायालयानं २ दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवलं आहे.