Asia

स्वातंत्र्य सैनिकांच्या नातवांना दिलेल्या आरक्षणामुळे बांगलादेशचे विद्यार्थी रस्त्यावर; सहा मृत, चारशेहून अधिक जखमी

२०१८मध्ये बांगलादेश सरकारनं नोकर भरतीमध्ये हे आरक्षण लागू करण्याचं ठरवलं होतं.

Credit : Indie Journal

 

गेल्या काही दिवसात बांगलादेशमध्ये आरक्षणाविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनात तीन विद्यार्थ्यांसह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून, चारशेहून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. आंदोलनाची तीव्रता पाहता सरकारनं देशातील सर्व शाळा आणि विद्यापीठं अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. मानवाधिकार संस्थांनी बांगलादेशमध्ये निर्माण झालेल्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. 

२०१८मध्ये बांगलादेश सरकारनं सरकारी नोकऱ्यांसदर्भात एक निर्णय घेत नोकर भरतीमध्ये आरक्षण लागू करण्याचं ठरवलं होतं. या निर्णयानुसार बांगलादेशमधील ५६ टक्के सरकारी जागा आरक्षणासाठी राखीव आहेत. त्यात १० टक्के जागा या महिलांसाठी, १० टक्के जागा अविकसित जिल्ह्यातील रहिवाशांसाठी, ५ टक्के जागा आदिवासी समुहांसाठी, तर १ टक्के जागा दिव्यांगासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. 

शिवाय या आरक्षणात एकूण नोकऱ्यांच्या ३० टक्के जागा या १९७१च्या बांगलादेश मुक्ती संग्रामत सहभागी स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांसाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. या निर्णयाला २०१८ मध्येदेखील विद्यार्थ्यांकडून मोठा विरोध झाला होता. अनेक दिवस चाललेल्या आंदोलनामुळे या निर्णयला सरकारनं तात्पुरती स्थगिती दिली होती.

मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीत ढाका उच्च न्यायालयानं ही स्थगिती हटवली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या निर्णयाला एक महिन्याची स्थगिती दिली आहे, मात्र या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्याऐवजी तो कायमस्वरुपी मागे घेण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थी आता करत आहेत. 

 

 

'देशातील पिछाडलेल्या घटकांसाठी, जसं की महिला, अल्पसंख्यांक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी आम्हाला आरक्षण आम्हाला मान्य आहे, मात्र स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना आरक्षण देणं म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणं,' असं विद्यार्थ्यांचं मत आहे. बांगलादेशमध्ये सध्या बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार बांगलादेशच्या १७ कोटी लोकसंख्येपैकी ३.२ कोटी विद्यार्थी सध्या बेरोजगार आहेत.

त्यात आता सरकारनं जर सरकारी नोकऱ्यांमध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांसाठी आरक्षण दिल्यास त्यांना पुरेशी संधी मिळणार नाही, अशी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भावना आहे.

शिवाय या स्वातंत्र्य सैनिकांच्या यादीत गोंधळ घातला जाऊ शकतो आणि त्याचा फायदा चुकीची लोकं उचलू शकतात, असं विद्यार्थी म्हणत आहेत. त्यामुळं गुणवत्तेवर आधारित नोकरभरती व्हावी, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. तर काहींच्या मते या स्वातंत्र्य सैनिकांच्या आरक्षणाचा फायदा पंतप्रधान हसिना शेख यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना होईल, अशी चिंता टीकाकार व्यक्त करत आहेत. शेख यांच्या अवामी पक्षानं बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भुमिका बजावली होती. 

"जर देशात स्वातंत्र्य सैनिकांच्या नातवांना फायदा मिळणार नसेल, तर काय रझाकारांच्या नातवांना मिळणार का?" असा प्रश्न शेख हसिना यांनी एका पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केला. १९७१च्या युद्धात पाकिस्तानी सैन्याला मदत करणाऱ्या लोकांना बांगलादेशमध्ये 'रझाकार' म्हटलं जातं आणि त्यांना देशद्रोही मानलं जातं. विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांनी केलेल्या टीकेला अपमानजनक म्हटलं.

रविवारी रात्री हजारो विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. "तुम्ही कोण? तुम्ही कोण? आम्ही रझाकार, आम्ही रझाकार" अशा घोषणा यावेळी विद्यार्थ्यांनी दिल्या. ही घोषणा १९७१ मध्ये दिलेल्या "आम्ही कोण? बंगाली" या घोषणेसारखी आहे, असं जाणकार नोंदवतात. त्याचवेळी हसिना शेख यांनी अशा घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांना देशाचा इतिहास माहित नसल्याचं म्हटलं आहे. 

 

 

शिवाय शेख हसीना आणि त्यांच्या पक्ष या हे आंदोलन विद्यार्थी आंदोलन नसून त्यामागे बांगलादेशचा मुख्य विरोधी बांगलादेश नॅशनॅलिस्ट पक्ष असल्याचा आरोप करतात. तर बांगलादेशच्या विरोधी पक्ष आणि त्यांच्या विद्यार्थी संघटनेनं विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं आहे.

सोमवारी ढाका विद्यापीठात अवामी लीगच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि आंदोलन करत असलेल्या विद्यार्थांमध्ये झटापट झाली. या झटापटीत १०० हुन अधिक विद्यार्थी जखमी झाले. याशिवायही अनेक ठिकाणी दोन्ही गटांमध्ये झटापटी झाल्या आहेत आणि त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दवाखान्यात भरती करावं लागलं आहे. या झटापटीत काही पोलीसदेखील जखमी झाल्याचं म्हटलं जात आहे. 

या आंदोनलांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे, त्यात तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पाच मृतांपैकी एक मृत्यू ढाकात, तीन चित्तगावमध्ये, तर एक मृत्यू रंगपूरमध्ये झाला आहे. हे सर्व मृत्यू पोलीस कारवाईदरम्यान झालेले आहेत. शिवाय अनेक विद्यार्थी पोलीसांनी झाडलेल्या रबरी गोळ्या, केलेला लाठीचार्ज आणि आश्रुधुराच्या कांड्यांमुळे जखमी झाले असल्याचं म्हटलं जात आहे. 

त्यानंतर वाढत्या तणावामुळे बांगलादेश सरकारनं ठिकठिकाणी दंगल नियंत्रण पथक आणि अर्धसैनिक बळांना तैनात केलं आहे. या आंदोलनांमुळे चौथ्यांदा देशाच्या पंतप्रधान झालेल्या हसिनांवर जगभरातून टीका होत आहे. हसिना यांच्या पक्षानं जानेवारीमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकल्या होत्या. मात्र या निवडणुकीत मुख्य विरोधी पक्षानं सहभाग घेतला नव्हता, शिवाय विरोधी पक्षांवर निवडणूक काळात कारवाई करून त्यांच्यावर बंधनं आणण्याचा आरोप हसिनांवर झाला आहे. 

 

 

यानंतर अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांनी सरकारकडून केल्या जात असलेल्या कारवाईची टीका केली आहे. अ‍ॅमनेस्टी इंटरनॅशनल या मानवाधिकार संघटनेनं सर्व आंदोलकांच्या सुरक्षेची हमी मागितली आहे. तर अमेरिकन सरकारचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सरकारकडून वापरल्या गेलेल्या बळाचा निषेध केला आहे. दरम्यान, सुरू असलेल्या आंदोलनाबाबत अमेरिका निराधार दावे करत असल्याचं बांगलादेशनं म्हटलं.