India

भारत चीन सीमा 'स्थिर मात्र संवेदनशील': लष्कर प्रमुख

भारतीय लष्कराचे प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी पत्रकार परिषदेत भारताच्या सुरक्षा स्थितीचा मागोवा घेतला.

Credit : इंडी जर्नल

 

भारतीय लष्कराचे प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी आज भारताची उत्तरेची सीमा म्हणजेच भारत चीन सीमा 'स्थिर मात्र संवेदनशील' असल्याचं म्हटलं. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी भारताच्या सुरक्षा स्थितीचा मागोवा घेतला. यावेळी मणिपूरमध्ये वारंवार हिंसाचाराच्या घटना घडत असल्या तरी परिस्थिती चांगली असल्याचं त्यांनी म्हटलं. भारत-चीन सीमेवर अजूनही काही प्रमाणात तणाव असल्याचं त्यांनी मान्य केलं.

द्विवेदी भारतीय सैन्याचे ३०वे लष्करप्रमुख आहेत. त्यांनी ३० जून २०२४ रोजी या पदाचा कार्यभार घेतला. लष्करप्रमुख होण्याआधी त्यांनी उपप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली आणि तसंच त्यांनी काही काळासाठी भारतीय सैन्याच्या उत्तर कमांडचे प्रमुख म्हणूनही काम केलं. आज झालेली पत्रकार परिषद ही दरवर्षी वर्षाच्या सुरुवातीला लष्करप्रमुखांकडून घेतली जाणारी पत्रकार परिषद होती. द्विवेदी लष्करप्रमुख झाल्यानंतर पहिल्यांदाच ते माध्यमांसमोर येऊन बोलत होते.

यावेळी बोलताना त्यांनी भारत चीन, भारत पाकिस्तान आणि भारत म्यानमार सीमेवर सध्या असलेल्या स्थितीबद्दल माहिती माध्यमांना दिली. यात मुख्यत्वे भारत-चीन दरम्यान असलेली 'वास्तविक नियंत्रण रेषा' (एलएसी) स्थिर असली तरी त्यावर काही प्रमाणात तणाव असल्याचं मान्य केलं.

"भारत चीन सीमा गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापासून देपसांग आणि देमचोक मधील परिस्थिती संवेदनशील मात्र स्थिर आहे. या दोन भागात भारताकडून नेहमीप्रमाणे गस्त घातली जात आहे. शिवाय स्थानिकांकडून काही प्रमाणात गायरानाचा वापर होत आहे. तुमच्या ठिकाणी उद्भवणारे वाद शक्यतो तुमच्या पातळीवर सोडवा, अशी सूचना मी स्थानिक सैन्य अधिकाऱ्यांना दिली आहे," द्विवेदी म्हणाले.

 

ऑक्टोबरमध्ये भारत आणि चीनमध्ये झालेल्या चर्चेनंतर लडाख भागातील एलएसीवर काही प्रमाणात सैनिकांची तैनात कमी करण्यात आली होती.

 

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारत सरकार आणि चीन सरकारमध्ये झालेल्या चर्चेनंतर लडाख भागातील एलएसीवर काही प्रमाणात सैनिकांची तैनात कमी करण्यात आली होती, मात्र त्या सैनिकांना त्यांच्या मुळ छावणीत माघारी जाण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत. म्हणजेच २०२० पुर्वीची स्थिती अद्याप निर्माण झालेली नाही. २०२० आधी ज्या भागापर्यंत भारतीय सैन्य गस्त घालत होतं, त्यातील काही ठिकाणांवर गस्त घालण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये करार झाले होते. मात्र त्यानंतर स्थितीत कोणतीही सुधारणा झाली नसल्याचं लष्करप्रमुखांनी केलेल्या वक्तव्यानंतर स्पष्ट झालं.

द्विवेदी यांना एलएसीवर सैनिकांच्या तैनातीत काही घट करण्याच्या विचारात आहे का, असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी दिलेल्या उत्तर त्यांनी दिलेल्या उत्तरात "हिवाळ्यात सैनिकांच्या संख्येत घट करण्याच्या विचार नाही, उन्हाळ्याच्या सुरुवातीला यावर पुनर्विचार करू, दोन्ही पक्षांमध्ये (भारत आणि चीन) काय चर्चा होते, यावर ते अवलंबून राहिलं," असं स्पष्ट केलं.

गेल्यावर्षी भारत आणि चीनमध्ये झालेल्या करारानंतर देपसांग आणि देमचोक या गस्तीच्या ठिकाणांवर गस्त पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मात्र हॉट स्प्रिंग, गलवान, गोग्रा, आणि पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्याबाबतीत कोणतीही प्रगती झाली नसल्याचं द्विवेदी यांच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट झालं.

जम्मू आणि काश्मीरमध्ये परिस्थिती नियंत्रणात असल्याचं यावेळी बोलताना लष्करप्रमुख म्हणाले. "भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवरील सीमेवर फेब्रुवारी २०२१ पासून लागू असलेली शस्त्रसंधी अजून कायम आहे. मात्र पाकिस्तानकडून दहशतवादाला अजूनही पाठिंबा दिला जात असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा फक्त नियंत्रण रेषाच नाही, तर आंतरराष्ट्रीय सीमेच्या दुसऱ्या बाजूला दिसतात," असं द्विवेदी यांनी नोंदवलं.

 

 

गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये मारल्या गेलेल्या एकूण दहशतवाद्यांपैकी ६० टक्के दहशतवादी हे पाकिस्तानचे नागरिक होते, हे अधोरेखित करत सध्या काश्मीर खोऱ्यात कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांपैकी ८० टक्के दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. काश्मीरमध्ये सर्व स्थिती नियंत्रणात असून पर्यटनाचा विकास आणि नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांकडं पाहता ही सकारात्मक बदलाची चिन्हं असल्याचं ते म्हणाले.

यावेळी त्यांनी ईशान्य भारतातील आणि मणिपूरमधील परिस्थितीवरदेखील माहिती दिली. ईशान्य भारतातील परिस्थिती हळूहळू सुधारत असल्याचं ते म्हणाले. "मणिपूरमध्ये सर्व सुरक्षा दल आणि सरकारच्या एकत्रित प्रयत्नांमुळं परिस्थिती नियंत्रणात आहे. काही हिंसाचाराच्या काही घटना होत आहेत. तरी शांतता आणि सद्भावना स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी अनेक सेवभावी संस्था आणि निवृत्त सैन्य अधिकारी देखील सलोख्यासाठी त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न केले आहेत," मणिपूरमध्ये असलेल्या सध्याच्या स्थितीची माहिती देताना ते म्हणाले.

त्याचवेळी भारत आणि म्यानमार सीमेवर सैन्याकडून ठेवली जाणारी पाळत वाढवली असल्याचं द्विवेदींनी सांगितलं. 'सध्या म्यानमारमध्ये सुरू असलेला हिंसाचार ईशान्य भारतात पसरू नये,' यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यासाठी म्यानमार सीमेवर कुंपण घातलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

भारतीय लष्कराकडून आधुनिकीकरणासाठी उचलली जात असणारी पावलं, यावर्षातील उद्दिष्टे आणि सैन्याकडून केल्या जाणाऱ्या कारवायां आणि सुधारणांबद्दल त्यांनी या पत्रकार परिषदेत माहिती दिली.